1896-97 सालात जेव्हा प्लेगच्या साथीने समाजात भितीचे वातावरण निर्माण झाले होते, तेव्हा हा रोग नेमका काय आहे, कशामुळे होतो, झालाच तर त्यावर प्रतिबंधात्मक उपाय अथवा झाल्यावर आरोग्य सुविधा काय केल्या पाहिजेत, यावर लो. टिळकांनी गहन विचार केला. हे सर्व पाहता लोकमान्यांना ‘विज्ञानेश्वर’ म्हणून आणखी एक उपाधी देण्याचा मोह टाळता येत नाही. कोरोनाच्या काळात उपाय थिटे पडले असताना, तसेच टिळकांची स्मृतिशताब्दी असताना त्यांच्या या प्रयत्नांची आठवण होणे स्वाभाविक आहे.
पुण्यात प्लेग आला 1897मध्ये, पण तो मुंबईत अवतरला तेव्हा 1896चा मध्य होता. मुंबईत आला तेव्हाच पुण्यात आता तो कोणत्याही क्षणी येणार याची खात्री लोकमान्य टिळकांना वाटू लागली होती, म्हणूनच प्लेगशी कशा पद्धतीने दोन हात करता येतील, याची चिकित्सा करायला त्यांनी प्रारंभ केला. त्यांनी त्यासाठी सुश्रुत संहिता वाचून काढली आणि त्यातून काही निष्कर्षही काढले. मुंबईत तो कसा आला, त्याचे मूळ काय आणि मुंबईच्या नेमक्या कोणत्या भागात तो आला आणि त्यामागे असलेले कारण काय, याचीही त्यांनी कारणमीमांसा केली. हा रोग गलिच्छ आणि दाट वस्त्यांमधून होतो आणि एखाद्या रुग्णाच्या संपर्कात जर कोणी दुसरे आले तरी त्यांना तो होतो, हा सर्वसाधारण निष्कर्ष. प्लेगवर लस शोधून काढली जात असतानाच्या काळात प्लेग झालेली व्यक्ती जास्तीत जास्त 24 तास जगते किंवा ती वाचलीच तर तोही चमत्कारच, असे मानले जात होते, अशा त्या प्लेगच्या काळात ज्यांच्या जिवाची ससेहोलपट होते, अशांसाठी टिळकांनी स्वतंत्र इस्पितळ तयार केले होते आणि रोज संध्याकाळी ते त्या इस्पितळाला भेट देऊन प्रत्येक रुग्णाची विचारपूस करायचे, त्याला काही हवे-नको ते त्यांच्याकडून पाहिले जात असे. या इस्पितळाला लागूनच त्यांनी मुक्तद्वार भोजनालयही उघडले होते. प्रत्येक रुग्णाला तिथे दोन वेळचे भोजन आणि सकाळचा नाश्ता मोफत असे. घरून येणार्यांना रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी ही व्यवस्था केली होती. अशा संकटसमयी त्यांच्यातला पत्रकार आणि जाणीव असलेला नेता त्यांना स्वस्थ बसू देणे शक्यच नव्हते. हे काहीच नाही, प्लेग येण्याच्या आधी आठ वर्षे - म्हणजे 1889मध्ये पुण्यात स्थापन झालेली ‘इम्पेरिअल बॅक्टेरिऑलॉजिकल लॅबोरेटरी’ हीदेखील टिळकांच्या प्रेरणेने उभी राहिली, हा इतिहास आहे. आल्फ्रेड लिंगार्ड त्याचे जनक होते, पण त्या कल्पनेचे प्रणेते टिळक होते.
