अग्निकल्लोळ कार्यसंस्कृतीत बदल गरजेचा

विवेक मराठी    20-Feb-2020
Total Views |

***विजय बुक्कावार ***

एकाच अपघाताची मूळ कारणे बहुविध असतात. मुळाशी असणाऱ्या कारणापाशी जाणे आवश्यक असते. परंतु सररास दिसते की कामगारास दोष देऊन सारे मोकळे होऊ इच्छितात. यंत्रसामग्राीत अथवा व्यवस्थापन पध्दतीत दोष असल्याने अपघात झाला हे स्वीकारणे जरा जड जाते. 

dombivali_1  H

 

 
गेल्या 3 महिन्यांत रासायनिक कारखान्यातील आगीच्या घटना वर्तमानपत्रातून तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सतत आदळत राहिल्या. कुठे प्राणहानी तर कुठे वित्तहानी व कुठे दोन्हीही. सर्वसाधारण नागरिकांचा प्रश्न की हे कुठवर व इतरांना प्रश्न हा की हे का व कसे? यावर काही उपाय नाहीच की काय? दिसते असे की अशा बातम्या आल्या की काही दिवस चर्चा व वाद व नंतर नेहमीचेच 'ये रे माझ्या मागल्या'.
 
प्रथम रासायनिक कारखान्याच्या बाबतीत तो कुठल्या दर्जात्मक प्रमाणांचा यंत्रसामग्राीच्या बाबतीत वापर करणार आहे याविषयी माहिती करून घेणे आवश्यक आहे. दिसते असे की, याबाबतीत कायद्यात व प्रत्यक्षात अनाकलनीय गोंधळ आहे. विद्यमान कायद्याप्रमाणे पाणी उकळून वाफ तयार करण्याविषयी इत्यंभूत नियंत्रण करणारा कायदा आहे, पण घातक रसायने उकळून त्याची वाफ जास्त दाबाखाली वापरणाऱ्या टाकीसाठी असणाऱ्या तरतूदी निव्वळ दिखाऊ आहेत, किंबहुना त्या नियंत्रणाबाहेरच आहेत असे बऱ्याचदा दिसते.

 

 

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

 

 

मूळ कारखाने कायदा व त्या आनुषंगिक नियम यांचा आढावा घेतल्यास रासायनिक कारखान्याविषयी ज्या तरतुदी आहेत, त्या इतक्या ठिकाणी विखुरल्या आहेत की बऱ्याचदा त्यांचा शोध घ्यावा लागतो. बदलांचे व्यवस्थापन म्हणजे सयंत्रात किंवा त्याच्या वापरात बदल, जो मूळ संकल्पनेपेक्षा वेगळा असू शकतो. त्याविषयी कायद्यात प्रत्यक्ष उल्लेखच नाही. 

 

 

जगातील पहिली उल्लेखनीय रासायनिक दुर्घटना फ्लिक्सबरो (इंग्लड) येथील कारखान्यात 1974मध्ये घडली. ही दुर्घटना भोपाळच्या आधीची. त्या बाबतीत केलेल्या अभ्यासात 'बदल व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष' हेच प्रमुख कारण दिसले. बदल हा सतत सतावणारा प्रश्न. स्पष्ट करण्यासाठी उदाहरणादाखल कारला जोरात ब्रेक मारणे म्हणजे गतीत बदल. त्यामुळे बऱ्याचदा चालकासहित प्रवासीसुध्दा जखमी होतात. कारखान्यातील यंत्रसामग्रीत बदल - उदा., तपमान दाब वाहण्याचा वेग, किंवा स्टेनलेस स्टीलऐवजी साधे पोलाद वापरणे यामुळे अपघात घडू शकतात. बदलाविषयी साधक बाधक चर्चा होऊन ते सुरक्षित असल्यासच तो बदल करणे अपेक्षित आहे. याविषयी खरी जागरूकता अभावानेच अढळते. बदल करणे, त्यामधून उद्भवणाऱ्या धोक्यांचे मापन करणे व तद्नुषंगिक कृती करणे हे सर्व सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. ह्या बाबतीत आपल्याकडे ना सुस्पष्ट कायदा आहे, ना जागरूकता किंवा जाणीव. वस्तूंची गुणवत्ता असो अथवा उत्पादनातील सुरक्षितता असो, 'चलता है' हेच एकमेव निदान व निधान.

