मृदुला सिन्हा एक सुजाण कार्यकर्ता

28 Nov 2020 11:39:08
@सुमित्रा महाजन
गोव्याच्या माजी राज्यपाल आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या मृदुला सिन्हा यांचे वयाच्या 78व्या वर्षी बुधवार दि. 18 नोव्हेंबर रोजी निधन झाले. पक्षसंघटनेत आणि सरकारमध्येही मृदुलाजींसह प्रदीर्घ काळ कार्यरत आणि त्यांच्याशी अगदी घरगुती संबंध असलेल्या सुमित्राताई महाजन यांनी मृदुलाजींच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...


RSS_1  H x W: 0
भारतीय जनता पक्षाच्या परिवारात श्रद्धेय राजमाताजींचं स्थान मातृवत होतं, तर त्यानंतर सर्वांना समजूतदार शब्दांत समज देत, प्रेमाच्या सावलीत घेऊन कार्यात समाविष्ट करणार्यात मृदुलाजी म्हणजे घरातली मोठी अक्का असंच म्हणावं लागेल. राजमाताजींच्या नेतृत्वात भाजपा महिला मोर्चाची स्थापना करून, त्याच्या मुळाशी खतपाणी घालून, त्याला काळजीपूर्वक वाढवणार्या संस्थापक सदस्यांत प्रामुख्याने त्यांची मेहनत होती. कुठल्याही पदावर असो वा नसो, पक्ष कार्यकर्त्यांच्या - विशेषत: महिला कार्यकर्त्यांच्या हितांचा सतत विचार, त्यांच्या कार्याचं कौतुक व मार्गदर्शन अखंडपणे करणार्या, उत्तम लेखिका म्हणजे आमच्या मृदुलाजी...

माझी मृदुलाजींशी घट्ट मैत्री होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या आणि माझ्या स्वभावातील एक समानता. राजकीय क्षेत्रात काम करत असतानाही एक पाय सतत सामाजिक क्षेत्रात, मनात सामान्य स्त्रियांचा, त्यांच्या विकासाचा सतत विचार व भारतीय संस्कार, संस्कृती याच्या अनुषंगाने पुढे कसं जाता येईल, त्यावर चिंतन. बाहेर काम करत असतानाही गृहिणी, आई, पत्नी या सर्व जबाबदार्या स्वत: तर मृदुलाजी उत्तम सांभाळत होत्याच, तसंच कार्यकर्त्या भगिनींनाही त्याच दृष्टीकोनातून त्यांनी सतत मार्गदर्शन केलं. त्यांचं अगदी याकडे बारीक लक्ष असे व ते त्यांच्याकडून सुंदर रितीने व्यक्तही होत असे. 1983-84मध्ये आम्ही इंदौरला महिला मोर्चाचं अखिल भारतीय प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं. माननीय कुशाभाऊ ठाकरेजींच्या मार्गदर्शनाखाली, इंदौरला आमची तयारी चालू होती आणि मी मनाशी ठरवलं व तसं सर्वांना सांगितलं की, हे संमेलन सर्व प्रकारे - म्हणजे अगदी धनसंग्रहापासून पूर्ण व्यवस्था आम्ही महिलाच सांभाळू आणि खरोखरच इंदौरच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी, महिलांनी अतिशय मेहनत करून ते सफलही केलं. पूर्ण हिंदुस्थानातून, सर्व प्रदेशांतून महिला कार्यकर्त्या या शिबिरात सहभागी झाल्या होत्या. आमची सर्वांची मेहनत व कार्यक्रमाची जोरदार तयारी पाहून, माननीय कुशाभाऊ म्हणाले, “वा वा! आता असं करू या, दोन दिवसांच्या प्रशिक्षण वर्गानंतर आमसभाही घेऊ या. स्टेजवर सर्व महिलाच राहतील, महिला नेत्यांची भाषणं आणि मग मोठी शोभायात्रा.” सर्व कार्यक्रम ठरला. अडवाणीजींपासून सर्व नेते आले होते. राजमाताजी तर पूर्ण तीन दिवस प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित होत्या. विशाल शोभायात्रा निघाली. राजमाताजी, मृदुलाजी वगैरे नेत्यांची जीपसुद्धा आमची एक महिला कार्यकर्तीच चालवत होती. मृदुलाजी व राजमाताजींनी मलाही जीपमध्ये शेजारी उभं केलं. शोभायात्रा आमच्या घराजवळून जात होती. मी सहज मृदुलाजींना म्हटलं, “हे आमचं घर. गॅलरीत माझ्या सासूबाई उभ्या आहेत.” त्या दोघींनी त्यांना हात हलवून नमस्कार केला. पण मृदुलाजींचं एक मृदू, स्त्रीत्व, ममत्व म्हणजे, त्यांचं इतकं बारीक लक्ष होतं की, नंतर त्या सर्वांना सांगायच्या, “अरे, मैने अपने आँखो से देखा यह सुमित्राजी की सास उसे कितना प्रेम करती हैं। बहूका कर्तृत्व देखकर गॅलरी में खडी देख रही थी और आँखोमें आसू थे उनके। मैने उन्हे आँसू पोछते देखा और रोमांचित हो गयी।” कार्यकर्तींच्या परिवाराशी ममत्वाचं नातं जोडण्याचा त्यांचा हा स्वभाव.


