जशास तसे उत्तर द्या!

07 Dec 2020 18:48:11

देवेंद्र फडणवीसांचे हे म्हणणे आहे की, “महाविकास आघाडीच्या एकत्रित शक्तीचा आम्हाला अंदाज आला नाही.हे आत्मपरीक्षणात्मक बोल आहेत. त्यातून दुसरा अर्थ ध्वनित होतो तो म्हणजे या एकत्र शक्तीशी पुढे लढायचे आहे, हे नेतृत्वाच्या लक्षात आलेले आहे.

bjp_1  H x W: 0

महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १ डिसेंबर रोजी निवडणुका झाल्या. धुळे स्थानिक स्वराज्य संस्था जागा सोडून सर्व ठिकाणी भाजपचा पराभव झाला. नागपूर आणि पुणे या दोन प्रतिष्ठेच्या जागा होत्या, त्यादेखील भाजपने गमाविल्या. निवडणुकांमध्ये विजय झाला की आनंद होतो आणि पराजय झाला की दु:ख होते. समजा, भाजपच्या जागा निवडून आल्या असत्या, तर महाविकास आघाडीला दु:ख झाले असते. आता उलटे झाले. सुख-दु:खाची बेरीज समान असते असे जे म्हणतात, ते अशा वेळेला अनुभवायला येते.

 

भाजपचा हा पराभव म्हटला तर गंभीर आहे आणि म्हटला तर विशेष गंभीरपणे घेण्याचे कारण नाही. ही काही सार्वत्रिक निवडणूक नव्हती. सामान्य मतदार मतदानासाठी उतरलेला नव्हता. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक होती. लोकमताचे प्रतिबिंब या मतदानात १०० टक्के उमटले आहे, असे म्हणता येत नाही. राजकीय नेते काय म्हणतात आणि राजकीय भाष्य काय करतात, ही गोष्ट वेगळी. मतदारांचा कौल हा विषय लक्षात घेतला तर सर्व जनतेने आपले मत सहा जागांतून व्यक्त केले, असे जर कुणी म्हणायला लागला तर त्यावर विश्वास ठेवता येणार नाही.

भाजपने हा विषय गंभीरपणे घेण्याचा आहे. कोणतीही निवडणूक मग ती एका जागेसाठी असो की २४२ जागांसाठी असो, राजकीय पक्षाने अतिशय गंभीरपणेच घ्यायची असते. राजकीय पक्षाचे यशापयश मोजण्याचा एकच मापदंड आहे, तो म्हणजे पक्षाचे किती उमेदवार निवडून येतात. पक्षाचे तत्त्वज्ञान चांगले आहे, नेते चारित्र्यवान आहेत, कार्यकर्ते समर्पित आहेत, एवढ्याने निवडणुका जिंकता येत नाहीत. एकेकाळी प्रजा समाजवादी पक्षात या सर्व गोष्टी होत्या. परंतु, ते कधी सत्तेवर आले नाहीत. निवडणुका जिंकण्याची क्षमता हीच पक्षाची सर्वात मोठी शक्ती असते. यासाठी प्रत्येक निवडणूक अटीतटीची करूनच लढावी लागते.

 

पाच जागी पराभव झाला याचे आत्मपरीक्षण भाजपने करायलाच पाहिजे. आत्मपरीक्षणाचे काही विषय असतात. पहिला विषय योग्य उमेदवाराची निवड केली गेली का? निवडणुकीत एका जागेसाठी इच्छुक उमेदवार अनेक असतात, त्यातून योग्य त्या उमेदवाराची निवड करावी लागते. ही निवड करताना उमेदवाराची पक्षनिष्ठा, पक्षासाठी त्याने केलेले आतापर्यंतचे काम, त्याचा जनसंपर्क, त्याचे संवाद कौशल्य, त्याचे संघटन कौशल्य, त्याची वैचारिक बांधिलकी आणि त्याची पैशाची ताकद या सर्व गोष्टींचा विचार उमेदवाराची निवड करताना केला जातो. यावेळीही हा विचार केला गेला असेलच. कुणीतरी उमेदवार लादणे असे राजकीय पक्षात फारसे होत नाही. सहमती निर्माण करावी लागते.


bjp_1  H x W: 0 

एवढे सगळे करूनही उमेदवार निवडून आला नाही आणि निवडून येणाच्या जागी निवडून आलेल्या जागी निवडून नाही आला तर उमेदवाराची निवड करताना काहीतरी चुकले आहे, असा निष्कर्ष करावा लागतो. त्याचे आत्मचिंतन भाजपने केले पाहिजे. कारण, पुढे येणार्‍या मोठ्या निवडणुका स्वबळावर लढायच्या आहेत आणि जिंकायच्या आहेत, सर्वांची ती अपेक्षा आहे.

