संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत 28 नोव्हेंबर 2012 रोजी एक ठराव संमत झाला. पुढील वर्षी 21 मार्च 2013 रोजी जगातला पहिला आंतरराष्ट्रीय वन दिवस साजरा करण्यात आला. हजारो वर्षांपासून जागतिक पर्यावरणात नैसर्गिक योगदान देणार्या विविध प्रकारच्या वनांना सात वर्षांपूर्वी एक हक्काचा दिवस मिळाला. तेव्हापासून दर वर्षी 21 मार्च हा ‘आंतरराष्ट्रीय वन दिवस’ म्हणून साजरा केला जातो. आज जगाच्या पाठीवर 30% जमीन वनक्षेत्रांनी व्याप्त आहे. 30% वनक्षेत्र विविध प्रकारच्या 60 हजार वृक्षांनी व्याप्त आहे. अद्यापही वनक्षेत्रातील जीवविविधतेची नेमकी संख्या सांगता येणे अशक्य आहे. 30% वनक्षेत्रात जीवविविधता तर आहेच, शिवाय वनांचे प्रकारसुद्धा वेगळे आहेत. प्रत्येक देशात स्थानिक हवामान, पर्यावरण यांच्यानुसार वनांचे प्रकार आढळतात. भारतात मात्र जगातील सर्व प्रकारची वने आढळून येतात. भारतातील हवामान व पर्यावरण बघता निसर्गाने भारताला दिलेले हे वरदानच आहे. वैदिक काळापासून भारताने आपल्या वनांचे संवर्धन केले आहे. अगदी प्राचीन काळापासून ते आज विद्यापीठात आढळणारे संवर्धनाचे अभ्यासक्रम त्याची साक्ष देताहेत. थोडक्यात, वनांचे महत्त्व, संवर्धन, जीवविविधतेचा निरक्षरतेपासून सुरू असलेला प्रवास आज उच्चविद्याविभूषित आहे.
अभ्यासकांनी वनांची अनेक विभागात शास्त्रीय विभागणी केली आहे. त्यात वर्षावने अथवा पर्जन्यवने आपले वेगळे नैसर्गिक अस्तित्व ठेवून आहेत. भारतात भौगोलिक रचनेत तीन वनक्षेत्रांचा प्रामुख्याने उष्णकटिबंधीय वर्षावनात समावेश होतो. अंदमान निकोबार, पश्चिम घाट व ईशान्येकडील काही वनक्षेत्रे. वर्षावनांच्या निकषाची अनेक शास्त्रीय कारणे अभ्यासकांनी दिली आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण अहवालात वर्षावनांची व्याख्या दिली आहे. त्यानुसार प्रचंड पर्जन्यवृष्टी होणारे अथवा वर्षातून दोन महिने पर्जन्यमान कमी असणारे वनक्षेत्र हे वर्षावन म्हणून संबोधले गेले आहे. थोडक्यात, वर्षभर सामान्य ते असामान्य पर्जन्यमान असलेली वने वर्षावनात मोजली जातात. वर्षावनांच्या जमिनीवर आकाशाला गवसणी घालणार्या उंच वृक्षांचा थर इतका घनदाट असतो की सूर्यप्रकाशसुद्धा जमिनीवर पोहोचत नाही. सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे इथल्या तापमानात आढळणारी आर्द्रता 25-27 अंश इतके सातत्य ठेवून असते. वर्षाला पावसाची सरासरी किमान 80 ते 400 इंच इतकी असू शकते. अर्थात प्रत्येक वर्षावनाची सरासरी तिथल्या जीवविविधतेसारखीच विविधता ठेवून आहे. त्यामुळे वर्षावने ही कायमच वरुणराजाच्या छत्रछायेखाली असतात.
