परीक्षेला सामोरे जाताना

15 Feb 2020 16:37:20

 

बरेचदा दहावी आणि बारावीत असलेल्या विद्यार्थ्यांना सतत हे वर्ष किती महत्त्वाचं आहे याची आठवण घरातील आणि अन्यजणही करून देत असतात. या आणि असा अनेक प्रश्नांच्या भडीमारामुळे विद्यार्थी आणि पालक यांना वर्षभर तोंड द्यावं लागतं. आणि मग कुठेतरी नकळतपणे मनावर दडपण येत जातं. यासाठी परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून आत्मविश्वासाने सामोरे जायला हवे, हेच योग्य.

exam time_1  H
 

 

 

फेब्रुवारी मार्च महिना आला की आपल्या ओळखीत कोणकोण 10वी 12वी मध्ये आहे याची चर्चा सुरू होते. त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या जातात. हे दोन महिने म्हणजे 10 वी आणि 12 वी मधल्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ. अगदी लहानपणापासूनच आपण ही दोन वर्षं खूप महत्वाची आहेत हे ऐकत आलेलो असतो. आपल्या करिअरची पुढची दिशा ठरवण्यासाठीचा हा एक महत्वाचा टप्पा असतो. आणि त्यामुळे साहजिकच परीक्षा जवळ आली की विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक प्रकारचा ताण येतो. एखादी परीक्षा म्हटली की त्याची भीती वाटणं किंवा ताण येणं ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. मुळात हा ताण येण्याची नक्की काय कारणं आहेत हे आधी समजून घ्यायला हवं.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 

आपण सहसा बघतो की मूल 10वी किंवा 12वी मध्ये गेलं की अगदी वर्षाच्या सुरुवातीपासूनच ओळखीचे, आजूबाजूचे, नातेवाईक सतत हे वर्ष किती महत्त्वाचं आहे याची आठवण करून देत असतात. काय मग यावेळी 10वी ना?, कसा सुरू आहे अभ्यास? या प्रश्नांना विद्यार्थी आणि पालक यांना वर्षभर तोंड द्यावं लागतं. आणि मग कुठेतरी नकळतपणे मनावर दडपण येत जातं. आपलं महत्त्वाचं वर्ष आहे, स्वतःकडून, पालकांकडून असलेल्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत, स्वतःला सिध्द करायचं आहे ही भावना कुठेतरी मनात आपोआप तयार होत जाते. आणि मग परीक्षा जशी जवळ येते तसा मनावर ताण यायला सुरुवात होते. परीक्षांच्या काळात आलेला हा ताण जर थोडया आणि योग्य प्रमाणात असेल तर त्याचा फायदा नक्कीच होतो. मला काहीतरी करून दाखवायचं आहे या विचाराने मुलं अभ्यास करतात. कुठेतरी योग्य प्रमाणात असलेला हा ताण मुलांना अभ्यास करायला प्रोत्साहित करतो. परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला येणारा ताण हा कमी अधिक प्रमाणात असतो. काही विद्यार्थी पालक हे गरजेपुरता ताण घेतात तर काही गरजेपेक्षा खूप जास्त.

हा गरजेपेक्षा जास्त ताण नक्की का येतो तर त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे डोक्यात येणारे नकारात्मक विचार. एखाद्या कसोटीच्या क्षणी किंवा काही अनपेक्षित घडल्यास आपल्या डोक्यात येणारे विचार हे नकारात्मक असतात. साधारण जानेवारी महिन्यात शाळा कॉलेजेसमध्ये प्रीलिम्स होतात. काहीवेळा त्यात एखाद्या विषयात कमी मार्क्स मिळतात, काही जणांना हे लक्षात येतं की आपल्या अमुक एक विषयाचा अभ्यास म्हणावा तितका झाला नाहीये. आणि मग अशा वेळी हळूहळू डोक्यात विचार यायला लागतात. माझा अभ्यास पूर्ण होईल ना?, मला परीक्षेत सगळं आठवेल ना?, मी लिहिताना काही विसरले/विसरलो तर?, मी न केलेला प्रश्न परीक्षेत आला तर?, माझा पेपर पूर्णच नाही झाला तर?, पेपर कठीण तपासले तर? या अशा नकारात्मक विचारांचं चक्र इतकं वेगात सुरू होतं की काही जणं अगदी माझी पुरवणी हरवली तर?, पेपरमधली काही पेजेस तपासायची राहूनच गेली तर? इतकाही विचार करायला लागतात. आणि मग या नकारात्मक विचारांच्या चक्रातून मनात भीती, ताण या भावना निर्माण होतात. मग त्याचा परिणाम कुठेतरी शरीरावर, झोपेवर, जेवणावर देखील दिसून येतो. भीती वाटायला लागली की घसा कोरडा पडणं, हातपाय थंड होणं, एकदम ब्लँक होणं, छातीत धडधड होणं, लक्ष न लागणं, झोप न येणं किंवा खूप जास्त झोप येणं, चिडचिड होणं अशा प्रकारचे शारीरिक बदल दिसायला लागतात. आणि मग साहजिकच या सगळयाचा अभ्यासावर परिणाम होतो. अभ्यासात लक्ष लागत नाही, वाचलेलं कळत नाही, आठवत नाही. आणि मग पुन्हा तेच नकारात्मक विचारांचं चक्र, भीती आणि ताण वाढतच राहतो.

