असामान्य

04 Dec 2020 15:27:57
सुरेंद्र थत्ते तसे असामान्य गुणांचे कार्यकर्ते होते. सरसंघचालक बाळासाहेब देवरसांपासून ते बाल स्वयंसेवकापर्यंत ते सहजपणे संवाद करू शकत असत. त्यांची संवादशैली, त्यांचे नर्म विनोद, कार्यकर्त्यांशी सलगी.. सगळेच काही असमान्य होते.

surendra thathe_1 &n
 
सुरेंद्र थत्ते यांना 28 नोव्हेंबर 2020 रोजी देवाज्ञा झाली. ही बातमी ऐकल्यानंतर क्षणभर मी सुन्न झालो. गेले अनेक दिवस माझ्या मनात या ना त्या प्रकारे त्यांची आठवण येत होती. त्यांना फोन केला पाहिजे असेही वाटत होते. पण गेल्या चार-पाच महिन्यांत विवेकचे इतके विषय मागे लागले आहेत की, त्या विषयांत गुंतल्यानंतर फोन करण्याचे राहून जायचे. त्यांच्याशी मला शेवटचे बोलता आले नाही, याची खंत मला दीर्घकाळ सोबत करीत राहील.
 
 
सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....
 
त्यांचा माझा संबंध 1972 साली आला. तेव्हा ते मुंबई महानगराचे महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख म्हणून संघाची जबाबदारी पार पाडीत होते. मी तेव्हा पार्ले नगराचा महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख होतो. सुरेंद्र थत्ते बीई झाले होते. नंतर ते दोन-तीन वर्षे संघाचे पूर्णवेळ काम करू लागले. तेव्हा ते गिरगावात राहत. महानगरभर त्यांचा प्रवास होई. त्यांच्या प्रवासात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बैठका, कार्यक्रम आणि त्यांचा बौद्धिक वर्ग होत असे. बैठक घेण्याची त्यांची स्वतंत्र शैली होती आणि त्यांचा बौद्धिक वर्गदेखील लहान-सहान किश्श्यांनी भरलेला असे. मिश्कीलता हा त्यांच्या व्यक्तित्वाचा अविभाज्य गुण होता. बैठकीचे गंभीर वातावरण त्यांच्या हलक्याफुलक्या विनोदाने खेळीमेळीचे होऊन जात असे.
आणिबाणीच्या कालखंडात सुरेंद्र थत्ते भूमीगत होते. आई सत्याग्रह करून कारागृहात गेली होती. आणिबाणी उठल्यानंतर नवीन जबाबदार्‍या आल्या. मी मुंबई महानगराचा सहकार्यवाह असताना सुरेंद्र थत्तेदेखील महानगर कार्यकर्ते झाले. या काळात त्यांच्या भेटी वारंवार घडू लागल्या. बैठकातील गंभीर वातावरण ते आपल्या मिश्किल वाणीने हालकेफुलके करीत.
बाँबे सेंटरला त्यांचे वर्कशॉप होते. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील उपकरणांचा व्यवसाय ते करीत असत. मला त्याचे काही ज्ञान नसल्यामुळे त्याविषयी मी काही लिहू शकत नाही. व्यवसाय किती वाढवायचा याची एक मर्यादा त्यांनी आखून घेतली होती. संघकामाला वेळ द्यावा लगतो आणि तो रोज द्यावा लागतो. महिन्यातून एक-दोन दिवस दिले असे चालत नाही. संघकामासाठी प्रवास करावा लागतो. तो बहुतेक स्वखर्चाने करावा लागतो. संघकामाला वेळ भरपूर राहील, एवढीच त्यांनी व्यवसायाची वाढ कोेली. त्यांची बुद्धिमत्ता आणि क्षमता व्यवसायाची शंभरपट वाढ करण्याची होती. पण ठरवून त्यांनी ते केले नाही. बाहेरच्या जगतात याला त्याग म्हणतात, संघात असली भाषा कुणी करीत नाही. संघकाम राष्ट्रकाम आहे आणि ते करणे म्हणजे कर्तव्य आहे. कर्तव्यात कसला आला त्याग.
या दृष्टीने सुरेंद्र थत्ते न बोलताच सर्वांना आदर्श कार्यकर्ते झाले. असा जो कार्यकर्ता असतो, त्याचे बोलणे ऐकणारे कार्यकर्ते फार गंभीरपणे घेत असतात. त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात त्याची न दिसणारी तपस्या उभी असते. ऐकणार्‍याच्या मनावर आणि बुद्धीवर त्याचा सहजपणे प्रभाव पडत असतो. त्यांच्या संपर्कात जे जे आले, ते नंतर फार मोठे कार्यकर्ते झाले आहेत. भाजपाचे दिवंगत संघटनमंत्री शरद कुलकर्णी हे त्यांचे जवळचे मित्र झाले. शरद कुलकर्णी आणि सुरेंद्र थत्ते या दोन्ही कार्यकर्त्यांत एक समान गुण होता, तो म्हणजे विनोद करण्यात आणि विनोदी किस्से सांगण्यात दोघेही वस्तादच होते. असे कार्यकर्ते आपल्या भोवती तरुणांचा गट उभा करतात.
 