अंदमान निकोबार द्वीपसमूह
अंदमान द्वीपसमूहात विविध प्रकारची वनक्षेत्रे आढळतात. उष्णकटिबंधीय हरित वन, उष्णकटिबंधीय अर्धहरित वन, उष्णकटिबंधीय पानझडी वन व दक्षिणी पर्वतीय सदाहरित वन ही त्यातील मुख्य वनक्षेत्रे आहेत. अंदमान निकोबार द्वीपसमूहात 80%पेक्षा अधिक वनक्षेत्र आहे. प्रचंड प्रमाणात असलेल्या वनक्षेत्रामुळे इथे आढळणारी जीवविविधतासुद्धा तितकीच समृद्ध आहे. या वनक्षेत्रात लाकडाच्या 200पेक्षा अधिक प्रजाती असून त्यातील फक्त 30 व्यापारासाठी आहेत. अंदमान निकोबार द्वीपसमूहात वृक्षवेलींच्या दोन हजारपेक्षा अधिक प्रजाती वर्षावनाच्या संपन्नतेत भर घालणार्या आहेत. त्यापैकी 200 प्रजाती ह्या केवळ याच वनक्षेत्रात आढळतात. असंख्य वृक्ष असे आहेत, जे भारतातल्या इतर कुठल्याही वनात नाहीत. मुळात अंदमान निकोबार भौगोलिक दृष्टीने अलिप्त असल्याने स्थानिक अथवा प्रादेशिक जीवविविधतेच्या बाबतीत महत्त्वाचे वनक्षेत्र ठरते. सस्तन प्राण्यांच्या 62 प्रजाती इथे आढळतात. त्यापैकी निम्म्या प्रजाती या प्रादेशिक आहेत. पक्ष्यांच्या जवळजवळ अडीचशे प्रजातींपैकी शंभर प्रजाती स्थानिक आहेत. अंदमानच्या वर्षावनात सरपटणार्या प्राण्यांच्या 70-75 प्रजातींचे अस्तित्व आहे. त्यापैकी किमान 25 प्रजाती स्थानिक आहेत. सागरी जीवविविधतेची संख्या अंदमान वर्षावनात अडीच हजारहून अधिक आहे. द्वीपसमूहात काही प्रजाती इतर ठिकाणाहूनसुद्धा वास्तव्यास आहेत. इतक्या प्रचंड संख्येने असलेल्या जीवविविधतेच्या संवर्धनाच्या दृष्टीने अंदमान निकोबार द्वीपसमूहात एकूण 96 वन्यजीव अभयारण्ये व 9 राष्ट्रीय उद्याने आहेत. मोठ्या आकाराच्या सस्तन वन्यजीवांचे इथे वास्तव्य नाही. इथल्या जीवविविधतेचे मलेशिया, म्यानमार, चीन येथील वन्यजीव, पक्षी, वनस्पती इत्यादी जीवविविधतेशी बरेच साम्य आढळते. यात वृक्षांची संख्या लक्षणीय आहे.
ईशान्य भारत
ईशान्य भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड येथील ब्रह्मपुत्रेच्या खोर्यातील उष्णकटिबंधातील अर्धहरित वनक्षेत्र म्हणून ओळखली जातात. या वनक्षेत्रांचे वैशिष्ट्य म्हणजे इथली गाळाची जमीन, जी पिवळसर रंगाची आहे. ही जमीन वनसंपदेच्या उत्कर्षासाठी अतिशय उपयुक्त अशी जमीन मानली गेली आहे. काही वन्यजीव केवळ ब्रह्मपुत्रेच्या खोर्यापुरते मर्यादित आहेत. मकाऊ माकडांच्या अनेक प्रजातींचा हा नैसर्गिक अधिवास आहे. हा प्रदेश पुढे मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर असा विस्तारलेला आहे. या प्रदेशातसुद्धा विविध प्रकारच्या वनांचे अस्तित्व आहे. बहुतांशी वनक्षेत्र समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंच पर्वतरांगेत असल्याने इथले सौंदर्य निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल. विशेष म्हणजे इथला बराच मोठा प्रदेश अद्यापही मानवी वस्तीपासून दूर आहे. हिमालयाच्या पायथ्याशी व आसामच्या खोर्यात सदाहरित वने आढळतात. नागा हिल्स, मेघालय, मिझोराम, मणिपूर या भागात पर्जन्यमान भरपूर असल्याने वर्षावनांची समृद्धी कायम आहे. आशियाई हत्तींची संख्या या वनक्षेत्रात लक्षणीय असून, सर्वाधिक संख्येत असलेल्या एकशिंगी गेंड्याचे अस्तित्व वन्यजिवांतील मुख्य आकर्षण आहे. या वनक्षेत्रात सस्तन प्राण्यांच्या 122 प्रजाती आहेत. विविध प्रकारच्या दुर्मीळ पक्ष्यांच्या साडेतीनशेच्या वर प्रजातींचा किलबिलाट श्रवणीय ठरतो. ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. मुळातच अनेक दशके ईशान्य भारत हा अलिप्त व मुख्य प्रवाहात नव्हता. रोजगाराचा अभाव, दैनंदिन गरजा भागवण्यासाठी इथल्या नागरिकांना शेती करण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. त्यामुळे दक्षिण भागातील वनक्षेत्रातील नागरी व शेतजमिनीचे अतिक्रमण चिंताजनक अवस्थेत आले आहे. बहुतांश भाग पर्वतीय असल्याने इतर भागात काही अपवाद वगळता वनक्षेत्र देशाच्या वनवैभवात अधिकच भर घालताहेत.
