राजकारणाला समाजभानाची साथ डॉ. मल्लिका आणि जगत प्रकाश नड्डा

विवेक मराठी    02-Dec-2020
Total Views |
नड्डाजी यांच्या राजकीय उत्कर्षात मल्लिकादीचा वाटा सिंहाचा आहे आणि मल्लिकादींच्या समाजसेवेत नड्डाजींची साथ मोलाची आहे. ‘स्पेशल ऑलिम्पिक्स’ ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. मल्लिकादी त्याच्या भारतातील पदाधिकारी आहेत. या स्पर्धेमध्ये भारतातील 679 जिल्ह्यांतून स्पर्धक भाग घेतात. मल्लिकादींची चेतना ही संस्था बुद्ध्यंक कमी असलेल्या दिव्यांग व्यक्तींसाठी कार्यरत आहे.

JP Nadda Family, Biograph
सेंबर महिना. गुलमर्गमधली सकाळ. हाडे गोठवणारी थंडी. बर्फावरील खेळांच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन. समोर बर्फाच्छादित शिखरे. कार्यक्रम सुरू झाला. शिखरावरून स्पर्धक दोन ओळी करून एक ओळ डावीकडून आणि दुसरी उजवीकडून स्कीइंग करत वेगात खाली आली. असे वाटले ते आता आपल्यावर आदळणार, तेवढ्यात त्यांनी वळण घेऊन बसलेल्या स्पर्धकांना वळसा घालून ते पाठीमागे पुन्हा ओळीत उभे राहिले. सर्वांनी टाळ्या वाजवत त्यांचे कौतुक केले. हा कार्यक्रम आयोजित केला होता डशिलळरश्र जश्रूाळिलीच्या भारतीय शाखेने. आयोजक होत्या डॉ. मल्लिका नड्डा, संस्थापक अध्यक्ष, चेतना संस्था, बिलासपूर, हिमाचल प्रदेश. आणि स्पर्धक होते मानसिकदृष्ट्या दिव्यांग. कल्पनातीत प्रसंग.
 
स्पेशल ऑलिम्पिक्स ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. मल्लिकादी त्याच्या भारतातील पदाधिकारी आहेत. या स्पर्धेमध्ये भारतातील 679 जिल्ह्यांतून स्पर्धक भाग घेतात. मल्लिकादींची चेतना ही संस्था बुद्ध्यंक कमी असलेल्या दिव्यांग व्यक्तींसाठी कार्यरत आहे. दर वेळेस हे हिवाळी खेळ हिमाचल प्रदेशात आयोजित केले जातात; पण 2016 साली बर्फ कमी पडला होता, त्यामुळे या स्पर्धा काश्मीर खोर्यातील गुलमर्ग येथील प्रसिद्ध स्कीइंग प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने घेतल्या, त्यात भारतातून सुमारे शंभरावर स्पर्धक सहभागी झाले होते. काश्मीरमधील माझ्या संपर्कामुळे मला त्यात खारीचा वाटा उचलण्यास मिळाला. त्याआधीही भाजपा अंत्योदय विभाग आणि नंतर कौशल्य विकास कार्यक्रमामुळे मला त्यांच्याबरोबर काम करायचा योग आला. त्यानंतर झकऊउहरालशीीमधून आम्ही - म्हणजे मी, मल्लिकादी आणि नीलम रुडीजी यांनी दिव्यांगांसाठी त्यांच्या क्षमतेप्रमाणे कोणते कौशल्य प्रशिक्षण करता येईल यासाठी प्रयत्न केले. एकत्र काम करताना एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडले.
आज त्या भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे.पी. नड्डा यांच्या पत्नी म्हणून आपणास परिचित आहेत. पण मुळात त्या मल्लिका बॅनर्जी. जबलपूर, मध्य प्रदेश येथील रा.स्व. संघाचे अधिकारी सुभाषचंद्र बॅनर्जी आणि जयश्रीजी यांची कन्या. त्यांची आई जयश्रीजी या भाजपाच्या जबलपूरमधून दोनदा आमदार, मंत्री आणि एकदा खासदार म्हणून प्रतिनिधी राहिल्या आहेत. त्यांची ही कन्या लहानपणापासूनच खूप धाडसी. राष्ट्र सेविका समितीचे आणि त्यानंतर अभाविपचे काम करणारी. तेव्हा तिला ‘जबलपूरची झांसीची राणी’ असे संबोधत असत.
 
