अमेरिकन स्वप्नाची निरर्थकता दर्शवणारा - सिटिझन केन

18 Dec 2020 14:49:18

सिटिझ केन चित्रपट म्हणजे त्याचे आत्मचरित्र नाही. त्याच्या सहकार्यांच्या, पत्नीच्या, त्याच्या गार्डिअनच्या, त्याच्या मित्रांच्या नजरेतून आपल्याला एक वेगळाच केन भेटतो. आईवडिलांपासून दूर ठेवलेला केन, श्रीमंत असूनही पोरका झालेला केन, सहवासाला तरसणारा केन. सगळीकडून एकाकी पडलेला केन पुतळे जमा करतो.


Obbb_1  H x W:  

सबुकवर एक लिंक आहे. तिच्यावर तुम्हाला काही प्रश्न मिळतात. त्यावरून एका शब्दात तुमची ओळख पटते.

माणूस एका शब्दात कळतो? माणसाला ओळखता येते का? त्याचे बाह्यस्वरूप जे जगाला उघडे असते तेच तो असतो?

खरे तर जसे त्याचे शरीर गुंतागुंतीचे असते, तितकेच त्याचे अंतरंगसुद्धा. एक शब्द हा या कोड्यातील एक भाग, एका मोठ्या जिगसॉ पझलमधील एक छोटासा भाग. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू. प्रत्येक माणसासाठी, हा माणूस वेगळा असतो. केवळ दुसर्या माणसासाठी का, प्रत्येक वेळेला तो स्वतःसाठीसुद्धा वेगळा वागू शकतो. कधीतरी तर त्यालासुद्धा तो अनोळखी भासू शकतो. ही आहे ऑर्सन वेल्स दिग्दर्शितसिटिझन केनया चित्रपटाची थीम.

चित्रपटाची सुरुवात होते एका काळोख्या किल्ल्यातील दृश्याने. मानवनिर्मित डोंगरावर हा किल्ला बांधला गेला आहे. गेटवरच आत येण्यास बंदी असलेला फलक आहे. हळूहळू कॅमेरा आत सरकत जातो. आतमध्ये विस्तीर्ण दालने आहेत. मोठा तलाव, एक गोल्फ कोर्स, भव्य पुतळे अशा वैभवाच्या खुणा असल्या, तरीही जिवंतपणाची कसलीही खूण दिसत नाही. त्या अवाढव्य, गूढ हवेलीच्या आत, एका खोलीत, पलंगावर एक माणूस झोपलेला आहे. त्याच्या मुठीत त्याने काचेचा एक बॉल घट्ट पकडला आहे. येथील निरव शांतता भंगते ती दबक्या आवाजात उच्चारलेल्या एका शब्दाने. या व्यक्तीच्या तोंडातून मृत्युसमयी आलेला शब्द असतो, ‘रोजबड’. रोजबड म्हणजे नक्की काय असावे, या प्रश्नावर हा चित्रपट फिरतो.


Obbb_3  H x W:  

मरण पावलेली व्यक्ती आहेचार्ल्स फॉस्टर केन’ (ऑर्सन वेल्स). एका नामांकित वर्तमानपत्राचा मालक आणि प्रकाशक. सर्व वर्तमानपत्रात याच्या मृत्यूची बातमी येण्याइतपत हा माणूस मोठा असतो. त्याची संपत्ती अफाट. त्याने जमवलेल्या चित्रविचित्र महागड्या वस्तूंचा संग्रह त्याच्या घरात आहे. हे घरही भव्य. इथेच तो शेवटचा श्वास घेतो. त्याचा मृत्यू अमेरिकेने दखल घेण्याएवढा महत्त्वाचा असला, तरीही काही जणांसाठीच ही बातमी दुःखद आहे. अनेकांसाठी हा सुटकेचा नि:श्वास आहे. राजकारण्यांसाठी हा समाजसत्तावादी विरोधाचा अंत आहे. एका माणसाला अनेकांनी आपापल्या समजुतीनुसार वेगवेगळी लेबले लावली आहेत. केन नक्की कोण आहे?

त्याच्या मृत्यूनंतर जी डॉक्युमेंटरी बनवली जाते, त्यात केनच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना आहेत, पण त्यातून केन नक्की कोण याचा बोध होत नाही. अर्थात त्याच्या आयुष्याबद्दल कुतूहल आहेच. पण मरताना त्याने उच्चारलेला शब्दरोजबडहे कुणाचे नाव आहे? हे नक्की काय आहे याचीही माहिती मिळवण्यासाठी एक वार्ताहर थॉमसन, केनच्या दुसर्या पत्नीची भेट घेतो. ती भेटीला नकार देते. त्याच्या मृत्यूनंतर ती एकही शब्द बोलण्यास उत्सुक नसते.


