मुलींना एवढया लहान वयात असे घराबाहेर पाठवताना पालकांना भीती कशाची असते? तर मुली भरकटणार नाहीत ना, त्यांचा कुणी गैरफायदा घेणार नाहीत ना, त्यांचे चारित्र्य अबाधित राहील ना, त्या लफडी करणार नाहीत ना, पुढे तिचे लग्न होण्यात अडचणी येणार नाहीत ना, वगैरे वगैरे... आम्हाला या बाबी होतील याची चिंता वाटली नाही, याची दोन कारणे - एक तर समाजातील भलेपणावरचा विश्वास. नव्वद टक्के माणसे शहाणी आणि चांगलीच असतात हा अनुभवातून निर्माण झालेला विश्वास आमच्याकडे होता आणि तो आम्ही तिलाही देत गेलो. आणि दुसरे कारण, मुक्ता आणि आमच्यात विश्वासाचे, परस्पर आदराचे, मोकळेपणाचे नाते आहे. हे कसे निर्माण झाले, याबद्दलही आता मी सांगू शकते.
मुक्ता वयाच्या विसाव्या वर्षापासून ट्रेकिंग, म्हणजे गिर्यारोहण या क्षेत्रात नोकरी करते. ती मनाली, देहरादून, नेपाळ अशा भागात घरापासून हजार मैल दूर, पुरुष वर्चस्व असलेल्या क्षेत्रात नोकरी करते. पंधरा ते वीस सहभागींचा समूह घेऊन ती हिमालयाच्या विविध गिर्यारोहण मार्गांवर सहा ते आठ दिवसांचे ट्रेक लीड करते. उणे 10 ते 15 अंश सेल्सियस तापमानात ट्रेक घेऊन जावे लागतात. एका ट्रेकमध्ये रात्री रॉक फॉल झाला होता. सर्व 24 जणांचा समूह पूर्ण अंधारात तातडीने वेगळया ठिकाणी हलवावा लागला होता. मुक्ताने सोबत असलेले गाइड्स व खानसामा यांच्या मदतीने प्रसंगावधान राखून, योग्य ते निर्णय जलद गतीने घेत ही परिस्थिती उत्तम पध्दतीने हाताळली, ज्यामुळे तिचे खूप कौतुकही झाले. या नोकरीत ती मुलगी आहे म्हणून कोणतीही विशेष वागणूक, विशेष सोयी दिल्या जात नाहीत, स्त्रीदाक्षिण्य दाखवले जात नाही. तीही कधीच अशी सूट मिळण्याची अपेक्षा करीत नाही. यात जसा तिच्या धाडसाचा भाग आहे, तसेच इंडिया हाइक्स या कंपनीच्या 'स्त्री-पुरुष भेदाभेद अमंगळ' या धोरणाचाही मोठा वाटा आहे. हे काम करत असताना तिच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा कस लागतो, ज्यात ती पुरेपूर उतरली आहे असे आता म्हणता येईल. आपल्याला काय आवडते आणि काय आवडत नाही याचे तिला छान भान आता आले आहे. जे आवडते त्यातील आणखी पुढचे मार्ग शोधण्याची, तिथे संपर्क करण्याची हिम्मत आता तिच्यात आली आहे, एक आत्मविश्वास, शहाणपण आले आहे. ती आता एक संपूर्ण स्वतंत्र व्यक्ती म्हणून समाजात वावरते आहे.
लोक जेव्हा हे ऐकतात, तेव्हा वेगळया क्षेत्रात काम करते याबद्दल तिच्याकडे आश्चर्ययुक्त आणि आमच्याकडे धास्तीयुक्त कौतुक व्यक्त करतात आणि त्याच वेळी आम्ही हे असे कसे करू दिले याबद्दल शंका व्यक्त करतात. एका मुलीला, एवढया लांब घरापासून दूर, पुरुष-वर्चस्व असलेल्या क्षेत्रात पाठवणे याबाबतची ती धास्ती असते.
