उच्च तात्त्वि अधिष्ठान - भाग 3

17 Feb 2020 18:11:51

धर्मस्थळांना व धार्मिक व्यक्तींना संरक्षण देणे ह्या गोष्टी महाराजांनी आयुष्यभर सांभाळल्या. ह्या सर्व गोष्टी त्यांची उच्च तात्त्वि भूमिकाच दाखवतात. उच्च तात्त्वि भूमिका आणि त्याला सुसंगत आचरण हे महाराजांचे वैशिष्टय होते.महाराष्ट्रातील संत-सत्पुरुषांबद्दल आपण मागच्या लेखात माहिती घेतली. आता आपण इतर प्रांतांबद्दल माहिती घेऊ.

 
shivaji_1  H x

सत्पुरुषांच्या भेटी व देवदर्शन हे विषय कर्नाटक मोहिमेतही महाराजांच्या जिव्हाळयाचे राहिले होते. आजही प्रसिध्द असणाऱ्या दोन महत्त्वाच्या देवस्थानांना त्यांनी तेव्हा भेट दिली होती. पहिले, तिरुपतीचे श्री बालाजीचे मंदिर व दुसरे श्रीशैल्यम येथील मल्लिकार्जुन मंदिर. त्यापैकी श्रीशैल्य इथले मंदिर व सभोवतालचा परिसर त्यांना इतका आवडला की आपले जीवनच तिथे संपवावे असे त्यांना वाटले होते. प्रत्यक्षात त्यांनी तसे काही केले नाही, पण विषयातील त्यांची श्रध्दा व समर्पण वृत्ती यावर त्यातून चांगला प्रकाश पडतो. श्रीशैल्यला त्यांनी गंगेश नावाचा सुंदर घाट बांधून दिला आणि भविष्यातील भाविकांसाठी एका धर्मशाळेचे नियोजन करून दिले. पारमार्थिक आणि ऐहिक गोष्टींचा इतका सुंदर मिलाफ आणखी काय असू शकतो?

महाराजांच्या ह्या उच्च तात्त्वि भूमिकेबद्दल आणि त्याला सुसंगत अशा आचरणाबद्दल त्यांचे समकालीन तटस्थ व शत्रुपक्षातील लोक काय म्हणतात ते बघू.

त्यांच्या हातात सापडलेल्या मुस्लीम स्त्रियांच्या अब्रूस व मुलांच्या जिवाला त्यांनी कधीही धक्का लागू दिला नाही. याबाबत त्यांचे हुकूम इतके सक्त होते की, ते मोडणाऱ्यांस कडक शिक्षा मिळाल्याशिवाय राहात नसे. - खाफिखान

रेव्हरंड फादर म्ब्रॉसने विनंती केल्यानुसार महाराजांनी त्यांच्या चर्चला पूर्ण अभय दिले. - येवेनो, फ्रेंच प्रवासी.

सुरतेतल्या डचांच्या एका दलालाचे घरही महाराजांनी अत्यंत सुरक्षित ठेवले. तो दलाल मृत झाला होता. पण त्याच्या विधवेला व मुलांना महाराजांनी स्वतःहोऊन पूर्ण संरक्षण दिले. दलाल जिवंत असताना गरिबांचा कनवाळू होता. दलालाचे नाव होते मोहनदास पारेख. तो सर्वधर्मीयांना मदत करत असे. - फ्रांन्सिस बार्निअर, टॅव्हर्निए. फ्रेंच प्रवासी.

सुरतेच्या लुटीसंदर्भात आजही गुजराथी व मराठी असा वाद निर्माण करणाऱ्यांना ही चांगली चपराक नव्हे का?

सुरतेच्या लुटीसंबंधात इतर परदेशी व्यक्तींच्या प्रतिक्रिया -

No one was in the peril of life, for it was the strict order of Sevagy (शिवाजी) that unless resistance was offered no one should be killed and as no one resisted non perished.

(सुरत लुटीच्या वेळी महाराजांनी आपल्या सैनिकांना सक्त ताकद दिली होती की, कुणी प्रतिकार करणार नाही, त्याला ठार मारू नये. प्रजेपैकी कोणीच प्रतिकार न केल्यामुळे कुणालाच ठार मारण्याचा प्रश्न उद्भवला नाही.)

सुरत लुटीच्यावेळी कॉस्म द गार्द या पोर्तुगीज गृहस्थांची प्रतिक्रिया. ह्याने महाराजांचे चरित्रही लिहिले -

He distributed the less valuable things among the poor, where by many acquired much more than they has lost through fire of pillage.