मल्लिकादींचे प्राथमिक शिक्षण जबलपूरच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट येथून आणि कला शाखेत पदव्युत्तर शिक्षण राणी दुर्गावती विश्वविद्यालयामधून झाले. महाविद्यालयीन काळात मल्लिकादी अभाविपचे राष्ट्रीय स्तरावरील काम अत्यंत समर्थपणे सांभाळत होत्या. लग्नाचे वय झाले होते. वरसंशोधन सुरू झाले, त्याच वेळी अभाविपचे सदाशिवराव देवधर यांनी जे.पी. नड्डा यांचे स्थळ सुचवले. नड्डाजी अभाविपचे पूर्णवेळ काम करत होते. त्यामुळे एकमेकांचा परिचय होताच. मात्र परिवार एकमेकांशी परिचित नव्हते. मदनदासजी, राजकुमार भाटियाजी, महेंद्र पांड्येजी यांच्या मदतीने सगळे पक्के झाले. तेव्हा मल्लिकादींचे वडील म्हणाले, “बंग नही संघ सही.” 1990 साली दोघांचे शुभमंगल झाले.
नड्डाजी मूळचे हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर जिल्ह्यातील विजयपूर नावाच्या छोट्या खेड्यातील. पण जन्म आणि बालपण बिहारमधील पाटणा येथील. वडील उच्चशिक्षित, पाटणा विश्वविद्यालयाचे कुलगुरू म्हणून निवृत्त झालेले, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ नारायण लाल नड्डा. आई गृहिणी श्रीमती कृष्णा नड्डा. नड्डाजी यांचे शिक्षण पाटण्याच्या सेंट झेविअर शाळेत झाले आणि पाटणा विश्वविद्यालयातून त्यांनी कला शाखेतील पदवी घेतली. त्यानंतर सिमला येथून हिमाचल विश्वविद्यालयातून वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. त्या वेळी ते अभाविपचे काम करत होते. विश्वविद्यालयातून विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. ‘संपूर्ण क्रांती’ चळवळीत आणीबाणीविरोधामुळे 45 दिवसांचा कारावास भोगला. दरम्यानच्या काळात वडील निवृत्त झाले. सर्व भावंडे मार्गी लागली, म्हणून वडील मूळ गावी विजयपूर येथे परतले. तेथे मोठा वाडा, खूप सारी जमीन होती. त्यातच ते रममाण झाले. 1980पासून ते आजही त्यांचे शिस्तबद्ध आयुष्य व्यतीत करत आहेत. बिलासपूरला जेव्हा जाण्याचा योग येतो, तेव्हा त्यांना भेटून त्यांच्याशी गप्पा मारणे मला आवडते. खूप काही शिकायला मिळते.