तिला विचाराल तर त्यात धाडसीपणा काय आहे असे ती विचारेल. का? तर तिच्या मनात आम्ही कधी भीती पेरली नाही. मोठी माणसे, समाज इतरांच्या, मुलांच्या मनात भीती, शंका, अविश्वास पेरत असतात, जे आम्ही केले नाही असे मी म्हणेन.
मुलींना एवढया लहान वयात असे घराबाहेर पाठवताना पालकांना भीती कशाची असते? तर मुली भरकटणार नाहीत ना, त्यांचा कुणी गैरफायदा घेणार नाहीत ना, त्यांचे चारित्र्य अबाधित राहील ना, त्या लफडी करणार नाहीत ना, पुढे तिचे लग्न होण्यात अडचणी येणार नाहीत ना, वगैरे वगैरे... आम्हाला या बाबी होतील याची चिंता वाटली नाही, याची दोन कारणे - एक तर समाजातील भलेपणावरचा विश्वास. नव्वद टक्के माणसे शहाणी आणि चांगलीच असतात हा अनुभवातून निर्माण झालेला विश्वास आमच्याकडे होता आणि तो आम्ही तिलाही देत गेलो. आणि दुसरे कारण, मुक्ता आणि आमच्यात विश्वासाचे, परस्पर आदराचे, मोकळेपणाचे नाते आहे. हे कसे निर्माण झाले, याबद्दलही आता मी सांगू शकते.
तिच्या वाढीच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर आमच्यात 'संवाद' हे महत्त्वाचे साधन राहिले आहे. समाजात ज्या ज्या उचित-अनुचित गोष्टी घडत असायच्या, त्याबद्दल तिच्याशी संवाद साधत राहणे, तिच्या विचारांना दिशा देत राहणे, त्यातून मूल्य, सावधगिरी देत राहणे हे घडत असायचे. या चर्चा देशात घडणाऱ्या घटनांपासून ते आमच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांपर्यंत असत. छेडखानी, मुला-मुलींचे संबंध हे विषयही सहजपणे संवादित होत. तिच्या पौगंडावस्थेतील विचारांची बंडखोरी आम्हाला दिसून यायची, आम्हाला तो काही वेळा उध्दटपणाही वाटायचा. पण तरीही त्या वेळी आमच्या मांडणीत आक्रस्ताळेपणा, अभिनिवेश, पालकत्वाची अधिकारशाही टाळण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न असे. या संवादातूनच आम्हाला ती आणि तिला आम्ही समजत गेलो. हे काम सोपे खचितच नव्हते. आपला इगो दुखावला जाण्याचे अनेक प्रसंग यायचे. पण इगोला जाणीवपूर्वक बाजूला करत, तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असे आपल्या संयमाची परीक्षा पाहणारे धोरण ठेवत संवादच करत राहायचा आटोकाट प्रयत्न केला.
बाहेरच्या जगात स्वतंत्रपणे वावरण्याच्या संधी तिने पुष्कळ घेतल्या. आमच्यासोबत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर ट्रेकिंगला यायची. पाचवीत असतानाच हिमालयातील मुलांसाठीच्या गिर्यारोहण कार्यक्रमात सात दिवसांसाठी एकटीने सहभागी झाली होती. तिने गिर्यारोहणाचे बेसिक आणि प्रगत (advance) हे आणि प्रस्तरारोहणाचा कोर्सही केला आहे. हे कोर्स शारीरिक क्षमतेची आणि चिकाटीची कसोटी पाहणारे होते. नोकरी मिळण्यापूर्वी या क्षेत्रात तिने विना-मोबदला उमेदवारी केली आहे. या साऱ्यासाठी तिला कित्येक दिवस घराबाहेर एकटीने राहावे लागले आहे. यात आपण मुलगी असल्याचा तिने कधीही बाऊ केला नाही. फर्स्ट इयरला असताना तिने टूरिझमचा दीड वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला. मग