धर्मगुरू रामराव महाराज

09 Nov 2020 11:40:42

 संत श्री सेवालाल महाराजांनंतर खऱ्या अर्थाने बंजारा समाजात धर्मकार्य करण्याचे अद्वितीय आणि अकल्पित कार्य जर कोणी केले असेल तर संत श्री रामराव महाराजांनी... त्यांनी समाजाचे नेतृत्व खऱ्या अर्थाने उभे केले. संघटनकौशल्य आत्मसात करत समाजाला संघटन करण्याचे कार्य सेवालाल महाराजांनंतर रामराव महाराजांनी केले. रामराव महाराज दुसरे धर्मगुरू, त्यांनी समाजात चैतन्य आणि मांगल्य टिकवून ठेवण्याचे काम केले. कोजागिरी पौर्णिमेला महाराजांचे देहावसान झाले. 

 
dharmaguru_1  H
 
बंजारा समाज, बंजारा समाजाची परंपरा, रितीरिवाज या सगळ्या गोष्टींचा विचार केला, तर हा समाज आदिकालापासून हिंदू समाजाचाच एक भाग असल्याचे दिसून येते. संत सेवालाल महाराज आणि आणि जगदंबा देवी या समाजाचे कुलदैवत. प्राचीन काळापासून ते आजतागायत या समाजाचा इतिहास पाहिला, तर संत सेवाभाया आणि देवी जगदंबा यांच्या भक्तिपरंपरेचा विचार प्रामुख्याने पाहायला मिळतो. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या पल्याड हा समाज संपूर्ण देशभर सर्वत्र विखुरलेला आहे. अलीकडे तर अनेक संशोधकांनी या समाजावर अभ्यास करून हा समाज विदेशातसुद्धा पहायला मिळतो. एक निश्चित अशी सांस्कृतिक परंपरा जोपासणारा हा समाज एक बोली भाषा आणि विशिष्ट वेशभूषा धारण करून भरताच्या सामाजिक एकात्मतेचा प्रमुख भाग बनला आहे.

अखिल भारतीय बंजारा समाजाचे दैवत असलेल्या संत श्री सेवालाल महाराजांचा जन्म भीमा नायक आणि माता धर्मणी यांच्या पोटी १५ फेब्रुवारी १७३९ रोजी झाला. याच कुळ वंशवेलीवर उमलेले संत श्री रामराव महाराज हे फूल. सेवालाल महाराजांच्या वंशावळीतील एकनिष्ठ भक्त परंपरेतला हा भक्त.. भारतात बहुसंख्य हिंदूधर्मीयांसह अनेक धर्मीय माणसे राहतात. बंजारा समाज हिंदू धर्मसंस्कृतीप्रमाणे संपूर्ण भारतात विखुरला गेला असला, तरी जगण्याच्या विशिष्ट खास शैलीमुळे तो लोकप्रिय झालेला आहे. समाजाच्या परंपरेच पाईकत्व संत श्री सेवालाल महाराजांनंतर संत श्री. रामराव महाराजांनी आपल्यासमोर मांडून दिले, ते आजच्या परिस्थितीत बोलके आहे. बंजारा समाजातील भीमा नायक यांचे सुपुत्र सेवालाल महाराज आणि याच कुळातले बालब्रह्मचारी संत श्री रामराव महाराज हे दुसरे धर्मगुरू ठरले.

