फ्रेंच क्रांतीचा विचारक

13 Oct 2020 14:55:12

jac_1  H x W: 0

लोकशाही, राज्यघटना, स्वातंत्र्य, समता, बंधुता अशा विषयांचा जेव्हा आपण उहापोह करतो, तेव्हा फ्रान्सच्या 1791च्या क्रांतीचा संदर्भ हमखास येतो. फ्रान्सच्या क्रांतीने युरोपच्या राजकीय आण सामिजक रचनेत मूलगामी बदल घडवून आणले. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे आगामी पुस्तक हे या क्रांतिवषयी आढावा घेणारे असणार आहे. त्याच पुस्तकातील एक छोटासा भाग या लेखात घेत आहोत.

फ्रेंच राज्यक्रांतीच्या वैचारिक जनकत्वाचा पुढचा मानकरी आहे जीन-जॅकस रुसो (१७१२ ते १७७८). बहुतेक इतिहासकार रुसोला फ्रेंच राज्यक्रांतीच्या वैचारिक जनकत्वाचा मान देतात. इतिहासही मोठा विचित्र असतो. १७७८ साली रुसोचा अंत झाला, १७८९ला फ्रेंच राज्यक्रांती सुरू झाली. आपली पुस्तके आणि विचार असली क्रांती घडवून आणील, असे रुसोलाही कधी वाटले नसेल. सत्ताबदल होतात, राजेशाहीत एका राजाचा पराभव होतो, तो मरतो, त्याची जागा दुसरा राजा घेतो, ही असते सत्ताक्रांती. समाजक्रांतीशी तिचा संबंध नाही. रुसोच्या विचारांनी राजेशाहीच संपवून टाकली आणि प्रजासत्ताक आणले. हे लिहायला आणि वाचायला आज खूप सोपे वाटते. पण ज्या काळात हे घडले, तो काळ आजच्यापेक्षा अतिशय वेगळा होता.

