संविधान या संकल्पनेचा विकास प्रामुख्याने ब्रिटन, अमेरिका आणि फ्रान्स या तीन देशांत झाला. या तीन देशांच्या संविधान संकल्पनेच्या विकासाचा इतिहासक्रम सांगणारी तीन पुस्तके हिंदुस्थान प्रकाशन संस्थेतर्फे लवकरच प्रकाशित होणार आहेत. या पुस्तकांचा परिचय करून देणारा, पुस्तकाचे लेखक रमेश पतंगे यांचा हा विस्तृत लेख.
संविधान या विषयावर उलटसुलट बोलणारे आपल्या देशामध्ये भरपूर लोक आहेत. अधूनमधून काही लोकांना साक्षात्कार होतो की, मोदी सरकार कायम राहिले तर भारताचे संविधान धोक्यात येईल, लोकशाही संपेल, एका पक्षाची हुकूमशाही सुरू होईल, विचारधारांचे स्वातंत्र्य संपेल, सर्व देश एका विचाराच्या प्रभावाखाली येईल, म्हणून संविधान वाचविले पाहिजे, लोकशाही वाचविली पाहिजे, व्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण केले पाहिजे.. या प्रकारे मांडणी केली जाते.
मुळात संविधान काय असते आणि संविधानातून कोणत्या संकल्पनांचा उदय होतो, याची माहिती संविधानाच्या रक्षणाचा गळा काढणार्यांना फारशी असते असे नाही. संविधान ही संकल्पना राजकीय आहे. समाजाचे राजकीय संघटन करण्याचा तो एक सर्वोच्च कायदा आहे. या कायद्याचा आणि सांविधानिक संकल्पनांचा विकास प्रामुख्याने ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेत झालेला आहे. या देशातून आधुनिक सांविधानिक लोकशाहीची संकल्पना जगात सर्वत्र गेली. आपल्या देशाने तिचा अंगीकार केलेला आहे. म्हणून सांविधानिक मूल्ये कशी अस्तित्त्वात आली, त्यांचा विकास कसा झाला, हा इतिहास समजून घ्यावा लागतो.
लोकशाही देशातील संविधान पुढील मूल्यांवर आधारित असते - 1. कायद्याचे राज्य, 2. व्यक्तीच्या जीवनाच्या आणि मालमत्तेच्या रक्षणाची हमी, 3. जनतेकडे सार्वभौमत्व, 4. जनतेच्या संमतीशिवाय कर आकारण्यास राज्यसंस्थेला प्रतिबंध, 5. न्यायालयाचे स्वातंत्र्य, 6. भाषण, लेखन, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, 7. उपासनापंथ निरपेक्ष राज्य. या सात गोष्टी जेथे असतात, त्याला लोकशाही म्हणतात. हे लोकशाही शासन आपल्या देशात आहे. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स या देशांतही आहे.
लोकशाही राज्यपद्धती सामान्यतः दोन प्रकारच्या असतात 1. संसदीय पद्धतीची लोकशाही व 2. अध्यक्षीय पद्धतीची लोकशाही. ब्रिटनची लोकशाही संसदीय पद्धतीची आहे आणि अमेरिकेची लोकशाही अध्यक्षीय पद्धतीची आहे. राज्यशास्त्राच्या परिभाषेत अमेरिकन पद्धतीचे वर्णन ‘रिपब्लिक’ या शब्दाने केले जाते आणि ब्रिटनचे वर्णन ‘डेमोक्रसी’ या शब्दाने केले जाते. आमच्याकडे लोकशाही आहे, असे अमेरिकन माणूस म्हणत नाही, तो म्हणणार, “आम्ही रिपब्लिक (प्रजातंत्र) आहोत.” आणि ब्रिटनचा माणूस म्हणतो, “आम्ही रिपब्लिक नाही, आम्ही डेमोक्रॅटिक आहोत.”
अनेकांना हा शब्दाचा घोळ वाटेल. पण तो तसा नाही. प्रत्येक देशाचा त्यामागचा स्वतंत्र इतिहास आहे. तो समजला की या शब्दांचे त्या त्या देशाप्रमाणे झालेले अर्थ समजू लागतात. आपण ब्रिटनपासून सुरुवात करू या.
ब्रिटनच्या संविधानाचा प्रवास
ब्रिटनच्या संविधान निर्मितीच्या इतिहासाचा प्रारंभ 15 जून 1215 पासून सुरू होतो. या दिवशी सगळ्या जगावर दूरगामी परिणाम करणारी एक घटना लंडनजवळील रेनीमेड या मैदानावर घडली. आज त्या ठिकाणी एक स्मारक उभे करण्यात आलेले आहे. रेनीमेडच्या या मैदानावर ओक वृक्षाच्या खाली प्लँटाजिनेट वंशातील राजा जॉन याने एका सनदेवर सही केली आणि आपला राजशिक्का उमटविला. त्या सनदेला ‘मॅग्नानिमस चार्टर’ किंवा ‘मॅग्ना चार्टा’ असे म्हणतात. आधुनिक पार्लमेंट, व्यक्तीचे अधिकार, त्याच्या जीवन-मालमत्तेच्या रक्षणाची हमी, कायद्याचे राज्य, न्यायालयाचे स्वातंत्र्य असे आजचे लोकशाहीचे सर्व विषय या मॅग्ना चार्टामध्ये आलेले आहेत. या मॅग्ना चार्टाला आधुनिक लोकशाही राजवटीचे जनकत्व दिले जाते.