बालब्रह्मचारी तपस्वी रामराव महाराज यांचा जन्म ७ जुलै १९३५ला तीर्थक्षेत्र पावनभूमी पोहरादेवी येथे परशुराम महाराज यांच्या पोटी झाला. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी संत श्री रामराव महाराजांनी शालेय शिक्षण सोडून भक्तिमार्ग पत्करला आणि तेव्हापासून ते आजतागायत त्यांनी अन्नत्याग केला. त्यांचा आहार म्हणजे फलाहार आणि दूध. महाराज हे निरंतर बालब्रह्मचारी राहिले. अखिल भारतीय बंजारा समाजाच्या परंपरेनुसार त्यांनी २५ जून १९४८ रोजी महंत म्हणून उपाधी प्राप्त केली आणि तीर्थक्षेत्र पोहरदेवीचे मठाधिपती म्हणून सर्वानुमते त्यांची नियुक्ती झाली. संत श्री रामराव महाराजांनी बारा वर्षे मौन धारण केले होते. संसाराचा त्याग करून त्यांनी भारतभ्रमण करण्याचे ठरवले आणि याच दरम्यान त्यांनी भाविकांना भक्तगणांना वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण दिले, दीक्षा दिली. संत सेवालाल महाराज आणि माता जगदंबा देवीची उपासना करत असताना त्यानी स्वप्न पाहिले की मी माझ्या या पोहरादेवीत तीर्थक्षेत्रामध्ये संत श्री सेवालाल महाराज आणि जगदंबा देवीसाठी भव्यदिव्य मंदिर करेन. लहानपणाची एक गोष्ट अशी आहे की संत श्री रामराव महाराज यांचे वडील परशुराम महाराज यांनी एक अनुष्ठान केले होते. त्यांनी एक स्वप्न पाहिले होते की माझ्या संत श्री सेवालाल महाराज आणि आई जगदंबेच्या मंदिरावर सोन्याचा कळस उभा झाला पाहिजे. त्यांच्या जीवनातली एक गोष्ट नेहमी सांगितले जाते. परशुराम महाराजांना भक्तांकडून मिळालेले धन ते अग्नीत समर्पित करत असत. त्यांना अनेक भक्तांनी विचारणा केली की "बाबा, हे असं का करता?" तेव्हा परशुराम महाराज म्हणायचे की हे "पैसे मी बँकेत जमा करीत आहे. पुढे जेव्हा महापुरुष येईल, तेव्हा त्यांच्या हस्ते आई जगदंबेच्या आणि सेवालाल महाराजांच्या मंदिरात सोन्याचा कळस उभा होईल आणि ते भव्य आणि दिव्य मंदिर माझा संपूर्ण समाज बघेन." इतकी ही शाश्वत आराधना! त्यांच्या ईश्वरभक्तीमुळे त्यांना पुत्रप्राप्ती झाली. याच ईश्वरभक्तीमुळे महाराजांचा जन्म झाला, असे म्हटले जाते.

संत श्री रामराव महाराज शिक्षण घेत असतानाच लहानपणी त्यांच्या जीवनात अनेक चमत्कारिक प्रसंग घडल्याचे दिसते. एकदा शाळेमध्ये गेले महाराजांचे वडील त्या दरम्यान अनंतात विलीन झाले होते. त्यांना एकावन्न गावाचे प्रतिनिधित्व मिळाले होते. रामराव महाराज बालब्रह्मचारी म्हणून १९४८ साली गादीवर बसले. त्यानंतर रामराव महाराजांनी पोहरादेवी येथे बारा वर्षे अनुष्ठान केले, त्यात बारा वर्षे मौन धारण केले. ईश्वरसाधना केली. २४ वर्षांच्या कालखंडानंतर त्यांनी संपूर्ण देश भ्रमण केला. आपला समाज अनेक तांडावाड्या-वस्त्यांवर गरिबीमध्ये जीवन जगतो आहे, दारिद्र्यात जीवन जगतो आहेत, आपले समाजबांधव देवभोळे आहेत, दीनदुबळे आहेत.. आपण आपल्या समाजाची उन्नती केली पाहिजे; आपल्या समाजावर ईश्वरी कृपा व्हावी. आपल्याला त्या निमित्ताने काही करता येईल यासाठी प्रयत्न केला.

