लोगोथेरपी : व्हीक्टर फ्रँकल

14 Jan 2020 15:34:28

 **रमा दत्तात्रय गर्गे***

 युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू असल्यामुळे डॉक्टर फ्रँकल आणि त्यांचे कुटुंबीय छळछावणी मध्ये पाठवले गेले। हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये आलेल्या अनुभवांनी आणि त्या काळामध्ये स्वतःच्या मानसिक क्षमतांचा नव्याने शोध लागल्याने, डॉक्टर फ्रँकल यांनी लोगोथेरपी या नावाची तत्त्वज्ञानावर आधारित अशी मानसशास्त्रीय उपचार पद्धती शोधून काढली

Logotherapy Viktor Frankl

26 मार्च 1905 साली ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे व्हीक्टर फ्रँकलचा जन्म झाला। लहानपणापासून अत्यंत कुशाग्र बुद्धीचा असलेला व्हीक्टर फ्रँकल उबदार कौटुंबिक वातावरणामध्ये आनंदाने वाढत होता ।त्याला तत्वज्ञान, प्रायोगिक मानसशास्त्र आणि न्यूरॉलॉजी या विषयांमध्ये रुची होती।
 

वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी त्याने त्या काळातील प्रसिद्ध
,
 आधुनिक मानसशास्त्राचा जनक असलेल्या डॉक्टर सिग्मंड फ्राइड या मानसशास्त्रज्ञाशी पत्रव्यवहार सुरू केला।या पत्रव्यवहाराने फ्रॉइड प्रभावित झाला आणि त्यातील काही गोष्टी एकत्रित करून फ्रॉइडने "इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायको ऍनालिसिस"मध्ये प्रकाशित केल्या.

तत्त्वज्ञानाची ओढ आणि मानसशास्त्राची आवड व्हीक्टर फ्रँकलला होती। तरुण वयातच "द डॉक्टर अँड द सोल"हे पुस्तक लिहायला सुरुवात केली.

 

व्हीक्टर फ्रँकल न्यूरोलॉजि आणि मानसशास्त्र आदीचे शिक्षण घेऊन व्हिएन्नामध्ये रॉथशिल्ड हॉस्पिटलमध्ये अधिकारी म्हणून काम करू लागले। त्यांनी कदाचित फ्रॉईड आणि डलर या दोन महान मानसशास्त्रज्ञा प्रमाणेच नव्या मनोविश्लेषणात्मक संकल्पनांची भर शास्त्रात घातली असती। पण अकस्मात अशा काही घटना घडल्या की ज्यामुळे त्यांचा मानसशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोणच पूर्णपणे बदलून गेला।

 

युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू असल्यामुळे डॉक्टर फ्रँकल आणि त्यांचे कुटुंबीय छळछावणी मध्ये पाठवले गेले। हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये आलेल्या अनुभवांनी आणि त्या काळामध्ये स्वतःच्या मानसिक क्षमतांचा नव्याने शोध लागल्याने, डॉक्टर फ्रँकल यांनी लोगोथेरपी या नावाची तत्त्वज्ञानावर आधारित अशी मानसशास्त्रीय उपचार पद्धती शोधून काढली।शोधली असे म्हणणे योग्य ठरणार नाही कारण कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये ते ही उपचार पद्धती स्वतः जगले।आजूबाजूच्या लोकांना शिकवली आणि तशाच प्रकारे ताठमानेने छळाला सामोरे जाणाऱ्या लोकांकडून मानसिक बळ कसे मिळवायचे हे स्वतः शिकले. ही थेरपी ते स्वतः जगले आणि म्हणूनच हे एक दर्शनशास्त्र झाले आहे।

 

छळछावणी मध्ये त्यांचे कुटुंबीय वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेले होते ।त्यांच्यासोबत असणारे कोणीच ओळखीचे नाही, परंतु सगळेजण एकसारख्या दुःखाचे साथीदार होते.

पहाटेपासून थंडीत खड्डे खणायचे दहा वाजता भोंगा वाजला की पावाचा तुकडा आणि वाटीभर सूप! सुपामध्ये निकृष्ट मांसाचा लहानसा तुकडा ,कधीतरी छोटासा चिजचा तुकडा! आजारी पडले तर दशा याहूनही कठीण ।कारण ते काम करत नाहीत म्हणून त्यांना याहूनही कमी अन्न दिले जात असे ।

 

अशा सगळ्या अमानुष वातावरणात डॉक्टर फ्रँकल त्याच्या त्यांच्या ज्ञानाचा आणि घटनांचा स्वतःच्या मनाचा आणि आजूबाजूच्या वातावरणाचा सहसंबंध लावण्याचा प्रयत्न करीत असत ।

त्यावेळी त्यांना आठवले की सिग्मंड फ्रॉइड एकदा म्हणाले होते ,"विभिन्न वृत्तीच्या अनेक माणसांना उपोषणाला बसवा .भुकेची तीव्रता जसजशी वाढू लागेल तसतसे माणसा-माणसातले वरवरचे भेद गळून पडतील आणि त्या जागी दिसेल एका साच्याचे न भागलेल्या भुकेचे प्रदर्शन"

सिग्मंड फ्रॉइडचे हे शब्द प्रत्यक्ष छावणीतील अनुभवांमुळे सत्याच्या कसोटीवर उतरणारे नाहीत हे व्हिक्टर फ्रँकलच्या लक्षात आले. माणसाचा एखाद्या घटनेला प्रतिसाद देण्याचा मार्ग हा पूर्णपणे वेगवेगळा असू शकतो हे त्यांच्या लक्षात आले.