रुसो जन्माने फ्रेंच नाही. त्याचा जन्म जिनेवा येथे झाला. त्याचे वडील घड्याळ बनविणारे होते. त्याची आई त्याला जन्म देऊन नऊ दिवसांनी वारली. त्याची आजी आणि मावशी यांनी त्याचा संभाळ केला. जिनेवा तेव्हा छोटे शहरी राज्य होते. प्रोटेस्टंट पंथातील काल्वीनिष्ठ पंथीयांचे ते राज्य होते. याच पंथांच्या लोकांना जिनेवाचे नागरिकत्व मिळे. त्यांची संख्या कमी होती. बाहेरून येणार्‍या लोकांची बहुसंख्या होती.
त्याच्या वडिलांचे आणि दोन इंग्रजांचे भांडण झाले. अटक चुकविण्यासाठी त्याचे वडील पळून गेले. रुसो तेव्हा दहा वर्षाचा होता. त्याचे शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण होऊ शकले नाही. घड्याळाचे काम, एनग्रेव्हरचे काम, कुणाचा मदतनीस म्हणून काम, शेवटी एका चर्चमध्ये तो दाखल झाला. तेथे त्याला फादरने शिकविले, संगीताचे धडे दिले आणि प्रत्येक विषयाचा स्वतंत्र विचार करायला शिकविले. येथून रुसोचा खरा प्रवास सुरू होतो. नंतर तो कॅथोलिक झाला. (आपल्या भारतात शैवाचा वैष्णव, वैष्णवाचा वेदान्ती, वेदान्तीचा योगमार्गी, योगमार्गचा भक्तिमार्गी बनविण्याची पद्धती नाही.) कॅथोलिकचा प्रोटेस्टंट करण्याचे धार्मिक विधी असतात, असल्या भानगडी आपल्याकडे नाहीत.
रुसो वीस वर्षांचा झाला आणि तो डीवारेन्स (Dewarens) या श्रीमंत महिलेबरोबर राहू लागला. अशा प्रकारचे संबंध ठेवणे हे तेथे समाजमान्य होते. ती जशी श्रीमंत होती, तशी बुद्धिमान होती. तिचे वाचनही चांगले होते. बुद्धिमान लोकांचा तिचा मित्रपरिवार होता. त्यात रुसोचा समावेश झाला.
रुसो १७४२ साली पॅरिसला आला. पॅरिसला येऊन त्याने शोधून काढलेल्या संगीताची नोटेशन्स तिथल्या फ्रान्स अ‍ॅकॅडमीला दिली. त्याची अपेक्षा होती की त्याला मान्यता मिळेल आणि त्याला भरपूर पैसा मिळेल. पण अ‍ॅकॅडमीने ती नोटेशन्स स्वीकारली नाहीत. पॅरिसमध्ये तो कफल्लक असताना, शिवणकाम करून चरितार्थ चालविणार्‍या एका तरुणीच्या प्रेमात पडला आणि तो तिच्याबरोबर राहू लागला. तिच्यापासून त्याला पाच मुले झाली. ती सर्व त्याने अनाथालयात ठेवली. या त्याच्या चुकीबद्दल त्याला पुढे जबरदस्त टीकेला सामोरे जावे लागले आहे. त्याच्या ग्रंथातून त्याने नैतिकतेचे पाठ दिलेले आहेत. त्याप्रमाणे त्याचे आचरण नव्हते. पॅरिसमध्ये तेव्हा ‘फ्रेंचसायकोप्लीडी’ या नावाचे स्वतंत्र विचाराचे नियतकालिक चाले. डायडेरॉट त्याचा संपादक होता. हे नियतकालिक तेव्हा खूप लोकप्रिय होते. त्याची लेखक म्हणून ख्याती झाली ती एका निबंधाने. कला आणि विज्ञान यावरील विचार या त्याच्या लेखाला पहिले पारितोषिक मिळाले. या निबंधात त्याने एका अर्थाने आपल्या पुढील पुस्तकांची ओळख करून दिली, असे म्हणायला हरकत नाही.
निबंधाचा विषय होता 'कला आणि विज्ञान यांच्या पुन:स्थापनेमुळे नैतिकतेचे शुद्धीकरण झाले आहे का?' रुसोने आपल्या निबंधात म्हटले की, कला आणि विज्ञानाने मानवाचे अध:पतन झालेले आहे. रुसो म्हणतो की, दैनंदिन जीवनामध्ये सुरक्षा आणि शांतीसाठी शासनाचे आणि कायद्याचे संरक्षण असते. कला, साहित्य, विज्ञान, हे त्या मानाने कमी अधिकारवादी असले, तरी जास्त शक्तिमान असतात. सामान्य लोकांना ज्या साखळदंडांनी बांधून टाकलेले असते, त्यावर ते फूलमाळा टाकतात. कला आणि विज्ञान माणसाला जन्मजात स्वातंत्र्यापासून दूर करतात आणि त्याच्या गुलामीवर त्याला प्रेम करायला शिकवितात. यालाच ते सुसंस्कृतपणा म्हणतात.
सिंहासने परिस्थितीने निर्माण होतात. कला आणि विज्ञान त्यांना सशक्त करतात. ज्यांच्याकडे प्रतिभा आहे, त्यांचे संरक्षण सत्ता करत असते. त्यांच्याकडून आपण आस्वादाची शिकवण घेतो. तेच आपले मार्गदर्शक होतात. कलेने आमचे जीवन व्यापून टाकण्यापूर्वी आणि कलात्मक भाषेचा अंगीकार करण्यापूर्वी नैसर्गिक स्थितीत जरी आमची नैतिकता दिखाऊ नसली, तरी ती श्रेष्ठ होती. आजच्यासारखी तिने खालची पातळी गाठली नव्हती. कलेने आणि विज्ञानाने आज सर्व मन एकसारखी केली आहेत. फसवे आणि लाचार शिष्टाचार आपण अंगीकृत करतो. फॅशनचे कायदे, वर्तणुकीचे नियम, समारंभाचे नियम या सर्वांचे आपण अनुसरणच केले पाहिजे - आपल्या मूळ प्रवृत्तीशी मेळ खात नसेल तरी. या मोठ्या लेखात रुसोने रोमन साम्राजाच्या शेवटच्या काळातील उदाहरणे दिली आहेत. कलेच्या भोक्त्याने रोमन कसे भ्रष्ट झाले, याची उदाहरणे दिली आहेत. रुसोने आपल्या निबंधामध्ये डेकार्ट आणि न्यूटन या वैज्ञानिकांचा उल्लेख केला आहे. त्यांना मनुष्य जातीचे शिक्षक म्हटले आहे. त्यांना शिकविणारे कोणी नव्हते. सामान्य शिक्षकांनी त्यांच्या डोक्यात पारंपरिक नियम आणि ज्ञान भरले असते. ते स्वत:च ज्ञानमार्गी झाले. अनेक प्रकारचे अडथळे पार करून त्यांनी ज्ञान संपादन केले. ज्याला कलेच्या आणि विज्ञानाच्या मार्गावर चालायचे आहे, त्यांनी या तिघांप्रमाणे स्वतंत्र बुद्धीने आणि प्रेरणेने चालले पाहिजे.
कला म्हणजे कलाकार, ते साहित्य, संगीत, चित्रपट, नाटक, चित्रकला, नृत्य, अशा विविध क्षेत्रांत असतात. या क्षेत्रांमुळे समाजाची नैतिकता वाढते की ढासळते, हा आजही तेवढाच ज्वलंत प्रश्न आहे. कामुक चित्रपट तयार करणारे, त्यात भाग घेणारे कलाकार, वाटेल तो अंगविक्षेप करून पांचट विनोद करणारे, निरंतर जातीय लेखन करणारे, थोर पुरुषांच्या बदनामीसाठी सतत लेखणी झिजविणारे, सतत तोंडाचा पट्टा चालविणारे समाजाच्या नैतिक मूल्यात कोणती भर घालतात? विज्ञानाने दिलेल्या साधनांचा अनैतिक कारणांसाठी किती आणि कसा उपयोग होतो, हे आपण जाणतो. यासाठी रुसोला काळाच्या पुढे पाहणारा विचारवंत म्हणावे लागते.

