उत्तुंग पार्थ

विवेक मराठी    17-Jan-2020
Total Views |

पार्थ बावस्कर हा अवघ्या वीस वर्षांचा तरुण औरंगाबादेला राहतो. सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह भारतात वीर सावरकर, लोकमान्य टिळक, योगी अरविंद, रामायण, महाभारत, भगवद्गीता, पसायदान अशा अनेक विषयांवर व्याख्यान देत भ्रमंती करतोय. शब्दामृत प्रकाशन या नावाने पार्थची आता स्वतःची पुस्तक प्रकाशन संस्था आहे. आजवर त्याने फक्त सावरकरांवर 100पेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत. आम्ही मोफत मराठी शिकवतो. दर रविवारी आम्ही 'फन स्कूल' भरवतो, कलारंग नावाची संस्था स्थापन केली. यात पाच वर्षांच्या बालकापासून 60 वर्षांच्या पुढील व्यक्तींचा समावेश आहे.''

 
parth_1  H x W:

सहा फूट उंच बलदंड शरीरयष्टी, पण मनाने अत्यंत तरल, संवेदनशील अन प्रगल्भ. रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी या ग्रांथांचा प्रचंड व्यासंग. उत्तम वक्ता, अभिनयाचीही तेवढीच जाण. मायभूमी अन मायबोलीसाठी खूप काही करण्याची धडपड. वय विचारले, तर अवघे 20 वर्षे. नाव पार्थ अभय बावस्कर. इतक्या लहान वयात हे सर्व कसे साध्य केले? मी पत्रकार असूनही पार्थची माहिती आपल्याला कशी नाही? याचे मोठे आश्चर्य वाटल्याने पार्थचे घर गाठले आणि एका प्रखर राष्ट्रभक्त तरुणासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाची ओळख झाली. मग आधाशासारखा पार्थच्या आईबाबांवर प्रश्नांचा भडिमार सुरू झाला आणि पार्थ समजून घेतल्यावरच चित्ताला परम समाधान लाभले.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 

पार्थ बावस्कर हा अवघ्या वीस वर्षांचा तरुण औरंगाबादेला राहतो. सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह भारतात वीर सावरकर, लोकमान्य टिळक, योगी अरविंद, रामायण, महाभारत, भगवद्गीता, पसायदान अशा अनेक विषयांवर व्याख्यान देत भ्रमंती करतोय. त्याने एवढया लहान वयात एवढा अभ्यास कसा केला, याची माहिती जाणून घेण्यासाठी मी सिडको एन-4 भागातील जयभवानी नगर परिसरातील पार्थचे घर गाठले. मिसरूडसुध्दा न फुटलेला पार्थ हसतमुखाने माझे स्वागत करायला आला.

साधे घर, मध्यमवर्गीय लोकांचे असते तसेच. भिंतीवर फक्त वीर सावरकरांची भलीमोठी तसबीर दिसली. सोफ्यावर बसलो, तोच आतून तरुण जोडपे आले. ''हे माझे आई-बाबा.'' पार्थने ओळख करून दिली. पोहे आणि चहाचा आग्राह झाला, नाही म्हणताच आले नाही. पार्थचे वडील अभय बावस्कर आणि आई कांचन बावस्कर यांची मुलाखत सुरू झाली.

 

पोटातच झाले देशभक्तीचे संस्कार

इतक्या लहान वयात पार्थ इतका व्यासंगी कसा काय झाला? या प्रश्नाचे उत्तर प्रथम आईने दिले. त्या म्हणाल्या, ''पार्थचा जन्म 26 जुलै 1999चा. तो पोटात असताना मी रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' वाचायचे, ऐकायचे. टेपरेकॉर्डर असल्याने मारुती स्तोत्रही सतत ऐकत होते. मला झोप लागली तरी माझ्या सासूबाई तो टेप उशाशी आणून ठेवायच्या. हेतू एकच होता - माझ्या बाळावर संस्कार चांगले व्हावे. हळूहळू पार्थ मोठा झाला, तेव्हा देवासमोर बसून सायंकाळी शुभंकरोतीसह पसायदान, रामरक्षा म्हणत असे. आई-बाबासह त्याला आजी, आजोबा यांचा छान सहवास लाभला. त्यांनी हेच बाळकडू दिले. ओम्कार बालवाडी नावाच्या शाळेत पाठांतराचे संस्कार छान झाले. मग सरस्वती भुवन शाळेत प्रवेश घेतला. पहिलीपासून तो याच शाळेत आहे. आता तो बी.कॉम.च्या अंतिम वर्षात शिकतोय. प्रसिध्द समीक्षक सुधीर रसाळ हे माझे मामा. बालपणी त्यांच्याकडे घेऊन जाई, त्यांचाही प्रभाव पार्थवर पडला आहे.

 
parth_1  H x W:

ग्रंथ हेच गुरू बनले. .