जे लोक पूर्वीच्या आयुष्यात बौद्धिक ,सुसंस्कृत आणि संवेदनशील आयुष्य जगलेली होती त्यांना खरेतर इथला शारीरिक त्रास जास्त जाणवायला हवा होता आणि ज्या लोकांना कष्टाची सवय होती त्यांना छळछावणीचा त्रास कमी जाणवायला हवा होता। मात्र छळछावणीच्या वाईट प्रसंगांमध्ये ठणठणीत प्रकृतीची दिसणारी माणसे ढासळून पडत असताना डॉक्टरांनी बघितले आणि वरवर नाजूक प्रकृतीचे दिसणारे लोक हे मात्र अधिक प्रमाणामध्ये या छावण्यांमधून वाचून बाहेर पडले।

छळछावणी मधून बाहेर पडल्यानंतर देखील जे लोक जीवनाच्या अर्थाकडे, जीवनाकडे सकारात्मक पद्धतीने पाहत होते ते या अमानुष वातावरणाने होरपळून निराशावादी किंवा स्वैर आणि निर्दय झाले नव्हते।तर या दुःखातून बाहेर पडून अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होते. त्याउलट ज्यांचा मनोविकास नीट झालेला नव्हता, अशी छळछावणीतून सुटलेली माणसे ही माणुसकी, मानसिक आरोग्य आणि नैतिकता गमावून बसलेली होती।

 

बाहेर पडल्यावर आपल्या कुटुंबातील सर्वजण आपण गमावले आहे, आई-वडील बायको मुलगा कोणीही आता जिवंत नाही याचा स्वीकार सर्वप्रथम डॉक्टरांना करावा लागला।त्याच काळात छळछावणीतील अनुभवावर आधारित असे Man's search for meaning हे पुस्तक झपाटल्यासारखे डॉक्टरांनी नऊ दिवसात लिहून काढले आणि ते पुस्तक आज लोगोथेरपी चे प्रमुख तत्त्व सांगणारे, मानवजातीचे पुस्तक म्हणून गौरवले गेले. आज यु एस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये लोगोथेरपी हा स्वतंत्र विभाग आहे।

 

ज्यूंच्या यातना शिबिरात आलेले अनुभव आणि त्यानंतर त्यातून जन्माला आलेली ही लोगोथेरपी सध्याच्या काळात न्यूरोसिस या मनोविकृतीने पछाडलेल्या लोकांना संजीवनी जणू ठरले आहे।

 

न्यूरॉसिस म्हणजे बुद्धीजन्य मनोविकार होय।न्यूरॉटिक व्यक्तीला आत्मकेंद्रित आणि आत्मघातकी असे विचार ग्रासून टाकतात आणि मनोविश्लेषणात्मक पद्धतीमध्ये याचे उत्तर सापडत नाही। तेव्हा ही लोगोथेरपी न्यूरॉसिस वर मात करण्यासाठी उपयुक्त ठरते।

 

"लोगो" म्हणजे अर्थ,हा ग्रीक शब्द आहे आणि थेरपी म्हणजे उपचार! लोगोथेरपी म्हणजे जीवनातील अर्थावर, उद्दिष्टांवर आणि ती उद्दिष्टे शोधण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करणे.म्हणजेच जीवनाचा अर्थ शोधणे किंवा जीवनामध्ये हेतू,उद्दिष्ट आणि अर्थ शोधून स्वतःच स्वतःची प्रेरणा होणे होय।

 

फ्रॉइडने सिध्दांत मांडला होता की ,"सुखाला वंचित झालेल्या व्यक्तीच्या सुप्त प्रवृत्ती मनुष्यात उफाळून येतात आणि त्यामुळे मानसिक रोग निर्माण होतात". तर फ्रॉईडचा शिष्य डलर याने मनुष्यामध्ये असलेला न्यूनगंड हा मनोविकाराचे कारण आहे,ते दूर करून माणूस स्वतःला सामर्थ्यवान समजू लागला तर त्याने मानसिक रोग बरे होतील, असे प्रतिपादन केले होते।

 

फ्रॉइडचे मनोविश्लेषण हे "प्लेझर प्रिन्सिपल" म्हणून ओळखले जाते तर डलरचे मनोविश्लेषण हे "पॉवर प्रिन्सिपल" म्हणून ओळखले जाते.मात्र फ्रँकलची लोगोथेरपी ही नीत्शे या तत्वज्ञाच्या एका वाक्यावर आधारित आहे। ते म्हणजे," आपण का जगायचे हे कळाले की कसे जगायचे हे आपल्याला आपोआप समजू लागते."