समाजातले अज्ञान आपल्याला दूर करता येईल का? समाजातील अंधश्रद्धा आपल्याला दूर करता येईल का? असे अनेक प्रश्न पडू लागले. समाजाला नव्या दिशेकडे नव्या प्रगतीकडे आपल्याला नेता येईल या भावनेतून त्यांनी कार्य केले. समाजात असलेल्या निरक्षरतेचा फायदा घेत मिशनरी , धर्मांतरण करणारी मंडळी यापासून समाजाला वाचवण्यासाठी महाराजांनी अथक परिश्रम घेतले. या मंडळींपासून दूर ठेवण्याचे काम संत श्री रामराव महाराज यांनी अविरतपणे केले. तांड्यापाड्यांवर जाऊन रामराव महाराजांनी लोकजागृतीचे काम केल्याची अनेक उदाहरणे आहेत. संपूर्ण भारतभ्रमण करून त्यांनी आपल्या समाजाला एका नव्या दिशेकडे नेल्याचे महत्कार्य संत सेवालाल महाराज आणि माता जगदंबा देवी यांच्या कृपाप्रसादाने त्यांनी केल्याचे आपणास दिसते.

रामराव महाराज यांचे सामाजिक आणि राजकीय वलयसुद्धा तितकेच व्यापक राहिले. देशातल्या मोठमोठ्या राजकीय आणि सामाजिक व्यक्तींशी असलेलं त्यांचा संबंध महनीय असाच आहे. संतपरंपरेतील माणूस म्हणून त्यांच्याकडे अनेक मोठमोठ्या व्यक्ती भेटायला येत असत. महाराजांनी संपूर्ण समाजातल्या तळागाळात जाऊन आपल्या धर्माचा प्रसार केला. भक्ती धर्म आपला हिंदू धर्म याचा पुरस्कार त्यांनी केला. चांगले कर्म करा, सत्कर्म करा म्हणजे आपल्याला वाईट विचारांपासून दूर होता येईल. नेहमी आपण चांगल्या विचारानेच आपण जगले पाहिजे. जीवनाची प्रगती करायची असेल तर आपण या संसारांमध्ये राहूनच चांगले सत्कर्म करूनच आपण पुढे आयुष्यात मोठे होऊ शकतो. आपल्या प्रत्येक तांडा-पाड्यांमध्ये जगदंबेची आशीर्वादाची अनुभूती आपण स्वीकारली पाहिजे. सेवालाल महाराजांचे मंदिर गावागावात आपण उभारले पाहिजे, देवीचे मंदिर उभे करणे सेवालाल महाराजांचे मंदिर उभे करणे, त्यांच्या जन्माचा उत्सव साजरा करणे, पारायण भागवत कथा अशा अनेक धर्तीवर समाजामध्ये जागृती करण्यासाठी त्यांनी समाजामध्ये चेतना निर्माण केली, आवाहन केले. एकंदरीत रामराव महाराजांचे धार्मिक कार्य आणि सामाजिक कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. महाराजांनी पन्नास वर्षांत लाखो लोकांना व्यसनमुक्त केले. गावागावात जाऊन त्यांनी समाजामध्ये जागृती केली. समाज अंधश्रद्धेने पूर्ण ग्रासला जाऊ नये, व्यसनांमुळेकुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त होतात, पर्यायाने आपल्या वाट्याला दारिद्र्य येते. व्यसन करू नये, कारण समाज तितकाच कष्ट करणारा, शेतीनिष्ठ संस्कृती जोपासणारी होता म्हणून सशक्त समाज निर्माण झाला पाहिजे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. लाखो तरुणांचे जीवन शिक्षणामुळे प्रभावी ठरते, त्यामुळे आपण शिक्षण घेतले पाहिजे यासाठी महाराजांनी शिक्षणाचा आग्रह धरला. तांड्या-पाड्यात जाऊन लोकांमध्ये जनजागृती करायचे. आपला समाज वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या जाती-जमातींमध्ये विभागला गेला आहे, आपला समाज एक व्हावा, आपल्या समाजाला एकाच जातीचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून त्यांनी सतत राजकीय दरबारी मोठमोठाल्या व्यक्तींना - राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री या सगळ्या लोकांना भेटी दिल्या. त्यांच्यासमोर आपल्या समाजाच्या व्यथा आणि वेदना स्पष्ट केल्या. आपल्या पोहरादेवीला येण्यासाठी निमंत्रण दिले. अनेक राजकीय व्यक्ती तीर्थक्षेत्री येऊन गेले, अनेकांनी महाराजांचा प्रसाद घेतला, अनेकांनी महाराजांना आश्वासित केले आणि महाराजांना आपल्या समाजाच्या उन्नतीचा मार्ग सांगितला. तब्येत साथ देत नसतानाही स्वतः समाजाच्या प्रगतीसाठी धडपडणारे रामराव महाराज बंजारा समाजाचे संतश्रेष्ठ ठरले.