या संदर्भात प्रस्तुत लेखकाने अनेक शास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांच्याशी संपर्क साधून तेव्हाच्या त्या परिस्थितीची माहिती घेतली असता नवनवीन माहिती प्रकाशात आली. 1880च्या दशकात दोन महत्त्वाच्या रोगांनी देशातला आणि विशेषत: महाराष्ट्रातला शेतकरीवर्ग चिंताग्रस्त होता. शेतात राबणार्या आणि उपयुक्त असणार्या जनावरांना मोठ्या प्रमाणात ‘फूट अँड माउथ डिसीज’ म्हणजेच लाळ्या कुरकुत रोग होत असे. त्या रोगाबरोबरच दुसरा अँथ्रॅक्स रोगही मोठ्या प्रमाणात पसरत होता. अशा वेळी टिळकांनी पुढाकार घेऊन तेव्हाच्या ब्रिटिश सरकारला पुण्यात एखादी उत्तम शास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन करण्यास सांगितले. या काळात टिळकांनी काही सांगितले म्हटले की, ब्रिटिश सरकार त्याकडे संशयाने पाहात असे. या बाबतीतही तसेच झाले. अँथ्रॅक्स रोगही प्रामुख्याने जनावरांमध्ये आढळे, पण तो मनुष्यप्राण्यासही त्रासदायक असतो. या रोगाने माणसास अंगावर चट्टे पडतात, मानेवर खरूज असल्यासारख्या पुळ्या उठतात, गाठी तयार होतात. हे सर्व वेदनादायक असते. मुक्या प्राण्यांना आपल्याला काय होत आहे, ते सांगता येत नसल्याने त्यांचे हाल तर अधिकच काळजी वाढवणारे असतात. जनावरांचे हे हाल पाहून टिळकांनी अशा एखाद्या प्रयोगशाळेची गरज असल्याचे प्रतिपादन केले. जनावरांचे हाल म्हणजे त्यांच्या मालकांना म्हणजेच शेतकर्यांना ताप. आधीच दुष्काळ, त्यात हे हाल, अशी ही अवस्था होती.
अशी एखादी प्रयोगशाळा निर्माण झाल्यास तिला जागेची टंचाई जाणवू नये, यासाठी दिनशा माणेकजी पेटिट यांनी 4 एकर 32 गुंठे इतकी आपली स्वत:ची जागा दिली. ही जागा आताच्या इंजिनीअरिंग कॉलेजच्या मैदानाशेजारी असल्याचे सांगण्यात येते. त्या ठिकाणी असलेल्या नामफलकाचे चित्रही मला सापडले आहे. ते सोबत आहे. ज्या काळात वैज्ञानिक संशोधनाची कमतरता होती, अशा त्या काळात एका वैज्ञानिक प्रयोगशाळेसाठी आग्रह धरणे आणि ब्रिटिशांनी तो पुरा करणे हे अप्रूपच म्हणावे लागेल. हे सर्व 1889चे आहे, म्हणजेच पुण्यात प्लेग येण्यापूर्वी आठ वर्षे आणि मुंबईत प्लेग येण्यापूर्वी सहा वर्षे आधीचे आहे. टिळकांना किती उच्च कोटीची दूरदृष्टी होती असे आपण म्हणतो, ते काही उगीच नाही. सरकारशी भांडण हा वेगळा प्रकार आहे, पण जनतेच्या प्रश्नांवर जनतेला बरोबर घेऊन नवीनच प्रकारचा लढा देण्यास जे असामान्य धैर्य लागते, ते लोकमान्यांपाशी कसे होते तेच या सर्व माहितीवरून स्पष्ट होते.
इम्पेरिअल बॅक्टेरिऑलॉजिकल लॅबोरेटरी’ हीदेखील टिळकांच्या प्रेरणेने उभी राहिली
पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीत 21 एप्रिल 2010 रोजी देशातील मायक्रोबायलॉजिस्ट शास्त्रज्ञांची परिषद झाली. तीत लोकमान्य टिळक यांच्यावरील ‘द अनसंग सायंटिस्ट’ हा माहितीपट दाखवण्यात आला. प्रवीण तरडे यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटासाठीची धडपड डॉ. मुकुंद देशपांडे तसेच राघवेंद्र गायकैवारी यांची आहे. इतरही अनेकांनी त्यास हातभार लावलेला आहे. माहितीपटात टिळकांना देण्यात आलेल्या ‘अनाम शास्त्रज्ञ’ या किताबाच्या निमित्ताने मला त्या काळात डोकावता आले आणि तो काळ अधिक तपशिलात जाऊन डोळ्यासमोर आणता आला. भारतात आणि विशेषत: पुण्यात जेव्हा सर्वप्रथम प्लेग फैलावला आणि त्यानंतरच्या