JP Nadda Family, Biograph
लग्न होऊन सुरुवातीला नड्डाजी व मल्लिकादी यांनी सिमला येथे राहण्याचे योजले होते. पण नंतर नड्डाजी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले. त्यांना पूर्ण देशभर प्रवास करावा लागत असे. त्यानंतर त्यांनी हिमाचल प्रदेश - बिलासपूर विधानसभेतून निवडणूक लढवण्याचे ठरले, त्यामुळे दोघे विजयपूर येथे राहू लागले. जबलपूरसारख्या शहरातली मल्लिका रस्ता नाही, वीज नाही, पोस्ट ऑफिस, शाळा नाही, महिलांनी एकट्याने बाहेर जाणे तर सोडाच माजघरातही येणे निषिद्ध अशा गावात आली. नड्डाजी अनेकदा प्रवासात असायचे. एक मुलगा तान्हा. पण सासरच्यांची माया, पतिप्रेम आणि आव्हान स्वीकारण्याचा उपजत स्वभाव यामुळे दुधात साखर विरघळावी तशी ती तिथली झाली. सासरच्या मंडळींची लाडकी, हक्काची सून झाली. महिलांची, अडल्या-नडल्या जनतेची भाभी झाली. नड्डाजी निवडणूक लढवत असताना तिथले घर आणि घर पाठ झाले. नड्डाजी 1993, 1998 आणि 2007मध्ये आमदार झाले, मंत्रिपदही भूषवले, दोनदा राज्यसभेत खासदार झाले आणि आता पक्षाध्यक्ष.
मल्लिकादीने चेतना संस्थेद्वारे आपले सामाजिक कार्य चालू ठेवले. त्यानंतर स्पेशल ऑलिम्पिक्स भारतद्वारे ती सर्व देशभर नव्हे, जगभर ह्या दिव्यांग मुलांबरोबर स्वत: जाते. ‘विश्व हिवाळी खेळात’ देशभरातल्या दिव्यांग व्यक्तींचे प्रशिक्षण आयोजित करते. अल्पाइन स्कीइंग, स्नो बोर्डिंग, स्नो स्कीइंग त्याबरोबरच अनेक खेळांची शिबिरे भरवते. शिकागो, ऑस्ट्रिया, रशिया सगळीकडे खेळाडू आणि प्रशिक्षकांचा चमू घेऊन जाते. त्यांना कुठेही त्रास होणार नाही याची दक्षता घेते. वेळ पडल्यास मुलींच्या मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी नॅपकीनसुद्धा बदलते. मात्र कोणत्याही परिस्थितीत नड्डाजींच्या पदामुळे मिळणारे फायदे आणि माणसे यांचा फायदा घेत नाही. त्यांची दोन्ही मुले - गिरीश आणि हरीशसुद्धा हा दंडक अचूक पाळतात. मुलांना राजकीय कामात गती आहे, मात्र हरीशचे सध्या शिक्षण सुरू आहे. मोठा गिरीश वकील झाला आहे. दरम्यान मल्लिकाने झह.ऊ. केले. सिमला आणि दिल्ली येथे प्राध्यापक झाली. तिचे बिलासपूर येथील चेतनाचे काम वृद्धिंगत झाले. त्या कामात स्थानिक समविचारी बुद्धिवंतांची, कृपावंतांची साथ मिळाली. बंगाली सौंदर्यवती हिमाचली-पहाडी सुनहरी परी होऊन गेली.
 
JP Nadda Family, Biograph
 
आजही हिमाचली टोपी आणि धाम (पंगतीतील भाताचे भोजन) यांच्यात गुंतून जाणारी मल्लिकादी आवर्जून बिलासपूर येथे दुर्गापूजा मोठ्या प्रमाणात साजरी करते. नड्डाजी तेथे अष्टमीला न चुकता आशीर्वाद घेण्यासाठी जातात. ते तिच्या प्रत्येक कार्यात आणि कार्यक्रमात साथ देतात. नड्डाजींना मल्लिकादीबद्दल प्रेम अधिक वाटते की आदर? मला माहीत आहे, त्यांच्या मितभाषी आणि मृदू स्वभावानुसार ते फक्त हसतील. हा त्यांचा शांत आणि समजूतदार स्वभाव भाजपाला अधिक पुढे नेईल, याबद्दल शंका नाही. नड्डाजी यांच्या राजकीय उत्कर्षात मल्लिकादींचा वाटा सिंहाचा आहे आणि मल्लिकादींच्या समाजसेवेत नड्डाजींची साथ मोलाची आहे. आत्ता चेतना संस्थेची मोठी इमारत साकारली आहे. तेथे मानसिक / बौद्धिक दिव्यांगांसाठी कौशल्य प्रशिक्षण, उत्पादकता विभाग आहे, जेणेकरून ही सर्व मंडळी स्वावलंबी होतील. अपार कष्ट करते ही बाई. या साध्या सरळ आणि अत्यंत संवेदनाशील अश्या सखीच्या इतक्या भरभरून आठवणी आहेत, पण शब्दसंख्या नेमकी आहे. केवळ एकच म्हणू शकते - मल्लिकादी, तुझ्या सर्व आशा, अपेक्षा पूर्ण होवोत.
 