आता या सगळयामध्ये गरज असते ती या येणाऱ्या ताणावर नियंत्रण करण्याची आणि भीतीवर मात करण्याची. या काळात मुलांनी खालील काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

1. झोप आणि आहार - आपलं शरीर आणि मन हे हातात हात घालून चालत असतं. त्यामुळे आपल्याला गरजेपुरती झोप मिळणं खूप महत्त्वाचं आहे. घरचा आणि योग्य आहार असणं हे ही तितकंच गरजेचं आहे. झोप आणि आहार या दोन गोष्टी व्यवस्थित असतील तर आपल्याला दिवसभर उत्साही राहायला, आपण जे करतोय त्यात लक्ष लागायला मदत होते.

 

2. सकारात्मक विचार - वर सांगितल्याप्रमाणे आपल्या डोक्यात येणारे नकारात्मक विचार आपल्या मनात भीती आणि ताण निर्माण करत असतात. त्यामुळे कुठेतरी त्या विचारांवर काम करून त्यांना डोक्यातून बाहेर काढून टाकण्याची गरज असते. मग अशा वेळी मुलांनी स्वतःला प्रश्न विचारायचा आत्ता माझ्या डोक्यात येणाऱ्या या शक्यता कशावरून खऱ्या होतील?, हे सगळे विचार करून आत्ता मला खरंच काही फायदा होतो आहे का?, या विचारांमुळे माझी भीती वाढते आहे की कमी होते आहे?. हे प्रश्न स्वतःला विचारले की आपलं आपल्याला लक्षात येतं की आपण कुठेतरी चुकीच्या पध्दतीने विचार करतो आहोत. आणि मग हे लक्षात आल्यावर स्वतःला सकारात्मक सूचना देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी अभ्यास करतो आहे, मी वाचलेलं सगळं मला परीक्षेत नक्की आठवेल, मला पेपर छान लिहिता येईल इत्यादी. या अशा सकारात्मक सूचानांमुळे आपला आत्मविश्वास वाढायला मदत होते. तसेच मनात येणारे नकारात्मक विचार, भीती याबद्दल पालकांशी किंवा शिक्षकांशी बोलल्यास देखील ताण कमी व्हायला मदत होऊ शकते.

 

3. अभ्यासाचं योग्य नियोजन - आत्तापर्यंत मी काय नाही केलं यापेक्षा आता माझ्याकडे किती दिवस शिल्लक आहेत आणि त्यामध्ये मी कसा आणि किती अभ्यास करायला हवा याचं नियोजन शांतपणे बसून करायला हवं. त्यासाठी पालकांची किंवा शिक्षकांची मदत घेतली तरी त्याचा फायदा होईल.

4. मित्र मैत्रिणींशी तुलना टाळणे - या दिवसात अजून एक महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आपल्या बाकीच्या मित्रमैत्रिणींचा किती अभ्यास झाला आहे, परीक्षेला वर्गात जायच्या आधी कोणी कोणता प्रश्न केला आहे, ऑप्शनला काय टाकलं आहे या अशा प्रकारच्या चर्चा टाळणे. या चर्चांमध्ये आपणच एखादी गोष्ट केली नाहीये हे लक्षात आल्यास भीती अजून वाढते.

5. आत्मविश्वास - या आधीही तुम्ही अनेक परीक्षा दिल्या आहेत. अनेक कसोटयांचा सामना यशस्वीपणे केला आहेत. आणि त्यामुळे ही कसोटी, ही परीक्षासुध्दा मी तितक्याच समर्थपणे पार करेन हा आत्मविश्वास स्वतःला द्यायचा आहे.

 

या सगळयामध्ये विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांना देखील बऱ्याच प्रमाणात ताण आलेला दिसून येतो. सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपल्या मुलाने चांगले मार्क्स मिळवणं गरजेचं आहे, पुढे चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणं गरजेचं आहे असं सगळयाच पालकांना वाटत असतं. मात्र बरेच पालकसुध्दा या गोष्टींचं दडपण घेताना दिसतात. आणि विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांच्याही डोक्यात नकारात्मक विचारांचं चक्र सुरू होतं. आपला मुलगा करतोय ना नीट अभ्यास ?, काय माहित परीक्षेत नक्की नीट पेपर लिहिल ना?, नाही मिळाले चांगले मार्क तर?, पुढे कसं होणार?, ऍडमिशन कशी मिळणार? इत्यादी अनेक विचार आणि मग त्यामुळे भीती आणि ताण. बऱ्याच पालकांना या ताणामुळे झोप लागत नाही, काही शारीरिक व्याधी असल्यास त्या अजून वाढतात. आणि त्यामुळेच पालकांनी देखील खालील काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