jac_1  H x W: 0
रुसोचे खूप ग्रंथ आहेत. कन्फेशन (लेपषशीीळेपी) ही त्याची आत्मकथा आहे. त्याला आत्मकथेचा जनक मानण्यात येते. ज्युली (Julie) ही त्याची रोमँटिक कादंबरी आहे. या कादंबरीने वाचकांना वेड लावले होते. तिची मागणी इतकी प्रचंड होती की ग्रंथालये ही कादंबरी दिवसांऐवजी तासांच्या हिशोबाने वाचकांना देत होती. त्याच्या दुसर्‍या कादंबरीचे नाव आहे एमिल (एाळश्रश). ही कादंबरी मुले आणि स्त्रिया यांच्या शिक्षणपद्धतीवर आहे. १७६२ साली 'सोशल कॉन्ट्रॅक्ट (Social Contract)' हा त्याचा ग्रंथ प्रकाशित झाला. एमिल आणि सोशल कॉन्ट्रॅक्ट हे दोन्ही ग्रंथ तेव्हाच्या धर्मसत्तेला आणि राज्यसत्तेला आवडले नाहीत. यामुळे रुसोला जिनेवा आणि फ्रान्समधून हद्दपार करण्यात आले. तो इंग्लंडला गेला. इंग्लंडमध्ये तो तीन वर्षे राहिला. १७६७मध्ये तो पुन्हा पॅरिसला आला. पाच मुले झाल्यानंतर त्याने थेरिस (शिवणकाम करणारी महिला) हिच्याशी लग्न केले. तो पुन्हा प्रोटेस्टंट झाला. कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट यांचा विवाह बेकायदेशीर समजला जाई.
आपल्या विषयाच्या संदर्भात origin on inequality आणि सोशल कॉन्टॅक्ट या दोन ग्रंथांचे महत्त्व आहे. मानवी जीवनाच्या प्रारंभापासून रुसो शोध घेतो. प्रारंभिक अवस्थेत (state of nature) माणूस भ्रष्ट नव्हता. माणूस जेव्हा जंगली अवस्थेत राहत होता, तेव्हा त्याची ती स्थिती मानवी विकासातील उत्तम अवस्था होती. त्या अगोदरच्या अवस्थेत तो हिंसक प्राणी होता आणि आताच्या अवस्थेत तो सडलेल्या संस्कृतीचा भाग झालेला आहे. याचा अर्थ असा होतो की, ज्याला आपण सुसंस्कृत माणूस म्हणतो, तो रूसोच्या भाषेत जंगली माणसापेक्षाही अधिक वाईट आहे. जंगली अवस्थेत मनुष्याकडे करुणा होती. मनुष्याची जंगली अवस्था ही तिसरी अवस्था आहे. तेव्हाची समाजरचना राजकीय झाली नव्हती. राजकीय समाजात न्याय आणि दुष्टपणा या संकल्पना येतात. निसर्गाचा चांगुलपणा हा माणसाचा चांगुलपणा होता. तेव्हा सर्वसाधारणपणे समानता होती. परंतु संस्कृतीचा विकास हा नकली विकास आहे. या संस्कृतीने असामनता, विद्वेष आणि हाव निर्माण केली. 
 
