घोंगडीला हवीय ‘राजाश्रया’ची ऊब

28 Dec 2020 14:54:15

 महाराष्ट्रातील परंपरेचा महत्त्वाचा घटक म्हणून घोंगडी ओळखली जाते. प्राचीन काळापासून घोंगडी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. घोंगडी विणणे ही कला असून ती काळाच्या ओघात लोप पावत आहे. आज विविध आव्हानांचा सामना करणार्या या कलेला राजाश्रयाची ऊब मिळणे आवश्यक आहे.

 Traditional Ghongadi _2&n

 

काठीन् घोंगडं घेऊन द्या की रं.. मला बी जत्रंला येऊन द्या कीया गीतातून घोंगडीचे स्वरूप उलगडले गेले आहे. प्राचीन काळापासून महाराष्ट्रातील प्रत्येक घरघरात या ऊबदार घोंगडीचा वापर केला जायचा. माण, आटपाडी, नातेपुते, म्हसवड, रुई-बाबीर, चिखलठाणा-करमाळा, तुळजापूर, सांगोला, जालना अशा महाराष्ट्रातील असंख्य गावागावात घोंगडी बनविणारे असंख्य हात या कामात गुंतले होते. आज या हातांची संख्या कमी कमी होत आहे. त्याची विविध कारणे आहेत. महाराष्ट्राच्या कला-संस्कृतीचा वारसा सांगणारी ही घोंगडी महाराष्ट्रात आणि देशातील अनेक राज्यांत भरविण्यात येत असलेल्या हस्तकला प्रदर्शनापुरती मर्यादित राहिलेली आहे.

 वारसा कलेचा

महाराष्ट्रात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. रानावनात, काट्याकुट्यातून, थंडी, वारा, ऊन, पाऊस याची कोणतीही तमा बाळगता हातात काठी अंगावर घोंगडी घेऊन आपला उदरनिर्वाह करणारा समाज म्हणजे धनगर.

या समाजाचे दोन प्रवाह आहेत - एक हटकर, तर दुसरा खुटेकर. हटकर म्हणजे शेळ्या-मेंढ्यांचे पालन करणारा, तर दुसरा खुटेकर हा एका जागी स्थिर राहून घोंगडी विणतो. या समाजाची अशी ही खास ओळख. माण-आटपाडी, कोल्हापूर भागात सणगर समाजातील लोक मोठ्या प्रमाणात घोंगडी विणण्याचे काम करतात.

ही कला केवळ स्वतःपुरती मर्यादित राहता आपल्या राज्यासाठी, देशासाठी एक महत्त्वाचा व्यवसाय म्हणून तिची ओळख होणे हे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच या व्यवसायास वैभव प्राप्त झाले पाहिजे.



Traditional Ghongadi _3&n 

घोंगडी निर्मितीची कथा

घोंगडी पारंपरिक हातमागावर विणली जाते. त्यासाठी चांगली ऊबदार लोकर असणे आवश्यक असते. चरख्यावर लोकरीपासून सूत काढले जाते. घोंगडीसाठी लागणार्या लोकरीचे लाकडी मोजणी यंत्रावर माप घेतले जाते. यालाताना काढणेअसे म्हणतात. साधारण 8 ते 12 फूट लांबीच्या घोंगड्या बनविल्या जातात. एक घोंगडी बनविण्यासाठी चार ते पाच किलो लोकर लागते आणि ती विणायला दोन दिवस लागतात. घोंगडी तयार झाल्यानंतर शेवटी सुताला चांगला पीळ यावा, मजबुती यावी यासाठी चिंचुक्याची खळ लावली जाते. खळ दिल्यानंतर कडक उन्हामध्ये दोन ते तीन दिवस वाळविले जातेअशी कोल्हापूर जिल्ह्यातील पेठसांगवी येथील घोंगडी व्यवसायिक विनोद सणगर यांनी घोंगडीच्या निर्मितीची कथा सांगितली.

