अंबरनाथ येथील ज्येष्ठ संघस्वयंसेवक आणि बदलापूर येथील योगी श्री अरविंद गुरुकुल शाळेचे कार्यवाह श्रीकांत देशपांडे यांना श्रध्दांजली अर्पण करणारा लेख.
जागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह श्रीकांत वसंत देशपांडे यांना मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने देवाज्ञा झाली.
श्रीकांत आर्य विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपक्रमांचे आयोजन करून ते फक्त विद्यार्थ्यांना घडवत नसत, तर ते आम्हा शिक्षकांनाही घडवत होते. ते आम्हा प्रत्येकावर विश्वास ठेवून एकेक जबाबदारी देत असत. यातही आमच्या कल्पकतेने बदल करायची मुभा असे आणि प्रत्येक कामाचा पाठपुरावा करून काम, उपक्रम उत्तम होण्यासाठी धडपडत असत. या पध्दतीने कामे केल्यामुळे नकळत आमच्यात जबाबदारीची जाणीव, आत्मविश्वास यात विकास होत होत आम्हीही विकसित होत होतो, घडलो. श्रीकांत आर्य यांनी आम्हास घडवले. कसे काम करावे याचा मार्ग - आदर्श घालून दिला.
अशा पध्दतीने त्यांचे सहकार्य, मार्गदर्शन सतत मिळत असल्याने आम्हास एक मोठा आधार वाटत असे. आम्हाला पित्याप्रमाणे आधार वाटत असे आणि विद्यार्थ्यांसाठी तर ते आजोबांप्रमाणे होते. ते आपुलकीने प्रत्येकाची विचारपूस करत असत. आम्हा सर्वांसाठीच हक्काने काय हवे नको ते मागणे (शाळेतील उपक्रम, अन्य कामांबाबत), मनातले सुखदुःख सांगण्याचे असे ठिकाण म्हणजे आमचे श्रीकांत आर्य. कोणत्याही संस्थेत, शाळेत असे संचालक मंडळापैकी कोणी इतके आपुलकीने विचारपूस करत नसतील, त्यामुळे त्यांच्यात आणि आमच्यात आपलेपणाचे कौटुंबिक नाते तयार झाले होते.
श्रीकांत आर्य यांच्याकडून आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. काम करण्याची त्यांची पध्दत, त्यांचे गुण -
* कामात बदल हीच विश्रांती, सतत काम करत राहणे, सतत काहीतरी वाचन करणे, लेखन करणे.
* सतत उत्साही राहणे, सकारात्मक विचार करणे, प्रत्येक कामाकडे, प्रसंग-घटनेकडे सकारात्मक विचाराने पाहणे.
* विद्यार्थी विकास, शिक्षकांना घडवणे यासाठी सतत नवनवीन उपक्रमांचे आयोजन, त्यासाठी आमच्यावर एकेक जबाबदारी देऊन पाठपुरावा करत मार्गदर्शन करणे.
* आलेल्या अडचणी, समस्या अगदी सहज कोणालाही न दुखावता सोडवणे.
* एकांतातही स्वतःबद्दल, स्वतःच्या कामाबद्दल अवलोकन करणे, शाळेच्या विकासासाठी विचारमंथन करणे.
त्यांचे काम, त्यांचा स्वभाव यावरून कवी विंदा करंदीकर यांच्या शब्दांत असे सांगता येईल की,
देणाऱ्याने देत जावे,
घेणाऱ्याने घेत जावे,
घेणाऱ्याने घेता घेता
देणाऱ्याचे हात घ्यावे.
या वरील पंक्तीत सांगितले आहे, त्याचप्रमाणे आम्ही सारेच शिक्षक, मुख्याध्यापक त्यांनी दाखवलेल्या मार्गानेच वाटचाल करीत आहोत, पुढेही करणार आहोत.
योगी श्री अरविंद गुरुकुल शाळा सुरू करताना तेव्हापासून ते आजपर्यंत आलेल्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी अनेकांनी कशी कशी मदत केली आणि आलेल्या साऱ्या कटू-गोड आठवणी एकत्रितपणे 'रवंथ' या त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात त्यांनी मांडलेल्या आहेत.
आम्हा शिक्षकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना अशा सर्वांसाठीच श्रीकांत आर्य हे तत्त्वज्ञ, मानसिक आधार, बळ देणारे आणि सतत मार्गदर्शन करणारे होते. ते आजही आहेत आणि पुढेही ते आमचे असेच मार्गदर्शक राहणार आहेत!
आमच्या आर्यांबद्दल कवी बा.भ. बोरकर यांच्या शब्दांत सांगायचे, तर -
देखणी ती पाउले
जी ध्यासपंथे चालती
वाळवंटातूनसुध्दा
स्वस्तिपद्मे रेखिती!!
रोहिणी कुलकर्णी
9766995401
योगी श्री अरविंद गुरुकुल, बदलापूर