राजा दाहिरची संतान

11 Mar 2020 14:56:07


Who was Raja Dahir_1 

आठव्या शतकात सिंध प्रांतात अरबांचे राज्य आले, तरीही हिंदू, जैन मोठया संख्येने इथे राहत होते. अगदी विसाव्या शतकापर्यंत. 1931च्या जणगणनेनुसार हैदराबादमध्ये 70%, कराचीमध्ये 46%, लारकानामध्ये 62%, शिखरपूरमध्ये 63%, तर सक्करमध्ये 58% हिंदू होते. पण फाळणीच्या वेळी सिंधच्या जनतेचे मत विचारात न घेता हा संपूर्ण प्रांत पाकिस्तानला दिला गेला. काँग्रोसने (INC) असे निर्णय कसे काय स्वीकारले याचे आश्चर्य वाटते.

 

सिंधू नदीच्या नावाने ओळखला जाणारा प्रांत! या प्रांतावरून भारताला 'हिंद' हे नाव मिळाले. भारताची कोणतीही व्याख्या 'सिंध'शिवाय पूर्ण होत नाही. स्वातंत्र्यवीरांची 'आसिंधु-सिंधुपर्यन्ता, यस्य भारत भूमिका' ही व्याख्या असो, किंवा गुरुदेवांची जन-गन-मनमधील 'पंजाब सिंध गुजरात मराठा' असो, सिंधशिवाय भारत अपूर्ण आहे.

 

सिंधची प्राचीन नोंद महाभारतात येते. दु:शला (दुर्योधनाची बहिण) हिचा विवाह सिंध सौवीरच्या राजाशी जयद्रथाशी झाला होता. कौरव-पांडव युध्दात तो कौरवांकडून लढला होता. अभिमन्यूला कपटाने मारण्यात त्याचा सहभाग होता. दुसऱ्याच दिवशी कृष्णाने हा सूर्य आणि हा जयद्रथ म्हणून गर्दीत तो कुठे आहे हे दाखवताच अर्जुनाच्या बाणाने त्याचा वेध घेतला होता.

 

समुद्राजवळ असणाऱ्या या प्रांताने व्यापारी, नाविक व जहाज बांधणारे कुशल कारागीर तयार केले. उद्योगशील व कार्यमग्न लोक तयार केले. शेकडो नाही, तर हजारो वर्षे सिंध, गुजरात व महाराष्ट्रातील समुद्राकाठचा प्रांत समुद्री व्यापारात अग्रोसर होता. येथील बंदरांतून आधी मेसोपोटामियाशी व नंतर रोमशी चालणाऱ्या व्यापारामुळे सुबत्ता होती. ब्रिटिशकाळात कराचीपासून मुंबईपर्यंतचा संपूर्ण प्रांत 'बाँबे प्रेसिडेन्सी' म्हणून ओळखला जात होता. मुंबई गुजरातची की महाराष्ट्राची हा अलीकडचा कृत्रिम वाद झाला. पण मुंबई प्रांतात कराची का नाही? हा वाद 1947मध्ये कुणी घातला नाही, हे दुर्दैव!

 

'बाँबे प्रेसिडेन्सी' हा एकसंघ, नैसर्गिक विभाग आहे. इ.स.पूर्व चौथ्या शतकात हा प्रांत मौर्यांच्या आधिपत्याखाली आला. मौर्य सम्राट अशोकने मुंबईजवळ नालासोपारामधून जाणाऱ्या व्यापारी मार्गावर आपला शिलालेख लिहिले होते. इ.स.पूर्व पहिल्या शतकात इथे शकांनी राज्य केले. इ.स.पूर्व पहिल्या शतकात उज्जैनच्या विक्रमादित्याने*, इसवीसनाच्या पहिल्या शतकात प्रतिष्ठानच्या गौतमीपुत्र सातकर्णीने व इ.स.च्या चौथ्या शतकात पाटलीपुत्रच्या चंद्रगुप्त गुप्तने (दुसरा) एकएक प्रांत जिंकून घेत शकांची सत्ता संपुष्टात आणली. मौर्यकाळातील अनेक बौध्द स्तूपांचे व विहारांचे अवशेष सिंधमध्ये मिळाले आहेत. तसेच गुप्तकाळातील अनेक देवतांच्या मूर्ती सिंधमध्ये मिळाल्या आहेत.