हातमागावर बनविलेली घोंगडी जवळपास आठ ते दहा वर्षे टिकते. बाजारपेठेत एका घोंगडीला 1000 ते 5000 रुपयापर्यंत किंमत मिळते, असेही सणगर यांनी सांगितले.

सणगर पुढे सांगतात, “घोंगडीचे अनेक फायदे आहेत. थंडीच्या दिवसात ऊबदारपणा तर देतेच, शिवाय घोंगडीत आरोग्यविषयक गुणधर्म दिसून येतात. त्यामुळे घोंगडीला देश-विदेशात मागणी आहे, पण या व्यवसायाला म्हणावी तशी गती मिळालेली नाही.”

घोंगडीला पुनर्वैभव प्राप्त करून देणार

घोंगडी हा धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. या समाजाचे ऋण फेडण्यासाठी मी गेल्या अनेक वर्षांपासून घोंगडी निर्मिती व्यवसायात उतरलो आहे. माझे आजोबा मेंढपाळ होते. या व्यवसायावर उदरनिर्वाह करायचे. लोकरीपासून हाताने सूत बनवत असत आणि त्यापासून घोंगडी हातमागावर बनवत असत. काळानुरूप नंतरची पिढी - म्हणजे माझे वडील, आम्ही भावंडे शेतीकडे, नोकरीकडे वळलो. मी स्वतः टेक्स्टाइल इंजीनिअर आहे. मला सतत असे वाटायचे की, या नैसर्गिकरित्या उत्पन्न होणार्या धनसंपदेचे - म्हणजे मेंढरांच्या लोकरीचे महत्त्व लक्षात घेता त्यास योग्य किंमत, स्थान दिले जात नाही. विशेष म्हणजे स्वयंरोजगाराची निर्मिती कशी करता येते, हे लोेकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी या व्यवसायाकडे वळलो. ही कला जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी मोठ्या प्रदर्शनांत सहभागी होऊन घोंगडीचे महत्त्व सांगितले.


Traditional Ghongadi _1&n
अरुण एदमाळे

या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकीकरणाची जोड देऊन संधीचे सोने कसे करता येते, हे माझ्या समाजबांधवांना समजावून सांगणे दाखवून देणे हेच एकमेव ध्येय डोळ्यांसमोर आहे. प्रत्येक व्यवसाय म्हटला की जे काही उत्पादन आहे त्याची चांगली वैशिष्ट्ये काय आहेत हे जाणून घेणे गरजेचे असते. त्यातील पहिले वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांची पसंती. थोडक्यात काळाची गरज ओळखणे हे महत्त्वाचे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गुणवत्ता. या दोन्ही गोष्टींचा मी समतोल साधला आहे. सध्या नोकरी व्यवसाय सांभाळत या व्यवसायातून वर्षाला दोन-तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवीत आहे. या कामाचे मला समाधान वाटते.

या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे लोेकर. ही लोकर कोणकोणत्या राज्यांतून उपलब्ध होते, याचा मी अभ्यास केलाआहे. महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, गुजरात, जम्मू-काश्मीर या राज्यांत लोकरीचे उत्पादन होते. पंजाब हरियाणा या राज्यांमध्ये लोकर उत्पादन होत नसले, तरी तिथे लोकरीपासून सूत बनवण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते. तसेच हे सूत घोंगडीमध्ये, रगीमध्ये वापरले जाते.

घोेंगडी बनवण्याचे विविध प्रकार आहेत. सर्वांत जास्त मेहनतीचा प्रकार म्हणजे पूर्वीपासून आजतागायत चालू असलेली पद्धत म्हणजेच हाताने सूत कातणे, सूत बनवून खड्डा (डबरी) मागावर घोंगडी बनविणे. आधुनिक काळात प्रत्येक व्यवसायाने ज्याप्रमाणे तंत्रज्ञानाची कास धरून प्रगती केलीआहे, त्याप्रमाणेच या व्यवसायातदेखील वेगवेगळ्या मशीन्सवर - म्हणजे फ्रेमचे हातमाग, पॉवरलूम यावर घोंगडी विणली जाते. त्याचप्रमाणे घोंगडी बनविण्यासाठी लागणारे सूत सुरुवातीला केवळ हातावर बनविले जायचे, आता ते बर्याच प्रमाणात मशीनमार्फत बनवले जाते.