रुसो म्हणतो - 'जेव्हा कधी पहिल्या माणसाने जमिनीच्या तुकड्याभोवती कुंपण घालून असे म्हटले की या जमिनीचा मी मालक आहे, तेव्हा अन्य लोकांनी अजाणता त्याला मान्यता देऊन टाकली. त्या माणसाला नागरी समाजाचा जनक मानले पाहिजे. यामुळे अनेक गुन्हे, युद्धे, खून, भयप्रद घटना आणि दुर्दैवाचे फेरे सुरू झाले.' रुसोला हे सांगायचे आहे की, जमिनीवरील खाजगी मालकी अनेक अनर्थांना जन्म देणारी झाली आहे. रुसो पुढे म्हणतो की, या वसुंधरेवर कुणा एकाची मालकी नाही, वसुंधरा सर्वांची आहे. रुसो तीन शब्दांचा वापर करतो, सकारात्मक स्वप्रेम, दुराभिमान, स्वप्रेमातून स्वरक्षणाची भावना निर्माण होते. त्यातून विचारशक्तीचा उगम होतो. दुराभिमानातून तो स्वत:ची तुलना दुसर्‍याशी करायला लागतो. दुसर्‍याच्या दुर्बळतेचा फायदा घेतो. प्रारंभीच्या काळात संपत्ती आणि दर्जा याबाबतीत परस्परांत फार भेद नव्हता. समाजाची प्रगती जसजशी होत गेली, कृषिप्रधान संस्कृती निर्माण झाली, धातुशास्त्र निर्माण झाले, खाजगी संपत्ती निर्माण झाली, श्रमविभागणी झाली, परस्परांवर अवलंबून राहण्याची स्थिती निर्माण झाली. या सर्वांचा परिणाम आर्थिक विषमता आणि संघर्ष निर्माण होण्यात झाला. लोकसंख्या वाढू लागली, एकमेकांशी जोडले गेलेले समूह निर्माण होत गेले. त्यामुळे माणसाच्या विचारात बदल होत गेले. इतरांच्या नजरेतून ते आपल्याकडे बघू लागले. इतर लोकांनी चांगले बोलल्यामुळे आत्मगौरव वाढला, असे त्यांना वाटू लागले.
 
 
 
रुसोचा सोशल कॉन्टॅक्ट हा ग्रंथ पाश्चात्त्य राजकीय तत्त्वज्ञानातील अतिशय महत्त्वाचा ग्रंथ समजला जातो. या ग्रंथातील 'मनुष्य जन्मत:च स्वतंत्र असतो, प्रत्यक्षात तो सर्व ठिकाणी साखळदंडांनी बांधलेला असतो. आम्ही दुसर्‍यांचे मालक आहोत, असे स्वत:ला जे समजतात, तेच खर्‍या अर्थाने मोठे गुलाम असतात' हे एक वाक्य अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचे आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या मनुष्यमात्राच्या मूलभूत अधिकाराच्या जाहीरनाम्याचे आधारभूत वाक्य झाले आहे. इथली गंमत अशी की, रुसो हयात असताना त्याचे ग्रंथ जाळले गेले. ग्रंथ जाळून विचार मरत नाहीत, हे आपल्याकडील अतिउत्साही लोकांनाही समजले पाहिजे.
 
