शिवभावनेची गरज

29 Jan 2020 15:39:35

**रमेश पतंगे***

महाराष्ट्राला आज दिशा देणाऱ्या, मार्ग दाखविणाऱ्या, महाराष्ट्रात राहणाऱ्या, आणि म्हणून मराठी असणाऱ्या, मराठी जनतेचे नेतृत्व करणाऱ्या धुरंधर नेत्याची आवश्यकता आहे. संघर्षाशिवाय राजकीय नेतृत्व निर्माण होत नाही. राजकीय संघर्ष नेहमीच स्वतःला पूर्णपणे पणाला लावण्याचा असतो. एक तर यश प्राप्त करीन, नाही तर देहत्याग करीन ही भावना असावी लागते. याला शिवभावना म्हणतात.

bjp_1  H x W: 0

विवेक, समरसता, संविधान या विषयांसाठी प्रवास करावा लागतो. आता प्रवास नकोसा वाटतो, परंतु अनेक वेळा कर्तव्यभावनेने प्रवासाला निघावेच लागते. प्रवासात अनेक कार्यकर्ते भेटतात. वेगवेगळे कार्यक्रम असतात, काही भेटीगाठी असतात. अशा वेळी तीन-चार प्रश्न हमखास विचारले जातात. पहिला प्रश्न - ''उध्दव ठाकरे यांचे सरकार किती काळ राहील?'' दुसरा प्रश्न - ''शिवसेनेशी जुळवून घेण्यात भाजपा कमी पडली का?'' तिसरा प्रश्न - ''मोदी शासनाच्या निर्णयांविरुध्द देशभर कोठे ना कोठे छोटे-मोठे आंदोलन चालूच असते, त्याचा परिणाम काय होईल?'' चौथा प्रश्न - ''आर्थिक मंदी आहे, रोजगार उपलब्ध होत नाही, युवा वर्ग अतिशय नाराज आहे. ही परिस्थिती कशी हाताळणार?''

प्रश्नकर्त्यांना सामान्यतः हे माहीत असते की, या प्रश्नांची ठोस उत्तरे मी काही देऊ शकत नाही. तशी उत्तरे देण्यासाठी जे ज्ञान असावे लागते, तेवढे ज्ञान माझ्याकडे नाही. परंतु मी ज्येष्ठ संघकार्यकर्ता असल्यामुळे आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी कार्यकर्ते माझ्याशी बोलतात. मीही त्यांना उत्तरे देतो. ती त्यांना किती पटतात, हे सांगता येत नाही. परंतु प्रश्न टाळता येत नाहीत. विचारलेले प्रश्न बालिश नाहीत, गंभीर आहेत. यासाठी त्यांचा विचार गंभीरपणेच करावा लागतो.

उध्दव ठाकरे यांचे शासन किती काळ राहील? या प्रश्नाची अनेक उत्तरे आहेत. ते पाच वर्षेदेखील राहील आणि पुढच्या महिन्यातदेखील कोसळू शकते. शासन चालवायचे की नाही, याचा संपूर्ण निर्णय उध्दव ठाकरे यांनाच करायचा आहे. त्यांनी जर असे ठरविले की, शरद पवार आपल्या नाकात जेवढया वेसणी घालतील तेवढया घालून घ्यायच्या आणि सरकार चालू द्यायचे. मग हे सरकार पाच वर्षे चालेल. परंतु त्यांनी जर ठरविले, झाले तेवढे खूप झाले, आता मी पवारांचा घोडा होणार नाही. तर हे सरकार कोसळेल. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, पण सत्तेच्या सर्व चाव्या शरद पवारांच्या हाती आहेत.

तसेच जर काँग्रेसला वाटले की या शासनात राहून आपले दीर्घकालीन नुकसान होणार आहे, शासनाचा उपयोग करून राष्ट्रवादी पक्ष बलवान होणार आहे आणि पुढे तोच स्वतःच्या शक्तीवर महाराष्ट्रात शासन करण्याच्या स्थितीत येईल, तर काँग्रेस सरकारमधून बाहेर पडेल. काही झाले तरी काँग्रेस, हा राष्ट्रीय पक्ष आहे. पक्षाची म्हणून काही विचारसरणी आहे. राष्ट्रवादी पक्षाचे तसे नाही. राष्ट्रवादी, उद्या सोयीचे असेल तर शिवसेनेला आणि काँग्रेसला डावलून भाजपाबरोबर युती करू शकतात. त्यांची एकच विषयसूची आहे - कोणत्याही मार्गाने सत्तेजवळ राहायचे. काँग्रेसचे तसे नाही, म्हणून काँग्रेस वाट बघण्याचे धोरण अवलंबेल. हा वाट बघण्याचा कालावधी दोन-अडीच वर्षांचा राहू शकतो. म्हणजे दोन-अडीच वर्षे तरी हे सरकार कोसळू शकत नाही.

आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळू या. शिवसेनेशी युती करावी असे सामान्य कार्यकर्त्याला वाटत नव्हते आणि बहुसंख्य नेत्यांनादेखील वाटत नव्हते. पण लोकसभेत युती झाली. तेव्हा काही बोलणे झाले असेल. राजकीय नीतिमत्ता पाळण्यासाठी ही युती करावी लागली. शिवसेनेशी जुळवून घेणे म्हणजे आपला घोडा करणे आहे. स्वाभिमान असणारा कुणीही ही गोष्ट मान्य करणार नाही. शिवसेना नेत्यांची भाषा आपण ऑक्टोबरपासून ऐकत आलो आहोत. त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देणे म्हणजे सार्वजनिक नळावर जशी भांडणे होतात, तशी भांडणे करण्यासारखे आहे. यामुळे जुळवून घेण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.

मोदी शासनाविरुध्द देशभर काँग्रेस आणि डावी मंडळी रोज काहीना काही तरी आंदोलने करीत असतात. विशेषतः नागरिकत्व कायदा हा विषय त्यांनी लावून धरलेला आहे. या आंदोलनाचे निरिक्षण केले तर लक्षात येईल की, पूर्ण ताकद लावून ते त्यात उतरले नाहीत. मुसलमानांना त्यांनी रस्त्यावर उतरवले नाही. या आंदोलनामागे एक खूप मोठा धोका आहे. मुसलमानांचा पक्ष मर्यादेपलीकडे घेणे म्हणजे आपली राजकीय कबर बांधणे आहे, ही गोष्ट राजकीय पक्षांना समजते. ती समजत नसेल तर त्यांना सोनिया गांधी म्हटले पाहिजे. भारतातील हिंदू राजकीयदृष्टया हिंदुत्ववादी विचारसरणीचा नसतो. परंतु मुस्लीम लांगुलचालन सुरू झाले की  भारतातील हिंदू हा  हिंदू भावनेने जागृत होतो. त्यामागे 800-850 वर्षांचा परकीय मुस्लीम आक्रमकांचा क्रूर इतिहास आहे. फाळणीचा इतिहास त्यामागे आहे. म्हणून या डाव्या आणि काँग्रेसी लोकांना अधिक उग्र आंदोलन करण्यास पेटविले पाहिजे. काहीही न करता भाजपाची मतबँक आपोआपच घट्ट होत जाईल. आव्हाड, अशोकराव चव्हाण, मणिशंकर अय्यर, शशी थरूर आदी नेते या विषयावर अधिक कडक कसे बोलतील याची रचना केली पाहिजे. रावण उभा राहिल्याशिवाय रामाला महत्त्व येत नाही.

नोटाबंदी केल्यामुळे काळया पैशाला आळा बसला हा जसा फायदा झाला, तसे रोख व्यवहारावर जे व्यवसाय चालत त्यांच्यावर बंधने आली. उद्योगातील आणि व्यापारातील लोकांना सत्तर वर्षे रोख व्यवहाराची सवय होती. ही सवय चटकन बदलणे कठीण झाले. त्याचा परिणाम म्हणून रिटेल बाजारात, मोटार व्यवसायात आणि बांधकाम व्यवसायात मंदीचा सामना करावा लागतो आहे. सामान्य माणूस त्यावरील उपाययोजना करू शकत नाही. एखादी सहकारी बँक करू शकत नाही. उपाययोजना केंद्र शासनालाच करायची आहे. अर्थ मंत्रालय आणि त्यांचे सल्लागार यांना त्याच्यावर उपाय शोधायचे आहेत. पंतप्रधानांनी त्यावर निर्णय घ्यायचा आहे. निर्णय चांगले घेतले तर त्याचे फायदे शासकीय पक्षाला होतील. निर्णय चुकीचे घेतले तर त्याचे फटके बसतील आणि निर्णय घेतलेच नाहीत तर होणारे परिणाम त्यांना भोगावे लागतील. अशा प्रसंगी हिंदू, हिंदुत्व, पाकिस्तान वगैरे काही फार कामाला येईल असे मला वाटत नाही. हा विषय गंभीर आहे आणि तितक्याच गंभीरपणे त्याचा विचार केला पाहिजे. केंद्रातील लोक करत नाहीत, असे मानण्याचे कारण नाही. आशा करू या की, चांगले निर्णय होतील.

ही झाली, प्रश्नांची मला समजलेली उत्तरे. आता महाराष्ट्राच्या एकूण स्थितीचा विचार करू या. सामाजिक चळवळीत ज्यांनी आयुष्य घालविले, अशा एका कार्यकर्त्याशी बोलत असताना तो म्हणाला, ''महाराष्ट्र अधोगतीच्या मार्गाने वेगाने चालला आहे. नैतिकतेला सुळावर चढविण्यात आले आहे. जातवादाचा राक्षस प्राण फुंकून फुंकून जागा केला जात आहे. सर्वत्र दिशाहीनता आहे. ती केवळ राजकारणात आहे असे नाही, साहित्य, संस्कृती, धर्मकारण या सर्वांत आहे. सुमार साहित्यिक गुणवत्ता असलेला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष केला जातो आणि अन्य साहित्यिक खाली माना घालून बसतात. सत्तेचा आदेश एका पक्षाला आणि तो डावलून ज्यांना मतदारांनी सत्ता दिली नाही, ते सत्तेवर बसले आहेत. हिंदू देवस्थानांच्या संबंधी सातत्याने काही ना काही वाद निर्माण करीत राहणे हा अनेकांच्या पोटापाण्याचा व्यवसाय झालेला आहे. महाराष्ट्राला दिशा देईल असा कुणी नेता राहिलेला नाही.''