RSS_1  H x W: 0

मी अटलजींच्या मंत्रीमंडळात महिला-बालविकास मंत्री होते व मृदुलाजी समाज कल्याण बोर्डाच्या अध्यक्षा. त्या महिलांच्या द़ृष्टीने सतत नवनवीन योजनांवर विचार करत व काही नवीन सुचलं की लगेच माझ्या कार्यालयामध्ये यायच्या. त्यांची ‘कुआप्यासा’ योजना म्हणजे, योजना जास्तीत जास्त सामान्य स्त्रियांपर्यंत कशा पोहोचतील, तर ‘प्यासा’ म्हणजे तहानलेला जर विहिरीपर्यंत पोहोचत नाही, तर विहीर त्यांच्याकडे जाईल, ही मूळ कल्पना. आम्ही दोघींनी एकत्र बसून महिलांच्या कार्याची, कर्तृत्वाची ओळख कशी होणार, या द़ृष्टीने खूप विचार केला व त्यातून ‘स्त्रीशक्ती पुरस्कार’ योजना मला सुचली. मग त्यावर पाच पुरस्कार ठरले. भारतीय स्तरावर नावं कोणती, हे ठरवलं व पहिली झाशीची राणी, दुसरी देवी अहिल्याबाई, तीन जिजामाता, चार राणी गैदिनलियु जीलियांग आणि पाच कण्णगी अशी पाच नावं व पुरस्काराचं स्वरूप ठरवून महिला-बालविकास मंत्रालयातर्फे पुरस्कार घोषित केले. स्त्रीउत्थानासाठी समाज कल्याण बोर्डातर्फे मृदुलाजींनी अनेक योजना राबवल्या. मुख्य म्हणजे, सर्व बोर्ड सदस्य व अधिकारी यांच्या विचारांना त्या उत्तम चालना द्यायच्या, प्रवासही खूप करायच्या व सर्व अनुभवांवर मंत्री म्हणून माझ्याशी चर्चा करत, अनेक नवीन कार्य आम्ही घेत असू. त्या पार्टी संघटनामध्ये त्यासाठी सतत प्रयत्न करत. बडोद्याच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत संघटन पदाधिकार्यांमध्ये मंडल स्तरावर स्त्रियांना 33 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पास करून घेण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका नक्कीच होती. गंमत म्हणजे, महिला कार्यकर्त्यांना कुठलंही पद मिळालं की मृदुलाजींना स्वत:लाच ते पद मिळाल्याचा आनंद व्हायचा. ‘बिहारी स्टाइल’ने बोलत म्हणायच्या, “सुनिये ना, अरे हम नही आप तो इतने बडे पद पर बैठी, यही हमारी सफलता हैं ना? और क्या चाहिए?” महिला मोर्चातील कार्यकर्त्यांवर तर त्या प्रेमाचा वर्षाव करायच्या. पण मृदुलाजींचं एक वैशिष्ट्य म्हणजे, पुरुष कार्यकर्त्यांच्या घरातील स्त्रियांशीही तितकीच मैत्री जोडून आपलेपणा निर्माण करायच्या. आम्हालाही सांगायच्या, अरे आपली पार्टी म्हणजे परिवार आहे ना! मग पूर्ण परिवार जोडला पाहिजे ना! यातूनच ‘कमलसखी क्लब’ची कल्पना साकार झाली.
