***मंगेश चव्हाण***
एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या तरुणाने स्वत:
चा रोजगार उभा केला.
खासगी साखर कारखान्यात संचालक व वाहन खरेदी-
विक्रीच्या उद्योगातून त्याने सतत कार्यतत्पर कार्यकर्ता अशी आपली ओळख निर्माण केली.
हे तरुण नेतृत्व म्हणजे चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे येथील मंगेश रमेश चव्हाण.
सिव्हिल इंजीनियरिंगचे शिक्षण घेतलेले मंगेश चव्हाण यांचे कुटुंबच भाजपाचे आहे.
वडील रमेश गोविंद चव्हाण भाजपाचे गावातील कार्यकर्ते.
सध्या ते चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आहेत.
घरात भाजपानुकूल वातावरण असल्याने मंगेशदेखील भाजपाचे काम करू लागले. “
सामान्यांना बरोबर घेऊन तळागाळातील जनतेपर्यंत विकास नेण्यासाठी काम करतोय,
करीत राहीन”
असे विचार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
त्यांचे कार्य व त्यांचे भावी स्वप्ने याविषयी त्यांच्याशी केलेली बातचीत.
आपला राजकारण प्रवेश कसा झाला?
वडीलच गावपातळीवरचे कार्यकर्ते असल्याने लहानपणापासूनच पक्षाच्या कामात सक्रिय झालो. 1999च्या आणि 2004च्या विधानसभा निवडणुकीत आमदार साहेबराव घोडे हे पक्षाचे उमेदवार होते. त्या दोन्ही निवडणुकांत मी घोडे सरांसाठी प्रचारात सहभागी होतो. हाच माझा राजकारण प्रवेश म्हणावा लागेल. नंतरच्या वाडीलालभाऊ राठोड यांनी विधानसभा लढविली, तेव्हाही सक्रिय होतो.
आपले राजकारणातील मार्गदर्शक कोण?
साहेबराव घोडे सर हे माझे या क्षेत्रातले खरे गुरू. घोडे सरांबरोबर दोन निवडणुकींच्या कामात सहभागी होतो. त्यांच्याकडून बरेच शिकता आले. त्यानंतर खासदार उन्मेषदादा पाटील यांच्यासह विधानसभा व नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा संभाळली. चाळीसगाव तालुक्याचे अनेक वर्षे आमदार असलेल्या घोडे सरांप्रमाणे खा. उन्मेषदादा हे माझे मार्गदर्शक आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीषभाऊ ह्यांच्या मार्गदर्शनामुळे तालुका स्तरावर पोहोचता आले.
राजकीय कारकिर्द कशा प्रकारे घडली?
1999पासून प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रचारात आहे. तालुक्याच्या राजकारणाचा अनुभव आल्यानंतर गावातील राजकीय चित्र बदलण्यास सुरुवात केली. 2010मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करून भाजपाचे पॅनल निवडून आणले. भाजपाचे सदस्य नोंदणी अभियान तालुकाभर राबविले.
आपण राबविलेले सामाजिक उपक्रम कोणते?
सामाजिक उपक्रमांची सुरुवात स्वत:च्या गावापासून केली. शिक्षण हा विकासाचा पाया आहे हे समजून त्यासाठी विविध उपक्रम राबविले.
मागील 15 वर्षांपासून वेळोवेळी गरजू विद्यार्थ्यांना विविध प्रकारची मदत उपलब्ध करून दिली. हिंगोणे गावात गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी संगणक कक्षाची उभारणी केली. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा डिजिटल करण्यासाठी मदत उपलब्ध करून दिली. चाळीसगाव शहरातील व तालुक्यातील विविध शाळांच्या 10 हजार विद्यार्थ्यांना दफ्तर व शालेय साहित्य वाटप केले. विविध शाळांमध्ये मिनी सायन्स लॅब उभारून दिली. रोजगाराभिमुख शिक्षणाचा विचार करून तरुणांमध्ये कौशल्य विकास व्हावा यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या.