समाजासाठी त्यांनी केलेल्या या महान कार्याची दखल घेत कर्नाटक राज्यातल्या गुलबर्गा विद्यापीठाने त्यांना डी.लिट. पदवी सन्मानाने बहाल केली. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला. त्यांना गौरवण्यात आले. पोहरादेवी ही पावन भूमी कशी होईल, संपूर्ण बंजारांची काशी तर आहेच, तशीच संपूर्ण समाजाची काशी कशी होईल यासाठी रामराव महाराजांनी प्रवास केला. सर्वदूर सर्व गणमान्य व्यक्ती यांना निवेदन देऊन अनेकदा त्यांनी प्रयत्न केला. मोठमोठे यज्ञ त्यांनी त्या परिसरात घडवून आणले. समाजामध्ये मांगल्य निर्माण व्हावे, अखिल विश्‍वात शांतता नांदावी, समृद्धीने माझा समाज आणि संपूर्ण देश भरभरून निघावा यासाठी त्यांनी अनेक यज्ञ, लक्षचंडी यज्ञ केले. समाजामध्ये आध्यात्मिक भाव प्रकट करण्यासाठी सहकार्य केले. पोहरदेवी ही संत श्री रामराव महाराची कर्मभूमी आणि पुण्यभूमी ठरली. सातत्याने पोहरादेवी येथे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले. सेवालाल महाराज आणि आई जगदंबेच्या मंदिर निर्माणासाठी त्यांनी जयपूरला महागडे मार्बल आणि मंदिरोपयोगी वस्तू आणून पोहरादेवी येथे सेवालाल आणि जगदंबा देवीचे मंदिर, कळस कळसावर सोनेरी मुकुट उभा केला. त्याचे अनुष्ठान केले. महाराजांच्या एकंदरीत जीवनकार्याचा जर विचार केला, तर ते सातत्याने समाजाची चिंता आणि चिंतन करत करत समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी सातत्याने आपला जीवन व्यतीत केल्याचे दिसते. अखिल भारतीय स्तरावर काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवीला महाराजांनी एक नवीन तीर्थक्षेत्र असा बहुमान प्राप्त करून दिला. आजही रामनवमीच्या पावन पर्वावर एक मोठी यात्रा भरते. ही यात्रा खऱ्या अर्थाने रामराव महाराजांचे वडील परशुराम महाराजांनी सुरू केली. या यात्रेला आजही संपूर्ण देश-विदेशातून लाखोच्या संख्येने भक्तगण संत श्री सेवालाल महाराज आणि आई जगदंबा देवी आणि रामराव महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. महाराजांनी भक्तगणांना उपदेश केला, धर्मप्रसार करून समाजातील अज्ञान दूर केले. चांगले कर्म करण्यासाठी त्यांचा आग्रह असे. सत्कर्म करण्यासाठी त्यांचा आग्रह असे. सत्संग हा जीवनाचा खरा आरसा आहे हे सातत्याने सांगत. शाश्वत जीवन त्याच्याशिवाय जीवनाची उन्नती नाही असे ते आग्रहाने सांगत असत. आपल्याला जर जगायचे असेल, चांगले वागायचे असेल तर आपल्या संसारातून परमार्थ साधता येतो हे सातत्याने सांगायचे. त्यांनी जगदंबा, सेवालाल महाराजांचे मंदिर उभे करण्यासाठी देवीची उपासना केली. सर्वत्र धार्मिक कार्य झाले पाहिजे