त्यांनी उभ्या केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये शरद कुलकर्णी, कनक त्रिवेदी, प्रमोद बापट, नंदा दामले  आणि गिरगावातील अन्य कितीतरी कार्यकर्ते यांची नावे घ्यावे लागतील. संघातील कार्यकर्ता बौद्धिक वर्ग ऐकून उभा राहत नाही. या कार्यकत्यार्ंशी व्यक्तिगत आणि कौटुंबिक संबंध निर्माण करावे लागतात. मी बोरिवलीला राहत असताना ते माझ्या घरी वारंवार येत. म्हाडातील माझे घर एका खोलीचे होते. कौटुंबिक अडीअडचणीची ते दखल घेत आणि अबोलपणे त्या दूर करण्याचा प्रयत्न करीत.
संघकार्यकर्त्यांचा परिवार संघमय होतो, असे सर्वांच्या बाबतीत घडत नाही. काही कार्यकर्त्यांच्या घरात पत्नी, आई, मुले, संघाची होत नाहीत. कार्यकर्त्यांच्या कामाला त्यांचा विरोध सुरू होतो. सुरेंद्र थत्ते यांचे घर याला पूर्णपणे अपवाद होते. त्यांची आई राष्ट्र सेविका समितीचे काम करीत असे. पत्नी सुहासदेखील स्त्रीशक्तीच्या कामात सहभाग देत असत. त्याही इंजीनियर आहेत आणि सुरेंद्रबरोबर वर्कशॉपमध्ये त्याही काम करीत असत. मुलगी जान्हवी तीन वर्षे समितीची प्रचारिका म्हणून नंदुरबार जिल्ह्यात गेली आणि मुलगा मिलिंद चार वर्षे संघप्रचारक म्हणून काम करीत राहिला. संघपरिवार कसा असतो, याचा चालताबोलता आदर्श म्हणजे सुरेंद्र थत्ते यांचे घर. त्यांच्या घरात पाऊल ठेवल्याबरोबर संघाची स्पंदने किंवा मॅग्नेटिक वेव्ह पाऊल ठेवणार्‍याच्या शरीरात संचार करीत. माझा हाच अनुभव आहे. आलेल्या कार्यकर्त्यांची आत्मीय भावनेने चौकशी, त्याचे स्वागत, चहापान, हे सगळे करण्यात कसलीही कृत्रिमता नसे. अशा प्रकारचे कुटुंब उभे करणे हे वाटते तितके सोपे काम नाही. कुटुंबातील प्रत्येक घटकाचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र असते. विचार, आवडीनिवडी स्वतंत्र असतात. सर्वांच्या मनात संघभाव असा नित्याचा जागृत ठेवणे हे खरोखरच कठीण काम आहे.
भटके विमुक्तांचे काम सुरू झाले. यमगरवाडीला प्रकल्प उभा राहिला. प्रारंभीच्या सात-आठ वर्षांत प्रकल्पात मुले वाढू लागली आणि त्यांचा निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, असे सगळे खर्चाचे विषय आ वासून उभे राहत गेले. विवेकमधून या प्रकल्पला अर्थसाहाय्य करण्याचे आवाहन येऊ लागले. एकदा सुरेंद्र थत्ते मला म्हणाले, ‘‘मला यमगरवाडीला यायचे आहे आणि देणगी द्यायची आहे.’’ ते यमगरवाडीला आले आणि त्यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली. वयाची साठी झाल्यानंतर त्यांनी कल्याण आश्रमाला साठ हजार रूपयांची देणगी दिली. या धनाचा उपयोग चैनीच्या वस्तू घेण्यात त्यांना करता आला असता. पण ते सामान्य मध्यमवर्गीय माणसाचे जीवन जगत राहिले.
 
नंतर मी विवेकचे काम बघू लागलो. विवेकची तेव्हाची आर्थिक स्थिती जेमतेम होती. रोजच्या व्यावहारिक भाषेत सांगायचे, तर विवेक तेव्हा गरिबीत होता. संपादकीय काम करीत असताना तात्कालिक घडामोडींविषयी भरपूर वाचन करावे लागते. मला टाइम्स साप्ताहिक हवे होते. त्याची वर्गणी कैक हजारात होती. वर्गणी भरण्याची विवेकची क्षमता नव्हती. मी सुरेंद्र थत्ते यांना सांगितले. त्यांनी दोन वर्षांची वर्गणी भरून टाकली आणि दर सप्ताहाला टाइम्स माझ्याकडे येऊ लागला. आज विवेकची अशी स्थिती राहिली नाही. विवेकला या स्थितीला आणण्यामध्ये ज्या असंख्य संघकार्यकर्त्यांनी धनटॉनिक दिले आहे, त्यात सुरेंद्र थत्ते यांची गणना करावी लागते.
 