राज्यात किती टक्के समाज या व्यवसायावर अवंलबून आहे, हे सांगणे खूप कठीण आहे, कारण याची अचूक माहिती किंवा गणना कोठेही नाही. एवढे मात्र नक्की आहे - हा व्यवसाय महाराष्ट्रातल्या बहुुतांश खेड्यापाड्यात पसरलेला आहे. सध्या पूर्वीच्या तुलनेत हा व्यवसाय खूपच कमी झाला आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्लॉस्टिक कृत्रिम वस्तूंचा वापर होय. चटयांच्या, ब्लँकेट्सच्या वापराचा पर्यावरणावर होणार्या मोठ्या परिणामांचा विचार केला जात नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीआत्मनिर्भर भारतही अतिशय स्तुत्य संकल्पना आणली आहे. ‘व्होकल टु लोकलमधून स्थानिक वस्तू जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी मोठा वाव मिळणार आहे. देशातील विविध स्थानिक वस्तूंबरोबर घोंगडीही जागतिक स्तरावर पोहोचली पाहिजे. तिला योग्य बाजारपेठ मिळाली पाहिजे.”

- घोंगडी उद्योजक, बाळूमामा घोंगडी उत्पादक

इचलकरंजी, जि. कोल्हापूर

9923495454


 घोंगडी व्यवसायासमोरची आव्हाने

जागतिकीकरण, विदेशातील शोरूम कंपन्याचा झालेला शिरकाव यासह कृत्रिम वस्तूंमुळे घोंगडी व्यवसायाला घरघर लागली आहे. विशेष म्हणजे दिवसेंदिवस कमी होत असलेल्या गायरान जमिनी, शेतात मेढ्यांना चरायला असलेली बंदी आणि मेंढ्यांची कमी होत असलेली संख्या, नवीन पिढीने फिरविलेली पाठ या सर्व अडचणी आणि समस्या आज घोंगडी व्यवसायास मारक ठरत आहेत. विविध आव्हानांशी झुंज देत कलेची जोपासना करणार्या आणि त्यातून पुरेसे आर्थिक उत्पन्न मिळविणार्या घोंगडी व्यावसायिकास लॉकडाउनला सामोरे जावे लागले.

लॉकडाउनच्या काळात घोंगडी बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल (लोकर) मिळत नव्हता. त्यामुळे हातमाग कामाद्वारे घोंगडी बनविण्याचा व्यवसाय कमी झाला आहे. एक घोंगडी तयार करण्यासाठी एक-दोन दिवस लागतात. या कामात संपूर्ण कुटुंब श्रम करत असते. त्या तुलनेत म्हणावी तशी किंमत मिळत नाही. त्यामुळे असंख्य घोंगडी निर्मिती कारागीरांचे हात दुसर्या उद्योगधंद्याकडे वळत आहेतअशी माहिती टाटा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून धनगर समाजाचा अभ्यास करणारे कोथळे (ता. माळशिरस, जि. सोलापूर) गावातील तरुण संशोधक सोमनाथ दडस यांनी दिली.

जागतिकीकरणाच्या युगात हातमागावरील घोंगडी विणणे ही एक मोठी कसरतच आहे. काही घोंगडी व्यावसायिक काळाशी सामना करत तग धरू पाहत आहेत.

माण तालुक्यातील (जि. सातारा) वरकुटे-मलवडी गावातील पिसे कुटुंब गेल्या सहा पिढ्यांपासून घोंगडी बनविण्याचा व्यवसाय करत आहे. घोंगडी विणण्याच्या कामात भागवत पिसे त्याच्या कुटुंबातील 25 सदस्य गुंतले आहेत.