वर्षभर decathlon या स्पोर्ट्स वस्तूंच्या दुकानात माटुंगा-घाटकोपर-ठाणे असा प्रवास करत, कॉलेज करून अर्धवेळ नोकरी केली. यात तिची दमछाक होत होती तरी आम्ही त्यासाठी कधी विरोध केला नाही, कारण ते तिला करावेसे वाटत होते. मित्र-मैत्रिणींसमवेत रात्री घालवायची. तिचे निर्णय, कृती काही वेळा आमच्या मनात शंका, चिंता निर्माण करत असत, पण त्या आमच्यापाशी ठेवून तिला निर्णय घेऊ दिले गेले. आम्ही पालकत्वाच्या अधिकारशाहीने विरोधाची भूमिका कधीही घेतली नाही आणि आमचा अहंकार कधी दुखवू दिला नाही. तिच्यावर शंका घेणे, मोबाइल तपासणे या बाबीही आम्ही कधी केल्या नाहीत. एकच गोष्ट केली, ती म्हणजे ती जे करत होती त्याची तपशिलात माहिती ठेवत होतो. जिथे आम्हाला गरज वाटेल त्याबाबत आवर्जून संवाद साधत होतो. पालक म्हणून आम्हाला काय वाटत असते हे तिला सांगत गेलो. पालकांनी विश्वास टाकला की तो निभावण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, याची जाणीव तिला येत गेली. काही वेळा आम्हाला धक्कादायक वाटणाऱ्या तिच्या वर्तनावर शंका उपस्थित करण्याचे जाणीवपूर्वक टाळले. चुका तर सर्वांकडूनच होतात. पण तिच्या चुकांमुळे ती कधीही अगदी गंभीर अडचणीत आली तरी ती आमची आहे, आम्ही तिला कधीच अंतर देणार नाही हा विश्वास वेळोवेळी तिला देत गेलो.
तिच्या बाबतीत घडलेली आणखी एक वेगळी घटना. अकरावीत असताना तिने 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी' या नाटकामध्ये दीड वर्ष काम केले. नाटकाच्या नावावरूनच त्याचा आशय लक्षात यावा. वंदना खरे यांचे हे नाटक. जेव्हा मुक्ताने या नाटकात काम करायची इच्छा व्यक्त केली, तेव्हाही तिला मी विरोध केला नाही. त्याआधी आम्ही लैंगिक शिक्षण या विषयावर तिच्याशी कधीही बोललो नव्हतो, परंतु मला वंदनाचे विचार माहीत होते. लैंगिकतेविषयीच्या माझ्याही कल्पना अगदी स्पष्ट होत्या. हे निव्वळ बाजारू, गल्लाभरू नाटक नसून स्त्रीच्या लैंगिकतेकडे डोळे उघडून पाहायला सांगणारे नाटक आहे, हे मला माहीत होते. म्हणूनच या नाटकात काम करण्याच्या मुक्ताच्या निर्णयाचे मला फारसे दडपण आले नाही. उलट असे वाटलं की तिचे लैंगिकतेचे शिक्षण अनायसेच निकोपपणे होऊन जाईल.
सर्वात शेवटी असे सांगेन की लोकशाही देशात लोकशाही मूल्य (म्हणजे, विचार- व उच्चारस्वातंत्र्य, समता, परस्पर आदर, प्रामाणिकपणा) अंगीकारत, निर्णयस्वातंत्र्य देत-घेत आम्ही मिळून आजवरचा सहजीवनाचा प्रवास केला. एक व्यक्ती म्हणून तिच्या मतांचा, विचारांचा आदर करत गेलो. केवळ ती लहान आहे, काही वेळा अपरिपक्व विचार व्यक्त करते म्हणून हेटाळणी, दुर्लक्ष असे कधी केले नाही. आणि याच्या परिणामाने मुक्ताही आज लोकशाही देशाची लोकशाही तत्त्व पाळणारी एक स्वतंत्र आणि परिपक्व नागरिक झाली आहे, याचा आनंद आहे.
हेमांगी शिक्षण अभ्यासक व कार्यकर्ता असून शिक्षण हक्क चळवळीशी निगडित आहेत, तर मिलिंद अभियंता असून एका केमिकल कंपनीत आहेत.
Joshful.hemangi@gmail.com