सहा महिन्यांमध्ये तो जेव्हा हाताबाहेर चालला, तेव्हा नागरिकांना थेट मरणरस्ता दाखवण्यापेक्षा आधी तुमच्या त्या लशीच्या प्रयोगात यश मिळवा एवढेच त्यांचे सांगणे होते. ब्रिटिशांनी फारशी चिकित्सा न करता सगळ्यांना प्लेगची लस टोचायला प्रारंभ केला. चिकित्सेविना लस टोचायची किंमत मोजावी लागण्याची शक्यता म्हणून त्याला टिळकांनी विरोध केला होता. हुबळी, धारवाड, बेळगाव, गदग आदी अनेक ठिकाणी अनेक जण लस टोचल्यानंतरच दगावले. तुमचे हे प्रयोग माणसांवर करत बसण्यापेक्षा आणि त्यांना थेट मरणरस्ता दाखवण्यापेक्षा आधी त्यात यश मिळवा एवढेच टिळकांचे सरकारला सांगणे होते. सर भालचंद्र भाटवडेकर यांनी लशीचे स्वागत केले होते. आधी लस की आधी त्या लशीची प्रचिती या विषयावर भाटवडेकर आणि टिळक यांच्यात वाद होता. कोरोनाच्या काळात काही ठिकाणी निवडक स्वयंसेवकांना लस टोचून जो प्रयोग करण्यात आला, तसा तो त्या वेळी केला गेला होता की नाही हे माहीत नाही. आताही कोरोनाच्या मधल्या काळात या लशीच्या दुष्परिणामांची शक्यता लक्षात घेऊन ती टोचण्याचे काही काळ बंद ठेवण्यात आले होते. मात्र टिळकांनी लशीला केलेला विरोध हा कायमस्वरूपी नव्हता. त्यांनी लगेचच त्या लशीचे स्वागत केले आणि जनतेला ती टोचून घेण्यासाठी प्रोत्साहितही केले. त्या वेळी टिळकांच्या या प्रयत्नांची वाखाणणी करण्यात आली.
या माहितीपटात टिळकांनी ज्या मायक्रोबायॉलॉजिस्ट राव यांच्याशी केलेली चर्चा दाखवलेली आहे, त्यात टिळकांनी प्लेग आणि सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेल्या अग्निरोहिणी यामध्ये एकवाक्यता आहे किंवा काय अशी शंका बोलून दाखवलेली आहे. रावांनी त्यांना ‘अग्निरोहिणीवर उपचार चांगला झाला नाही तर माणूस किती दिवसात दगावतो?’ असा प्रश्न केला. तेव्हा टिळकांनी तो फार तर पंधरा दिवसांनी मृत्यूला सामोरे जाण्याचा धोका संभवतो, असे म्हटले; पण प्लेगमध्ये तो एक-दोन दिवसांमध्येच मरतो, असे कळल्यानंतर टिळकांनी प्लेग आणि अग्निरोहिणी हे एकच रोग नाहीत, हे मान्य केले. मुंबईत सर्वप्रथम जेव्हा प्लेग आला, तेव्हा टिळकांनी त्यावर लिहिलेल्या ‘मुंबईतील भयंकर साथीचा ताप’ या अग्रलेखात अग्निरोहिणीचा उल्लेख केला आहे. त्यात ते म्हणतात - “हल्ली जो मुंबईस ताप सुरू आहे त्याला इंग्रजीत ‘प्लेग’ किंवा ‘ब्युबॉनिक फीव्हर’ हे नाव आहे. हा रोग फार प्राचीन काळी इकडे माहीत होता किंवा नाही हे खात्रीने सांगता येत नाही. याचे स्पष्ट वर्णन कोणत्याही संस्कृत ग्रंथात सापडत नाही. अग्निरोहिणी म्हणून एक रोग वाग्भटात सांगितला आहे. त्याची लक्षणे मात्र हल्लीच्या तापाशी काही अंशी जुळतात. हल्लीच्या तापाची मुख्य लक्षणे म्हटली म्हणजे इतर ज्वराप्रमाणे पहिल्याने डोके दुखणे, अंग ठेचल्यासारखे होणे; आळस, ग्लानी वगैरे चिन्हे उत्पन्न होऊन एकदम सपाटून ताप भरणे, वांत्या व उन्हासे सुरू असणे, रोग्याला नेहमी झापड असून, तो लवकर बरळू लागणे ही होत. रोगाच्या जोराप्रमाणे थोड्या किंवा फार अवकाशाने जांगाड, काख किंवा मान यापैकी एक किंवा अनेक ठिकाणी बद्यासारखी गाठ उत्पन्न होऊन तिला ठणका लागतो. ती गाठ बहुधा पिकून फुटते. या आजाराने रोग्याचा शक्तिपात इतका होतो की, हल्लीच्या साथीत काही रोगी चोवीस तासांच्या आतच यमसदनास जातात. बरेच दोन किंवा तीन दिवसांनी मरतात, काही पाच-सहा