1. प्रश्नांचा भडीमार टाळणे - परीक्षा जवळ आली की बरेच पालक आपल्या मुलांसाठी सुट्टी घेऊन घरी राहतात. आणि या काळात बऱ्याचदा मुलांवर सतत प्रश्नांचा भडीमार होतो. अभ्यास होतोय ना?, करतोयस ना?, मला दिसतच नाहीयेस अभ्यास करताना, अरे 12 वी आहे इतका अभ्यास नाही पुरणार, हे व असे संवाद प्रत्येक घराघरातून ऐकू येतात. या प्रश्नांनी मुलांवर अजून दडपण येऊ शकतं. त्यामुळे तपास केल्यासारखे प्रश्न न विचारता एकंदरीत कसा अभ्यास सुरू आहे याचा आढावा घेणारे प्रश्न असावेत.

 

2. तुलना टाळणे - तुमच्या मुलांबरोबरीची इतर मुलं कसा आणि किती अभ्यास करतायत हे मुलांना सतत सांगणं टाळायला हवं. प्रत्येक मूल हे वेगळं असतं आणि त्यामुळे प्रत्येकाची अभ्यास करण्याची पध्दत देखील वेगळी असते हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं.

3. आत्मविश्वास वाढवणे - तू चांगला अभ्यास करते आहेस, तू नक्की छान पेपर लिहू शकशील, परीक्षा चांगली जाईल, तुला हवे तेवढे मार्क्स नक्की मिळतील, तुला अभ्यासात, नियोजनात काहीही मदत लागली तरी आम्ही तुझ्याबरोबर आहोत अशा प्रकारचे सकारात्मक संवाद मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्कीच मदत करतात. तसेच मुलं करत असलेल्या तयारीवर आणि त्यांच्या क्षमतेवर पालक म्हणून आपणही तितकाच विश्वास दाखवणं गरजेचं आहे.

4. वेळापत्रकाची काळजी - पालकांनी वेळापत्रकाचे नियोजन करून देण्यापेक्षा मुलांनी आखलेले वेळापत्रक पाळण्यासाठी त्यांना मदत केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. मुलांची झोप आणि आहार या गोष्टींकडे पालकांनी विशेष लक्ष द्यायला हवं.

5. योग्य संवाद साधणे - परीक्षांचं महत्त्व पालकांनी योग्य पध्दतीने मुलांना समजावून देणं गरजेचं आहे. तुला इतके मार्क्स मिळाले तर हे बक्षीस घेऊन देऊ, अमुक इतके मार्क्स मिळाले तरच आयुष्यात पुढे काहीतरी चांगलं होऊ शकतं, कमी मार्क्स मिळाले तर काय म्हणतील लोकं.

अशा प्रकारचे संवाद प्रत्येक घरात ऐकायला मिळतात. परंतु अभ्यास करणं ही आपली जबाबदारी आहे आणि तो आपण फक्त स्वतःसाठी करतो आहोत, आपण अभ्यास केल्याने त्याचा फक्त आपल्याला फायदा होणार आहे, त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळणार आहे हे मुलांना समजावून देणं खूप महत्त्वाचं आहे. आपण मुलांना करत असलेल्या सूचना, आपण व्यक्त करत असलेली नाराजी याचा मुलांना या क्षणी काहीही फायदा होत नसतो हे लक्षात घ्यायला हवं. तसेच यश मिळालं की आपण ते कसं साजरं करणार याबरोबरच चुकून अपयश आल्यास त्यावरही कशी मात करता येऊ शकते हे मुलांना सांगणं खूप गरजेचं आहे. या गोष्टींमुळे परीक्षांचं दडपण, आलेलं अपयश यामुळे ऐकायला मिळणारे अपघात नक्कीच टाळता येतील.

 

शेवटी या सगळयामध्ये विद्यार्थी आणि पालक यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे 10 वी आणि 12वी ही वर्षं आयुष्यात कितीही महत्त्वाची असतील, पुढच्या वाटचालीला दिशा देणारी असतील तरीही या परीक्षा म्हणजे आपलं आयुष्य नसून तो आपल्या आयुष्याचा फक्त एक छोटासा भाग आहे. आणि त्यात मिळणारं यश किंवा अपयश हे मला काहीतर शिकवून जाणार आहे. त्यामुळे आत्तापर्यंत दिलेल्या इयत्ता पहिलीपासूनच्या परीक्षांसारखीच ही एक परीक्षा आहे या दृष्टिकोनातून बघितल्यास पालक आणि मुलं यांच्या मनावरचा ताण कमी व्हायला आणि आत्मविश्वास वाढायला नक्कीच मदत होईल.

 

हा लेख वाचत असलेल्या सर्व 10वी आणि 12वी मधील विद्यार्थी आणि पालकांना खूप शुभेच्छा !


Powered By Sangraha 9.0