त्यामुळे सद्भाव निर्माण होईल, यासाठी धार्मिक कार्याला त्यांनी दिशा दिली. गेल्या पन्नास वर्षांत लाखो लोकांना महाराजांनी व्यसनमुक्त केले. संत श्री सेवालाल महाराजांनंतर खऱ्या अर्थाने बंजारा समाजात धर्मकार्य करण्याचे अद्वितीय आणि अकल्पित कार्य जर कोणी केले असेल तर संत श्री रामराव महाराजांनी... त्यांनी सेवालाल महाराजांनंतर समाजाचे नेतृत्व खऱ्या अर्थाने उभे केले. संघटनकौशल्य आत्मसात करत समाजाला संघटन करण्याचे कार्य सेवालाल महाराजांनंतर रामराव महाराजांनी केले. बंजारा समाजाला एक फार मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. अकराव्या शतकातील गुरुजी वाणी आजही समाजात प्रचलित आहेत. 'शिकच शिकावंच....शिके राज घडावच ...शिके जेरी राजपोळी ....घियानपोळी..' याचा अर्थ असा की ज्ञान प्राप्त करणारा समाज ज्ञानी होऊ शकतो आणि दुसऱ्याला ज्ञानी बनवू शकतो आणि तोच ज्ञानी समाज राजवैभव प्राप्त करू शकतो. त्या काळी ज्ञानाचे महत्त्व गुरूच्या वचनातून त्यांना आपल्याला दिले. बाराव्या आणि सतराव्या शतकांमध्ये बंजारा समाजात मोठमोठे राजे-महाराजे होऊन गेले - राजा गोपीचंद, आला उदल, राणा महाराणा प्रताप यांचे सेनापती जयमल, राजा रतन सिंग यांचे सरसेनापती, राणी रूपमतीचे बंधू गोरा बादल, उत्तरेत लकीशा बंजारा, दक्षिणेत जंगी भंगी आणि मध्य प्रदेश - मध्य भारतात भगवानदास अशा कितीतरी शूरवीरांची नावे इतिहासात सापडतात. ही सारी मंडळी त्या त्या राजा महाराजांना रसद पुरवण्याचे काम करत होती. संत श्री सेवालाल महाराज आणि त्यांचा पूर्ण बंजारा समाजसुद्धा यात पद्धतीने समाजकार्य करत, देशकार्य करत सातत्याने व्यग्र राहिले. बंजारा समाजाच्या इतिहासात नावाच्या इतिहासात आपण बघितले, तर अनेकांना मदत करणारी ही जमात अनेकांना दिशा देणारी ही जमात. संपूर्ण देशाला दिशा देण्याचे काम बंजारा समाजाने केल्याचे इतिहासातून दिसते. रामराव महाराज दुसरे धर्मगुरू, त्यांनी अशा पद्धतीने समाजात चैतन्य आणि मांगल्य टिकवून ठेवण्याचे काम केले. कोजागिरी पौर्णिमेला महाराजांचे देहावसान झाले. गुरुपौर्णिमेला जन्माला आलेले रामराव महाराज कोजागिरी पोर्णिमेला स्वर्गलोकी जातात ही बंजारा समाजासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भक्तिपूर्ण अशी घटना मानवी लागेल. आज रामराम महाराज आपल्यात नाहीत. समाजाला दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य संत श्री रामराव महाराज यांनी केले, ते कार्य अविरत पोहरदेवीच्या शक्तिपीठाद्वारे होत राहील.


प्रा. विजय फकिरा राठोड

नागपूर.

९३२५२९०२७०

vijayraorathod1975@gmail.com

Powered By Sangraha 9.0