 

सहाव्या शतकात सिंधच्या श्रेष्ठ राजा चाचने सिंध, बलोच व पलीकडे इराणचादेखील थोडा भाग आपल्या अखत्यारीत आणला. याचा मुलगा राजा दाहिरच्या काळात मुहम्मद बिन कासीमने सिंधवर आक्रमण केले. साल होते इ.स. 712. राजा दाहीरला त्याच्या मंत्र्याने सांगितले, ''तुझ्या कुटुंबीयांना राजस्थामधील हिंदू राजांकडे आश्रयाला पाठव. तू अरबांशी लढत असल्यामुळे राजस्थानला, गुजरातला संरक्षण मिळत आहे, ते निश्चित मदत करतील.'' पण राजाने नकार दिला. तो म्हणाला, ''मी माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी पाठवले, तर माझ्या सरदारांना कोणत्या तोंडाने लढण्यास सांगू? या युध्दात जर मी जिंकलो, तर आपले राज्य महासत्ता होईल! आणि जर हरलो तर शौर्याने लढलो म्हणून माझे नाव अरब व हिंदच्या गाथांमधून अमर होईल!''
 

सिंधू नदीच्या काठी दाहीर व कासीमचे घनघोर युध्द झाले. राजा दाहीर व त्याचा पुत्र जयसिंह धारातीर्थी पडले. कासीमने राजाचे धडावेगळे केलेले शीर व त्याच्या मुली - सूर्यादेवी व प्रेमलदेवी 'भेट' म्हणून खलिफाला पाठवल्या. राजा दाहिरच्या मुलींनी युक्तीने कासिमवर सूड उगवला. त्यांनी खलीफास सांगितले की कासीमने त्यांचा उपभोग घेतला असल्याने त्या खलिफासाठी लायक नाहीत! त्या वक्तव्याने संतापलेल्या खलिफाने कासिमला मृत्युदंड ठोठावला. कासीमच्या मृत्युनंतर खलिफाला त्याची चूक लक्षात आली. तेव्हा त्याने राजा दाहिरच्या दोन बहाद्दर मुलींना भिंतीत चिणून मारले.

राजा दाहीर व त्याच्या पुत्राच्या शौर्याच्या व त्याच्या मुलींनी घेतलेल्या सुडाची कथा अरबांनी लिहिलेल्या 'चाचनामा'मध्ये आहे. पण हिंदच्या एकाही लेखात, गाथेत किंवा पोवाडयातसुध्दा त्यांचे नाव नाही. त्या राजाने, त्याच्या कुटुंबाने आणि त्याच्या हजारो सैनिकांनी दिलेल्या बलिदानाची हिंदमध्ये कोणीही दखल घेतली नाही.

 

आठव्या शतकात सिंध प्रांतात अरबांचे राज्य आले, तरीही हिंदू, जैन मोठया संख्येने इथे राहत होते. अगदी विसाव्या शतकापर्यंत. 1931च्या जणगणनेनुसार हैदराबादमध्ये 70%, कराचीमध्ये 46%, लारकानामध्ये 62%, शिखरपूरमध्ये 63%, तर सक्करमध्ये 58% हिंदू होते. पण फाळणीच्या वेळी सिंधच्या जनतेचे मत विचारात न घेता हा संपूर्ण प्रांत पाकिस्तानला दिला गेला. काँग्रोसने (INC) असे निर्णय कसे काय स्वीकारले याचे आश्चर्य वाटते. 1940च्या दशकातील सिंध कसे होते, हे खालील उदाहरणांवरून लक्षात येण्यासारखे आहे.

 

1947च्या सुरुवातीला जोशी यांनी लिहिलेले 'संगीत परिचय' नावाचे पुस्तक कराचीमधून प्रकाशित झाले होते. 'आदर्श साहित्य' या कराचीमधील प्रकाशन संस्थेने ते प्रकाशित केले होते. या काळात सिंधमधून प्रकाशित झालेली इतर पुस्तके होती - तुलसी रामायणाचे सिंधी भाषांतर, सिंधी भाषेतून भगवत गीता इत्यादी. दयाराम, परसराम, नानकराम, उधाराम, लीलाराम, मेवाराम, नंदिराम अशा नावांचे सिंधी इथे राहत होते. स्त्रियांच्या बाबतीत पाहता येथील सरस्वती दयाराम मिरचंदानी (1937) आणि शकुंतला रोचीराम हिंगोरानी (1947) या सिंधच्या बॅरिस्टर होत्या. डॉ. देवी लखानी, डॉ. हरी मिरचंदानी, डॉ. लीला छबलानी या सिंधमधील स्त्री डॉक्टर होत्या.