राजा जॉनला या चार्टरवर सही का करावी लागली? राजमुद्रा का उमटवावी लागली? याचा इतिहास आहे. राजा जॉन इंग्रज राजवंशातील सगळ्यात वाईट, क्रूर, जुलमी, अत्याचारी, घमेंडखोर राजा समजला जातो. कोणताही ब्रिटिश इतिहासकार या राजाविषयी चार चांगले शब्द लिहीत नाही. त्याच्या राजवटीत सतत लढाया होत राहिल्या. त्या काळातील ब्रिटन हा काही आजचा ब्रिटन नव्हता. या जॉनचे राज्य अर्धा फ्रान्स, स्कॉटलंड आणि आयर्लंड सोडूनचा इंग्लंड एवढे विस्तारित होते.
त्याचा राजवंश विलियम दी काँकरर (थळश्रश्रळरा ींहश उेर्र्पिींशीेी) याच्यापासून सुरू होतो. हा विलियम नॉर्मंडीचा होता. नॉर्मंडी फ्रान्समध्ये येते. इंग्लंडची राजगादी वारसा हक्काने मलाच मिळाली पाहिजे, असा त्याचा दावा होता, म्हणून चारशे गलबतांतून सैन्य घेऊन त्याने इंग्लंडवर स्वारी केली. राजाचा पराभव करून त्याला ठार मारले आणि येथून त्याचा राजवंश सुरू झाला, तो आजतागायत चालू आहे. जॉनकडे हे राज्य वंशपरंपरेने आले, परंतु त्याने फ्रान्सची सर्व भूमी गमावली. इंग्लंडमध्ये खूप शत्रू निर्माण करून ठेवले. वाट्टेल तशी कर आकारणी सुरू केली. कर न भरणार्यांचे छळ सुरू केले. अत्यंत क्रूरपणे त्याने अनेकांना ठार मारले. पोपशी भांडण सुरू केले. चर्चची संपत्ती ताब्यात घ्यायला सुरुवात केली. पोपने त्याला धर्मबहिष्कृत करून टाकले.
जॉनने धर्मसत्तेशी संघर्ष सुरू केला. सरदार, सामंत मंडळींशी संघर्ष सुरू केला, विदेशी शक्तींशी संघर्ष सुरू केला. यातील चर्च आणि सामंत मंडळी ही सत्ता भोगणारी मंडळी होती. ती एकत्र आली आणि त्यांनी राजाला निर्वाणीचा इशारा दिला - एकतर आमच्या मागण्या मान्य कर, नाहीतर गृहयुद्धाला तयार हो. आपल्याच देशवासीयांशी युद्ध केल्यास त्यात आपला अंत होईल, हे समजण्याची अक्कल जॉनकडे होती, म्हणून महिनाभर बॅरन, बिशप यांच्याशी चर्चा करून शेवटी चर्मपत्रावरील सनदेवर राजाला सही करावी लागली आणि त्यावर राजमुद्रा उमटवावी लागली.
या मॅग्ना चार्टातील काही महत्त्वांच्या कलमांचा थोडक्यात आढावा घेऊ या. मॅग्ना चार्टातील पहिलेच कलम ब्रिटनमधील चर्च संस्थेच्या लिबर्टीचे आहे. इंग्लिश चर्च स्वतंत्र असेल, त्याची मुक्तता घट्ट असेल. हा अधिकार निरंतर स्वरूपाचा राहील. तो येणार्या पिढीलाही प्राप्त होईल.
कलम 39 म्हणते की, कायद्याची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कुणाही स्वतंत्र व्यक्तीला अटक करता येणार नाही, हद्दपार करता येणार नाही, अथवा अन्य कोणत्याही मार्गाने त्याला बरबाद करता येणार नाही. कलम 40 म्हणते की, न्याय मागण्याचा अधिकार कुणालाही नाकारला जाणार नाही. तसेच न्यायदानाचे ज्ञान नसणार्या कुणाचीही त्या पदावर नियुक्ती करण्यात येणार नाही. (कलम 45) कलम 55/56 यात राजा म्हणतो की, अन्यायकारकरित्या जो दंड लावून वसूल केला असेल तो परत करण्यात येईल, तसेच ज्यांची जमीन -मालमत्ता कायद्याची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय जप्त झाली असेल, त्यांना ती परत करण्यात येईल. कलम 12, 13, 14 हे कर लावण्याविषयी आहेत. बिशप, आर्चबिशफ, बॅरन, अर्ल्स यांच्या सह्यांशिवाय कर आकारणी केली जाणार नाही, याविषयीचे आहे.
हा मॅग्ना चार्टा निर्माण करण्यामागे आर्चबिशप आफ कॅन्टेरबरी स्टिफन लँग्टन यांची भूमिका खूप महत्त्वाची राहिली. धर्मसत्तेने राजसत्तेला नमविले, असा याचा अर्थ होतो. वर जी कलमे दिली आहेत, ही कलमे मूलभूत अधिकार, प्रजेचे सार्वभौमत्व आणि कायद्याचे राज्य या संकल्पनांची जननी आहेत. या सर्व संकल्पना आपल्या राज्यघटनेत अंतर्भूत आहेत. आधुनिक लोकशाहीचे संविधान निर्माण करण्याचे एक शास्त्र आहे. हे शास्त्र आपल्या घटनाकारांना ज्ञात होते. हे ज्ञान सर्व मानवजातीचे आहे.
