शतप्रतिशत भाजपा होण्यासाठी बाकीच्या गोष्टींची चिंता करता कामा नये. आपल्या पक्षाची मुळे फार खोलवर गेलेली आहेत आणि ती घट्ट आहेत. ती कुणालाही हलविता येणार नाहीत. शतप्रतिशत भाजपा होण्यासाठी आज सगळयात मोठी आवश्यकता आहे ती येणाऱ्या काळात जे परिवर्तन आपल्याला अपेक्षित आहे, त्याचे व्हिजन डॉक्युमेंटेशन करण्याची.
शतप्रतिशत भाजपा होण्यासाठी सर्वप्रथम शिवसेनेचा मोह सोडला पाहिजे. आज ना उद्या शिवसेना आपल्याबरोबर येईल आणि आपण सरकार स्थापन करू, या स्वप्नरंजनात राहण्याचे सोडून दिले पाहिजे. आमची युती तीस वर्षे होती, हिंदुत्व हा आमचा समान बिंदू आहे, वगैरे भाषा बोलणे सोडून दिले पाहिजे. आणि सावरकरांच्या भाषेत म्हटले पाहिजे, 'याल तर तुमच्यासह आणि विरोध कराल तर विरोधाला ठोकरून लावून' आपल्याला पुढे जायचे आहे.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
पुढे जाणे हीच आमची परंपरा आहे, हाच आमचा इतिहास आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मंत्र दिला की, 'चरैवेति, चरैवेति'. जेव्हा जनसंघ स्थापन झाला, तेव्हा शिवसेना नव्हती. जनसंघाला कुणी मित्र नव्हता. पत्थर, काटे तुडवीत कार्यकर्त्यांनी वाटचाल केली. जनसंघ राष्ट्रीय पक्ष झाला. त्याचा इतिहास सतत आठवला पाहिजे. कार्यकर्त्यांना सांगितला पाहिजे आणि शिकविला पाहिजे. या चरैवेतिवर संघाचे सुंदर गीत आहे. त्याचे धुव्रपद असे -
नहीं रुकना, नहीं थकना, सतत चलना सतत चलना।
यही तो मंत्र है अपना, शुभंकर मंत्र है अपना।'
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जनसंघाचा एकच विचार मांडला, तो होता राष्ट्रीय राजकारणाचा. जातीपातीच्या राजकारणाचा नाही, धार्मिक राजकारणाचा नाही, जातींची समीकरणे जुळविण्याचा नाही, जातींची अद्याक्षरे घेऊन त्यांचे शब्द तयार करून राजकारण करण्याचा नाही. हाच वारसा भाजपाकडे अालेला आहे. अटलजी आणि अडवाणीजी यांनी हाच वारसा पुढे चालविला. हाच वारसा नरेंद्र मोदी आणि अमित शाह पुढे नेत आहेत. अटलजी यांनी स्वतःची जात कधी काढली नाही. मोदी स्वतःची जात सांगत नाहीत. मनात एकच भावना असते, ती म्हणजे मी हिंदू आहे आणि हिंदुहित हेच माझे जीवनकर्तव्य आहे.
हिंदू या शब्दात हिंदू समाजातील यच्चयावत जाती येतात. त्यांना वेगळे करण्याचे कारण नाही आणि व्यापक अर्थाने हिंदू या शब्दात मुसलमान, ख्रिश्चन, पारशी असे अन्य धर्मीयदेखील येतात. त्यांच्यासाठी आपला शब्दप्रयोग आहे, हिंदू-मुसलमान, हिंदू-ख्रिश्चन, हिंदू-पारशी. हिंदू कोड बिलाच्या व्याख्येत जैन, शीख, बौध्द सर्वच येत असल्यामुळे कायदेशीरदृष्टया हे सर्व हिंदूच आहेत. म्हणून हिंदुहिताचे राजकारण किंवा हिंदुत्वाचे राजकारण 'सर्वजन हिताय' राजकारण असते. त्यात सर्वांचे कल्याण, कुणावर अन्याय नाही, कुणाला वगळण्याचा विषय नाही. भाजपाने याची घोषणा तयार केली - 'सबका साथ, सबका विकास'. हे वाक्य राजकारणातील हिंदूपण व्यक्त करणारे आहे.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
त्याला पुढे घेऊन गेले पाहिजे. महाराष्ट्राचा विचार करता आज त्याची नितांत आवश्यकता आहे. वृत्तपत्रांना आणि माध्यमांना बातम्या लागत असतात. आज भाजपा सत्तेवर नसल्यामुळे ते बातम्यांसाठी भाजपात अंतर्गत धुसपूस कशी चालू आहे, याचे विषय शोधत राहतात. काही ना काही कारणामुळे नाराज नेत्यांच्या मागे राहतात, त्यांची वक्तव्ये मिळवितात. ती पहिल्या पानावर छापतात. हवा अशी निर्माण करतात की, भाजपात अंतर्गत खूप ताणतणाव आहे आणि भाजपा एकसंघ नाही. तो फुटीच्या उंबरठयावर आहे. अशा सनसनाटी बातम्या आणि लेख छापल्याशिवाय माध्यमांचा टीआरपी वाढत नाही. ज्यांना संघविचारधारा माहीत आहे आणि या विचारधारेतून जन्मलेला भाजपा माहीत आहे, त्यांच्या दृष्टीने या बातम्या केवळ करमणुकीच्या विषय असतात. असे कार्यकर्ते या बातम्या थोडयाही गंभीरतेने घेत नाहीत.