शिक्षण आणि खेळ याचे महत्त्व मोठे आहे हे लक्षात घेऊन तालुक्यातील खेळाडूंना वेळोवेळी विविध प्रकारचे क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले. तसेच खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून ठिकठिकाणी कबड्डी स्पर्धांचे, कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले. तालुक्यातील अनेक व्यायाम मंडळांना व्यायाम साहित्य उपलब्ध करून दिले.
शेतकरी हा केंद्रबिंदू मानून तालुक्यात काही गोष्टी केल्या. दुष्काळाने पोळलेल्या बळीराजाच्या गुरांना चारा मिळेना, म्हणून तालुक्यात रोहिणी येथे चारा छावणी सुरू केली. तिथे 1300 गुरांच्या चारा-पाण्याची सोय झाली. गुरांसोबत आलेल्या पशुपालकांच्या एका वेळच्या जेवणाचीदेखील येथे सोय केली. वलठाण धरणातील गाळ उपसून शेतकर्यांच्या शेतात गाळ उपलब्ध करून दिला. दहीवद येथे गावातील पाणीपुरवठा करणार्या विहिरीजवळील तलावाचा गाळ उपसून त्याची साठवण क्षमता वाढविली.
विकासकामांबरोबर पर्यावरण रक्षणाची काही कामे केली आहेत. अनेक ठिकाणी केलेले वृक्षारोपण ह्याचे एक उदाहरण असून शहरात प्लास्टिकमुक्तीसाठी एक अभिनव उपक्रम राबविला. शहरात मोठ्या प्रमाणात कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
स्वत: वृत्तीने धार्मिक असल्याने अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतो. वारकरी संप्रदायाचे संस्कार असल्याने सुमारे 2300 वारकर्यांना पंढरपूरची वारी घडवून आणली. तालुक्यातील अनेक गावांमध्ये कीर्तन सप्ताहांचे व भागवत कथांचे प्रायोजन केले. विविध गावांतील भाविकांना तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी मदत उपलब्ध करून दिली. चाळीसगावचा एकदंत हा गणेश महोत्सव सुरू करून त्याद्वारे अनेक सामाजिक उपक्रम राबविले. तालुक्यातील अनेक भजनी मंडळांना भजन साहित्य भेट दिले.
‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ मानून विविध उपक्रम राबविले. त्यानुसार तालुक्यातील अनेक रुग्णांना मुंबई, पुणे, नाशिक येथील दवाखान्यांमध्ये विविध प्रकारची मदत उपलब्ध करून दिली. तालुक्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करून अनेक नेत्ररुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मदत केली.
समाजसेवेनंतर माझा राष्ट्रसेवेवर अधिक भर आहे. त्यासाठी मी विविध प्रेरणादायक उपक्रम राबविले आहेत. 15 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा सन्मान यात्रा आयोजित केली. यानिमित्तानेच स्वाभिमान महोत्सवाचे आयोजन केले होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘जागर देशभक्तीचा’ हा गीतगायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यानिमित्ताने ‘शिवसह्याद्री’ या छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित दोन दिवसीय महानाट्याचे आयोजन केले. याशिवाय गडकिल्ले संवर्धनासाठी सहकार्य केले.
राजकारणात आल्यानंतरचे ध्येय काय?
कृषी, आरोग्य, विद्यार्थी व सांस्कृतिक या क्षेत्रांसाठी काम करायचे हे ठरविले आहे. तालुक्याचा विविधांगांनी विकास साधायचा हे ध्येय ठरले असून खा. उन्मेषदादा, ज्येष्ठ नेते गिरीषभाऊ यांचे मार्गदर्शन असल्याने ते साध्य करण्यासाठी मी कंबर कसणार आहे. तळागाळातील जनतेला सोबत घेऊन मी काम करणार आहे. माझ्याबरोबर असणार्या तरुण कार्यकर्त्यांचेही त्यासाठी मला सहकार्य मिळत आहे.
- मुलाखत : चिंतामण पाटील