हे मूलभूत अधिकार, कायद्याचे राज्य, संसद, धर्मस्वातंत्र्य या सर्व संकल्पना अगोदर निर्माण झाल्या. त्या राजाच्या अत्याचारामुळे निर्माण झाल्या. राजाचे अत्याचार लोकांना असह्य झाले आणि त्यातून या कल्पनांचा जन्म झालेला आहे. विचारवंतांनी ग्रंथ लिहिले, काही सिद्धान्त मांडले आणि त्यानंतर या संकल्पनांचा विकास झाला, असे ब्रिटनमध्ये काहीही घडले नाही. मार्क्सचा मार्क्सवाद अगोदर आला आणि नंतर रशियन क्रांती झाली. ती टिकली नाही हा भाग वेगळा. ब्रिटनमध्ये उलटे झाले. अगोदर लोकांनी संकल्पना निर्माण केल्या, संघर्ष करून त्या अमलात आणल्या आणि नंतर त्यावर ग्रंथ झाले. म्हणून ब्रिटनच्या संविधानाचे वर्णन ‘अलिखित संविधान’ असे केले जाते. ब्रिटनच्या संविधानाचे पुस्तक नाही किंवा एखादा ग्रंथ नाही. 1215पासून त्याचा विकास झाला. संविधानाच्या कुठल्या कलमाने पार्लमेंट अस्तित्वात आलेली नाही. मूलभूत अधिकार संविधानाच्या कलमाने आलेले नाहीत. 1889ला राजाशी संघर्ष करून ब्रिटिश जनतेने ‘बिल ऑफ राइट्स’ मिळविले. या सर्व संघर्षामध्ये अनेक वेळेला गृहयुद्धे झाली. त्यात लाखो लोक मेले. म्हणजे ब्रिटिश लोकांनी रक्ताची किंमत मोजून संसद, मूलभूत अधिकार, जनतेचे सार्वभौमत्व मिळविलेले आहे. हे त्यांना वारसा हक्काने फुकट मिळालेले नाही.
ब्रिटिश संसदेचा इतिहासही असाच रंजक आहे. मॅग्ना चार्टात ब्रिटिश संसदेची बीजे आहेत. हळूहळू तिचा विकास होत गेला. पहिल्यांदा तिचे स्वरूप बिशप, बॅरेन यांच्यापुरतेच मर्यादित राहिले, नंतर मात्र सामान्य जनतेचे प्रतिनिधी संसदेत येऊ लागले. अनेक प्रकारच्या संघर्षानंतर हाउस ऑफ कॉमन्स आणि हाउस ऑफ लॉर्ड्स अशी दोन सभागृहे तयार झाली. संसद हळूहळू शक्तिमान होत गेली. राजाचे अनियंत्रित अधिकार संसदेने कमी करीत आणले.
पहिला चार्ल्स याच्या काळात संसद आणि राजा यांच्यात जबरदस्त संघर्ष झाला. राजाचे सैन्य आणि संसदेचे सैन्य यांच्यात युद्ध झाले. संसदेच्या सैन्याचे नेतृत्व ऑलिव्हर क्रॉव्हेल याने केले. त्याने चार्ल्सचा पराभव केला. राजा चार्ल्सला स्कॉटिश सैन्याने संसदेच्या हवाली केले. त्याच्यावर खटला चालविला गेला आणि बहुमताने त्याला देहांताची शिक्षा देण्यात आली. 1649मध्ये त्याचा शिरच्छेद करण्यात आला. इंग्लंडच्या घटनात्मक इतिहासातील ही क्रांतिकारक घटना आहे. त्यानंतर संसदेचे रूप बदलत गेले. ऑलिव्हरच्या काळात राजाशिवाय इंग्लंड अशी जवळजवळ दहा वर्षे गेली. इंग्लंडच्या इतिहासातील ही अपवादात्मक वर्षे आहेत.
यानंतर इंग्लंडच्या जनतेला ‘बिल ऑफ राइट्स’ मिळाले. त्यांना मूलभूत अधिकार असे आपण म्हणतो. ही घटना 1689 सालातील आहे. या काळात आपला देश रानटी मुस्लीम राजवटीविरुद्ध लढत होता. जगात अशा काही घटना घडत आहेत, याची गंधवार्तादेखील आपल्याला नव्हती. आम्ही लढून मूलभूत अधिकार मिळविले, असे ब्रिटिश माणूस म्हणतो. ते फुकट मिळालेले नाहीत किंवा निसर्गदत्त अधिकार आहेत, अशा प्रकारची फिलॉसॉफिकल भाषा तो करीत नाही. लढून अधिकार मिळविले असल्यामुळे त्याला त्याचे महत्त्व समजते आणि त्याच्या पावित्र्याचे तो रक्षण करतो. आपण मात्र भाषणस्वातंत्र्याच्या नावाखाली किंवा लेखनस्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल तो धुमाकूळ घालत असतो. फुकट आणि मूल्य देऊन मिळविलेली वस्तू यातील हा फरक आहे.
अमेरिकेचा संविधानाचा प्रवास
कोलंबसने 1492 साली अमेरिकेचा शोध लावला. स्पॅनिश राजाने त्याला भारतात जाण्याचा सागरी मार्ग शोधण्याचा परवाना दिला होता. अमेरिकेत स्पॅनिश लोकांनी साधनसंपत्तीची प्रचंड लुटालूट केली. त्यांनी तेथे वसाहती निर्माण केल्या नाहीत. वसाहती निर्माण करण्यासाठी इंग्रज माणसे तेथे आली. सोळाव्या शतकाच्या अखेरीपासून अमेरिकेत त्यांचे येणे सुरू झाले. इ.स. 1600पासून अमेरिकेत येण्याची त्यांची आवक सतत वाढत गेली.