Obbb_2  H x W:  

ज्या बँकरबरोबर - वोल्टेर थॅचरबरोबर - तो लहानाचा मोठा होतो, ज्याचा हात धरून तो व्यवसायात जातो, त्याच्याशीही त्याचे पुढे संबंध राहत नाहीत. केनच्या भूतकाळावर मात्र तो प्रकाश टाकतो. अचानक मिळालेल्या घबाडाने केनचे कुटुंब श्रीमंत होते. केन आपल्या दारुड्या वडिलांच्या सहवासात राहून बिघडू नये, म्हणून त्याची आई त्याला शहरात पाठवते. आपल्या मुळापासून दूर गेलेला केन कधीही शहरात रुजू शकत नाही. थॅचरच्या सहवासात केन वाढतो, तिथे ऐशआराम असतो, पण त्याचबरोबर करडी शिस्त असते. प्रेमाचा मात्र अभाव असतो. सामान्य वातावरणात वाढलेला हा मुलगा, अचानक आलेल्या या बदलांनी पूर्णतः बदलतो. अतिशय गर्विष्ठ आणि निष्ठुर केन आपल्या जवळच्या माणसांपासूनही दुरावत जातो. थॉमसन केनला जवळून ओळखणार्या अनेक व्यक्तींची भेट घेतो, ज्यातून केनचे चित्र उलगडत जाते.

त्याचा जवळचा मित्र आणि जनरल मॅनेजर थॉमसनला केनच्या व्यावसायिक यशाबद्दल सांगतो. केनच्या नेतृत्वाखाली पेपरचा खप सव्वीस हजारावरून सात लाखापर्यंत पोहोचतो. सुरुवातीला मूल्यांशी प्रामाणिक असलेला केन, व्यावसायिक तडजोडीवर उतरतो. त्या वेळी केवळ वर्तमानपत्रे ही माहितीचा मुख्य स्रोत असत. अशा वेळी स्वतःच्या फायद्यासाठी गॉसिपचा आधार घेणे, मीडियाचा उपयोग करणे म्हणजे व्यावसायिक नीतिमूल्ये पायदळी तुडवणे. थॅचर त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण यश आणि पैसे याची धुंदी उतरणे अवघड असते. दुर्दैवाने आजची पिवळी मीडियाही त्याला अपवाद नाही.

आपल्या स्वार्थासाठी चार्ल्स अमेरिकन अध्यक्षाच्या पुतणीशी लग्न करतो. त्याच वेळी सुसान अलेक्झांडर नावाच्या सर्वसामान्य मुलीशी त्याचा संबंध येतो. गव्हर्नरसाठी निवडणुकीला उभा असतानाच, हे स्कँडल त्याची राजकीय कारकिर्द बरबाद करते. त्याची बायको घटस्फोट घेते. स्वतःचे नाव राखण्यासाठी केन सुसानशी लग्न करतो.

केन आणि सुसान यांच्या पहिल्या भेटीचा प्रसंग अतिशय सुंदर आहे.

मी वर्तमानपत्र चालवतो. तू काय करतेस?” हा त्याचा पहिल्याच भेटीला केलेला प्रश्न.

सुझानला जेव्हा केन भेटतो, त्या वेळी त्याच्या मनात त्याच्या आईचे विचार असतात. ती एकच व्यक्ती त्याच्या आयुष्यात असते, जी त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करत असते. सुसानला त्याच्या प्रसिद्धीबद्दल काहीच कल्पना नसते. खरे तर देणे-घेणेसुद्धा नसते. ही साधी सरळ व्यक्ती आपल्यावर फक्त केन म्हणून प्रेम करेल हे त्याला जाणवते. तिच्या साध्याशा घरात एका आरामखुर्चीत बसलेला केन आणि त्याच्या समोर बसून पियानो वाजवणारी घरगुती सुसान. हिच्या सहवासात शांत आयुष्य जगता येईल, याची खूणगाठ पटलेला केन तिला मागणी घालतो.


 

तिला ऑपेरा सिंगर बनवायचे तिच्या आईचे स्वप्न असते. ते पुरे करायच्या तो मागे लागतो. सुझानला एक यशस्वी ऑपेरा सिंगर बनवण्याचा तो ध्यास धरतो. केनच्या नजरेत सर्व माणसे सामान्य आणि म्हणून त्यांच्या हिताचे निर्णय तो घेणार. हा हेतू चांगलाच, पण सुझानच्या आवाक्याच्या बाहेर असते ते स्वप्न.