Traditional Ghongadi _4&n

भागवत पिसे सांगतात, “घोंगडी विणणे हा आमचा पिढीजात व्यवसाय आहे. यातून समाधानकारक उत्पन्न निघायचे. यांत्रिकीकरणामुळे आमच्या व्यवसायाचे मोठे नुकसान झाले. पूर्वी आमच्याकडे पाच हातमाग यंत्रे होती. आज ही संख्या एकवर आली आहे. आज आमची सहावी पिढी या कामात गुंतली आहे. या व्यवसायावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह होणे कठीण आहे. अशा काळातही आम्ही आमची कला तग धरून राहील यासाठी प्रयत्न करत आहोत.”

रुई (ता. इंदापूर, जि. पुणे) हे गाव घोंगडी निर्मिती आणि विक्रीसाठी प्रसिद्ध असलेले गाव. या गावात दीपावलीच्या भाऊबीजेच्या दिवशी ग्रामदैवत बाबीर देवाची मोठी यात्रा भरते. यात्रेत महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून घोंगडी व्यावसायिक आपल्या घोंगड्या विकण्यासाठी येतात. या गावातील पिढीजात घोंगडी व्यावसायिक गणेश पुजारी सांगतात, “रुई हे आमचे गाव घोंगडी विणण्यासाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. आज गावात एक-दोन कुटुंबे घोंगडी विणकाम करत आहेत. घोंगडीच्या मागणीत घट होत असल्याने मी लोकरीच्या शाली बनवत आहे. या शालींना बाजारात मोठी मागणी आहे. कोरोनाच्या फटक्यामुळे हा व्यवसाय मोडकळीस आला आहे. महाराष्ट्रातील यात्रा-जत्रा या व्यवसायाच्या हक्काच्या बाजारपेठा आहेत. रुई-बाबीर (इंदापूर), पंढरपूर, आळंदी, पैठण, पट्टणकोडोली, चिंचणी, म्हसा (ठाणे), मढी, जेजुरी, माळेगाव (नांदेड) आदी ठिकाणांच्या यात्रेतून घोंगडीविक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. कोरोनामुळे या ठिकाणांच्या यात्रा बंद आहेत. त्यामुळे आम्हाला आर्थिक फटका बसला आहे.”

घोंगडी व्यवसायाचे भवितव्य

आज घोंगडी विणण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप बदल होत आहे. ऊबदार वस्तू-कपड्यांच्या क्षेत्रात रेमंड, लिनन यासारख्या अनेक कंपन्यांनी भारतीय बाजारपेठा काबीज केल्या आहेत. या कंपन्यांशी स्पर्धा करत असताना पारंपरिक घोंगडी तग धरू शकली नाही. अस्सल पारंपरिक घोंगडी आज बाजारातून लुप्त झाली आहे. महाराष्ट्राचा हा कलावारसा जपला पाहिजे. या वारशाचे संवर्धन करायचे असेल, तर केंद्र राज्य सरकारने योग्य ती पावले उचलली पाहिजेतअशी अपेक्षा धनगर समाजजीवनाचे संशोधन करणार्या मरहट्टी संशोधन आणि विकास मंडळाचे सचिव सुमीत लोखंडे यांनी व्यक्त केली.

एकूणच या सर्व गोष्टींचा विचार केला असता घोंगडी व्यवसायासमोर उभ्या असलेल्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता घोंगडी व्यवसायिकांच्या अंगी निर्माण झाली पाहिजे. त्याचबरोबर या व्यवसायिकांनी मार्केटिंगमधील नवतंत्रज्ञान अवगत करून, नवनवीन डिझाइनच्या घोंगड्या, शाली इतर ऊबदार वस्तूंची निर्मिती केली पाहिजे, तरच जगाच्या बाजारपेठेत महाराष्ट्राचा हा अनमोल ठेवा तग धरेल.

Powered By Sangraha 9.0