अमेरिकेत जे इंग्रज आले, त्यांची वैशिष्ट्ये लक्षात घ्यावी लागतात. त्यांचे येण्याचे मुख्य कारण त्यांना धार्मिक स्वातंत्र्य हवे होते. ब्रिटनमध्ये तेव्हा प्युरिटन पंथ वाढीस लागला होता. ते सर्व ख्रिश्चन होते. राजा कॅथोलिक किंवा प्रोटेस्टंट झाला तरी तो या प्युरिटन लोकांचा छळ करीत असे. या धार्मिक छळाच्या अंगावर काटा आणणार्या कथा आहेत. (त्या पुस्तकात वाचायला मिळतील.) प्युरिटन लोक स्वावलंबी, आपल्या मतांविषयी अत्यंत कट्टर, अत्यंत कष्टाळू, तेवढेच धाडसी, समूहरूपाने राहणारे, शिस्तबद्ध, स्वसंरक्षणास प्रत्येक जण तप्तर आणि कायद्याने स्वतःला बांधून घेणारे होते. ही सर्व वैशिष्ट्ये आजच्या अमेरिकन लोकजीवनात दिसतात.
ब्रिटनमधून जहाजातून अटलांटिक महासागर पार करून हे जथे अमेरिकेच्या किनार्याला येत. बहुतेक जथ्यांना राजा एक चार्टर - म्हणजे सनद देई. ही सनद म्हणजे एक प्रकारची राज्यघटनाच असे. या सनदीमध्ये अनेक कलमे असत. या कलमात नवीन भूमीत कोणत्या कायद्याखाली राहायचे आहे हे नमूद केलेले असे. ब्रिटनचा राजा सार्वभौम, येणारे सर्व लोक त्याची प्रजा, ब्रिटिश नागरिकांना जे हक्क आणि अधिकार ते त्यांनाही राहतील; संपत्तीचा काही हिस्सा राजालाही द्यावा लागेल, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक गव्हर्नर असेल, त्याला सल्ला देणारे एक मंडळ असेल; खुनासारखे विषय सोडून बाकी सर्व भांडणांचा निवाडा या मंडळानेच करायचा आहे, गव्हर्नर बदलण्याची पद्धती कोणती असेल असे सर्व नियम म्हणजे कायदे या सनदेत असत. इंग्रज माणूस या कायद्याचे काटेकोरपणे पालन करी.
याचा अर्थ असा झाला की, एक राजकीय समाज म्हणून कसे जगायचे आहे, याची सवय इंग्रज माणसाला पूर्वीपासूनच होती. अमेरिकेत या सवयीचे त्याने पालन केले. राजकीय समाज म्हटला की राजा, पार्लमेंट आणि ब्रिटिश कायदे यांच्याशी एकनिष्ठ राहणे आवश्यक झाले. आपल्या देशातूनही लोक अफ्रिकन आणि कॅरेबियन देशात गेले. ते मजूर म्हणून गेले. इंग्रजांनी त्यांना नेले. परंतु त्यांच्यात राजकीय समाज बनण्याची गुणवत्ता नव्हती. हा त्यांच्यातील आणि आपल्यातील फरक आहे. अमेरिकेतील आलेल्या जथ्यातील एक जथा असा होता, ज्याला राजाकडून चार्टर मिळाला नाही. 1602 साली मेफ्लॉवर जहाजातून हे प्युरिटन ख्रिश्चन अमेरिकेच्या किनार्याला लागले. त्यांनी जहाजावर असतानाच एक सनद तयार केली. अमेरिकन भाषेत तिला ‘कॉम्पॅक्ट’ असे म्हणतात. म्हणजे सर्वांनी मिळून एक करार केला. नवीन भूमीत आपण कोणत्या कायद्याने बांधलेले राहू, आपला नेता कोण असेल, नवीन नेता निवडण्याची पद्धती कोणती असेल, आपआपसातील भांडणे कोणत्या कायद्याने सोडविल्या जातील, अशा सर्व गोष्टी लिहून काढल्या. दोन-तीन पानांचा हा दस्तऐवज अमेरिकन संविधानाची जननी समजण्यात येतो. राजाने दिलेली सनद, राजाने दिलेली सनद असते. लोकांनी निर्माण केलेली सनद ही लोकांची घटना असते. मेफ्लॉवर जहाजावर ही घटना निर्माण करणार्यांत कुणी घटनातज्ज्ञ नव्हता, हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य. 1602 साली आपण कुठे होतो, याचा वाचकांनी विचार करावा.
त्यानंतर दीडशे वर्षांत अमेरिकेत आलेल्या प्युरिटन लोकांनी तेरा वसाहती निर्माण केल्या. त्यासाठी त्यांनी केलेला त्याग, संघर्ष, बलिदान, अपार कष्ट याला कुठलीही तुलना नाही. या तेरा वसाहती स्वायत्त वसाहती होत्या. प्रत्येकाने आपआपल्या घटना तयार केल्या. घटना म्हणजे राजकीय समाज म्हणून आपल्याला कसे राहायचे आहे, याचे कायदे त्यांनी बनविले. ब्रिटनचा उल्लेख ‘मदर कंट्री’ असा सर्व जण करीत. ब्रिटिश राजाशी बांधिलकी, ब्रिटिश परंपरांचा आदर अशा सर्व गोष्टी त्यांच्या मनात होत्या.