 
सोशल कॉन्ट्रॅक्ट या ग्रंथामधले 'जनरल विल' हे जबरदस्त विचार मांडणारे शब्द आहेत. रुसो म्हणतो की, प्राथमिक नैसर्गिक अवस्थेत कायदाही नव्हता आणि नैतिकताही नव्हती. जसजसा समाजाचा विकास होत गेला, श्रमविभागणी झाली, खाजगी संपत्ती आली, त्यातून कायदा देणार्‍या संस्थेची आवश्यकता निर्माण झाली. एका बाजूला अस्तित्वासाठीचा संघर्ष आणि दुसर्‍या बाजूला एकमेकांवर अवलंबून राहणे याच्या कैचीत तो सापडला. त्याचे अस्तित्व आणि स्वातंत्र्य याला या दोन्ही गोष्टींनी धोका निर्माण झाला.
 
 
 
यातून मार्ग काढण्यासाठी सामाजिक कराराद्वारे नागरी समाजाची निर्मिती झाली. काही नैसर्गिक अधिकार व्यक्तींनी सोडून दिले. आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी असे झाले. या करारातून समाजाची जनरल वील - सर्वसाधारण इच्छाशक्ती निर्माण झाली. या जनरल विलपुढे समाजातील व्यक्ती झुकल्या. यामुळे इतर कोणाच्या इच्छेपुढे अकारण नमण्याचा प्रश्न संपला. ही सर्वसाधारण इच्छाशक्ती (जनरल विल) सर्वांची मिळून इच्छाशक्ती झाली. सर्वसाधारण इच्छाशक्तीचे कायदे सर्वांचे झाले. आजच्या भाषेत हाच विषय सांगायचा झाला तर जनता सार्वभौम किंवा सर्वशक्तिमान आहे. कायदे करण्याची शक्ती जनतेत आहे. आज आपल्याला या गोष्टीचे नावीन्य वाटत नाही. राजेशाहीत या म्हणण्याचा असा अर्थ होतो की, हे राजा, कायदे करण्याचा तुला अधिकार नाही. आमच्यावर सत्ता गाजविण्याचा तुला अधिकार नाही. अठराव्या शतकातील कोण राजा हे मान्य करणार होता? यामुळे रुसोला देशातून हद्दपार व्हावे लागले.
 
 
सार्वभौमत्व कोणाकडे? रुसो उत्तर देतो की, ते जनतेकडे. राज्य करणार्‍या लोकांकडे नाही. राज्य करणारे मंत्री, न्यायाधीश, आणि इतर सर्व यांचे काम जनरल विल काय आहे, ती समजून घेऊन तिच्या अंमलबजावणीचे आहे. सार्वभौमत्व म्हणजे सर्वसाधारण इच्छाशक्तीने केलेल्या कायद्याचे राज्य. त्याला आजच्या भाषेत 'रूल ऑफ लॉ' असे म्हणतात.
 
 
 
सर्वसाधारण इच्छाशक्तीने आपले सार्वभौमत्व कसे प्रकट करावे हे रुसो सांगतो. त्यासाठी तो प्रजासत्ताक राज्याची संकल्पना मांडतो. रुसो ज्या काळात ही संकल्पना मांडतो आहे, त्या काळात युरोपमध्ये कुठेही प्रजासत्ताक नव्हते. राजेशाही, सामंतशाही अशा प्रकारच्या राजवटी होत्या. राजे आणि सामंत स्वत:ला सार्वभौम समजत.
 
