हाथरस घटनेचा आधार घेऊन, हिंदू समाजात कसे जातीय अत्याचार होतात हे एका बाजूला अधोरेखित करताना सामाजिक तेढ आणि विद्वेष यांना खतपाणी घालण्याचा उद्योग सुनियोजित पद्धतीने चालू आहे. अशा नियोजनबद्ध प्रयत्नातून हिंदू समाज विखंडित करण्याच्या डाव आहे.
हाथरस येथे झालेल्या घटनेचा निषेध करत असताना आम्हाला आंधळे आणि हत्ती यांची गोष्ट आठवते. मीडिया, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांच्याबरोबर जे स्वत:ला लोकशाहीचे आणि मानवी अधिकारांचे रक्षणकर्ते मानतात, अशा सर्वांची स्थिती गोष्टीतील आंधळ्यांसारखी झाली आहे. कोणावरही होणारा अन्याय-अत्याचार निंदनीयच असतो. अत्याचाराचा निषेध करण्यासाठी जात, धर्म तपासून घेण्याची गरज नसते. मात्र हाथरस येथे झालेल्या घटनेचा निषेध केला जात असताना जात महत्त्वाची ठरली आणि प्रत्येक जण जातीचे शेपूट धरून आपल्याला हवा तसा हत्ती मांडू लागले आहेत. कोणी जातीय अस्मितेचे भांडवल केले, तर कुणी जातीचा तवा तापवून राजकारणाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. हिंदू समाजातील दलितांच्या जगण्यावरच मीडियाने प्रश्न उपस्थित केला. गेले पंधरा दिवस हे जे चालू आहे, ते पाहता हाथरस घटनेचे हत्यार बनवून एकाच वेळी अनेक ठिकाणी वार करणे सुरू झाले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मूळ घटना आणि त्यासंबंधी येणाऱ्या वेगवेगळ्या बातम्या पाहिल्या, तर ही घटना केवळ जातीय अत्याचाराची नसून ती बहुपेडी आहे, हे लक्षात येते.
हाथरस घटनेचा आधार घेऊन, हिंदू समाजात कसे जातीय अत्याचार होतात हे एका बाजूला अधोरेखित करताना सामाजिक तेढ आणि विद्वेष यांना खतपाणी घालण्याचा उद्योग सुनियोजित पद्धतीने चालू आहे. अशा नियोजनबद्ध प्रयत्नातून हिंदू समाज विखंडित करण्याच्या डाव आहे. जोपर्यंत हिंदू समाज विखुरलेला राहील, तोपर्यंत अनेक मंडळींची दुकानदारी चालू राहणार आहे आणि त्यासाठी अशी वेगवेगळी निमित्ते शोधून त्यांच्या आधारे ते आपल्या जगण्याचा प्राणवायू जमवत राहणार आहेत. अशा मंडळींच्या किती नादी लागायचे, हे ठरवण्याची आता वेळ आली आहे. यामध्ये तथाकथित पुरोगामी, मानवाधिकारवाले, दलित समूहाचे स्वयंघोषित तारणहार आणि संधिसाधू राजकीय नेते यांचा समावेश होतो. हाथरसच्या घटनेचा हा धडा आहे आणि हिंदू समाजाने त्याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.
हाथरस येथील घटनेचा विचार करताना असे लक्षात येते की या स्वयंघोषित न्यायाधीश मंडळींमुळे तपासकार्यात अडथळे निर्माण होत आहेत, किंवा तपास यंत्रणाची दिशाभूल केली जात आहे. या मंडळींना पीडित मुलीचा किंवा तिच्या कुटुंबीयांचा कळवळा नसून त्यांना त्यांनी ठरवलेल्या मार्गावर हे प्रकरण घेऊन जायचे आहे आणि त्यातून सामाजिक विद्वेष निर्माण करून उत्तर प्रदेशात राजकीय साठमारी करायची आहे. अशा वेळी हिंदू समाजाने या मंडळींच्या भूलथापांना बळी न पडता त्यांचा डाव उलथून लावला पाहिजे. उत्तर प्रदेश राज्य सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे. सरकारने गतीने तपास पूर्ण करून आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. खरे तर हाथरस हे निमित्त आहे. या घटनेचा आधार घेऊन उत्तर प्रदेशात सत्तेवर असलेल्या योगींविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी आणि आगामी बिहार निवडणुकीत दलितांच्या मतांना प्रभावित करण्यासाठी ही धडपड सुरू आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.
मागील पाच-सहा वर्षांपासून समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमे यांनी ठरवून समाज विभाजित करण्यासाठी अनेक घटनांचा उपयोग केला आहे - मग ती रोहित वेमुला आत्महत्या असो की पंधरा दिवसांपूर्वी हाथरस येथे घडलेली घटना असो. माध्यमांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अशा घटनांमागील सत्य परिस्थिती जेव्हा समोर येते, तेव्हा मात्र ही माध्यमे आपल्या चुका मान्य करत नाहीत. म्हणून आता अशा माध्यमांच्या आहारी जायचे की सत्याची प्रतीक्षा करायची, हे ठरवून घेण्याची वेळ आली आहे. आपण हिंदू समाज म्हणून एकमय असणे आवश्यक आहे आणि एकमय होताना वैयक्तिक पातळीवर जे विषय होतात, ते जातीच्या आणि धर्माच्या चश्म्यातून न बघण्याची सवय लावून घेतली पाहिजे. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, तो माणूस आहे या दृष्टीने विचार केला पाहिजे, तरच आपण पुढील काळात अशा सामाजिक उद्रेकाला कारणीभूत होणाऱ्या गोष्टी टाळू शकू. हिंदू समाजाने ही गोष्ट आपल्या व्यवहारातून दाखवून दिली पाहिजे. हिंदू समाजाला लागलेली जातीपातीची व्याधी समूळ नष्ट होणे हेच या समस्येला औषध आहे. ते औषध लागू होईपर्यंत समाजाने अशा घटनांकडे बघताना घटनेच्या मुळाशी जाऊन शोध घेतला पाहिजे आणि त्या समस्यांची उत्तरे मांडली पाहिजेत.