परिस्थिती अनुकूल आहे, काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेते आपल्याकडे आलेले आहेत. मोदींची लाट आहे, म्हणून निवडणुकीत बाकी सगळ सपाट होणार आहे, या मनःस्थितीत जर भाजपाची मंडळी राहिली तर फायद्याऐवजी नुकसानच होईल. जबरदस्त मेहनत करून आणि तेवढाच जनसंपर्क करून प्रत्येक जागा जिंकायचीच आहे याच भावनेने सर्वांनी भारावून घेतले पाहिजे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होतील. लोकमताचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, हे राजकारणात हयात घालविणाऱ्यांना पटकन समजते. प्राणी आणि पक्षी यांना आपले आवडते भक्ष्य कुठे आहे, हे उपजत ज्ञानानेच समजते, तसे या राजकारण्यांचे आहे. काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली तरी ते काही सत्तेवर येऊ शकत नाहीत, हे समजल्यामुळे दोन्ही पक्षांतील मातब्बर नेते मोठया संख्येने भाजपात आणि छोटया संख्येने शिवसेनेत जात आहेत. हे स्थलांतर एवढया मोठया प्रमाणात आहे की, लोक आता असे बोलू लागले आहेत की, पवार परिवारातील अमुक-अमुक जण उद्या कोणत्या पक्षात जाणार?
सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे फेसबुक पेज like करावे....
बाहेरून आलेल्यांमुळे शिवसेनेत किती अस्वस्थता आहे, हे मी सांगू शकत नाही, परंतु भाजपात आणि भाजपा सहानुभूतिदारांमध्ये या आयारामांमुळे फार मोठया प्रमाणात अस्वस्थता आहे. अशाच एका कार्यकर्त्याने मला फोन केला आणि अत्यंत अस्वस्थ होऊन त्याने आपल्या मनातील व्यथा बोलून दाखविली. फोन करणारा कार्यकर्ता समाजात मोठी प्रतिष्ठा असलेला व्यावसायिक आहे. अशा कार्यकर्त्यांचे पूर्ण समाधान करणे अतिशय कठीण असते. ते जे मुद्दे उपस्थित करतात, त्यातील एकही मुद्दा दुर्लक्ष करणारा नसतो. अस्वस्थ होण्यात त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो. कारण ते निवडणुकांच्या रिंगणात नसतात.
बाहेरून आलेले पक्षात किती काळ राहतील? पक्षाच्या विचारधारेशी ते बांधील राहतील का? चारित्र्याचे निकष ते पाळतील का? पक्षात गटबाजी सुरू करतील का? सत्तेचा दुरुपयोग करतील का? असे असंख्य प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे शोधणेदेखील अवघड आहे. आलेले नीट वागले तर चांगले आहे. पण त्यांनी आपल्या सवयी सोडल्या नाहीत, तर पक्षाचे कधीही न भरून येणारे नुकसान होईल.
आणखी एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. भाजपात जे आले आहेत, त्यांचा राजकीय स्वार्थ आहे. राजकारण हा निःस्वार्थी लोकांचा अड्डा नसतो. त्यामुळे या मुद्दयावर कोणावर आक्षेप घेता येणार नाहीत. जे भाजपात आलेले आहेत, त्यांचे आपआपल्या क्षेत्रात भक्कम राजकीय काम आहे. त्यांना मोठा जनाधार आहे. त्यांनी लोकहिताची कामे केलेली आहेत. अशी माणसे पक्षाचा जनाधार व्यापक करण्यास उपयुक्त ठरतील.
तरीदेखील भाजपा म्हणून विचार करीत असताना थोडा अधिक खोलात जाऊन विचार करावा लागतो.
निवडणुका पुढच्या महिन्यात आहेत. हा लेख लिहीपर्यंत शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीची घोषणा झालेली नव्हती. त्यामुळे त्याबद्दल निश्चितपणे आता काही लिहिता येणार नाही. युती झाली किंवा नाही, तरीही एक प्रश्न नेहमीच चर्चेला राहणार, तो म्हणजे, शिवसेनेबरोबर किती फरफटत जायचे? शिवसेना सोयीप्रमाणे भूमिका बदलत राहते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ती मोदी प्रशंसक झाली. त्यापूर्वी शिवसेनेने 'चौकीदार चोर आहे' असे म्हणण्यास कमी केले नाही. भाजपाला नाणार प्रकल्प हवा आहे, शिवसेनेने विरोध केला. आरेमध्ये मेट्रो कारशेड उभी राहिली पाहिजे, शिवसेनेने त्याला विरोध केला. मनमोहन सिंग यांनी आर्थिक परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली, शिवसेनेने त्याचे समर्थन केले. शिवसेना आज भाजपाबरोबर राहून पूर्वीप्रमाणे विरोधी पक्षाची भूमिका बजावू इच्छिते.
उद्या युती झाल्यास आणि सत्ता आल्यास शिवसेनेची भूमिका बदलेल, असे नाही. शिवसेनेला स्वतःच्या ताकदीवर महाराष्ट्रात सत्ता मिळवायची आहे. आदित्य ठाकरे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अशी त्यांनी अनधिकृतपणे घोषणा केली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? हे त्यांनीच ठरवायचे आहे; पण लोकांना कोण पाहिजे आहे, हे लोकांनी ठरवायचे आहे. ज्याला सत्तेचा काही अनुभव नाही आणि फक्त घराणेशाहीची शान मागे आहे, तो मुख्यमंत्री होण्याच्या लायक आहे की नाही, हे लोक ठरवतील. जनता आता खूप शहाणी झालेली आहे. गांधी नाव आहे म्हणून या जनतेने राहुलला जवळ केलेले नाही, हा इतिहास तर अगदी ताजा आहे.
आणखी एक विचार मनात येतो की, लोकसभेत यश मिळाले. नरेंद्र मोदी यांच्या नावाने मते मागता येतात, वातावरण अनुकूल आहे. परंतु एवढयावरून यश हमखास आहे या फाजिल आत्मविश्वासात राहू नये. मतदारांच्या मनाचा थांगपत्ता कुणाला लागत नाही. भाजपाला लक्षात घ्यावे लागेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची शक्ती संपलेली नाही. ती नगण्य नाही. राष्ट्रवादीची पैशाची ताकद अफाट आहे. राजकीय डावपेच खेळण्यात आणि मतांची गणिते जमविण्यात शरद पवार कसलेले खेळाडू आहेत. त्यांचे काही सहकारी त्यांना सोडून गेले, म्हणून ते संपले असे जर मानले तर ती घोडचूक होईल. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांची युती जबरदस्त आव्हान देणारी होऊ शकेल. आज राज ठाकरे काही बोलत नाहीत, उद्या ते काही बोलणार नाहीत असे नाही. तेही बोलण्याच्या संधीची वाट बघत असावेत.
हवा अनुकूल आहे, काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेते आपल्याकडे आलेले आहेत, मोदींची लाट आहे, म्हणून निवडणुकीत बाकी सगळ सपाट होणार आहे, या मनःस्थितीत जर भाजपाची मंडळी राहिली तर फायद्याऐवजी नुकसानच होईल. जबरदस्त मेहनत करून आणि तेवढाच जनसंपर्क करून प्रत्येक जागा जिंकायचीच आहे याच भावनेने सर्वांनी भारावून घेतले पाहिजे. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्यात आणि भाजपाची सत्ता येण्यातच महाराष्ट्राचे कल्याण आहे, याबद्दल आपल्या मनात शंका असता कामा नये.
vivekedit@gmail.com