 

उमेदवाराची निवड करताना उमेदवाराच्या जातीचा विचार करावा लागतो. जातीचा विचार करायचा नाही, ही संघविचारधारेची शिकवण आहे. समरसता कामाचा तो पायाभूत सिद्धांत आहे. या सर्व गोष्टी खर्‍या असल्या तरी ज्यांच्याशी लढायचे आहे ते १०० टक्के जातवादी आहेत. लढाई विषम शस्त्राने करता येत नाही. घोड्यावर बसून हातात भाला किंवा तसेच लांबलचक शस्त्र घेऊन जर कुणी लढायला आला तर त्याच्याशी जंबिया, छोटी तलवार घेऊन लढता येत नाही. महाराष्ट्रामध्ये जातवादी राजकारणाचे सुपीक पीक शरदराव पवार यांनी आणलेले आहे. लढाई त्यांच्याशी करायची आहे.

 

त्यांनी एक घोषणा दिली की, ‘हा महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकर यांचा आहे.त्यांना असे म्हणायचे आहे की हा महाराष्ट्र या तिघांच्या जन्मजातीचा आहे. हा महाराष्ट्र रानडे, गोखले, टिळक, सावरकर यांचा नाही. म्हणजे त्यांच्या जन्मजातींचा नाही. हे राजकारण ते अतिशय कौशल्याने खेळत असतात. जातवादाचा शिक्का आपल्यावर लागणार नाही, याची ते काळजी करतात. आपली प्रतिमा सेक्युलर’, ‘पुरोगामीठेवण्यात त्यांना विलक्षण यश आलेले आहे. त्यांच्याशी लढा द्यायचा आहे. म्हणून त्यांच्या जातवादाला, जातवादाच्या शस्त्रानेच कापावे लागेल. उद्धटाशी आणावा उद्धट, खटनटाशी आणावा खटनटरामदास स्वामी नंतर सांगतात की जैशास तैसा जेव्हा भेटे, तेव्हा मज्यालसी थाटेजो ज्या शस्त्राने लढतो आहे त्याला त्या शस्त्रानेच उत्तर दिले पाहिजे. आपण किती जातिमुक्त आहोत, हे ओरडून सांगितले तरी निवडणुकीच्या राजकारणात त्याचा काही उपयोग नसतो.

 

उमेदवारांची निवड करत असताना याचा विचार गंभीरपणे केला की नाही, हे मी काही सांगू शकत नाही. परंतु, त्याचा विचार केला पाहिजे. आम्हाला जातपात निर्माण करायची नाहीहे जसे खरे, तसेच आम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेतहे त्याहून खरे आहे. एकदा जातवादीचे तण जाळल्याशिवाय जातीविरहीत समाजाची पेरणी शक्य होणार नाही. निवडणूक जिंकण्यासाठी आणखी एका विषयाचा विचार करावा लागतो, तो आहे संघटनेचा. विधान परिषदेची निवडणूक मर्यादित मतदारांपुरती होती. मतदार कोण आहेत, हे नावानिशी माहीत असते.

 

तो राहतो कुठे, त्याचा व्यवसाय काय, त्याचा मोबाईल नंबर कोणता, अशी सर्व तपशीलवार माहिती या मतदारसंघात सर्वांनाच सहजपणे उपलब्ध असते. यामुळे संपर्क कोणाशी करायचा आहे, हे स्पष्ट होते. संपर्क करण्याचे माध्यम कोणते वापरायचे, हेदेखील स्पष्ट होते. संपर्कासाठी कोणते विषय उचलायचे याचा विचार करता येतो आणि त्याची मांडणी करता येते. सार्वत्रिक निवडणुकीत तेथील मतदारसंघ मोठे असतात. मतदार विखुरलेला असतो. त्याच्याशी संपर्क करण्याचा खूप आटापिटा करावा लागतो. तसे या मतदारसंघाचे नाही.