 
राजेशाहीविषयी रुसो म्हणतो - 'प्रजासत्ताक राज्यापेक्षा राजेशाही अनेक बाबतीत दुर्बळ असते. प्रजासत्ताकात बुद्धिमान आणि सशक्त माणसे उच्च पदावर जातात. राजेशाहीत मात्र लहान मनाची माणसे, उचापती करणारे लोक, सुमार बुद्धीचे लोक उच्चस्थानी जातात. त्यांच्याकडून लोकसेवा फारशी घडत नाही.' लिबर्टीसंबंधी रुसोचे म्हणणे असे आहे - मनुष्याचे वेगळेपण लिबर्टी या शब्दातून व्यक्त होते. लिबर्टीचा त्याग करणे म्हणजे आपल्यातील मनुष्याचा त्याग करणे होय. स्वतंत्र नसणे याचा अर्थ असा होतो की, मी मनुष्य आहे आणि माझी काही कर्तव्य आहेत, याच गोष्टी मी नाकारतो. यामुळे रुसोने मानवी गुलामीचा धिक्कार केला आहे. लिबर्टी म्हणजे मुक्ततेविषयी रुसो त्याच्या काळाच्या फार पुढे गेलेला आहे.
 
 
 
रुसोच्या स्वातंत्र्याच्या तत्त्वज्ञानात सार्वभौमत्वाचे विभाजन बसत नाही. सार्वभौमत्वाचे विभाजन याचा अर्थ सार्वभौमत्वाचे अवमूल्यन आहे. प्रजेने सार्वभौमत्व आपल्याकडे ठेवायला पाहिजे. जेव्हा फ्रान्समध्ये १७ जून १७८९ला इस्टेटस् जनरल बोलविण्यात आली, तेव्हा हा विभाजनाचा प्रश्न निर्माण झाला. या इस्टेटस् जनरलचे तीन भाग होते. १. सामंत आणि राजमंडळ, २. चर्चचे प्रतिनिधी आणि ३. सर्वसाधारण जनतेचे प्रतिनिधी या तिघांत सार्वभौम कोण, हा वाद निर्माण झाला. रुसोच्या सिद्धान्ताने सर्वसाधारण जनता सार्वभौम ठरली. इस्टेटस् जनरलचे नाव 'नॅशनल असेंब्ली' झाले. हा थोडा पुढचा भाग झाला.
 
 
 
रुसोने धर्मसत्ता, तिचे रितीरिवाज, वेगवेगळ्या संस्था, त्यांनी प्रस्थापित केलेले नीतिनियम सर्व नाकारले. व्यक्तीच्या जीवनावर बाहेरील कोणत्याही व्यवस्थेने अधिकार गाजविणे त्याला मान्य नव्हते. नीतिमत्ता काय आहे, याचा निर्णय व्यक्तीने आपल्या सदसद्विवेकबुद्धीने केला पाहिजे. ज्या गोष्टींना तो स्वेच्छेने मान्यता देईल, त्याचेच पालन करणे बंधनकारक राहील. सर्वसाधारण हित आणि चांगल्या वाईटाबद्दलचा स्वयंनिर्णय याच गोष्टी कायद्याचा आणि राजकीय संघटनेचा आधार आहे. बळजबरीने जर असे सांगितले गेले की हेच खरे आहे, तर त्याला काही अर्थ नाही. जे सत्तेवर आहेत, त्यांच्या आज्ञा पाळा हे बोलायला चांगले आहे, परंतु ते वरून लादलेले आहे. सत्तेचा उगम परमेश्वराकडून होतो, हे खरे असले तरी प्रत्येक रोगाचा उगमदेखील देवाकडूनच होतो. याचा अर्थ देवाचे आहे म्हणून स्वीकारले पाहिजे असे नाही. रोगमुक्त होण्यासाठी आपल्याला डॉक्टरची मदत घ्यावीच लागते, म्हणून हे आपल्याला मान्य करायला पाहिजे की सामर्थ्याच्या आधारावर सत्य ठरत नसते. जी सत्ता विधिवत अधिकारावर आली असेल, तिच्याशी एकनिष्ठ राहणे हेच कर्तव्य आहे.
 