अमेरिकेतील तेरा वसाहती आणि ब्रिटिश राजसत्ता यांच्यात तणाव आणि भांडणे निर्माण होण्याचे प्रसंग अधूनमधून निर्माण होत, परंतु त्यातून मार्ग काढला जाई. या वसाहतींच्या आजूबाजूच्या प्रदेशात फ्रेंचांनी आपली ठाणी उभी करायला सुरुवात केली. इंग्रज माणूस राजकीयदृष्ट्या निरंतर जागा असतो. जेव्हा त्यांच्या हे लक्षात आले, तेव्हा त्यांनी फ्रेंचांचा विरोध सुरू केला. त्यातून युद्ध भडकले. 1756 ते 1762 असे सात वर्षे युद्ध चालले. याला ‘सप्तवार्षिक युद्ध’ म्हणतात. ते अमेरिका, युरोप, आफ्रिका, भारत यांच्यात लढले, म्हणून इतिहासकार त्याला पहिले महायुद्ध म्हणतात.
या सप्तवार्षिक युद्धाचे दूरगामी परिणाम झाले. अमेरिकेतून फ्रान्सला माघार घ्यावी लागली. जॉर्ज वॉशिंग्टन यांचे नेतृत्व उदयाला आले. आम्ही अमेरिकन आहोत, या भावनेचे बीजारोपण झाले. युद्धाचा खर्च भरून काढण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने वसाहतींवर कर लावले. त्यातील स्टॅम्प ड्युटी हा जाचक कर होता, अमेरिकन लोकांनी त्याला विरोध केला. विरोधाची घोषणा झाली. ज्या पार्लमेंटमध्ये आमचे प्रतिनिधी नाहीत, त्या पार्लमेंटला आणि राजा दुसरा जॉर्जला कर लावण्याचा अधिकार नाही. प्रतिनिधी नाहीत तर कर नाहीत, ही घोषणा झाली.
राजा जॉर्ज हटवादी होता. त्याने ब्रिटिश कॉलनीवर सैन्य घातले. इंग्रज माणसाला आपलेच सैन्य आपल्यावर चालवून घेण्याची सवय नाही. तो प्रतिकारासाठी उभा राहिला. त्यातून 16 डिसेंबर, 1773 रोजी बोस्टन टी पार्टीची घटना घडली. (तपशील पुस्तकात वाचायला मिळेल.) अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाला सुरुवात झाली. 1783 साली पॅरिस कराराने त्याची समाप्ती झाली. तेरा कॉलनी एकत्र आल्या. त्यांनी 5 सप्टेंबर 1784ला ‘कॉन्टिनेंटल काँग्रेस’ची स्थापना केली. आजच्या अमेरिकन काँग्रेसची - म्हणजे संसदेची ती सुरुवात आहे. या कॉन्टिनेंटल काँग्रेसने हंगामी सरकार बनविले. सैन्य उभे केले. जॉर्ज वॉशिंग्टन यांना सेनापती नेमले. जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले. हे युद्ध आम्ही का लढत आहोत, हे स्पष्ट करणारा स्वातंत्र्याचा जाहीरनामा 4 जुलै, 1776 रोजी प्रकाशित झाला. 4 जुलै हा दिवस आज अमेरिकेत स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा स्वातंत्र्याचा जाहीरनामा अमेरिकन राज्यघटनेचा मूलभूत दस्तऐवज मानण्यात येतो.
19 ऑक्टोबर, 1781 रोजी ब्रिटिश सेनापती लॉर्ड कॉर्नवॉलिस याच्या यॉर्कटाउन शरणागतीने हे स्वातंत्र्ययुद्ध संपले. स्वतंत्र अमेरिकेला ब्रिटिशांना मान्यता द्यावी लागली. येथून स्वतंत्र अमेरिकेचा प्रवास सुरू झाला. तेरा राज्यांचा संघ तयार झाला. हा संघ चालविण्यासाठी कॉन्टिनेंटल काँग्रेसने राज्यघटना तयार केली. सार्वभौमत्व तेरा वसाहतींकडे - म्हणजे राज्यांकडे ठेवले. राज्य चालविणारे एक मंडळ तयार केले. कॉन्टिनेंटल काँग्रेसची ही राज्यघटना कुचकामी आहे, असे पुढील चार-पाच वर्षांतच अमेरिकेच्या राजनेत्यांच्या लक्षात आले.
त्यातून मार्ग काढण्यासाठी या राज्यघटनेत कोणत्या सुधारणा करता येतील, याचा विचार करण्यासाठी तेरा राज्यांतील 50 प्रतिनिधी फिलाडेल्फिया येथील राज्य सभागृहात जमले. हे सभागृह आज अमेरिकेचे राष्ट्रीय स्मारक झालेले आहे. या सभेला नाव देण्यात आले ‘कॉन्स्टिट्यूशनल कन्व्हेंशन’. आपल्या भाषेत त्याला ‘घटना समिती’ असे म्हणतात. मे 1787 ते सप्टेंबर 1787 असे पाच महिने ही संविधान सभा दारे-खिडक्या बंद करून चालली. जॉर्ज वॉशिंग्टन तिचे अध्यक्ष होते. जेम्स मॅडिसन यांनी संविधानाचा मसुदा समोर ठेवला. ते व्हर्जीनिया राज्याचे असल्यामुळे या मसुद्याला ‘व्हर्जीनिया प्लान’ असे म्हणतात. दुसरी योजना न्यू जर्सीच्या प्रतिनिधींनी ठेवली, तिला ‘न्यू जर्सी प्लान’ म्हणतात. प्लान याचा अर्थ मसुदा असा आहे.
या मसुद्यावर साधक-बाधक चर्चा होऊन 17 सप्टेंबर 1787ला सात कलमांचे आणि सुमारे आठ हजार शब्दांचे अमेरिकेचे संविधान तयार झाले. राज्यांकडे ते स्वीकृतीसाठी पाठविण्यात आले. तेरापैकी तेरा राज्यांनी त्याला मान्यता दिली.