दिवसांनी मरण पावतात; व फारच थोडे वाचतात. हल्लीच्या साथीत मरणाचे प्रमाण शेकडा किती आहे याची खात्रीलायक माहिती अजून मिळालेली नाही. तरी वर्तमानपत्रातील व खासगी बातम्यांवरून ते पाऊणशे असावे असा आमचा अंदाज आहे. ह्या तापाची साथ मांडवी येथे सुरू होऊन सुमारे एक महिना झाला. इतक्या अवधीत चारशेवर माणसे मेली असावीत असे वाटते. अशा साथीच्या प्रसंगी जितक्या बारकाईने चौकशी झाली पाहिजे व लागलेल्या व मेलेल्या लोकांची संख्या रोजच्या रोज ज्या तर्हेने नोंदली जावी, त्या तर्हेने ती मुंबईसारख्या शहरातही होत नाही, ही मोठ्या दिलगिरीची गोष्ट आहे. हा ताप सुरू झाल्यावर लवकरच मांडवी येथील एक-दोन डॉक्टरांनी व काही म्युनिसिपल कमिशनरांनी ही गोष्ट मुंबईचे म्युनिसिपल कमिशनर व हेल्थ ऑफिसर यांच्या कानावर घातली, तरी त्या दोन अधिकार्यांनी बरेच दिवस त्याजविषयी योग्य विचार केला नाही. परंतु जेव्हा बरेच लोक मृत्युमुखी पडले व बरेच लोक साथीच्या भीतीने आपआपली घरे सोडून बाहेरगावी किंवा मुंबईतील स्वच्छ भागात स्थलांतर करू लागले व मांडवीतील लोक हवालदिल होऊन त्या भागात जिकडे तिकडे भीती व अस्वस्थता दिसू लागली, तेव्हा म्युनिसिपालिटीचा अधिकारीवर्ग हळूहळू जागा होऊ लागला.” हा परिच्छेद सविस्तर अशासाठी दिला की, वाचकांना तेव्हाची ती स्थिती आणि हल्लीची कोरोनाची परिस्थिती यात नेमका फरक आहे किंवा नाही हे कळावे; शिवाय सर्वसाधारण अधिकारीवर्गाची आणि सामान्य जनतेचीही मानसिकता आणि वैचारिकता कळावी. हा अग्रलेख दि. 6 ऑक्टोबर 1896चा आहे. म्हणजेच तो पुण्यात प्लेगने धुमाकूळ घालण्यापूर्वीचा आहे.
पुण्यात प्लेग आला आणि त्याने सारे पुणे शहरच वेठीला धरले. मुंबईत प्लेग लवकर आटोक्यात आला नाही आणि तो सर्व भागांतच पसरला. त्यामुळे मुंबईतील तीन चतुर्थांश वस्ती स्थलांतरामुळे कमी झाल्याचे ‘ग्रांथिक सन्निपात व सरकार’ या 16 फेब्रुवारी 1897च्या अग्रलेखात म्हटले आहे. चार महिन्यांमध्ये उद्भवलेली ही स्थिती चिंताजनक असली, तरी असे दिसते की मुंबईत जो जुलूम झाला नाही, तो पुण्यात झाला. मुंबईत कोणाच्या नित्य व्यवहारावर गदा आणण्यात आली नाही, पण पुण्यात त्यांच्या त्या व्यवहारावर नांगरच फिरवला गेला. मुंबईत महिलावर्गाला फार त्रास सहन करावा लागला नाही, तो पुण्यात लागला. पुण्यात महिलांच्या काखा आणि जांघा यांना तपासण्याचे काम हाती घेतले गेले आणि या त्यांच्या कामामुळे लोक संतापले आणि त्याच चिडीच्या भरात रँड तसेच आयर्स्ट यांचा खून झाला. चाफेकर बंधूंना त्यासाठी फाशी देण्यात आले. त्या वेळी चाफेकर बंधूंच्या कटात टिळकही असले पाहिजेत, हा ब्रिटिशांचा ग्रह होता आणि त्या दिशेने त्यांचे प्रयत्न होते. सरकारने या दोन अधिकार्यांच्या खुनाचा पुणेकरांवर सूड उगवायचे सर्व प्रकारचे प्रयत्न करून पाहिले. सरकारच्या हाती तो महामारीचा कायदा होता, त्याचा हा दुरुपयोग होता. तेव्हा सरकारला वठणीवर आणण्यासाठी टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ हा अतिशय जहाल अग्रलेख (6 जुलै, 1897) लिहिला. 27 जुलै, 1897 रोजी टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली. 