यशस्वी उद्योजक, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते आणि समाजकारणासाठी राजकारणाचा मार्ग स्वीकारणारे अशी ज्यांची ओळख आहे, त्या सचिन शिंदे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग विवेकच्या याआधीच्या अंकात दिला होता. याच मुलाखतीच्या उत्तरार्धासाठी आम्ही त्यांच्या कार्यालयात पोहोचलो. एकच व्यक्ती वर उल्लेखलेल्या तीन भूमिका एकाच वेळी समर्थपणे निभावत असल्याने व्यग्र असणे स्वाभाविक होते. कार्यालयातील गर्दीवरून आणि लगबगीवरून ती व्यग्रता आणि समाजातील लोकप्रियता जाणवत होती. कार्यालयातील कलात्मक सजावट त्यांच्या रसिकतेची साक्ष देत होती. काही वेळातच आम्ही आमच्या मुलाखतीला सुरुवात केली. आमच्याशी बोलत असतानाच व्यावसायिक कामासंदर्भात फोन येतच होते. बहुराष्ट्रीय कंपन्यांशी कामासंदर्भात बोलणी सुरू असल्याचं त्यांच्या संवादावरून लक्षात येत होतं. त्याच वेळी त्यांच्या कंपनीच्या मुंबईतील प्रमुख चार कार्यालयांमधून तेथील कामाचे अपडेट घेणंही एकीकडे चालू होतं. कल्याणमधील त्यांच्या भव्य रिफर्बिश हबमध्ये काही टेक्निकल अपग्रेडेशन चालू असल्याची माहिती बोलण्यातून मिळाली.
‘सध्या कोणता सामाजिक उपक्रम सुरू आहे?’ या आमच्या प्रश्नावर ते तत्परतेने माहिती देऊ लागले - माहीममध्ये नव्याने सुरू केलेल्या आठवडी बाजाराद्दल. या आठवडी बाजाराची संकल्पना भाजपाच्या एका तरुण पदाधिकार्याने मांडल्याबरोबर शिंदे यांनी ती उचलून धरली व त्याला सर्वतोपरी सहकार्य केले. आता माहीमच्या एका मैदानावर दर रविवारी आठवडी बाजार भरू लागला आहे. दादर-माहीमच्या नागरिकांना त्यांच्या दारात स्वच्छ आणि ताजा भाजीपाला अत्यंत वाजवी दरात मिळावा, तसेच ग्रामीण भागातील शेतकर्यांना ग्राहक आणि उत्पादक यांच्यामध्ये कोणताही दलाल न राहता त्यांच्या शेतमालाला थेट योग्य भाव मिळावा, अशी या आठवडी बाजारामागील संकल्पना आहे. या आठवडी बाजाराला त्यांनी आवश्यक ते सर्व सहकार्य केलं आणि माहीमच्या नागरिकांनी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. पहिल्या आठवड्यापासून होत असलेली गर्दी उत्तरोत्तर वाढत चालली आहे. लोकांना हवी ती भाजी त्यांच्या घराजवळच्या मैदानावर सहज उपलब्ध होते आहे. या उपक्रमामुळे, सामान्य माणसांना छोट्या छोट्या गोष्टींतून मिळणार्या आनंदाचा अनुभव त्यांनी आमच्याशी शेअर केला. तसंच या माध्यमातून पक्षालाही योग्य व्यासपीठ आणि चांगला उपक्रम देता आल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं. पक्षाची पाळमुळं रुजवण्यासाठी अशा लोकोपयोगी उपक्रमांची कास धरायला हवी. त्यातून लोकांशी दीर्घकाळ टिकणारी जवळीक निर्माण व्हायला मदत होते, असं त्यांनी नमूद केलं.
कितीही व्यग्रता असो, कार्यकर्ता आधी हे तत्त्व जपणारे सचिन शिंदे मुलाखत थांबवून कार्यकर्त्यांच्या शंकानिरसनासाठी, मार्गदर्शनासाठी वेळ देत होते. भेटीसाठी येणार्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साही तरुणांचा भरणा अधिक होता. दहीहंडीच्या आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या विभागात घेण्याच्या कार्यक्रमासाठी त्यांना आर्थिक पाठबळाची गरज असते. त्यांना यथोचित मदत आणि काही मोलाचे सल्ले दिले जातात. या कार्यकर्त्यांमध्ये काही महिला पदाधिकारी आहेत, त्यांना महिलांसाठीचे कार्यक्रम घ्यायचे असतात. या उपक्रमांसाठी आवश्यक ती आर्थिक मदतही केली जाते. सहकार्य मागण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना शिंदे कधीही निराश करीत नाहीत. हा त्यांचा स्वभावविशेष खूप काही सांगून जातो.