दोन माणसांच्या क्षमतेत फरक असेल, तर ज्याची क्षमता कमी तो न्यूनगंडाने खचतो. कितीही प्रयत्न केले तरी यश मिळवण्याची एक मर्यादा असते. प्रत्येकासाठी वेगवेगळी. खेचून तर स्वतःच्या बरोबरीला आणता येत नाही. तिचे गाण्याचे कार्यक्रम आयोजित करणे त्याला शक्य असते, पण प्रेक्षकांचे काय? त्यांना कोण आवडते, कोण नाही ते तुम्ही ठरवू शकत नाही. सुसानची टर उडवली जाते. तिला गाणे अशक्य होते. ती आत्महत्येचा प्रयत्न करते, पण केन हा पराभव मानायला तयार होत नाही. त्याचे स्वप्न पुरे करता येत नाही, म्हणून सुसान निराशेच्या गर्तेत सापडते आणि शेवटी त्याला सोडून जाते.

अहंकारी, अविचारी, नीतिभ्रष्ट, कौतुकासाठी हपापलेला आणि केवळ स्वतःचा विचार करणारा केन एकटा पडतो. आधी तो माणसांना दूर करतो, नंतर माणसे त्याला सोडून जातात. मित्र त्याला दूर लोटतात. पैसे संपतात. त्याचा पेपर बंद पडतो. त्याचे भाग्यही साथ देत नाही.

हा चित्रपट म्हणजे त्याचे आत्मचरित्र नाही. त्याच्या सहकार्यांच्या, पत्नीच्या, त्याच्या गार्डिअनच्या, त्याच्या मित्रांच्या नजरेतून आपल्याला एक वेगळाच केन भेटतो. आईवडिलांपासून दूर ठेवलेला केन, श्रीमंत असूनही पोरका झालेला केन, सहवासाला तरसणारा केन. सगळीकडून एकाकी पडलेला केन पुतळे जमा करतो. पुतळे पाहिजे तिथे ठेवता येतात आणि नको तर टाकता येतात. हळूहळू पुतळे माणसांची जागा घेतात आणि जिवंत माणसे दुसरी वाट धरतात. चार्ल्सला आयुष्यात हवे असते ते प्रेम. ते मिळवायचे कसे हे मात्र तो समजू शकत नाही. पैशाने माणसे मिळतात पण त्यांचे प्रेम नाही, हे कळेपर्यंत उशीर होतो. पैसा, समृद्धी, यश यांच्या मागे पळतो आपण. हवेहवेसे अमेरिकन स्वप्नसत्ता, प्रतिष्ठा आणि पैसे’. पण त्यातील फोलपणा जेव्हा लक्षात येतो, तेव्हा मिडास राजाचे आयुष्य वाट्याला येते.

माणूस समजायचा कितीही प्रयत्न केला, तरीसुद्धा तो अनोळखी राहतो ही या चित्रपटाची मुख्य थीम. केन मेल्यावर त्याच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्यासाठी अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्यांच्या शब्दातून केनचे व्यक्तिमत्त्व उलगडायचा प्रयत्न केला जातो आणि इतक्या जणांना भेटून, माहिती मिळवून एक प्रश्न अनुत्तरितच राहतो - नक्की कोण असेल हा चार्ल्स फॉस्टर केन? माणसाचे यश, कर्तृत्व, त्याची मिळकत, त्याचे निर्णय या सर्वांच्या पलीकडे काहीतरी असते, जे त्याला घडवते. त्याचे आयुष्य नियंत्रित करते.

या चित्रपटाचा शेवट धक्कादायक. ‘रोजबडया शब्दाभोवती चित्रपट फिरतो. रोजबड म्हणजे त्याची बर्फात खेळायची गाडी. एवढा मोठा होऊनही त्याचे मन भूतकाळात अडकलेले असते. एकुलते एक साधे खेळणे, ज्यापासून दूर करून त्याला भविष्यात कुणीतरी बनण्यासाठी नेलेले असते. ही गाडी म्हणजे त्याच्या बालपणीच्या आयुष्यातील सुरक्षितता, आशा आणि निरागसता यांचे प्रतीक.. कुणास ठाऊक, कदाचित त्याला व्हायचेही नसेल मोठे. आयुष्य जगताना आलेले अनुभव नेहमीच समृद्ध करत नाहीत. जगण्यातली निरर्थकता समजली, तर जगण्यासाठी कशालातरी घट्ट पकडून ठेवण्याची धडपड प्रत्येक जीव करत असतो. ही धडपड म्हणजेरोजबड’. जेव्हा जगण्यातला जिवंतपणा संपतो, तेव्हा कधी पुतळे तर कधी खेळणी जगण्याचे आधार बनतात, कारण जीवनाची आसक्ती अमर असते, मृत्यूनंतरसुद्धा ती संपत नाही.

एक अप्रतिम अनुभव देणारा हा चित्रपट.

Powered By Sangraha 9.0