गोव्याच्या राज्यपाल झाल्यावरही तेथील स्त्रियांची स्थिती, त्यांचं कार्य जाणून त्यांच्या संपर्कात काही कार्यक्रमांच्या निमित्ताने जाऊन त्यांचं अध्ययन करून, मुख्यमंत्र्यांशी व अन्य मंत्र्यांशी चर्चा करून, विकासाची कार्ययोजना मृदुलाजी तयार करत किंवा त्यांना सल्ला देत. त्यांच्या लिखाणातही स्त्रीमनाच्या संवेदनांचं चित्रण उत्तम रितीने प्रत्ययास येतं. रावणाची पत्नी मंदोदरी हिच्या मनाचा विचारही आमच्या मृदुलाजी करतात व त्यावर पुस्तक लिहितात, ही त्यांची स्त्रीत्वाची विस्तृत संवेदनाच दर्शवत नाही काय? आवश्यकता पडल्यावर त्यांनी स्वत:चं शिक्षण पूर्ण केलं, नोकरीही केली, पण आता संसाराची जबाबदारी नीट पेलण्यासाठी नोकरी सोडणं आवश्यक. मग काय, जराही विचार न करता त्यांनी नोकरी सोडली. आपल्या आजारी मुलाची हळुवार पण खंबीरपणे सेवा करत पक्षाचं कामही खंबीरपणे सांभाळणार्या मृदुलाजी अशी त्यांची अनेकविध रूपं त्यांच्याबरोबर काम करताना पाहत आले. पण त्यांना कधी रागवताना पाहिलं नाही. उलट आम्ही कुणी चिडलो की, “देखिये ना, छोडिये ना, ऐसा होता हैं संघटन में काम करते वक्त, यह होता हैं! छोडो, आगे बढो!” असं म्हणत त्या विषय बदलून वातावरण एकदम ठीक करायच्या.
‘गृहिणी, सचिव, सखी’ हे वचन त्यांच्या बाबतीत सार्थ होतं. गोव्याच्या राज्यपाल असताना मी त्यांना भेटायला गेले होते. आम्ही छान गप्पा मारत होतो. थोड्या वेळाने डॉ. रामकृपाल, त्यांचे यजमान बाहेर आले. मी सहजच म्हटलं, “तुम्ही कुठे होता इतका वेळ?” तर ते मुद्दाम मृदुलाजींना चिडवत म्हणाले, “नही, मैने सोचा पहले आप राज्यपाल महोदया से मिलो, फिर मै मिलूंगा।” मृदुलाजीही त्याच सुरात म्हणाल्या, “देखिये ना... कैसे कहते हैं? रहने दो, सुमित्राजी सब जानती हैं। आप जब मंत्री थे, (हाँ - रामकृपालजी बिहार में कॅबिनेट मंत्री, केंद्र में भी स्टेट मिनिस्टर रहैं) तब हम भी आपके पिच्छे रहतेही थें ना?” वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं हे प्रेमाचं गोड भांडण त्यांचं सखीरूप दाखवत होतं. अशी ही आमची मार्गदर्शक, जिच्याशी मनातील गूजही बोलावं, अशी मैत्रीण अचानक सोडून गेली, परिवाराला दु:खात टाकून! भारतीय जनता पक्षात आजही परिवार भाव काठोकाठ भरला आहे.
लेखिका लोकसभेच्या माजी अध्यक्षा आहेत.

- मुंबई तरुण भारत 
Powered By Sangraha 9.0