समृध्दीसोबत संस्कारांची रुजवण करणारे काकासाहेब चितळे

14 Feb 2020 17:09:15

दूरदृष्टी, नव्याचा स्वीकार करण्याची वृत्ती या गुणांचा वारसा काकासाहेबांना आपल्या वडिलांकडून मिळाला. लहान लेकरांना दूध देतानाही भेसळीच्या शंकेनं मन काळवंडून जावं अशा या काळात चितळेंनी दिलेला दर्जाबद्दलचा, शुध्दतेबद्दलचा विश्वास फार मोलाचा आहे आणि म्हणूनच तो रुजवणाऱ्या, जपणाऱ्या काकासाहेबांसारख्या कर्मयोग्याचे योगदान अनमोल आहे! त्यांच्या स्मृतींना श्रध्दांजली अर्पण करणारा लेख.

chitale_1  H x  

भिलवडीच्या चितळे उद्योगात अखेरपर्यंत कार्यरत असणारे उत्साहमूर्ती काकासाहेब चितळे यांचं आकस्मिक निधन सांगली परिसराला व विशेषतः भिलवडी परिसरातील शेतकरी व सामान्य माणसालाही चटका लावून गेलं.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 

भिलवडीसारख्या लहान खेडेगावात चितळे उद्योग समूहाने केलेली उद्योगक्रांती सर्वांना परिचित आहे. देश-विदेशात दूध व दुग्धजन्य पदार्थांसोबत मिठाई व बाकरवडी करता 'चितळे ब्रँड' यशस्वीपणे ग्रााहकांच्या मनात रुजला आहे.

'कष्ट, सातत्य व सचोटी' हा व्यवसायाच्या मूळ पुरुषाने म्हणजे कै. भास्कर गणेश चितळे यांनी 1940 साली दिलेला मंत्र आज चौथ्या पिढीतही तंतोतंत पाळला जात आहे. 'ज्या दिवशी दुधात पाणी घालायची इच्छा होईल त्या दिवशी धंदा बंद करा' हा त्यांनी दिलेला संस्कारदेखील या घराण्याने कुळधर्माप्रमाणे जपला आहे. एखादा व्यवसाय पिढयानपिढया सुरू रहाणं, गुणवत्ता व मूल्यं याबाबत काहीही तडजोड न करता तो वाढत रहाणं, हा काही योगायोग वा नशिबाचा भाग नसतो. स्वप्नांसोबत मूल्यंदेखील एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवली जात असली तरच हे घडू शकतं.

दूरदृष्टी, नव्याचा स्वीकार करण्याची वृत्ती या गुणांचा वारसा काकासाहेबांना आपल्या वडिलांकडून मिळाला. 1939-40च्या काळात दुधाचं पाश्चरायझेशन करून विकणं ही कल्पना आधुनिक होती. काकासाहेब व नानासाहेब या दोघांनीही स्वतः अनेक आधुनिक गोष्टींची जोड व्यवसायाला दिली. या दुसऱ्या पिढीने व्यवसाय नुसता संख्यात्मक वाढवला नाही, तर अत्यंत शास्त्रशुध्द पध्दतीने व नवनवी तंत्रज्ञाने अंगिकारून तो गुणात्मकदृष्टया उंचीवर नेऊन ठेवला.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

पुण्यासारख्या ठिकाणी विक्री सुरू झाली. दूध व अन्य दुग्धजन्य उत्पादने यांची विक्री महाराष्ट्र ओलांडून देश-विदेशात जाऊ लागली. या विक्रीला पुरी पडणारी उत्पादन यंत्रणा भक्कम व चोख असणं गरजेचं होतं.

वाढत्या मागणीला पुरं पडेल इतकं म्हणजे दररोज सुमारे चार लाख लिटर्स इतकं दुग्ध उत्पादन व संकलन भिलवडीत होऊ लागलं. शेतकऱ्यांना उत्तम वाणाच्या म्हशी मिळवून देणं, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासून म्हैस शेतकऱ्याला पोच मिळणं, तिच्या देखभालीकरता मार्गदर्शन मिळणं, आजारांवर उपचार, आहार, स्वच्छता सर्वच बाबी काटेकोरपणे पाहिल्या जात. दुधाचे पैसे तातडीनं देण्याची पध्दत पाडून शेतकऱ्याला आश्वस्त तर केलंच पण मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या काकासाहेबांनी या सर्वाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोडही दिल. चितळेंच्या स्वतःच्या केंद्रात म्हशीला खाणं-पाणी-औषधं देणं, दूध काढणं या गोष्टी संगणकामार्फत नियंत्रित होऊ लागल्या. अत्यंत स्वच्छ, चकचकीत व संगणकाकडून पूर्णपणे नियंत्रित असे गोठे पहाताना आपण एखादी सुसज्ज प्रयोगशाळाच पहातोय असं वाटतं. म्हशींचे उत्तम वाण तयार होण्याकरता म्हशींच्या जेनेटिक्सचा अभ्यास करणारं केंद्रं उभं राहिलं. कृत्रिम रेतन पध्दतीने मादी जातीची पेैदास वाढवण्याकरता 'ब्रह्मा' या स्वतंत्र प्रकल्पाची उभारणी झाली. उत्तम व निवडक बीजांपासून अधिक सुदृढ व दर्जेदार दूध, तेही सामान्य म्हशीच्या तीन ते चार पटीनं अधिक देणाऱ्या म्हशींचं नवं वाण भिलवडीत तयार झालं. या वाणालाही भरपूर मागणी आली.

