बलुचिस्तान

28 Feb 2020 13:08:15

मस्कत, दुबई, इराक, उत्तर अफगाणिस्तान येथून पूर्वीपासून व्यापार होत असे. मागील हजारो वर्षे हे व्यापारी मार्ग तसेच आहेत, फक्त त्यांची मालकी बदलत आहे. जसे हे मार्ग बदलले नाहीत, तसेच येथील काही सांस्कृतिक घटक बदलले नाहीत.

baluchistasn_1  

अफगाणिस्तानमधून सिंधला नेणारा राजमार्ग म्हणजे बोलान खिंड. हिंदुकुश पर्वतात उत्तरेला जशी खैबर खिंड आहे, तशीच दक्षिणेची बोलान खिंड भारतात येण्याचे महाद्वार आहे. बोलान खिंडीतून जाणारा मार्ग फार प्राचीन काळापासून व्यापारी, यात्रेकरू, प्रवासी वापरत आले आहेत. या मार्गाच्या तोंडाशी मेहेरगढ नावाचे गाव वसले होते. सरस्वती-सिंधू संस्कृतीचे हे गाव तब्बल 9,500 वर्षांपूर्वी वसले होते. या रस्त्याने चालणाऱ्या व्यापाराने आणि इथे वाहणाऱ्या बोलान नदीने मेहेरगढ जोपासले होते. बलुचिस्तानमधील नौशारो हे गाव सरस्वती-सिंधू संस्कृतीचे आणखी एक महत्त्वाचे स्थळ. 5,500 वर्षांपूर्वी बलुचिस्तानमध्ये - बालाकोट, सोतक कोह आणि सुत्कागेन डोर यथे बंदर होते. या बंदरातून समुद्रमार्गाने मागन (मस्कत), दिलमन (दुबई) व सुमेर (इराक) यांच्याशी व्यापार चालत असे, तर जमिनीवरील मार्गाने शोर्तूगई (उत्तर अफगाणिस्तान)पर्यंत व्यापारी मार्ग होते.

बलुचिस्तान

आज बलुचिस्तानमध्ये सोत्का कोहजवळ एक प्रसिध्द बंदर आहे - ग्वादार, तर बालाकोटजवळचे प्रसिध्द बंदर आहे कराची. मधल्या काळात बरीच वषर्े ग्वादार मस्कतच्या अखत्यारीत होते. 1958मध्ये ग्वादार पाकिस्तानला मिळाले. 2002पासून चीन या मोक्याच्या ठिकाणी अद्ययावत बंदर बांधत आहे. चीनमधील काशगर ते कराची व ग्वादार असा China Pakistan Economic Corridor (CPEC) मार्ग तयार होत आहे. हा मार्ग पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिटमधून जातो. CEPCद्वारे चीनमधून थेट अरबी समुद्रापर्यंत व्यापारी मार्ग सुरू होईल. याला शह देण्यासाठी ग्वादारपासून जवळ पण इराणमध्ये भारत चाबहार बंदर विकसित करत आहे.

मागील हजारो वर्षे हे व्यापारी मार्ग तसेच आहेत. फक्त त्यांची मालकी बदलत आहे. जसे हे मार्ग बदलले नाहीत, तसेच येथील काही सांस्कृतिक घटक बदलले नाहीत. उदाहरणार्थ, मेहेरगढमध्ये मिळालेल्या घरांच्या अवशेषातून दिसते की हे लोक घरांच्या भिंती मातीने सारवत असत. त्यावर गेरूचा गिलावा देत. मग त्या लालसर भिंतीवर काळया व पांढऱ्या रंगांनी चित्र काढत असत. राजस्थानमधील घरांवर आजही अशा प्रकारची कलाकुसर पाहायला मिळते.

 