समारोपाचे वाण
‘सखी सूत्र’चे लेख आपल्यासमोर आणताना मी प्रत्येक क्षण नव्याने अनुभवला. अनेक जिवलग सख्यांचे दांपत्यजीवन आपल्यासमोर विस्ताराने आणता आले नाही, म्हणून काही त्यांच्याबद्दल जिव्हाळा कमी झाला असे होत नाही.
या सगळ्यांशी बंध जुळले ‘कमल सखी मंच’च्या निमित्ताने. त्यामुळे त्याची शिल्पकार प्राची जावडेकर आणि तिच्या बरोबरीने डॉ. मल्लिका नड्डा, नीलम रुडी, मृदुला प्रधान आदी सर्वांची मी आभारी आहे. या उपक्रमाला ज्याप्रमाणे संघटन मंत्री रामलाल यांचे पाठबळ होते, त्याप्रमाणेच दिवंगत कमलाजी अडवाणी, दिवंगत सुषमा स्वराज आणि सुमित्राताई महाजन यांचे सक्रिय मार्गदर्शन होते. खासदार पत्नींना सद्य:स्थितीतील राजकीय घडामोडींची जाणीव असावी, सरकारच्या कामाबद्दल माहिती असावी याबद्दल त्या सजग असत.
आणखी काही सख्यांच्या उल्लेखाशिवाय या लेखमालेची सांगताच होऊ शकत नाही. तेजस्वी आणि कणखर संगीता अरुण जेटली, कलासक्त जोहरी मृदुला धर्मेंद्र सिन्हा, काश्मिरी गुलाब मंजू जितेंद्र सिंह, शिस्तप्रिय लष्करातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गायत्री राज्यवर्धन राठोड, अंदमानची रूपा विष्णुपद रे, अंतराळ वैज्ञानिक तेजस्विनी अनंतकुमार, नर्मदामैय्यासारखी नितळ पारदर्शक पुष्पलता प्रल्हाद पटेल आणि एक सखी जिचा उल्लेख केल्याशिवाय लेखमाला परिपूर्ण होऊ शकत नाही पण तिच्याविषयी जास्त लिहिणे उचित नाही अशी सोनलभाभी - सोनल अमितभाई शहा. अत्यंत प्रेमळ, काळजी घेणार्या, जन्म आणि बालपण कोल्हापूरचे, मराठी साहित्याची, पाककृतींची चाहती, अनेक कविता तोंडपाठ असलेली ही देवभक्त सखी झर्यासारखी आहे. सावली रात्री पाठीशी नसते असे म्हणतात, पण अमितभाईंची ही सावली, रात्रंदिवस, सुखदुःखात, अडीअडचणीत, जगाच्या पाठीवर कोठेही त्यांची पाठराखण करीत असते.
 
अशा माझ्या सख्या. 2014 ते 2019 या काळात रायसिना हिल्सवर मला त्यांचा सहवास लाभला.
 
दिस सोन्याचे झाले, मन भरून पावले॥
नको देवा अधिक काही, सख्य तेवढे अतूट राही॥
हीच कृपा दयाळा, दीर्घायुष्य दे सकळा॥