6 जुलैच्या अग्रलेखात टिळकांनी जो सूचक उल्लेख केला आहे, तो असा - “त्याचप्रमाणे हल्ली गर्भार बायका, बाळंतिणी आणि म्हातारे-कोतारे वगैरे सर्वांस कैद्याप्रमाणे पकडून उघडीबोडकी जी सेग्रेगेशन कँपमध्ये पाठवितात, तसे न करिता गर्भार किंवा बाळंतिणी आणि म्हातारी कोतारी यांस घरातच राहू दिले, तर त्यापासून काही मोठा तोटा होईल असे आम्हास वाटत नाही.” टिळकांनी महिलावर्गाची बदनामी होऊ नये यासाठी जी काळजी घेतली होती, ती तेव्हाच्या बहुतेक वृत्तपत्रांनी घेतलेली होती. एकच वृत्तपत्र ‘ज्ञानसागर’ होते, ज्याने 15 मार्च, 1897च्या अंकात लिहिले होते की- “घरातल्या माणसांची शारीरिक पाहणी करताना त्यांना घराबाहेर उघड्यावर आणले जाते. तिथेही पुरुषांना नागव्याने उभे करत आणि बायकांना चोळ्या काढून लुगडी वर करायला लावत. या वेळी कोणी विरोध करायला आला, तर त्याला गुरासारखे पिटले जात असे. या सर्व गोष्टी करता याव्यात यासाठी तर तेव्हाचा तो महामारीचा कायदा हाती घेण्यात आला नव्हता ना, असा संशय जनतेत बळावला होता.”
आज ज्या ‘एपिडेमिक अॅक्ट’ची - अर्थात साथीच्या कायद्याची विशेषेकरून चर्चा होते, तो कायदा 1897चा आहे आणि अगदी कोरोनाच्या प्रारंभीच्या काळापर्यंत त्यात काही विशेष सुधारणा झालेली नव्हती. हा कायदा झाल्यानंतरच्या स्थितीविषयी टिळकांनी 16 फेब्रुवारीच्या या अग्रलेखात म्हटले आहे की, ‘ज्या ज्या गावी मुंबईतील लोक गेले, तेथे तेथेही साथीचा ताप सुरू झाला, ही बातमी युरोपातील राष्ट्रांना कळताच त्यांच्यात फार चळवळ उत्पन्न झाली. ठिकठिकाणच्या शास्त्रज्ञ मंडळींची ग्रांथिक सन्निपाताविषयी व त्याचा प्रसार बंद करण्याच्या उपायांविषयी चर्चा करण्याकरिता व्हेनिस येथे एक सभा भरवावी, असे सर्व युरोपियन राष्ट्रांनी ठरविले. हिंदुस्थानातून येणारी गलबते युरोपातील कोणत्याही बंदरांवर उतरू देऊ नये व हिंदुस्थानचा मालही युरोपात येऊ देऊ नये अशा विचारात तिकडील सर्व राष्ट्रे पडली आहेत; असे पाहून स्टेट सेक्रेटरीला बरीच भीती उत्पन्न झाली; व ही गोष्ट इतक्या थरावर येण्यास मुंबई सरकारचा व हिंदुस्थान सरकारचा या कामी प्रथमारंभी झालेला हलगर्जीपणा कारणीभूत आहे असे त्यास वाटून त्यांनी व्हाइसरॉयसाहेबांस यासंबंधाने विशेष व्यवस्था करण्याविषयी फार नेटाचा हुकूम फर्माविला. या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की, साथीच्या रोगाचा प्रसार बंद करण्यासंबंधाने व्हाइसरॉयसाहेब व त्यांचे काउन्सिल यांनी 4 फेब्रुवारी 1897 रोजी आपल्यास विशेष तर्हेचे अधिकार घेण्याकरिता व तसेच अधिकार निरनिराळ्या इलाख्यांच्या गव्हर्नरांना देण्याकरिता साथीच्या रोगाचा अॅक्ट नावाचा एक कायदा पास करून घेतला. या कायद्याच्या योगाने प्रस्तुत साथीच्या प्रसंगी व पुढे केव्हाही अशाच भयंकर साथीच्या प्रसंगी हिंदुस्थान सरकारला व स्थानिक सरकारला साथीचा प्रसार बंद होण्याकरिता हिंदुस्थानातील कोणत्याही बंदरावर उतरणार्या किंवा तेथून निघणार्या आगबोटी तपासणे, त्यातील मालाला किंवा उतारूंना अडथळा करणे, तसेच रेल्वेतून जाणार्या लोकांना हव्या त्या स्टेशनवर तपासणी व योग्य वाटेल तसा अडथळा करणे व त्यातून आजारी लोकांना साथीच्या रोगाकरिता बांधलेल्या इस्पितळात नेऊन टाकणे वगैरे गोष्टी करण्याविषयी पूर्ण अधिकार प्राप्त होतो. या अॅक्टअन्वये मुंबई सरकारने मुंबईच्या म्युनिसिपल कमिशनरला जे अधिकार दिले आहेत, त्यांजविषयीचे नियम आम्ही दुसरीकडे दिले आहेत. ते वाचले असता सरकारने या कामी आता फारच कडकपणा धरला आहे, असे दिसून येईल.”