हे संविधान काय आहे, हे आपल्या हिताचे कसे आहे, ते आपल्याला सामर्थ्यशाली आणि समृद्ध कसे करणार आहे, याचे विवरण करणारे 85 लेख जॉन जे, अलेक्झांडर हॅमिल्टन, जेम्स मॅडिसन यांनी लिहिले.
‘फेडरॅलिस्ट पेपर’ या शीर्षकाचा त्याचा ग्रंथ तयार झाला. संविधान शास्त्रावरील हा प्रमाणभूत आणि सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. (पुस्तकात त्यातील चार निबंध वाचायला मिळतील.) ‘मिरॅकल अॅट फिलाडेल्फिया’ या शब्दात अमेरिकेतील घटनातज्ज्ञ या संविधानाचे वर्णन करतात. परमेश्वरी हस्तक्षेपाने या संविधानाची निर्मिती झाली, याचे विवरण करतात. त्याचे अनेक ग्रंथ आहेत. सर्व ग्रंथ ज्ञानसमृद्ध करणारे आहेत. संविधानावर तेथे कुणी फालतू बकवास करीत नाहीत.
अमेरिकेचे संविधान हे जगातील पहिले लिखित संविधान आहे. आपल्या उद्देशिकेचे पहिले शब्द अमेरिकेच्या उद्देशिकेतून घेतलेले आहेत. या संविधानाने आधुनिक जगातील पहिले संघराज्य आणि प्रजासत्ताक निर्माण केले. या संविधानाने सत्तेच्या त्रिभाजनाचा सिद्धान्त राजकीय रचनेत कसा आणायचा, याचा एक आराखडा ठेवलेला आहे. राजकीय समता कशी अमलात आणायची हे जगाला दाखवून दिलेले आहे. कायद्याचे राज्य आणि स्वतंत्र न्यायपालिका म्हणजे काय, अमेरिकेकडे बघून समजून घ्यावे लागते. राष्ट्रपिता म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांचा सन्मान केला जातो. संविधानाचे पितामह म्हणून जेम्स मॅडिसन यांचा सन्मान केला जातो आणि जॉन मार्शल यांना स्वतंत्र न्यायपालिकेचे पिताश्री समजण्यात येते. या तिघांविषयी वेडेवाकडे बोलणार्याला अमेरिका सहन करीत नाही आणि किंमतही देत नाही. आपण आपल्या राष्ट्रपुरुषाविषयी काय बोलतो याचा विचार आपला आपण करावा.
फ्रान्सचा संविधानाचा प्रवास
फ्रेंच क्रांती ही युरोपला मुळापासून हादरवून सोडणारी घटना आहे. 14 जुलै 1779पासून तिची सुरुवात झाली, असे मानण्यात येते. या दिवशी पॅरिसमधील जनतेने बास्तिल तुरुंग फोडला. हा तुरुंग अनेक बुरुजांचा फार मोठा किल्ला होता. भक्कम संरक्षक तटबंदी आणि खंदक होते. या सर्व अडचणी पार करून जनतेने हा तुरुंग आठ तासांत जमीनदोस्त केला.
बास्तिल तुरुंग फोडण्याचे कारण असे की, तो राजाच्या जुलमी सत्तेचे प्रतीक झालेला होता. सोळाव्या लुईचे राज्य सुरू झाले होते. राणीचे नाव होते मारिया अन्त्वानेत. ती ऑस्ट्रियन राजकन्या होती. अत्यंत विलासी होती. आठवड्याला तिला पादत्राणाचे चार जोड लागत. हिरे आणि जवाहिरे याची तिला जबरदस्त आवड होती. त्यातून कोट्यवधी रुपयांच्या हिर्याच्या हाराचे प्रकरण घडले. ही राणी अतिसुंदर होती, तेवढीच ती लोकांच्या द्वेषाची आणि घृणेची धनी झाली. आणि शेवटी गिलोटीनखाली गेली. तिचे सौंदर्य तिच्या कामाला आले नाही.
राजाचे शासन अनियंत्रित होते. समाजाची विभागणी चार वर्गांत झाली होती - राजा आणि राजपरिवार, राजाचे सरदार आणि बिशप मंडळींचा दुसरा वर्ग, तिसरा वर्ग छोटे छोटे सामंत आणि सरदार आणि चौथा वर्ग सामान्य जनता. करातून पहिल्या आणि दुसर्या वर्गाला वगळण्यात येई. तिसर्या वर्गाला मामुली कर भरावे लागत आणि चौथा वर्ग कराखाली पिसला जाई. प्रत्येकाने सात किलो मीठ वर्षाला घेणे बंधनकारक होते. मिठावर भरमसाठ कर होता. सामान्य शेतकरी शेतीचा मालक नसे. त्याची स्थिती भूदास होती. जमीनदार, सरदार आणि बिशप यांच्या दमनचक्राखाली त्याचे चिपाड झाले होते.