 

हे मतदारसंघ का निर्माण केले गेले? याचे कारण असे की, पदवीधरांचे प्रतिनिधित्व कायदेमंडळात असले पाहिजे आणि शिक्षकांचेही प्रतिनिधित्व कायदेमंडळात असले पाहिजे. या दोन्ही वर्गांचे प्रश्न किंवा गार्‍हाणी वेगवेगळी असतात. त्यांना वाट करून देणे आवश्यक असते. निवडणूक लढविताना या विषयाचा पक्षाने अभ्यास करावा लागतो. शिक्षकांची गार्‍हाणी कोणती आहेत, पदवीधरांच्या काय अपेक्षा आहेत, हे समजून घेऊन त्यानुसार प्रचाराचे तंत्र ठरवावे लागते. पक्षाने हे सर्व केलेच असेल. तेथेही काही उणिवा राहिल्या का, याचा विचार पक्षनेतृत्वाने केला पाहिजे. हाच विषय पुढे सार्वत्रिक निवडणुकांमध्ये येणार आहे. सामान्य मतदार नाराज आहे का, कोणत्या कारणाने नाराज आहे, शासनाकडून त्याच्या अपेक्षा काय आहेत, या अपेक्षांची पूर्तता कशा प्रकारे करता येईल, या सर्व विषयांचा विचार करावाच लागणार आहे. विधान परिषदेच्या निवडणूक निकालांनी ती संधी दिलेली आहे, तिचा उपयोग करावा.

 

शिक्षक आणि पदवीधर मतदार हे नाही म्हटले तरी समाजाचे मर्यादित क्षेत्रात का होईना, नेतेच असतात. त्यांची मते सामान्य मतदार प्रमाण मानतो. आजही खेडोपाडी शिक्षक वर्गाला सन्मानाचे स्थान आहे. गावातील शिक्षित पदवीधराला तसाच मान असतो. त्याची मते प्रमाण मानली जातात. या मतदाराने भाजपला स्वीकारलेले नाही, हा गंभीरपणे घेण्याचा विषय आहे. शतप्रतिशत मतदारांनी नाकारले असे काही झाले नाही. मतांची तफावत थोडी आहे. परंतु, त्याची चिंता करता नये, असे म्हणून नाही चालणार. प्रत्येक मताची चिंता हीच उद्याच्या यशाची शाश्वती आहे.

 

या निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य करून काहीजणांनी पराभवाचे खापर त्यांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यामागे जातीचे राजकारण आहे आणि त्यामागे शरद पवार नसतीलच हे सांगणे फार अवघड आहे. म्हणून आपण कुणाच्या बंदुकीतील गोळी बनता नये. हे आज भाजपमध्ये असलेल्या लोकांनी जसे लक्षात ठेवायला पाहिजे, तसेच काल भाजप सोडून गेलेल्यांनीसुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. ही निवडणूक काही फडणवीसांच्या नेतृत्वाची कसोटी पाहणारी निवडणूक नव्हती. जय-पराजय हा स्थानिक आहे. उमेदवाराच्या क्षमतांचा हा जय-पराजय आहे.
 

म्हणून त्याचा विचार स्थानिक पातळीवर केला पाहिजे. नेतृत्वाची जबाबदारी असतेच आणि जो नेता असतो तो जय-पराजय सगळे काही स्वीकारतो. फडणवीसांचे हे म्हणणे आहे की, “महाविकास आघाडीच्या एकत्रित शक्तीचा आम्हाला अंदाज आला नाही.हे आत्मपरीक्षणात्मक बोल आहेत. त्यातून दुसरा अर्थ ध्वनित होतो तो म्हणजे या एकत्र शक्तीशी पुढे लढायचे आहे, हे नेतृत्वाच्या लक्षात आलेले आहे. इंग्रजीमध्ये 'one step backward to take two steps forward' अशी एक उक्ती आहे. पुढची दहा पावले टाकण्यासाठी आज एक पाऊल मागे पडले आहे, एवढाच याचा अर्थ.

पूर्व प्रसिद्धी - www.mahamtb.com

Powered By Sangraha 9.0