एकट्या मुंबईमध्ये जेव्हा प्लेग पसरला आणि तो काही केल्या आटोक्यात येईना म्हटल्यावर ब्रिटिश सरकारला जाग आली, माणसापरीस माणसे मरत होती आणि सरकार स्वस्थ होते, अशी प्रतिमा जनमानसात पसरलेली होती. भारतातून परदेशात जाणारा मालही युरोपात उतरवून घेतला जात नव्हता आणि तेव्हाच्या ब्रिटिश सरकारची खूपच पंचाईत झालेली पाहायला मिळत होती. अशा अवस्थेत बाहेरच्या जगात झालेली नाचक्की ब्रिटिशांना अधिक झोंबणारी वाटली. त्यांनी म्हणूनच हा कायदा केला. तो कायदा अगदी कालपरवापर्यंत तसाच होता. आताही जो बदल त्यात केला आहे, तोही अगदी जुजबी म्हणावा असा आहे. ब्रिटिश पार्लमेंटने तेव्हा हा कायदा संमत करवून घेतला होता. या कायद्याच्या एकूण चार भागात वेळोवेळी काहीसे बदल करण्यात आले. त्या वेळच्या प्लेगमध्ये एक कोटी लोक मृत्युमुखी पडले होते. पुणे वा मुंबई शहरात प्रेते जाळण्यास सरण कमी पडत होते, असे केसरीत प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. ही आकडेवारी कमी असेल असे मानले, तर मग जास्त असणारी आकडेवारी काय असेल ते सांगणे अवघड आहे.
कोणत्याही अशास्त्रीय गोष्टीला टिळकांनी पाठिंबा दिला आहे असे कधीही झालेले नाही. महामारीच्या त्या काळचक्रात काय काय घडत होते याचा विचार केला, तर ते आजच्यापेक्षा काही वेगळे घडत होते असे नाही. आज जरा कमी प्रमाणात कदाचित असेल, पण परिस्थिती तीच आहे. या संदर्भात टिळकांचा एक अग्रलेख वानगीदाखल सांगता येईल. हा अग्रलेख 9 डिसेंबर, 1902चा आहे. त्याचे शीर्षक वाचून आपली उत्सुकता नक्कीच ताणली जाते. हे शीर्षक असे - ‘प्लेगोबास पंजाब सरकारने दिलेले बळी’. त्यांनी प्रारंभीच लिहिले आहे की, “महामारीच्या किंवा दुसर्या कोणत्याही भयंकर साथीत रोगाचा प्रतिकार करण्याचा उपाय न सुचल्यामुळे भांबावून जाऊन रानटी किंवा अडाणी लोक साथीच्या देवतेस भाताचा, जनावराचा किंवा अत्यंत रानटी अवस्थेत लोक असल्यास, मनुष्याचाही बळी देतात हे सर्वांस माहीत आहेच, व इंग्रजी शिक्षणाने सुशिक्षित झालेले बहुतेक लोक अशा जुन्या चालीरितीची चेष्टा करीत असतात हेही सांगावयास नकोच. परंतु विशेष आश्चर्याची गोष्ट ही की, ज्या गोष्टी रानटी लोक करतात म्हणून आम्ही त्यास नावे ठेवितो, त्याच गोष्टी रूपांतराने विसाव्या शतकाच्या आरंभी सुधारलेले सरकार करीत असता त्यास आमची शहाणीसुर्ती मंडळीही साहाय्य होऊन सरकारच्या कृत्याचे अभिनंदन करण्यास किंवा त्यांनी उपस्थित केलेल्या खंडोबाची तळी उचलण्यास तयार होते. मनुष्यस्वभाव येथून तेथून सारखाच आहे, व रानटी मनुष्य अडाणीपणाने भांबावून जात असला, तर सुधारलेले सरकार भांबावून जाण्यास नवीन शास्त्रीय शोधांच्या नावावर मोडेल, अशी काही तरी कल्पना असली म्हणजे बस्स झाले.” यावरून कदाचित काहींचा असा समज होईल की, टिळकांनी प्लेगमध्ये सरकार करत असलेल्या विरोध केला. तो विरोध महिलांना वाईट आणि घृणास्पद वागणूक देण्याला होता. त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झाली, वर्षभराने परतले, तरी प्लेग होता तिथेच. ही परिस्थिती काही चांगली म्हणता येणारी नव्हती. पुण्यात प्लेग येऊन गेल्यावर सहा वर्षे उलटली तरी प्लेग हटला नाही, याला नाकर्तेपणा म्हणायचे नाही, तर मग म्हणायचे तरी काय? असा टिळकांचा सवाल होता.