हा कार्यकर्ता अत्यंत पोटतिडकीने बोलत होता. त्याचे हितसंबंध राजकारणात नाहीत, साहित्य क्षेत्रात नाहीत की धार्मिक क्षेत्रातही नाहीत. महाराष्ट्र म्हणजे साऱ्या भारताला वेगवेगळया चळवळीची दिशा देणारा देश. महाराष्ट्रात अब्जाधीश कमी असतील, पण बुध्दिधीश असंख्य झाले. त्यांनी एकेका क्षेत्रात जे काम केले, ते साऱ्या भारताला अभिमान वाटावा असे आहे. महाराष्ट्र आज जो विचार करतो, तो विचार पन्नास वर्षांनंतर देश करायला लागतो, असे म्हटले तर ते खोटे ठरू नये. असा महाराष्ट्र आज भरकटत चालला आहे.

याचा दोष काही लोक काही ठरावीक राजनेत्यांवर टाकतात. परंतु दोष राजनेत्यांचा नसतो. दोष असतो त्यांना नेते बनविणाऱ्या जनतेचा. दोन प्रकारचे नेते असतात. पहिल्या प्रकारचे नेते सर्व समाजाला वाईट अवस्थेकडून उन्नत अवस्थेकडे घेऊन जातात. एका अर्थाने ते स्वयंभू नेते असतात. उपमाच द्यायची तर ज्यू जमातीच्या मोझेसची उपमा देता यईल. त्याने इजिप्तमधील सर्व ज्यू गुलामांना इजिप्तमधून बाहेर काढले. अब्राहम लिंकनचे उदाहरण देता येईल, ज्याने निग्रोंना गुलामीतून मुक्त केले. आपल्याकडे बाबासाहेबांचे नाव घेता येईल, ज्यांनी अस्पृश्यांना सामाजिक गुलामीतून मुक्त केले. समाजाला उन्नत करणाऱ्या नेत्यांत न्या. रानडे, लो. टिळक, नामदार गोखले, गाडगे महाराज, साईबाबा अशा थोर पुरुषांचा विचार करावा लागतो. यात अनेक नावांची भर घालता येते. ही नावे काढली तर शून्य महाराष्ट्र राहतो.

दुसऱ्या प्रकारच्या नेत्यांत स्वार्थी, मतलबी, लोकांना झुलविणारे, पैशाच्या राशी उभे करणारे, लोकांच्या धर्म-जातभावनांना कौशल्याने चेतविणारे नेते येतात. ते तात्कालिक फायद्याची गाजरे लोकांपुढे नाचवितात. खोटा आशावाद निर्माण करतात. खोटी स्वप्ने खरी होणार, असा आभास निर्माण करतात. सामान्य जनतेला घोडा करून तिच्या नाकात वेसण घालून ते जनतेवर स्वार होतात. अशा नेत्यांची सध्या महाराष्ट्रात चलती आहे. ती आपणच निर्माण केली आहे. आपणच आपल्या स्थितीला जबाबदार असतो.

यातून बाहेर पडावे लागेल. सृष्टीचा नियम असा आहे की, एकच अवस्था कायम राहत नाही. ही अवस्था बदलेल. ती बदलण्याचे काम पहिल्या प्रकारातील नेत्याला करावे लागेल. आज असा नेता कोण? प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही. पण उद्या तो येणारच नाही, असे म्हणता येणार नाही. महाराष्ट्राला आज दिशा देणाऱ्या, मार्ग दाखविणाऱ्या, महाराष्ट्रात राहणाऱ्या, आणि म्हणून मराठी असणाऱ्या, मराठी जनतेचे नेतृत्व करणाऱ्या धुरंधर नेत्याची आवश्यकता आहे. आध्यात्मिक नेतृत्व आध्यात्मिक साधनेने उभे राहते. खेळातील नेतृत्व सरावाने आणि कौशल्याने उभे राहते. राजकीय नेतृत्व सत्य आणि न्याय देणाऱ्या प्रश्नांवर संघर्ष करून उभे राहते. संघर्षाशिवाय राजकीय नेतृत्व निर्माण होत नाही. राजकीय संघर्ष नेहमीच स्वतःला पूर्णपणे पणाला लावण्याचा असतो. एक तर यश प्राप्त करीन, नाही तर देहत्याग करीन ही भावना असावी लागते. याला शिवभावना म्हणतात. महाराष्ट्राला त्याची आज नितांत गरज आहे.

vivekedit@gmail.com

Powered By Sangraha 9.0