चौदाव्या लुईने वर्साइल राजवाडा बांधला. युरोपमधील राजांच्या राजवाड्यांपेक्षा हा राजवाडा अतिअतिभव्य होता. केवळ राजपरिवाराच्या सेवेसाठी दोन हजार नोकर होते. राजाला आणि राणीला कपडे घालण्यासाठी 15-20 नोकरांचा ताफा असे. त्या सर्व चैनीत राजाची तिजोरी आटत गेली. सोळावा लुई जेव्हा गादीवर आला, तेव्हा चैन भागविण्यासाठी राजा कर्ज काढीत असे. ते कर्जही त्याला मिळत नसे. राज्याला दिवाळखोरीतून वाचविण्यासाठी राजाने 1789मध्ये इस्टेट जनरलचे अधिवेशन बोलाविण्याचा निर्णय घेतला. इस्टेट जनरलमध्ये तीन वर्ग होते - 1. नोबल, सरदार, 2. बिशप, कार्डिनल, आर्चबिशप असे उच्चपदस्थ धर्मगुरू, 3. सर्वसामान्य लोक ज्यात गावपाद्रीदेखील येत. हा तिसरा वर्ग फ्रान्सचा बहुसंख्य वर्ग होता. बहुसंख्य म्हणजे जवळजवळ 90 टक्के होता. त्याच्यावर अल्पसंख्य राज्य करीत होते. फ्रान्समधील धर्मसत्ता राजासारखीच अत्यंत जुलमी, सत्ता आणि संपत्तीला हपापलेली होती.
उच्चपदस्थ वर्ग अत्यंत चैनीत राहत. एक चतुर्थांश भूमी चर्चच्या मालकीची होती. एक उच्चपदस्थ कॅसल बांधून राहत. कॅसल म्हणजे एक प्रकारचा किल्लाच. (त्याची वर्णने पुस्तकात वाचायला मिळतील.) राजा पदांची विक्री करत असे. न्यायाधीशपद पाहिजे, सरदारकी पाहिजे, बिशपगिरी पाहिजे, कर वसूल करण्याचे अधिकार पाहिजेत, तर त्यासाठी पैसा मोजावा लागेल. अधिकार आणि सत्ता मिळाल्यानंतर दिलेला पैसा दामदुपटीने वसूल करण्याच्या मागे हे लोक लागत. सर्व भार लोकांवर पडे आणि छळ सोसायला लागे. नॅशनल असेम्ब्लीचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर तीन वर्गांचे प्रतिनिधी वेगवेगळे बसू लागले. तिसर्या वर्गाने एकत्र राहण्याची शपथ घेतली. त्याला ‘टेनिस कोर्ट ओथ’ असे म्हणतात. फ्रान्सच्या इतिहासातील कलाटणी देणारा हा क्षण आहे. थर्ड इस्टेटच्या एका सभासदाचे नाव आहे सियेस. त्याने तीन प्रश्न उपस्थित केले - 1. थर्ड इस्टेट काय आहे? - सर्व काही. 2. तिचे स्थान कोणते? - कोणतेच नाही. 3. तिला काय हवे? - तिला मान्यता आणि अधिकार हवेत.
शेवटी पहिला आणि दुसरा वर्ग नॅशनल असेम्ब्लीत सामील झाले आणि तिचे कामकाज सुरू झाले. राजाला कर आकारण्याचा सल्ला देण्यासाठी या सभेचे अधिवेशन भरविले गेले होते. पण तिचे स्वरूप घटना समितीचे झाले. 1791मध्ये या समितीने फ्रान्सची पहिली राज्यघटना तयार केली.
या राज्यघटनेचे तत्त्वज्ञ म्हणून रूसो, होल्टेर आणि अमेरिकेचे थॉमस जेफर्सन यांना मान दिला जातो. या राज्यघटनेने सांविधानिक राजेशाहीची घटना तयार केली. ब्रिटनची राज्यघटना अशीच आहे (कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की). ही राज्यघटना तिच्या जन्मानंतर महिन्याभरातच कोसळली. ज्या राजाला घेऊन सांविधानिक राजेशाही निर्माण केली, तो राजा अप्रामाणिक निघाला. तो गुप्तपणे फ्रान्सबाहेर पळून जाण्यासाठी निघाला, तेव्हा फ्रान्सच्या सर्व शत्रूंनी सीमेवर सैन्यांची जमवाजमव केली होती. राजेशाही वाचविणे हे त्यांचे लक्ष्य होते. त्यांच्याशी हातमिळवणी करून विदेशी सैन्य आणि राजनिष्ठांचे सैन्य घेऊन नॅशनल असेम्बलीच्या सभासदांना आणि बंडखोर जनतेला ठार करण्याचा राजाचा डाव होता.
हा डाव फसला. तेव्हा फ्रान्समधील शेवटच्या पंगतीतील माणूसदेखील राजकीदृष्टया विलक्षण जागृत झालेला होता. वेषांतर करून पळून जाणार्या राजाला सीमेजवळील वेरेन्ना गावात लोकांनी पकडले आणि त्याची उलटी मिरवणूक पॅरिसला काढली. राजा आणि राणी कैद झाले. राजाचे राजेपद राहिले, पण त्याचे अधिकार आणि सत्ता गेली. ती सत्ता नॅशनल असेम्ब्लीकडे आली. पहिल्या संविधानाने नोबल लोकांची सर्व पदे नष्ट करून टाकली. त्यांचे अधिकार समाप्त करून टाकले. राजकीय समता प्रस्थापित केली. चर्चची संपत्ती जप्त केली. चर्चच्या संपत्तीचे लिलाव केले. सामान्य माणसांनी संपत्ती खरेदी केली. यातून एक नवीन मध्यमवर्गाचा उदय झाला. हा मध्यमवर्ग फ्रेंच क्रांतीचा सगळ्यात मोठा वाहक झाला.