याच दरम्यान 1899मध्ये डॉ. हाफकिन यांनी मुंबईत प्लेगची लस शोधून काढण्यासाठी जेव्हा आपली एक स्वतंत्र प्रयोगशाळा उभी केली, तेव्हा तिचे स्वागत करायला टिळकच पुढे आले होते. डॉ. वाल्देमार हाफकिन यांनी स्वत:वर लस टोचून त्याची ‘क्लिनिकल ट्रायल’ घेतली होती, हेही विशेष होते. ते स्वत: युक्रेनियन होते आणि त्यांना पाश्चर इन्स्टिट्यूटने भारतात काम करण्यासाठी पाठवून दिले होते. टिळकांना भेटून गेलेले डॉ. बॅनरमन यांनी या प्रयोगशाळेत बनणारी प्लेगवरील लस कशी तयार केली जाणार आहे, त्याविषयीही उपस्थितांना माहिती दिली. टिळकांनी त्याविषयी 15 ऑगस्ट 1899च्या केसरीत लिहिलेल्या अग्रलेखात (प्लेग टोचणे, प्लेगची लस व प्लेगवरील उपाय) म्हटले होते की, “कॉलर्याप्रमाणे प्लेग हाही रोग एक प्रकारचे सूक्ष्म जंतू (त्यास सजीव विषकण म्हटले तरी चालेल) शरीरात शिरल्याने उद्भवतो, असे डॉ. यारसिन आणि जपानी डॉ. किटॅसेंटो यांनी हाँगकाँग येथे प्लेग सुरू होता तेव्हा प्रथम शोधून काढल्यास बरीच वर्षे झाली. हा प्लेग जंतू अथवा सजीव विषकण (यालाच आपण विषाणू असे म्हणतो) शरीरात शिरला म्हणजे तो मनुष्याच्या शरीरातील रक्तात एक प्रकारचे निर्जीव विष तयार करतो. ज्याप्रमाणे कोळ्याच्या पोटातून धागे निघतात, तशाच प्रकारे हे प्लेग जंतू रक्तात शिरल्याने तेथे त्यांच्या पोटातून हे निर्जीव विष बाहेर पडते. मनुष्य प्लेगने मरतो तो काही प्लेग जंतू शरीरात शिरल्याने मरत नाही, तर या प्लेग जंतूंपासून जे विष उत्पन्न होऊन शरीरात साचते, त्या विषाच्या योगाने मनुष्यास मृत्यू येतो. हे विष मारण्यास दुसरे प्रतिविष अद्यााप सापडलेले नाही; परंतु असे आढळून आले आहे की, जे रोगी प्लेग होऊन बचावतात त्यांच्या रक्तात निसर्गत:च प्लेगच्या विषास मारक असे प्रतिविष तयार होते; व अशा रीतीने प्रतिविष तयार झाल्यामुळे माणसे प्लेगने मरत नाहीत. ज्यांच्या शरीरात अथवा रक्तात हे प्रतिविष उत्पन्न करून प्लेगबरोबर झुंजण्याची शक्ती नसते, ते प्लेग झाला असता जगत नाहीत.” म्हणजेच जिथे हे प्रतिविष तयार होत नाही, तिथे त्याला ते बाहेरून पुरवायची आवश्यकता असते. नेमके हेच टिळकांनी आपल्या या अग्रलेखात म्हटलेले आहे.