लहान वयात पुस्तक वाचनाची गोडी कशी लागली? या प्रश्नावर पार्थचे बाबा म्हणाले, ''सरस्वती भुवन शाळेत तो वेगवेगळया वक्तृत्व, श्लोक स्पर्धांत भाग घेत असे. त्यामुळे पुस्तक वाचनाची गोडी लागली. चिन्मय मिशनच्या गीता पठण स्पर्धेत भाग घ्यायचा, त्यामुळे भगवद्गीता वाचली. ज्ञानेश्वरी वाचनाची सवयच त्याला बालपणी लागली. आता तर तो रोज पाच ओव्या वाचल्याशिवाय झोपत नाही. त्याने एकदा 'ताटी उघडा ज्ञानेश्वरा'या नाटकात भाग घेतला होता. त्यात निवृत्तीनाथांची भूमिका केली. त्यामुळे ज्ञानेश्वरांवरील अनेक पुस्तके वाचली. मोगरा फुलला, इंद्रायणी काठी ही पुस्तक त्याने अनेकदा वाचून काढली. अजूनही तो रात्री दोन वाजेपर्यंत जागा असतो. आम्ही त्याला बळजबरीने झोपायला लावतो, इतके वाचनाचे वेड आहे. आज त्याच्याकडे 1500 पुस्तकांचा खजिना आहे. तीन कपाटांत त्याने विषयवार पुस्तके ठेवली आहेत. सावरकर, टिळक, राम गणेश गडकरी, रामायण, महाभारत यासह नाटकांची पुस्तके आहेत. शब्दामृत प्रकाशन या नावाने पार्थची आता स्वतःची पुस्तक प्रकाशन संस्था आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/


सावरकर असे समजून घ्या

पार्थच्या घरच्या पुस्तकांत समग्रा सावरकर आहेत. त्यात दोन खूप जुनी पुस्तके आहेत, ज्यावर सावरकरांची स्वाक्षरी आहे. पार्थने ही पुस्तके आवर्जून दाखवली. सावरकर तुला कोणी शिकवले का? त्यांची पुस्तके वाचायला कुणी सांगितले? या प्रश्नावर पार्थ म्हणाला, ''नाही, मला कुणी शिकवले नाही की सांगितले नाही. मी त्यांच्यावर लिहिलेली पुस्तक वाचली.'' पार्थ म्हणतो, ''सावरकर समजून घेताना हळुवार जावे लागते. थेट माझी जन्मठेप जर एकदम हातात घेतले, तर त्यांची भाषा नवीन वाचकाला अवघड अन क्लिष्ट वाटते आणि पुन्हा सावरकरांकडे ते वळत नाही. त्यासाठी त्यांच्यावर लिहिलेली इतर पुस्तके वाचा. मग सावरकरांनी स्वतः लिहिलेली पुस्तक वाचावीत.'' पार्थ गेल्या तीन वर्षांपासून अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये जाऊन वीर सावरकरांवर व्याख्यान देतो आहे. आजवर त्याने फक्त सावरकरांवर 100पेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत.

parth_1  H x W:

आधी व्याख्यान, मग परीक्षा..

पार्थ ज्ञानेश्वरांच्या पसायदानावर व्याख्यान देतो खास तरुणांसाठी. तो म्हणतो, ''प्रसिध्द लेखक राम शेवाळकर यांची पुस्तके वाचून मी पसायदानाच्या प्रेमात पडलो. मग निरूपण करू लागलो. शाळेत असताना टीव्हीवरची कार्टून चॅनल्स माहीतच नव्हती.'' त्याच्या आईने सांगितले की, ''पार्थची दहावीची परीक्षा तोंडावर आली होती. 1 मार्चला पेपर होता अन 26 फेब्रुवारीला त्याने मी नाही म्हणत असताना वीर सावरकर यांच्यावर व्याख्यान दिले. त्याच्या शिक्षकांचा त्याच्यावर खूप विश्वास होता. त्यांनीच मला सांगितले - काळजी करू नका, पार्थ हुशार आहे, तो चांगला पास होईल. पार्थला दहावीत 90 टक्के गुण मिळाले. पुढे बारावीतही कॉमर्सला 80 टक्के गुण मिळाले. त्याने विज्ञान शाखेला प्रवेश घेतला नाही, कारण वाचन, लेखन यासह त्याला नाटकाचीही आवड आहे.