फ्रेंच क्रांती ही कमालीची हिंसक क्रांती आहे. या क्रांतिपर्वात राजाला वर्साइल राजवाड्यातून पॅरिसला आणण्याचा प्रसंग, पॅरिसमधील टुलेरिज राजवाड्यावर लोकांनी केलेला हल्ला, पावासाठी झालेल्या हिंसा आणि त्याची वर्णने आपल्या अंगावर काटा आणणारी आहेत. विरोध करणार्यांची डोकी छाटून ती उंच भाल्याच्या टोकाला लावून लोक बेधुंदपणे नाचत असत. राजघराण्यातील लोकांना, नोबल लोकांना आणि पाद्री लोकांना ठार मारण्याचे प्रकार अत्यंत अमानवी आहेत. जनतेला राजेशाही आणि राजेशाहीतून निर्माण झालेल्या व्यवस्था यांच्याविषयी जबरदस्त घृणा निर्माण झाली. फ्रेंच क्रांती एक शाश्वत संदेश देते की, अन्याय सहन करण्याची एक मर्यादा असते. ती ओलांडली गेली की, अन्याय करणार्यांची डोकी छाटली जातात - अत्यंत निदर्यपणे. ही डोकी छाटण्याचे काम स्त्रियादेखील मोठ्या उत्साहने करताना दिसतात.
ज्याप्रमाणे अमेरिकन राज्यघटनेचा आशय व्यक्त करणारा स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे, त्याप्रमाणे फ्रेंच क्रांतीने - म्हणजे नॅशनल असेम्ब्लीने ‘राईटस् ऑफ मॅन अॅण्ड सिटिझन’ हा जाहीरनामा 1790 साली घोषित केला. त्यात 17 कलमे आहेत. जगातील सर्व लोकशाही देशांच्या राज्यघटनांचा तो मूलभूत दस्तऐवज मानण्यात येतो. या 17 कलमांत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता म्हणजे काय आणि तिचे रक्षण कशा प्रकारे केले पाहिजे याची कलमे आहेत. मूळ शब्द लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी असे आहेत. या शब्दांचे मराठी अनुवाद शब्दांचे खोलवरचे अर्थ प्रकट करीत नाहीत. त्याचे विवरण पुस्तकात केले आहे. फ्रान्सच्या राज्यघटनेचा प्रवास सरळमार्गी नाही. आजच्या फ्रान्सची सोळावी राज्यघटना चालू आहे. अमेरिकेची राज्यघटना 230 वर्षांपूर्वीची आहे. राज्यघटनेचे आराखडे जरी बदलत गेले, तरी प्रत्येक राज्यघटना राईट्स ऑफ मॅन अॅण्ड सिटिझन यांना वंदन करून आणि स्वीकारूनच पुढे जाते.
फ्रेंच क्रांतीने पुढील शंभर-सव्वाशे वर्षांत युरोपातील बहुतेक राजवंश समाप्त करून टाकले. सोळावा लुई आणि राणी अन्त्वानेत यांना गिलोटीनखाली घालून त्यांची मुंडकी छाटण्यात आली. 1793 हे वर्ष क्रांतिपर्वातील दहशतीच्या कालखंडाचे वर्ष आहे. या दहशतीच्या कालखंडात क्रांतिकाळातील कर्ते स्त्री-पुरुष, विचारवंत, सेनापती, राज्यकर्ते, एका पाठोपाठ एक गिलोटीनखाली घातले गेले. क्रांती आपल्या पिल्लांना खात जाते, अशी एक उक्ती आहे. तिचे विदारक दर्शन या काळात घडते. पहिली राज्यघटना कोलमडल्यानंतर 1793 साली दुसरी राज्यघटना तयार करण्यात आली. या दुसर्या राज्यघटनेने सर्वसामान्य माणसास राजकीय अधिकार मिळाले, मतदान करण्याचा अधिकार मिळाला, ही दुसरी राज्यघटना फक्त कागदावरच राहिली, तिचा अंमल सुरू झाला नाही.
यानंतर 1795 साली तिसरी राज्यघटना अस्तित्वात आली. या तिसर्या राज्यघटनेने राज्य चालविणारे एक मंडळ तयार केले. त्याला ‘डिरेक्टरी’ असे म्हणतात. या डिरेक्टरीतील कार्यकारी सत्ताधीशांचे सत्तेवर कलह सुरू झाले. कार्यकारी सत्ता विभाजित करता येत नाही. ती विभाजित केली तर भांडणाशिवाय दुसरा काही पर्याय राहत नाही. अशी भांडणे राज्याला दुर्बळ करतात. याच काळात नेपोलियन बोनापार्टचा झपाट्याने उदय होत होता. या डिरेक्टरीवर बंडखोरांचे सैन्य चालून आले. नेपोलियनने तोफखान्याच्या मदतीने बंडखोरांची वाताहत करून टाकली. नेपोलियन राष्ट्रीय हिरो झाला.
फ्रेच क्रांती राजाविरुद्ध झाली. तिने राजेशाही समाप्त करून टाकली. प्रजासत्ताक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तशा राज्यघटना बनविल्या. त्या यशस्वी झाल्या नाहीत. तरीदेखील फ्रान्स नावाचे एक राष्ट्र जन्मास आले. राष्ट्रीय भावनेचा उदय एका महापुरासारखा झाला. आम्ही फ्रान्सिसी आहोत, ही भूमी आमची आहे, क्रांती आमची आहे, क्रांतीतून निर्माण झालेले राष्ट्रगीत आमचे आहे, राष्ट्रध्वज आमचा आहे, आम्ही सर्व समान आहोत आणि म्हणून परस्परांचे बंधू आहोत, या भावनेने देश भारावून गेला. नेपोलियन सर्वसत्ताधीश झाला. काही काळ फ्रान्सच्या प्रजासत्ताकाचा प्रयोग स्थगित झाला. प्रजासत्ताकाची निर्माण झालेली ऊर्जा ही आजच्या महासत्ता फ्रान्सची ऊर्जा आहे.