जीवनातील कोणतीही घटना ही आपल्या ताब्यात नसते हे खरे. परंतु त्या घटनेला प्रतिसाद कसा द्यायचा याचे माणसाचे स्वातंत्र्य हे पूर्णपणे अबाधित असते. हा लोगो थेरपी चा प्रमुख सिद्धांत आहे.

 

त्यासाठी तीन टप्पे सांगितले जातात पहिला म्हणजे कृतिशील राहून काहीतरी अर्थपूर्ण काम करत राहणे. ज्यामुळे शरीराचे आणि मनाचे संतुलन टिकून राहते.

 

दुसरा टप्पा सामाजिक आहे. समाजात यश एकांगी पद्धतीने मोजले जाते. पैशांमध्ये वस्तूमध्ये आणि सामाजिक प्रतिष्ठे मध्ये यश मोजले जाते।अनेकदा हे यश आंतरिक समाधान पणाला लावून मिळवले जाते।

मात्र आंतरिक समाधान पणाला लावून मिळवलेल्या यशाइतकेच आंतरिक जगतामध्ये काही अद्वितीय अनुभवणे तितकेच मोलाचे असते. माणूस म्हणून माणसाला असलेली प्रतिष्ठा मॉल आणि त्याच्या आंतरिक जगतातील अनुभव हे सामाजिक प्रतिष्ठा इतकेच मोलाचे असतात मात्र केवळ दुसऱ्यांच्या नजरेने आपले यश मोजू पाहतो म्हणून ते आपल्याला जाणवत नाही हे लोगो थेरपी शिकवते।

 

तिसरा टप्पा म्हणजे, टाळता न येणारी दुःखद निराशाजनक स्थिती असली तरी, तिला प्रतिसाद देण्याचे आपले स्वातंत्र्य अबाधित असते। तेव्हा ताठमानेने सामना केल्यास स्वत्वाचा प्रत्यय येतो आणि जीवनाच्या हेतूचा शोध लागतो।

 

लोगो थेरपी म्हणते ,जे कमजोर नाहीत त्यांना संरक्षण दिले तर ते कमजोर होऊन जातात।

 

उष्णता, थंडी, कष्ट, घाम यासोबत माणसाला जगता आले पाहिजे।

 

कसोटीच्या काळात मनुष्याच्या बळाचा प्रत्यय येतो। प्रत्येक परीक्षा तुम्हाला उजळून टाकणारी असते। स्वतःला शोषित शिकार आहोत असे मानणे किंवा तुमच्याबरोबर काही वाईट घडले तर एखाद्या स्थितीला किंवा व्यक्तीला त्यासाठी जबाबदार धरणे,त्यातून बाहेर येण्यासाठी दुसऱ्याचा आश्रय घेणे हे तुम्हांला अधिक गर्तेत नेतात.

 

त्याऐवजी स्वयंनिर्भर राहून कोणत्याही घटनेला जेव्हा प्रतिसाद दिला जातो तेव्हा, काळाने कितीही घाव घातला तरी स्वतःला सामर्थ्यवान म्हणून टिकवता येते। तुम्ही तूटला नाही तर मजबूत व्हाल। स्वतः मान्य केल्याशिवाय तुम्ही कमजोर ठरू शकत नाही। श्रद्धा हि बुद्धीला ताकद देत असते।

भारतामध्ये मानसशास्त्र तत्त्वज्ञान अध्यात्म या सगळ्याकडे बघण्याचा आपला एकसंघ दृष्टीकोन असतोच "नायं आत्मा बलहिनेन लभ्य:"हे उपनिषदांनी सांगितलेले तत्व आपल्या सगळ्याच अध्यात्मिक धारा वेगवेगळ्या प्रकारे सांगत असतात ।

मात्र पश्चिमेकडे आधुनिक मानसशास्त्रामध्ये अशाप्रकारे दर्शनशास्त्राचा वापर हा लोगोथेरपीच्या उदयाने सुरू झाला। Men's search for meaning या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणाऱ्या हेरॉल्ड एस. कुशनर या ज्यूईश धर्मगुरूने म्हटले आहे की ऑशवित्झमधल्या विषारी वायूकक्षाचा शोध लावणारा माणूस होता आणि त्या वायूकक्षात ताठमानेने 'शेमा इस्रायल' हे प्रार्थनेचे शब्द ओठावर घेऊन प्रवेश करणाराही माणूसच होता"

अशी ही अर्थगर्भित ,स्वतःही पलीकडे काही शोधू पाहणारी मानवी प्रेरणा मानसशास्त्रामध्ये लोगोथेरपी च्या निमित्ताने उदयास आली आहे।


Powered By Sangraha 9.0