 

आम्ही सर्व या क्षेत्रातील व्यावसायिक जेव्हा एखाद्या परिषदेत भेटतो, तेव्हा आमच्या सर्वांचे एकमत असते की सुरक्षितताविषयक कायद्यांच्या पालनाविषयी कुणीही गंभीर नाही. याहून गंभीर असे की, 'सर्व कायद्यांचे पालन करूनसुध्दा अपघात थांबतील काय?' त्यांचे उत्तरसुध्दा एकमताने नाही, असेच मिळते.

 
dombivali_1  H

 

अगदी खूपच झाले, तर कायद्याच्या पालनाने कदाचित 70% अपघात थांबतील, पण उरलेल्या 30 टक्क्यांचे काय? आणि त्यातील एखादा जर गंभीर असेल तर? हे जर असे विश्लेषण असेल तर मग आजवरच्या उपायांचे काय? ते निःसंशय चालूच ठेवावे लागतील, पण त्यापलीकडे काही वेगळे करणे आवश्यक आहे. 

 

 

सुरक्षिततेच्या संस्कृतीची व्याख्या अशी आहे की, 'कुणाचाही पहारा नसताना सर्व काही सुरक्षित पध्दतीने काम करणे.' रस्त्यावरचे अपघात असो वा सुरक्षित वागणूक या विषयी व्यवधान व अवधानाची वानवा प्रचंडच आहे.

 

 

जोखमीवर आधारित सुरक्षित प्रक्रिया (Risk Based Process Safety) यावर भोपाळनंतर झालेल्या निरनिराळया चर्चेतून जे आणखी प्रमुख मुद्दे समोर आले आहेत, त्यापैकी काहींविषयी ना कायद्यात तरतूदी आहेत, ना व्यवस्थापनाच्या मनोभूमीत.

 

 

1) वरिष्ठ व्यवस्थापन हे नेहमी उत्पादन, त्याची गुणवत्ता या विषयी जागरूक असते व त्या आधारेच कामाचे मोजमाप होत राहते. सुरक्षेविषयी कुणीच उत्सुक नाही, हे दुर्दैवी सत्य आहे. 

 

2) यंत्रसामग्री हाताळण्याविषयी ज्ञान व क्षमता यांचा अभ्यास व त्यावर आधारित कृती. कामगार सुरक्षित वागतो व सुरक्षित पध्दतीनेच सर्व काही हाताळतो यासाठी ना प्रशिक्षण, ना धोरण.

3) कंत्राटदाराकडील सुरक्षिततेचे व्यवस्थापन - सर्वात जास्त जोखमीचे काम सहसा कंत्राटी कामगारच करताना दिसतात. 'कमी दाम व जास्त जोखमीचे काम' हे नेहमीचेच दृश्य, तर त्यांच्या सुरक्षिततेविषयी प्रशिक्षण हा नेहमीच दुर्लक्षिलेला विषय.

 

 

4) अपघातांची चौकशी व विश्लेषण - अपघातांची सुविहित चौकशी याकरिता, की तो अपघात पुन्हा घडू नये यासाठी काय करणे आवश्यक आहे हे कळावे. त्याकरिता मुळापर्यंत जाणे आवश्यक आहे. तिथे कधी कामगारांची चूक असेल, तर कधी यंत्रसामग्राी नीट न राखली गेली असेल. 

 

 

कधी प्रशिक्षणच कुचकामी असेल. एकाच अपघाताची मूळ कारणे बहुविध असतात. मुळाशी असणाऱ्या कारणापाशी जाणे आवश्यक असते. परंतु सररास दिसते की कामगारास दोष देऊन सारे मोकळे होऊ इच्छितात. यंत्रसामग्राीत अथवा व्यवस्थापन पध्दतीत दोष असल्याने अपघात झाला हे स्वीकारणे जरा जड जाते. 
 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 

 

 

खरा प्रश्न आहे की सुरक्षा संस्कृती बदलता येईल काय? याचे उत्तर जरी होय असले, तरी ती एका रात्रीत बदलणार नाही. संस्कृती कुठलीही असो - अगदी सामाजिकसुध्दा, ती एका रात्रीत बदलणे अशक्य. पण म्हणून प्रयत्नच करायचा नाही की काय?