 

कराचीमध्ये दिमाखात उभी असलेली ही हवेली होती - शिवरतन चंद्ररतन मोहट्टा या श्रीमंत व्यापाऱ्याची. फाळणीनंतर मोहट्टा कुटुंबीय कराचीमध्येच राहिले. पण लवकरच त्यांना पाकिस्तान सरकारकडून घर खाली करण्याविषयी चिठ्ठी आली. त्याच रात्री मोहट्टा कुटुंबाने बॅगा भरल्या व दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईसाठी निघाले. जीना यांची बहीण फातिमा जीना यांनी त्यांच्या हवेलीचा ताबा घेतला व त्या मृत्यूपर्यंत तिथेच राहिल्या. पुढे जीनाच्या वारसदारांकडून पाक सरकारने 'मोहट्टा पॅलेस' विकत घेतले. आता या हवेलीमध्ये 'सिंध म्युझियम' उभारण्यात आले आहे.

 

अशीच कथा आहे सेठ रामगोपाल गोवर्धनदास मोहट्टा यांनी बांधलेली हिंदू जिमखान्याची. ही भव्य इमारत जणू राजस्थानी महाल असावा असे स्थापत्य असलेली होती. फाळणीनंतर Evacuee Trust Property Boardने ही जागा ताब्यात घेतली. आता इथे पाकिस्तानचे National Academy of Performing Artsचे मुख्य कार्यालय आहे. अशीच व्यथा आहे सक्कर येथील सात मजली 'ओम कन्हैय्या लाल कॉटेज' या प्रसिध्द इमारतीची.

 

अनेक हवेली, मोठमोठे प्रासाद, शाळा, कॉलेज, लायब्ररी, हॉस्पिटल, इतर संस्था, जमिनी, शेती, गुरे जे होते ते सगळे सिंधमधील हिंदूंना, जैनांना व शिखांना सोडून यावे लागले. कित्येक प्राचीन मंदिरे, ग्राामदेवता, कुलदेवता, जागृत स्थाने, मठ, जैन मंदिरे, शीख गुरुद्वारा सोडून यावे लागले. बौध्द स्तूपांचे, विहारांचे, मंदिरांचे अवशेष व हडप्पा, मोहनजोदाडो, तक्षशीला यासारखी प्राचीन संस्कृतीची यशोगाथा सांगणारी गावे सोडून यावे लागले. हाडाची काडे करून बांधलेल्या वास्तूंवर व आयुष्य वाहिले होते अशा पुत्रवत् संस्थांवर पाणी सोडावे लागले. ज्या भूमीने आईसारखी माया केली होती, तिथले घरच काय, ते गावसुध्दा पुन्हा पाहायला मिळणार नव्हते. नेसत्या वस्त्रानिशी फाळणीच्या असंख्य जखमा लेवून हे लोक भारतात शरणार्थी म्हणून आले.

 

इस 712मध्ये सुरू झालेली सिंधची लढाई 1947च्या फाळणीनेसुध्दा संपली नाही. फरक इतकाच की आज राजा दाहिरच्या मुलींचे नाव सूर्यादेवी व प्रेमलदेवीऐवजी रीना-रवीना, जगजीत कौर, मेहेक, भारतीबाई किंवा हुमा युनूस असे आहे. दर वर्षी जवळपास 1,000 हिंदू/शीख/ख्रिश्चन मुलींना पळवून त्यांचे धर्मांतर करून, त्यांची लग्ने लावून दिली जातात. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या जाचामुळे आजही हे लोक भारतात शरणार्थी म्हणून येत आहेत. ज्या लोकांनी शेकडो वर्ष भारताच्या सीमेचे रक्षण केले, त्यांचे उपकार आपण स्मरले नाहीत. त्यांच्या मदतीला धावलो नाही. आज आपण त्यांच्या वंशजांना किमान आसरा तर देऊ शकतो. म्हणून CAA!

 

संदर्भ -

1. Chachnamah šn šncient History Of Sindh - šustralian Islamic Library

2. Mohatta Palace: š tale of love lost - škhtar Balouch

3. Sindh Tourism Development Corporation Website

4. Sindh's Stolen Brides - Mariana Baabar, šmir Mir

* इ.स.पूर्व पहिल्या शतकातील उज्जैनच्या विक्रमादित्यच्या अस्तित्वाचा पुरातत्त्वीय पुरावा मिळाला नाहीये.

Powered By Sangraha 9.0