आलेल्यापैकी काही कार्यकर्त्यांना सहकार्याबरोबरच सल्ला हवा असतो, त्यांच्या प्रश्नांना सोल्युशन हवं असतं. त्यांच्या काही छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अडचणींवर शिंदे उपाय सुचवतात. ते उपाय सांगतानाही यातून पक्ष संघटन कसं मजबूत होईल हा विचार जाणवतो.
महाविद्यालयीन जीवनात अभाविपशी जोडले गेल्यानंतर शिंदे यांच्या राजकीय प्रवासाची नकळत सुरुवात झाली. त्यानंतर भाजयुमोच्या दक्षिण मुंबई अध्यक्षपदावर नियुक्ती झाल्यानंतर आपल्यावरील कामाची जबाबदारी आणखी वाढली, असं शिंदे सांगतात. त्यानंतर विनोदजी तावडे आणि आशिषजी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षासाठी विविध पदांवर ते काम करीत राहिले. गेल्या विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुनीलजी राणे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा समर्थपणे पेलली.
त्यांच्या प्रत्येक कामातून तळागाळातील कार्यकर्त्यांसह प्रत्येकाला जोडून घेण्याचं संघटनकौशल्य जाणवतं राहतं. म्हणूनच प्रत्येक उपक्रम राबवताना ते आधी पक्षहिताचा विचार करतात. पक्षाला अगदी खालच्या स्तरापासून बळकटी देण्यासाठी आणि नवमतदारांची बांधणी करण्यासाठी त्यांनी दादर-माहीम मतदारसंघात आजवर विविध प्रयत्न केले. आठवडी बाजारसारख्या वेगळ्या संकल्पना प्रत्यक्षात आणणार्यांचं ते केवळ कौतुक करून थांबले नाहीत, तर स्वतःही त्यात सक्रिय सहभाग घेतला. त्या उपक्रमाला आवश्यक असलेलं आर्थिक बळ दिलं.
विभागातील महिला कोळी भगिनींची अडचण लक्षात घेऊन, भर पावसात भिजत व्यवसाय करणार्या या कोळी भगिनींसाठी मोठ्या छत्र्यांचं वाटप करून त्यांनी जणू संरक्षक छत्रच त्यांच्या डोक्यावर धरलं. या मदतीमुळे कोळी भगिनी त्यांना दुवा तर देतातच, शिवाय भाजपाशी त्या अधिक बांधल्या जातात.
गणेशोत्सव म्हटला की गणपतीबाप्पा मोरयाचा गजर आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घराघरात घुमणार्या बाप्पाच्या आरतीचा आवाज आपल्याला पहिल्यांदा आठवतो. या सणाचं औचित्य साधून शिंदे यांनी दादर-माहीम विभागात एक लाख आरती संग्रह वाटले. त्याचबरोबर ज्या नागरिकांच्या घरी गणपती येतो, अशा दोन हजार घरांमध्ये गणरायाच्या पूजेसाठी अगरबत्ती संचाचंही वाटप केलं. त्याआधी येऊन गेलेल्या ईदलासुद्धा त्यांनी माहीममधील मुस्लीम बांधवांसाठी पाणी-शीतपेयाची सोय केली होती. सणांच्या माध्यमातून विविध धर्मीयांमधील बंधुभाव वाढायला मदत होते, ही भूमिका असल्याचं त्यांनी नमूद केलं.
आमचं बोलणं चालू असताना, एक सर्वसामान्य नागरिकांचा गट त्यांना भेटायला आला. पंचविशीपासून ते साठीपर्यंतच्या लोकांचा यात समावेश होता. त्यात काही अन्य पक्षांचे कार्यकर्तेही होते.