कारण त्यांना हे माहीत आहे की, जातीची समीकरणे ही काही भाजपाची ताकद नव्हे. आणि या समीकरणासाठी भाजपात कार्यकर्ता काम करीत नाही. त्याच्या प्रेरणा फार वेगळया असतात. जातीय समीकरणे मांडणारे कधीही स्वयंसेवकांच्या हृदयात जागा मिळवू शकत नाहीत. त्यांच्या भावविश्वात ते जाऊ शकत नाहीत. संकुचित आवाहन करून गर्दी जमविता येऊ शकते आणि गर्दी बघून, गर्दी जमविणाऱ्याला असे वाटते की, आपली शक्ती खूप मोठी आहे. अशी गर्दी जमविण्याची ताकद महाराष्ट्रात अनेक लोकांच्यात आहे. त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे, राज ठाकरे यांचे. गर्दी जमा होते, पण मतपेटया मात्र रिकाम्या राहतात आणि एखादाच उमेदवार निवडून येतो.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
गावपातळीवरील कार्यकर्ता सलोख्याची शक्ती मागतो. त्याला कलह व भांडणाचा शक्तिक्षय नको वाटतो. तो शिवसेनेने केलेल्या विश्वासघातामुळे अगोदरच प्रचंड दुखावला गेलेला आहे. हक्काची सत्ता असताना आज सत्तेपासून दूर राहावे लागले आहे, याची खंत त्याला सतावते आहे. तो याचा वचपा काढण्याची वाट पाहत आहे. तो लढायला तयार आहे. कष्ट करायला तयार आहे. परिवर्तनासाठी जे आवश्यक असेल, ते सर्व काही करण्यास तो तयार आहे. अशा वेळी भांडणाचे विषय त्याला धक्का पोहचवितात. त्याच्या मनात दुःख निर्माण करतात. हे काय चालले आहे, असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण होतो. काही जणांचा मतदारसंघात पराभव झाला, निवडून येता आले नाही, म्हणजे पक्षाचा पराभव झाला का, पक्षाच्या विचारसणीचा पराभव झाला का, असे त्याच्या मनात येते.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
तो बोलत नाही. त्याला बोलता येत नाही, म्हणून तो बोलत नाही असे नाही. पक्षशिस्तीमुळे तो बोलत नाही. तो लिहीत नाही. त्याला लिहिता येत नाही म्हणून तो लिहीत नाही असे नाही. लिहून फारसा उपयोग होईल का, ही शंका त्याच्या मनात असते. पक्षाच्या नेत्यांनी दोन-चार नेत्यांची चिंता करण्याऐवजी हजारो कार्यकर्त्यांची चिंता करावी. ते कुठे जात नाहीत, कुठे जाणारही नाहीत. त्यांचे स्वप्न आहे शतप्रतिशत भाजपाचे. आता युतीचे राजकारण नको. आता स्वबळाचे राजकारण पाहिजे. ज्या कुणाला आपल्या बरोबर यायचे असेल त्याचे स्वागत करू या. परंतु आमच्या बरोबर यायचे असेल तर आमच्या अटी मान्य करून यावे लागेल. त्याचे पालन करावे लागेल.
आपल्याला शक्तिस्थानावर गेल्याशिवाय पर्याय नाही. शक्तिविरहित राहण्यात काही अर्थ नाही. मुळात काहीच नव्हते, त्या शून्यातून आपण उभे राहिलो आहोत. आज शंभर आहोत, उद्या दोनशे व्हायला वेळ लागणार नाही. ती आपली ताकद आहे. तिची ओळख आपली आपण करून घ्यायला पाहिजे. भाजपा नेतृत्वाने करून घ्यायला पाहिजे. आपण आशावादी असले पाहिजे. पण आपला आशावाद पंचतंत्रातील कोल्ह्याप्रमाणे नसावा.
एक कोल्हा एका बैलाच्या मागे अनेक दिवस फिरत राहिला. बैलाचे लोंबकळणारे वृषण आज ना उद्या खाली पडतील आणि आपल्याला मेजवानी मिळेल, असे त्याला वाटत होते. काही दिवस तो भुकेला राहिला. वृषण काही पडले नाहीत आणि कोल्ह्याला खायला काही मिळाले नाही. आज ना उद्या सरकार कोसळेल, हे बैलाचे वृषण समजले पाहिजे. आपल्या पुरुषार्थाने आपण सरकार बनवू, हा ध्येयवाद ठेवला पाहिजे.
इतिहास अगोदर निर्माण करावा लागतो, नंतर लिहिणारे तो लिहितात. सुभाषचंद्र बोसांची एक आठवण आहे. सेनाधिकारी त्यांच्या बरोबर बसले होते आणि ते म्हणाले, ''आपण आझाद हिंद सेनेचा इतिहास लिहू या.'' सुभाषचंद्रांनी उत्तर दिले, ''अगोदर इतिहास निर्माण करू या, आपले काम ते आहे. नंतर लिहिणारे लिहितील.'' इतिहास निर्माणाच्या कामाला लागण्याऐवजी शिवसेनेच्या मनधरणी करण्याच्या कामी लागणे....
शिवसेनेने आपणहून काडीमोड घेतलेला आहे. आता पुन्हा घरोबा नको. आता आपल्याला 288 मतदारसंघांत आपल्या दोन पायांवर उभे राहायचे आहे. त्याची तयारी आतापासून केली पाहिजे. प्रत्येक दिवस महत्त्वाचा समजून त्याची संघटना बांधली पाहिजे आणि जनसंपर्क जिवंत ठेवला पाहिजे. जातीपातींशी संपर्क नाही, तर वर उल्लेख केलेल्या तमाम हिंदूंशी संपर्क ठेवायला पाहिजे. तोच आपला पिता-परमेश्वर आहे. त्याच्या आशीर्वादाची प्रतीक्षा केली पाहिजे.
vivekedit@gmail.com
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/