 

 

कधीतरी, कुठेतरी सुरुवात करावी लागेल. 'जंगले जर वाढवायची असतील, तर झाड लावण्यापासून सुरुवात करावी लागते, हा निसर्गाचा नियम'. इथेसुध्दा हेच लागू आहे. 

 

 

यासाठी सर्वप्रथम कायद्यात योग्य ते बदल करावे लागतील. रासायनिक कारखान्यातील सुरक्षेच्या अनुषंगाने जगभर कायदे बदलले आहेत. कारखाने कायदा 1948मध्ये त्या अनुषंगाने एक वेगळे प्रकरण टाकून जोखमीवर आधारित सुरक्षा प्रक्रियेच्या (Risk Based Process Safetyच्या) अनुषंगाने लागू असलेल्या सर्व 20 मुद्दयांविषयी स्वतंत्र तरतूद करणे आवश्यक आहे.

 

विजेचा कायदा व नियम (Electricity Act & Rule) अन्वये फक्त प्राणघातक अपघातच निरीक्षकाला कळवणे आवश्यक आहे. अपघातांचा जर नीट अभ्यास केला, तर त्यांत आपणास काही आकार दिसतील. त्यासाठी अपघातांचा विदा (Database) तयार करणे आवश्यक आहे. आपल्याकडे सुरक्षिततेविषयी सार्वकालिक अनावस्था आहे, हे खरे आहे. पूल पडून लोक जखमी झाल्याशिवाय त्यांचे विहित कालावधीन ऑडिट कुणालाही सुचत नाही. कुणी सुचवलेच तर साधारणतः त्याची टिंगलटवाळी होते. ''आजपर्यंत असे काहीच घडले नाही'' हा त्यावरचा हुकमी प्रतिवाद ऐकवला जातो.

 

पोलिसांची संख्या वाढवणे वा पोलीस स्टेशनची संख्या वाढवून गुन्हेगारी नियंत्रित राहील या तत्त्वज्ञानापेक्षा गुन्हे कमी राहतील अशी समाजव्यवस्था जर करता आली, तर ती सार्वकालिक उपाययोजना ठरेल. त्यामुळे निरीक्षकांची संख्या वा अग्निशमन केंद्राची संख्या वाढवण्याऐेवजी आगच लागणार नाही यावर भर द्यावा लागेल.

 

 

आग प्रतिबंधक कायदे वा नियम किंवा विद्युत कायदा व नियम यांचा अभ्यास केला तर दिसते की, कारखाना, माल किंवा ऑफिस अशा जागा जेथे जास्त संस्थेने लोक उपस्थित असतात, अशा जागांच्या विद्युत तारांच्या मांडणीचे आरोग्य तपासण्यासाठी लागणाऱ्या तापमान मोजणीचा (Thernoglophyचा) उल्लेखच नाही. हे असे तंत्रज्ञान आहे की मांडणीतील शिथिल जोड (Loose Contact) व तप्तबिंदू (Hotspot) लगेच पडद्यावर दिसतात व त्या अनुषंगाने वेळीच उपाययोजना करता येते. तापमान मोजण्याचे उपकरण आता परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे, असे असूनसुध्दा ना कायदा याविषयी आग्रही आहे, ना या सर्वांचे मालक वा व्यवस्थापक.

 

 

शेवटी एकच म्हणायचे की आपण सध्या फक्त प्रतिक्रियावादी आहोत. त्याऐवजी आवश्यकता आहे आम्ही सक्रिय आहोत हे सिध्द करण्याची. कुठेतरी असे म्हटले आहे की 'महाआपत्तीचे सर्वाधिक चांगले निवारण तेव्हाच होते, जेव्हा आपण ती महाआपत्ती होऊच देणार नाही.

 

जोडीला कार्यसंस्कृती सुधारणेची सुरुवात कायद्यात योग्य त्या तरतुदीने करावीच लागेल. गोडाउनच्या वा वखारीच्या सुरक्षिततेविषयी आग्राह धरणारा एकही कायदा नाही, ही वस्तुस्थिती स्वीकारणे बऱ्याच जणांना अवघड जाते.