अलीकडेच त्यांनी प्रभादेवीमध्ये पक्षाचे जनसंपर्क कार्यालय सुरू केले. त्याच्या उद्घाटन सोहळ्याला जनसामान्यांनी जी गर्दी केली होती त्यावरून, मा. नरेंद्र मोदीजी आणि मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या लोकप्रियतेची चुणूक पहायला मिळाली, असं ते म्हणाले. लोकांचा हाच उत्साह त्यानंतर घेतलेल्या प्रत्येक उपक्रमांमध्ये पाहायला मिळाला. मग ते प्लास्टिकचे आधार कार्ड असो की ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्र देण्याचा उपक्रम असो, नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादाप्रमाणेच हे उपक्रम यशस्वी होण्यात भाजयुमोच्या टीमचा उत्साहपूर्ण सहभागही महत्त्वाचा आहे, असं शिंदे यांनी आवर्जून नमूद केलं.
मुलाखतीच्या माध्यमातून शिंदे यांनी केलेली कामं सर्वांसमोर ठेवत असतानाच पक्षाचा जनसंपर्क वाढवण्यासाठी त्यांनी आपल्या भागात जे प्रयत्न केले, तेही जाणवण्याजोगे आहेत. अलीकडेच भाजपाचं ‘महासदस्यता अभियान’ देशपातळीवर मोठ्या प्रमाणात पार पडलं. माहीम विभागातूनही या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या परिसरात भाजपा आता घट्ट पाय रोवून उभा आहे, मग ते अगदी प्रभादेवी चौकासमोरच्या गल्लीतील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आणि त्याला मिळालेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद असो किंवा पक्षाचं महासदस्य अभियान असो. नवमतदारांपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हजारो नवीन लोक गेल्या काही काळात भाजपाशी जोडले गेले आहेत. दादर-माहीम परिसरात आता दर आठवड्याला भाजपाचे किमान दोन ते तीन जाहीर कार्यक्रम वा उपक्रम असतात आणि लोक त्याची वाट बघत असतात, हे दृश्य पक्षासाठी खूपच आशादायक आहे. प्रभादेवी-दादर-माहीमसारख्या या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या विभागातून पक्षाला जनाधार मिळवण्यात सचिन शिंदे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांमधून शिंदे यांनी हा परिसर अक्षरशः पिंजून काढून उत्साहाने सळसळता ठेवला आहे. शिवाजी पार्कमधील लायन्स क्लब स्कूल फॉर डेफ या कर्णबधिर मुलांच्या शाळेत कलासाक्षरता वर्ग सुरू करण्यासाठी सचिन शिंदे यांनी घेतलेला पुढाकार हे त्यापैकीच एक उदाहरण होय. यासाठी त्यांनी कलेच्या क्षेत्रात काम करणार्या एका समाजसेवी संस्थेला सहकार्य केलं. समाजात विशेष मूल म्हणून वाढणार्या या मुलांमधील कला जोपासता यावी, त्यांच्यातील कलासाक्षरता वाढीस लागावी या हेतूने हा उपक्रम राबवला जातो आहे. हा उपक्रम पुढील वर्षभर चालू राहणार असून अन्य शाळांपर्यंतही तो आगामी काळात पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
असे उपक्रम एकीकडे, तर त्याच्या जोडीनेच दुसरीकडे मरणोत्तर देहदान तसंच अवयवदानासंदर्भात नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी त्यांनी दादर-माहीम परिसरात एका ट्रस्टच्या माध्यमातून मोहीम राबवली जाते. अशा कार्यक्रमांनी, तसंच सातत्यपूर्ण आणि वेगळेपण जपणार्या उपक्रमांमुळे भाजपाचं दादर-माहीममध्ये ठळक अस्तित्व जाणवू लागलं आहे.
स्वतःच्या उद्योगाचा व्याप यशस्वीरीत्या सांभाळत शिंदे यांनी पक्षीय कामांना गती देऊन तरुण पिढीपासून ज्येष्ठांपर्यंत माहीम विभागात पक्षसंघटना बळकट करण्याच्या कामी घेतलेला पुढाकार आणि मिळवलेलं यश नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. या यशस्वी उद्योजकामागचा दीर्घोद्योगी कार्यकर्ताच त्यामुळे विशेषत्वाने नजरेस भरतो. दीर्घोद्योगी वृत्ती, कामातील सातत्य आणि जनाधार ही वैशिष्ट्यं त्यांची राजकीय कारकिर्द दीर्घ असेल याची ग्वाही देतात.
- विवेक प्रतिनिधी