 
विधिवत सत्ता म्हणजे काय? राजघराणे वंशपरंपरेने राज्य करते. रुसोच्या मते ही विधिवत सत्ता नव्हे. ज्या सत्तेला जनमान्यता नाही, ती विधिवत सत्ता नव्हे. या सत्तेचे कायदे मानण्याचे बंधन लोकांवर नाही. अशा सत्तेविरुद्ध बंड केले पाहिजे, ती उलथवून टाकली पाहिजे, अशी भाषा रुसो वापरत नाही. परंतु अशा सत्ता उलथवून पाडण्यासाठी जो वैचारिक दारूगोळा लागतो, तो रुसो देतो. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात जेफर्सन म्हणतो की 'मानवी जीवनात अशी वेळ येते की, जेव्हा प्रस्थापित राजवटीविरुद्ध उभे राहावे लागते. निर्मितीने सर्व माणसे समान आहेत, त्यांना हिरावून न घेणारे अधिकार प्राप्त झाले आहेत...' शब्दरचना जेफर्सनची असली, तरी त्यातील वैचारिक आशय रुसोचा आहे.
 
 
 
भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेतदेखील आपण रुसोला पाहू शकतो. उद्देशिकेची सुरुवात ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दाने होते. म्हणजे 'आम्ही भारताचे लोक सार्वभौम आहोत' असा त्याचा अर्थ झाला. पुढे स्वातंत्र्य, समता, बंधुता हे शब्द आहेत, ते रुसोचे आहेत.
 
 
लोकशाही राज्यव्यवस्थेत सेक्युलॅरिझमविषयी लिहिले आणि बोलले जाते. आपल्या देशातही या विषयावर बोलणारे अर्धज्ञानी पंडित भरपूर आहेत. रुसोने संघटित रिलिजन नाकारलेला आहे. ख्रिस्ताचे अनुयायी चांगले नागरिक बनू शकत नाहीत, असे त्याचे मत होते. सोयीप्रमाणे तो कधी कॅथोलिक, कधी प्रोटेस्टंट होताना आपण पाहिले. या दोन्ही पंथात मुलभूत पापाची संकल्पना मांडलेली आहे, रुसो ती नाकारतो. रिलिजनची आवश्यकता आहे, हे त्याला मान्य होते. तो अस्तित्ववादी होता. विश्वाचा निर्माता परमेश्वर आहे, हे त्याला मान्य होते. त्याचे म्हणणे असे होते की, ख्रिश्चन धर्मातील अनेक विषयांवर चर्चा झाली पाहिजे. अन्यांवर मते लादण्यापेक्षा हेच मोठे धार्मिक कार्य आहे.
 
 
 
आपण सावधपणे हे विषय समजून घ्यायला पाहिजेत. ख्रिश्चन धर्मातील मतमतांतरे, त्यांची आपापसातील भांडणे, त्यासाठी होणारी युद्धे, माणसांच्या कत्तली असे सर्व विषय धार्मिक असहिष्णुतेत येतात. तिथला सेक्युलॅरिझम म्हणजे ख्रिश्चन धर्मात विचारस्वातंत्र्य असले पाहिजे. प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे ख्रिश्चन धर्माचे पालन करता आले पाहिजे. असहिष्णुता हा प्रत्येक ख्रिश्चन पंथाचा अंगभूत भाग आहे. त्यांचा हा सेक्युलॅरिझम आपल्या कामाचा नाही, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्याकडे भारतात जन्मलेल्या सर्व धर्मांत अनेक मतांतरे आहेत. त्यांच्यात वैचारिक वादविवाद खूप होतात. तो आपला स्वभाव नाही. एखादा वैदिक धर्माचा कर्मकांड करतो. पण तो राजमंडळ मानत असतानाच बौद्ध आणि जैन मतांचा उदय झाला आणि त्यांचा प्रचारही झाला. युरोपात ते शक्य नाही. राजसत्ता आणि धर्मसत्ता तेथे जुळ्या बहिणी होत्या. धर्मसत्तेला राजसत्तेपासून तेथे कालांतराने वेगळे करण्यात आले.
vivekedit@gmail.com
Powered By Sangraha 9.0