पश्चिम घाट
पश्चिम घाट हा भारतातील सर्वाधिक नागरी वस्ती असलेला वर्षावन प्रदेश आहे. अभ्यासकांनी याला दोन भागांत विभागले आहे - पश्चिम घाटातील उत्तर भाग व पश्चिम घाटातील दक्षिण भाग. दोन्ही भाग हे उष्णकटिबंधातील ओलसर पानगळ वर्षावन म्हणून ओळखले जातात. दक्षिण भाग पर्वतीय प्रदेश असल्याने इथले हवामान उत्तर भागाच्या तुलनेत अधिक थंड व ओलसर आहे. महाराष्ट्र-कर्नाटक हे पश्चिम घाटातील उत्तरेकडील वनक्षेत्र अंदाजे 30 हजार चौ.कि.मी क्षेत्रात असून केरळ-तामिळनाडू राज्यांत विस्तारित आहे. या भागात सस्तन प्राण्यांच्या एकूण 87 प्रजाती असून पक्ष्यांच्या अंदाजे 350 प्रजाती आहेत.
दक्षिण भागातील पर्वतीय प्रदेश अंदाजे 23 हजार चौ.कि.मी क्षेत्रात विस्तारले आहे. समुद्रसपाटीपासून हे वनक्षेत्र अंदाजे एक हजार मीटर उंचीवर आहे. पर्वतावर अशक्य अशा ठिकाणी समतोल साधत मुक्त विहार करणारा निलगिरी थार हेसुद्धा या वनक्षेत्रातील आकर्षण आहे. इथले आढळणारे शोला गवत पर्वतावर आढळते. म्हणून हे वनक्षेत्र निलगिरी थारचे नैसर्गिक अधिवास आहे. भारतात इतरत्र ते कुठेच आढळत नाही. आशियातील हत्तींची सर्वाधिक संख्या पश्चिम घाटात आहे. या व्यतिरिक्त इतर अनेक श्वापदांचे वास्तव्य इथे मोठ्या प्रमाणात आहे. पश्चिम घाटातील पर्वतीय प्रदेशात सस्तन प्राण्यांच्या 80 प्रजाती आहेत. उभयचर प्राण्यांच्या 206, तर पक्ष्यांच्या 300हून अधिक प्रजाती आढळतात. सरपटणार्या प्राण्यांच्या प्रजातींची संख्या लक्षणीय आहे. इथल्या वनक्षेत्रात 12 वर्षांतून निलकुरुंजी नावाचे फूल इथल्या पर्वतीय रांगांच्या सौंदर्यात निळ्या रंगाची भर घालणारे म्हणून प्रसिद्ध आहे. या समृद्ध वनसंपदेचे संवर्धन व्हावे म्हणून शासनाने व्याघ्रप्रकल्प, अभयारण्ये जाहीर केली आहेत. पश्चिम घाटात गेल्या काही दशकांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण व व्यापारीकरण झाले आहे. या परिसरातील दोन तृतीयांश वनक्षेत्र नष्ट होऊन तीन चतुर्थांश वनक्षेत्र हे शेतजमीन म्हणून परिवर्तित झाल्याकडे अभ्यासक लक्ष वेधतात.
विविध प्रकारचे उपयुक्त लाकूड, रबर, डिंक यांचा व्यापार आज आर्थिक चालना देणारा आहे. भारतातील तीन मुख्य वर्षावनांत पश्चिम घाटातील वाढते नागरीकरण, शेती, उद्योग हे नागरिकांना निश्चितच रोजगार उपलब्ध करून देणारे आहेत. परंतु पुरेशी रोजगाराची संधी दुर्गम अतिदुर्गम भागात स्वातंत्र्यानंतर उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यासाठी मानवाने आपल्या पद्धतीने रोजगाराच्या संधी उपलब्ध करवून घेतल्या. मात्र वर्षावने अथवा इतर वने ही राष्ट्राची नैसर्गिक संपत्ती आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघितल्यास उत्सर्गवायू कमी करून पृथ्वीला प्रदूषणमुक्त करणारी वर्षावने ही पृथ्वीची फुप्फुसे म्हणूनसुद्धा संबोधली जातात. वर्षावनांवर होत असलेले अतिक्रमण म्हणजे मानवाने पृथ्वीच्या फुप्फुसांवर केलेला आघात ठरतो. वर्षावनांची नैसर्गिक क्षमता कमकुवत झाल्यास त्याचे दुष्परिणाम अत्यंत भीषण ठरतील.