नव्या पिढीच्या नव्या आकांक्षांना बळ देण्याकरता जुनी पिढीही त्यांच्यासोबत उभी राहिली तरच असे चमत्कार घडू शकतात. काकासाहेबांचं वैशिष्टय हे की त्यांनी कधीही वयाचा परिणाम वृत्तीवर होऊ दिला नाही. अखंड कार्यरत असण्याचे चितळे घराण्याचे संस्कार त्यांच्यात याही वयात कायम होते. काकासाहेबांचं व्यक्तिमत्त्वही अतिशय छाप पाडणारं. उंच, रुबाबदार आणि सदैव प्रसन्न अशा काकासाहेबांना पहाताच त्यांच्याबद्दल आदरयुक्त दबदबा वाटत असे. पण काकासाहेबांनी कधीही आपला मोठेपणा मिरवला नाही.

अत्यंत साधी, मध्यमवर्गीय म्हणावी अशी जीवनशैली कधी बदलली नाही.

दैनंदिन शिस्तबध्द कार्यक्रमात कधीही खंड पडला नाही. सकाळी सहाचा चहा स्वहस्ते करून घेणं, वयाच्या सत्तरीपर्यंत सकाळी बॅडमिंटन खेळायला जाणं चुकलं नाही. इतके वर्षांत काकासाहेब आजारी असल्यानं ऑफिसला आले नाहीत असं कुणाला आठवतच नाही. साडेनऊला न्याहारी करून दहाच्या ठोक्याला ते ऑफिसला हजर असत. अर्थातच कर्मचारी वर्गाला कामात कुचराई करायला संधीच मिळत नसे. संध्याकाळी दुधाच्या गाडया बाहेर पडतेवेळी काकासाहेब व नानासाहेब जातीनं हजर असत. पण उद्योगात मग्न असले तरीही घरच्या आघाडीवरही काकासाहेबांचं बारीक लक्ष असे.

बोलणं स्पष्ट व रोखठोक असलं तरी वागण्यात कोरडेपणा नव्हता. सुना, मुलं नातवंडं यांच्याशी अतिशय स्ेहाचं नातं. नव्या पिढीच्या नव्या योजना, नवे प्रयोग, नवी झेप यांचं मनापासून कौतुक व अभिमान असे. 'जरूर करून पहा. मी तुमच्याबरोबर आहे' असं प्रोत्साहन ते नेहमीच देत. घरी कोण आजारी आहे, त्यांचं पथ्यपाणी, औषध नीट होतंय ना असं बारीक लक्ष असे. नातवंडं ही दुधावरची साय सर्वच आजोबांना प्रिय असते. 'शिक्षण मातृभाषेतूनच हवं' या त्यांच्या आग्राहाला सिध्द करून दाखवल्यामुळे काकासाहेबांनाही भिलवडीतल्या मराठी शाळेत शिकून आता ऍपलमधे नोकरी करणाऱ्या नातीचा फार अभिमान!

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 त्यांच्या गप्पांचे विषय इतके विविध असत की यांना सगळंच कसं माहिती असतं, असं समोरच्याला वाटावं आणि इतकी माहिती असायला ते कधी वाचत असतील, असा प्रश्न पडावा. एकदा शिक्षक परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांना बोलावलं असता त्यांनी 'शिक्षक व शिक्षणपध्दती' या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण पण अतिशय खेळीमेळीत भाषण केलं. त्यांचा व्यावसायिक परिचय नसणाऱ्या कुणी ते भाषण ऐकलं असतं, तर हे शिक्षणक्षेत्रातील कुणा अनुभवी तज्ज्ञ व्यक्तीचे विचार आहेत, असंच वाटलं असतं.
 

व्यवसायाशी संबंधित कर्मचारी, शेतकरी यांच्याशी त्यांचं व्यवसायापलीकडचं घट्ट नातं होतं. भिलवडी परिसरातील कित्येक तरुणांना 'मुलगा चितळे डेअरीत कामाला आहे' या निकषावर वधुपिते निर्धास्त आपल्या मुली देत. अशा अनेक विवाहांमधे काकासाहेब स्वतः नुसते हजर नसत, तर प्रसंगी हौसेने वाढायलाही उभे राहत. सामाजिक काम करतानाही काहीही हातचं राखून करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. थेट माणसांच्यात मिसळणं, त्यांच्याशी संवाद करणं, कामात प्रत्यक्ष सहभाग देणं त्यांना आवडे. सामाजिक कामानिमित्त सहज कुणाच्याही घरी जाणं, अनौपचारिक व सहज गप्पांनी त्या घराला आपलं मोठेपण विसरायला लावणं हा त्यांचा सहजस्वभाव होता. जायंटस् क्लबचे ते पदाधिकारी होते. जायंटस्च्या माध्यमातून नेत्रदानविषयक जागृतीचे मोठं काम त्यांनी केलं.