आपण यावरून एक निष्कर्ष निश्चित काढू शकतो की, टिळकांनी येथे प्लाझ्माच्या निर्मितीचेच किंवा प्लाझ्मा रोगोपचाराचेच इंगित सांगितलेले आहे. अगदी स्पष्टच लिहायचे तर जेव्हा युरोपात शंभर वर्षांपूर्वी स्पॅनिश एन्फ्ल्युएन्झाचा प्रादुर्भाव होता, तेव्हा पहिल्यांदा या प्लाझ्मा थेरपीचा वापर केला गेला. ती वर्षे होती 1918 ते 1920 या दरम्यानची. त्या आधी 1916मध्ये न्यूयॉर्कमध्ये पोलिओमायलायटिसचा प्रसार वाढला, तेव्हा अतिशय तीव्र अशा अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीच्या संदर्भात या प्लाझ्मा रोगोपचाराचा वापर केला गेला. त्याच वर्षी ट्यूनिसमध्ये गोवर झालेल्या व्यक्तीसाठी या रोगोपचाराचा वापर केला गेला होता, अशी नोंद आहे. 1915मध्ये इटालियन डॉक्टर फ्रान्सेस्को सेन्सी यांनी पहिल्यांदा प्लाझ्मा वापरलेला होता. सेन्सी यांनी 1907मध्ये इटालियन पेडियाट्रिक जर्नलमध्ये लिहिलेल्या लेखात त्याचा संदर्भ आढळतो. त्यांनी त्यात म्हटले होते की, एका विकाराने आजारी असलेली व्यक्ती बरी झाल्यानंतर ती पुन्हा त्याच रोगाने आजारी पडल्याचे किंवा त्याने त्याचा मृत्यू झाल्याचे आढळत नाही. त्याच्याकडे त्या रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण झालेली असते. तिचा वापर करून घेऊन दुसर्याकडे त्या शक्तीची बदली केल्यास त्याच्याकडे तो प्रतिकार येण्याची शक्यता जास्त निर्माण होते, असे त्यांनी त्या लेखात म्हटलेले आहे. फ्रान्सेस्को सेन्सी हे मध्य इटलीतील पेरूगिया या छोट्याशा शहरात डॉक्टर होते. त्यांनी 1901मध्ये गोवर होऊन गेलेल्या वीस वर्षांच्या एका तरुणाचे 600 मिलिलीटर रक्त घेऊन ते गोवर झालेल्या दुसर्या व्यक्तीच्या शरीरात टोचले आणि त्याच्यात अक्षरश: चमत्कार घडून आला, असे मत त्यांनी नोंदवलेले आहे. याचाच अर्थ त्याआधी कधी त्याचा वापर झाल्याचे इतिहासात नोंदवले गेलेले नाही. जे 1901पूर्वी नोंदवले गेलेले नाही, ते टिळकांनी 1897मध्ये सांगितले होते. दुसरे विशेष हे की, प्लेग हा जिवाणूंपासून होतो की विषाणूंपासून याविषयी अजूनपर्यंत संशोधन चालू ठेवण्यात आले होते, पण तो विषाणूंपासूनच होत असल्याचे अलीकडे निष्पन्न झाले आहे. टिळकांनीही आपल्या लेखनात सर्वत्र त्याचा उल्लेख विषकणांपासून, म्हणजेच विषाणूंपासून झालेला रोग असे म्हटले आहे. हाफकिन इन्स्टिट्यूट स्थापन झाली 10 ऑगस्ट 1899 रोजी आणि त्यावर टिळकांनी सविस्तर अग्रलेख लिहिला तो 15 ऑगस्ट 1899 रोजी. तेव्हा केसरी साप्ताहिक होता आणि आताप्रमाणे ‘गूगल विद्यापीठ’ तेव्हा माहिती द्यायला नव्हते. टिळकांनी लिहिलेला ‘प्लेग टोचणे, प्लेगची लस व प्लेगवरील उपाय’ हा अग्रलेख म्हणूनच लक्षणीय ठरतो. म्हणूनच त्यांना विज्ञानेश्वर म्हणून आणखी एक उपाधी देण्याचा मोह टाळता येत नाही. कोरोनाच्या काळात उपाय थिटे पडले असताना, तसेच टिळकांची स्मृतिशताब्दी असताना त्यांच्या या प्रयत्नांची आठवण होणे स्वाभाविक आहे.
(ज्येष्ठ संपादक, तसेच ‘मंडालेचा राजबंदी’ आणि आगामी ‘टिळक पर्व’ या पुस्तकांचे लेखक)