मंडन भित्तिचित्रे, राजस्थान

जुन्या नकाशांमध्ये बलुचिस्तानचे नाव Gedrosia असे दिसते. इ.स.पूर्व सहाव्या शतकात पर्शियाच्या दरायवशने हा प्रांत जिंकून घेतला. इ.स.पूर्व चौथ्या शतकात सम्राट सिकंदरने पर्शिया जिंकले व जेडरोशिया त्याच्या अखत्यारीत आले. झेलम नदीच्या काठावर सिकंदरची गाठ पडली महाराज पुरूशी. या लढाईनंतर सिकंदरने ग्रीसला परतायचा निर्णय घेतला. तो सिंधू नदीतून दक्षिणेला कराचीजवळ आला. इथे त्याने आपल्या सैन्याचे दोन भाग केले. एका तुकडीला समुद्रमार्गाने परतीच्या प्रवासाला पाठवले व दुसरी तुकडी घेऊन तो भूभागाने ग्रीसकडे निघाला. समुद्रातून प्रवास करणाऱ्या तुकडीचा प्रवास सुरक्षित होवो म्हणून त्याने 'पोसायडन' या समुद्राच्या ग्रीक देवाची पूजा केली व त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी बैलांचा बळी दिला. त्यावर सिकंदरने आपल्या तुकडीसह जेडरोशियाच्या वाळवंटातून प्रवास सुरू केला. हा मार्ग अतिशय बिकट होता. या तुकडीजवळ पुरेसे अन्नपाणी नव्हते. तसेच या मार्गावर मनुष्यवस्ती नसल्याने सैन्याची कसलीही सोय झाली नाही. सिकंदरच्या सैन्याने झाडाची मुळे, दिसतील ते प्राणी, सामान वाहणारे खेचर आणि शेवटी स्वत:चे घोडेसुध्दा मारून खाल्ले. अशी वेळ आली की आतापर्यंतच्या लढायांमधून मिळवलेली लूट वाहून न्यायलादेखील प्राणी शिल्लक राहिले नाहीत. तेव्हा सिकंदरला सगळा खजिना वाळवंटात सोडून द्यावा लागला. जेडरोशिया पार करेपर्यंत सिकंदरचे निम्मे सैन्य मृत्युमुखी पडले होते. जेडरोशिया ओलांडून, पार्स ओलांडून सिकंदर उरलेल्या सैन्यासह कसाबसा बॅबिलॉनला पोहोचला. बॅबिलॉनला 32 वर्षीय सिकंदरचा मृत्यू झाला. काहींच्या मते त्याच्यावर विषप्रयोग केला गेला, तर काहींच्या मते युध्दातील जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह चोरून नेल्याने तीन हात जमीनदेखील त्या 'जगज्जेत्याच्या' नशिबी आली नाही. लवकरच त्याच्या बायकोला व लहान मुलाला मारले गेले आणि त्याच्या सरदारांनी त्याचे राज्य आपापसात वाटून घेतले.

बलुचिस्तानवर सिकंदरचा सेनापती सेल्युकस निकेटर राज्य करत होता. चंद्रगुप्त मौर्यने तो प्रांत त्याच्याकडून जिंकून घेतला. मौर्यांनंतर शकांनी व कुशाणांनी इथे राज्य केले. पारतराज घराण्याने इथे बराच काळ राज्य केले. हे शक घराणे असले, तरी त्यांच्यावर भारतीय संस्कार झाले होते. या घराण्यात अर्जुन, भीमार्जुन आदी नावांचे राजे होऊन गेले. या सर्व राजांच्या नाण्यांवर वरील बाजूस राजाचे चित्र व मागील बाजूस स्वस्तिकचे चिन्ह होते.

सातव्या शतकापर्यंत इथे हिंदू, बौध्द व पारसी धर्मीय लोक राहत होते. इथे शेकडो बौध्दविहार होते. शेकडो हिंदू मंदिरे होती. हिंगोल येथे आज 'हिंग्लज माता' हे 51 शक्तिपीठांपैकी एक देवीचे मंदिर टिकून आहे. तसेच कराचीजवळ असलेले 'शिवहरखराय' हे आणखी एक शक्तिपीठ टिकून आहे.

 

हिंग्लज माता / नानी देवी मंदिर

सातव्या शतकात सिंधच्या राय राजांना पराभूत करून इथे अरबांचे राज्य आले. सोळाव्या शतकाच्या दरम्यान माकारन, कलात, खरान व लास बेला ही चार स्वतंत्र राज्ये उदयाला आली होती.

स्वातंत्र्य मिळाल्यावर कलातचा राजा मीर अहमदियार खानला कलात हा स्वतंत्र देश ठेवायचा होता किंवा भारतात विलीन करायचा होता. काँग्रेसचे (INCचे) त्या वेळचे अध्यक्ष मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्याशी खानची बोलणी चालू होती. पण खानला काँग्रेसकडून (INCकडून) मदत मिळाली नाही. तिकडे पाकिस्तानकडून विलीन होण्यासाठी दबाव होता. भारतात विलीन न होता स्वतंत्र राहिला असता, तरी येथील राजकारणाची गणिते बदलली असती. 1947नंतर 6 महिने कलात स्वतंत्र देश होता. परंतु 1948च्या एप्रिलमध्ये पाकिस्तानने कलातवर स्वारी करून तो प्रदेश गिळंकृत केला. येथील चार राज्ये मिळून आता बलुचिस्तान म्हटले जाते. या प्रांतात राहणारे बलुची व पख्तुनी लोक पाकिस्तानपासून वेगळे होण्यासाठी लढा देत आहेत.

 

आजच्या घडीला मात्र बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये असल्याने चीनला येथे हातपाय पसरता आले आहेत. त्यातच भारताला मध्य आशियातील देशांना जोडणारा गिलगिट पाकिस्तानच्या ताब्यात आहे. या दोन कारणांमुळे भारतातून मध्य आशियात जाणारा थेट रस्ता बंद झाला आहे. भारतातून अफगाणिस्तानला गिलगिटमधून जाणारा रस्ता बंद झाला आहे आणि चीन व पाकिस्तान यांना गिलगिटच्या स्थानाचा फायदा मिळत आहे, तसेच गिलगिट ते बलुचिस्तान या मार्गामुळे चीनला अरबी समुद्रावर वर्चस्व स्थापन करता येऊ शकत आहे.

संदर्भ -

Coin India - पारतराज नाणी व त्यावरील लेखाचे वाचन

Nehru's Balochistan blooper was as disastrous as his Himalayan blunder - Utpal Kumar, Sunday Guardian, 5 Oct, 2019.

Powered By Sangraha 9.0