भिलवडी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून झालेलं शैक्षणिक काम, भिलवडीच्या सार्वजनिक वाचनालयाचं अनेक वर्षे केलेलं काम असे अनेक पैलू त्यांच्या कामाचे होते.

परिसरातील अनेक सामाजिक संस्थांशी ते जोडलेले होते. या संस्थांच्या माध्यमातून उद्योगाशी थेट संबंध नसणाऱ्या सामान्य जनतेशीही त्यांचं थेट व जिव्हाळयाचं नातं जुळलं होतं. महापुराच्या काळात या परस्पर साहचर्याचं उत्तम उदाहरण पहायला मिळालं. दोन्ही पुराच्या काळात काकासाहेब मदतकार्यात अग्रोसर होते. पूरकाळात ते कोयनेच्या विसर्गावर लक्ष ठेवत होते. पूरकाळात व नंतरही गावातल्या अडचणी सोडवत होते. यंदाच्या महापुरात एक वेळ अशी आली की त्यांच्या रेतन केंद्रातले मौल्यवान रेडे पुराच्या पाण्यात सापडणार अशी चिन्हं दिसताच गावातल्या काही तरुणांनी जीव धोक्यात घालून ते रेडे वाचवले. एरवी सत्कारावर विषय संपला असता. चितळेंनी त्या तरुणांना आपल्या व्यावसायिक परिवारात सामावून घेतलं. त्यामुळेच काकासाहेबांच्या जाण्यानं कृष्णाकाठच्या साध्यासुध्या लोकांनाही चटका बसला आहे.

 

उद्योग -व्यवसाय वा कोणत्याही क्षेत्रात जो समाजाचं नेतृत्व करतो, काही एक स्थान मिळवतो, त्याची जबाबदारी अधिक वाढते, कारण त्याची पुढची पिढीच नाही, तर त्याचं अनुकरण करत समाजातले अनेक लोक वाटचाल करत असतात. त्या माणसाचं बोलणं, वागणं, मूल्यनिष्ठा सर्वाचा प्रभाव समाजावर पडत असतो.

 

काकासाहेबांनी आपल्या वागण्यातून परिसरातील तरुणांकरता एक धवल आदर्श उभा केला. आपला उद्योग सचोटीनं करून नुसता पैसा नव्हे, तर अकलंकित लक्ष्मी घरी आणली. तिचा व्यय समाजाकरता किती मार्गांनी करता येतो हेही दाखवून दिलं. कृष्णाकाठाने शेतीचा पैसा दोन मार्गांनी आलेला पाहिला, एक उसाचा पैसा व दुसरा दुधाचा पैसा. दुधाच्या पैशासोबत दिलेले संस्कार हे चितळेंनी कृष्णामाईचं केलेलं खरं ऋणमोचन आहे.

 

या उद्योगसमूहाचा कणा म्हणजे कुटुंबाची घट्ट असलेली वीण. ती वीण न उसवता उलट नवनव्या नक्षीनं खुलेल याकरता जुन्या पिढीनं खुलेपणानं नव्या पिढीला वाव देणं आवश्यक असतं. काकासाहेब व नानासाहेब यांची व्यक्तिमत्त्वं सकृतदर्शनी अगदी भिन्न. पण परस्परपूरक व एकदिलानं काम करण्याच्या वृत्तीमुळं काकान-नानांची जोडी भिलवडी परिसराच्या अभिमानाचा व अपार स्नेहाचा विषय बनली. काकांच्या सामाजिक कामामुळं व चितळे उद्योग समूहाच्या भक्कम आर्थिक सहकार्यामुळं परिसरात अनेक चांगली कामं उभी राहिली. चितळेंनी या भागात केवळ पैशाचाच नाही, तर संस्कारांचा, सद्वर्तनाचाही प्रवाह वाहता ठेवला. मुळात दुधाचा व्यवसाय कष्टाचा. पहाटे चार वाजण्याच्या आधीच सुरू होणार. अत्यंत काळजीपूर्वक हाताळायचा पदार्थ. या कामाला एक दिवसही सुट्टी नसते व एक तासाचंही दुर्लक्ष चालत नाह. त्यामुळं शिस्त, काटेकोरपणा, प्रामाणिकपणा या गुणांना पर्याय नसतो. काकासाहेबांनी आपल्या वागण्यातून हे आदर्श दाखवून दिले. लहान लेकरांना दूध देतानाही भेसळीच्या शंकेनं मन काळवंडून जावं अशा या काळात चितळेंनी दिलेला दर्जाबद्दलचा, शुध्दतेबद्दलचा विश्वास फार मोलाचा आहे आणि म्हणूनच तो रुजवणाऱ्या, जपणाऱ्या काकासाहेबांसारख्या कर्मयोग्याचे योगदान अनमोल आहे !

 

विनीता तेलंग

989098411

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 
Powered By Sangraha 9.0