(कमी मौल्यवान वस्तू त्याने (शिवाजी महाराज) गरिबांना वाटून दिल्या. त्यामुळे अनेकांनी आगीमुळे वा लुटीमुळे जे गमावले गेले होते, त्यापेक्षा त्यांना कितीतरी अधिक मिळाले.) - फ्रान्सिस व्हॅलेंटाईनचा अभिप्राय.

महाराजांनी सुरतेत 3000 घरे जाळली व अनेकांना कठोर शिक्षाही केल्या. पण ह्यात त्यांचा रोख फक्त श्रीमंत आणि सत्ताधाऱ्यांवर होता. गरीब व निष्पाप लोकांना त्यांनी कोणताही त्रास दिला नाही. उलट कमी मौल्यवान वस्तू त्यांनी वाटून टाकल्यामुळे अनेकांची गरिबी दूर झाली. व्हॅलेंटाइनने वरील मजकुरात त्यालाच दुजोरा दिला आहे.

स्त्रिया व मुले ह्यांना सदैव संरक्षण, निःशस्त्रावर हल्ला न करणे, लुटालुटीत गरिबांना कमीतकमी तोशिस लागणे, धर्मस्थळांना व धार्मिक व्यक्तींना संरक्षण देणे ह्या गोष्टी महाराजांनी आयुष्यभर सांभाळल्या. ह्या सर्व गोष्टी त्यांची उच्च तात्त्वि भूमिकाच दाखवतात. जगातले अनेक सेनानी अनेक प्रकारचे पराक्रम गाजवून गेले आहेत. उदा., अलेक्झांडर (सिकंदर), हॅनिबाल, नेपोलियन इ. पण महाराजांप्रमाणे किंवा महाराजांइतके नैतिक आदर्श त्यांनी पाळलेले दिसत नाहीत, हेच महाराजांचे खरे मोठेपण!

सुरतेमध्ये अनेक परदेशी लोकांशी महाराजांचा संपर्क आला. त्यामध्ये डचसुध्दा होते. त्यांना महाराजांनी सुरत लुटीबद्दल असे सांगितले होते की ते सुरतवर चढाई करून आले ते त्यांना औरंगझेब बादशहाची दाढी जाळायची होती म्हणून! ह्या दाढी जाळण्यामागची मेख आपण जाणून घेतली पाहिजे. दाढी ही कुठल्याही पुरुषाला सगळयात जवळची असते, त्यामुळे ती प्रियही असते. सुरत ही बादशहाला दाढीसारखी अतिशय प्रिय होती. कारण मुघल साम्राज्यात सर्वात जास्त उत्पन्न देणारे शहर होते सुरत! तसेच सुरतेचे उत्पन्न त्याच्या बहिणीला मिळत असे, ह्याचाच अर्थ तो पैसा बादशहाच्या घरात जात होता! बादशहाची दाढी म्हणजे काय ते यातून स्पष्ट होते. हेसुध्दा महाराज का करत होते, तर शायिस्तेखानाने त्यापूर्वी स्वराज्याची जी खराबी केली होती, त्याचा सूड घ्यायचा म्हणून. हा शायिस्तेखान औरंगझेबाच्याच आदेशावरून आला होता ना! शायिस्तेखानचा काय मामा करायचा तो महाराजांनी पुण्यातच केला होता, पण तरीही त्याचा बोलविता धनी औरंगझेब पुण्यात प्रत्यक्ष न आल्यामुळे मोकळाच होता. त्याचा हिशोब चुकता करायला म्हणून सुरत! आणि असे हिशोब चुकते करणे हेच प्रत्येक राजाचे कर्तव्य असते. महाराजांनी तो सुरतेला चुकता केला, एवढेच.

ह्यावर इतके विस्तृत विवेचन करण्याचे कारण असे की त्यामुळे गुजराथी व मराठी माणसांमध्ये, त्यांच्या परस्पर नात्यामध्ये एक अवघडलेपणा येतो, तो दूर व्हावा किंवा येऊच नये.

ह्या लेखाचा समारोप करताना मला आणखी एक मुद्दा मांडायचा आहे, तो म्हणजे सुरतेला महाराजांनी केली ती लूट नसून आपल्या मुलखाची मुघलांनी (शायिस्तेखानाने) केलेली जी लूट होती व मुघली फौजेने त्या साडेतीन ते चार वर्षांत मराठयांवर जे सर्व प्रकारचे नुकसान व आत्याचार लादले, त्याची भरपाई होती. लूट नव्हे तर नुकसानभरपाई, हेच आपले संबोधन असले पाहिजे.

ह्या निमित्ताने सुरतेत शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणाऱ्या मराठी व गुजराथी बंधूंचे हार्दिक आभार!

Powered By Sangraha 9.0