 

मराठीसाठी सर्व काही

पार्थ म्हणाला, ''शाळेतील इंग्लिशचे सर सूर्यकांत सराफ यांनी माझ्यावर मराठी वाचन-चिंतन-मननाचे संस्कार केले. नाटकाचे बाळकडू त्यांनीच पाजले. आज मराठी मातृभाषा असणारी बहुतांश मुले इंग्लिश माध्यमात शिकत आहेत. त्यांना श्यामची आई माहीत नाही, साने गुरुजी माहीत नाहीत. मला हे पाहून फार वाईट वाटते, म्हणून आम्ही मोफत मराठी शिकवतो. दर रविवारी आम्ही 'फन स्कूल' भरवतो, त्याला आता मोठी गर्दी होत आहे. मुलांचे मराठी पुस्तकांचे वाचन, चिंतन, मनन वाढावे म्हणून गावोगाव जाऊन आम्ही पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम घेतो. बालनाटयही बसवतो. आमचा चाळीस जणांचा नाटकाचा समूह आहे. आम्ही कलारंग नावाची संस्था स्थापन केली. यात पाच वर्षांच्या बालकापासून 60 वर्षांच्या पुढील व्यक्तींचा समावेश आहे.''

प्रवीण दवणे, शरद पोंक्षे यंच्याशी भेट

पार्थला आई-वडील, आजी-आजोबा यांनी चांगले संस्कार दिले. सरस्वती भुवन शाळेतील शिक्षक सूर्यकांत सराफ यांनी नाटकाचे संस्कार केले. ''वाचनाने मी समृध्द झालो, तर नाटकाने मला व्यक्त होण्यास शिकवले'' असे पार्थ अभिमानाने संगतो. ''प्रवीण दवणे यांच्या हस्ते एकदा पुरस्कार मिळाला अन त्यांच्यासह खूप ठिकाणी जाऊ लागलो. आता त्यांच्यासह 'सावर रे'चे प्रयोग करतो. शरद पोंक्षेंससह 'राष्ट्राय स्वाहा'चे प्रयोग करतो. या दोघांनी मला खूपच प्रोत्साहन दिले. सच्चिदानंद शेवडेंच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. त्यांनीच रामायण, महाभारत वाचायला सांगितले.'' पार्थ सांगतो की तो फक्त वाल्मिकी रामायणच बोलतो, कारण वाल्मिकी रामायणात काल्पनिक काही नाही. सर्व काही वास्तव मांडले आहे. इतर रामायणात अनेक रूपकात्मक गोष्टींचा समावेश आहेत, त्यावर आजची तरुण पिढी विश्वास नाही ठेवणार. खारूताई आली, तिने दगड टाकले, राम नाम लिहिलेले दगड तरंगू लागले असे काही वाल्मिकी रामायणात नाही. त्यात सेतुबंधनाचा प्रसंग वर्णन करताना सांगितले आहे की, त्या ठिकाणी एक यंत्र होते. त्याने दगड फोडले, झाडे तोडली. त्यांचा वापर सेतू बांधताना झाला.

 

कुंती, द्रौपदी, गांधारी यांच्यावर व्याख्यान

पार्थने आणखी एक नव्या विषयावर व्याख्यान देण्यास सुरुवात केली आहे. त्यात 'अपरिचित लक्ष्मण आणि ऐतिहासिक राम' या विषयावर तो खास तरुणांशी बोलतो, तसेच महाभारतातील कुंती, द्रौपदी आणि गांधारी या स्त्री पात्रांची माहीत नसलेली बाजू सांगतो.


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 

असा हा पार्थ खऱ्या अर्थाने लहान वयात उत्तुंग वाटला. त्याच्याविषयी आणखी खूप काही लिहिण्यासारखे आहे. त्याला सारखे भेटूनच तो पूर्ण समजून घेता येईल, इतके ज्ञानभांडार पदवीधर होण्याआधीच त्याच्यात ठासून भरलेय.

 

पार्थचा सार्थ अभिमान

इतका वेळ आमच्या गप्पा ऐकणारी त्याची आजी मला निघताना म्हणाली, ''अहो, आम्हाला आता पार्थच्या नावाने ओळखतात. त्याने ही दुर्मीळ पुस्तके जेव्हा घरात आणली, तेव्हाच मी प्रथम पहिली. नातवाचा मला सार्थ अभिमान आहे. आम्हाला त्यांच्यामुळे रामायणाचे, महाभारताचे माहीत नसलेले पैलू समजले. नव्या पिढीसाठी त्याने जो संकल्प केलाय तो नक्की पूर्ण होणार.''

 

आशिष देशमुख

9923931807