विवेकमध्ये त्यांनी लिहिलेल्या काही लेखांचे स्मरण मला झाल्याशिवाय राहत नाही. नागोठणे, चिपळूण, अलिबाग परिसरात सुमारे 15-16 वर्षांपूर्वी प्रचंड महापूर आला होता. तेव्हा सुरेंद्र थत्ते पूरग्रस्तांना मदतकार्य करण्यास संघयोजनेतून गेले होते. त्या वेळी त्यांनी विवेकमध्ये एक लेख लिहिला. लेखाचे शीर्षक होते - ‘प्रेमसेवा शरण’. शिवराय तेलंग यांनी लेखाच्या शीर्षकाचे तोंडभरून कौतुक केले.
असाच दुसरा लेख त्यांनी मधुकरराव मोघे यांच्या निधनानंतर लिहिला होता. मधुकरराव मोघे दीर्घकाळ मुंबई जिल्हा प्रचारक होते. स्कूटरने त्यांनी मुंबईचा केलेला प्रवास गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येदेखील मावणार नाही एवढा मोठा आहे. त्यांच्या लेखाचे शीर्षक होते - ‘मधुकर वणवण फिरत करी’! ‘मधुकर वनवन फिरत करी’ या नाट्यगीतातील ‘वनवन’ शब्दावर सुरेंद्र यांनी केलेली ही कोटी आहे. शब्दांवर अशा प्रकारची कोटी करणे ही सुरेंद्रची खासियत होती. वहिनींचे नाव सुहास. ते प्रातांचे काम करू लागले. प्रचारक होते सुहास हिरेमठ. एकदा गमतीने ते म्हणाले, ‘‘दोेन सुहासांची मर्जी सांभाळून मला काम करावे लागते.’’
जागतिकीकरणाचा विषय सुरू झाल्यानंतर नवीन आर्थिक धोरण सुरू झाले. मुंबईतील अनेक कारखाने बंद झाले. त्यात काम करणारे अनेक संघकार्यकर्ते बेरोजगार झाले. सुरेंद्र थत्ते अशा कार्यकर्त्यांची यादी घेऊन असत आणि त्यांचे पुनर्वसन कसे होईल याची चिंता करीत असत. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी या काळात आर्थिक साहाय्य केले. अशा सर्व विविध गुणांमुळे, सर्वांना हवाहवासा वाटणारा कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा झाली. अशी स्वयंसेवकमान्यता मिळविणे हीदेखील साधी गोष्ट नव्हती.
नंंतर त्यांच्याकडे प्रातांचे सहकार्यवाह म्हणून जबाबदारी आली. सर्व महाराष्ट्रभर त्यांचा प्रवास सुरू झाला. तो कालखंड संघविचारांची समाजमान्यता वाढीचा कालखंड आहे. संघविचाराची माणसे राजसत्तेत येऊ लागली होती. सत्तेची अनुकूलता कार्याला मिळू लागली होती. नवनवीन प्रश्न उभे राहत गेले. त्या प्रश्नांना भिडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रचना उभ्या कराव्या लागल्या. पारंपरिक रचनेतून नवीन रचनेत जायचे आहे, याला संधिकाल म्हणतात. सुरेंद्र थत्ते यांनी बदलत्या परिस्थितीची आव्हाने समजून घेतली आणि कालानुरूप ज्या जबाबदार्‍या आल्या, त्याही त्यांनी पार पाडल्या. संघशरणतेला त्यांनी कुठेही बाधा निर्माण होऊ दिली नाही.
 
सुरेंद्र थत्ते तसे असामान्य गुणांचे कार्यकर्ते होते. सरसंघचालक बाळासाहेब देवरसांपासून ते बाल स्वयंसेवकापर्यंत ते सहजपणे संवाद करू शकत असत. त्यांची संवादशैली, त्यांचे नर्म विनोद, कार्यकर्त्यांशी सलगी.. सगळेच काही असमान्य होते. असामान्य असूनही ते कधी अलौकिक झाले नाहीत. सामान्य कार्यकर्त्याला कधी असे वाटले नाही की, सुरेंद्र थत्ते कुणीतरी मोठा माणूस आहे, त्याच्याशी कसे बोलावे. हा संकोच त्यांच्या बाबतीत कधी निर्माण झाला नाही. शेवटी एका वाक्यात सांगायचे तर सुरेंद्र थत्ते, सुरेंद्र थत्ते होते. त्यांच्यासारखे तेच होते.
 

आवाहन 

सुरेंद्र थत्ते यांना मानणारे, त्यांच्याविषयी आपुलकी असणारे अनेक जण या महाराष्ट्रात आहेत. त्यांनी सुरेंद्र थत्ते यांच्याविषयीची वा थत्ते दांपत्याविषयीची विशेष आठवण 200 ते 250 शब्दांमध्ये लिहून, साप्ताहिक विवेकच्या मेल आयडीवर 15 डिसेंबरपर्यंत पाठवावी.vivekedit@gmail.com

Powered By Sangraha 9.0