काँग्रेसने भाजपाला आणि भाजपाच्या विचारधारेला क्रमांक एकचे शत्रू मानले. शरद पवारांनी 'हिंदू दहशतवाद' हा शब्दप्रयोग दिला. कथित हिंदू दहशतवादी पकडले. एका संन्यासीवर घोर अत्याचार केले. त्याच पक्षाची मंडळी आता हिंदुहिताची चिंता करणाऱ्या भाजपात जात आहेत. त्यांच्याही मनात फडणवीस यांच्याप्रमाणेच हिंदुहिताचा विचार सदैव राहावा, अशी आपण अपेक्षा करू या. त्यांच्या चांगलेपणावर विश्वास ठेवू या.
अखेरशेवटी गणेश नाईक आणि हर्षवर्धन पाटील यांचा भाजपात प्रवेश झाला आहे. दोन्ही काँगे्रसमधून येणाऱ्या नेत्यांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून गेले आहेत की, ''या पक्षांची विचारधारा आणि कार्यक्रम योग्य नसले, तरी अनेक माणसे चांगली आहेत, चांगला विचार करणारी आहेत. त्यांना पक्षात घेतले पाहिजे.''
एकेकाळी काँग्रेसने भाजपाला आणि भाजपाच्या विचारधारेला क्रमांक एकचे शत्रू मानले. शरद पवारांनी 'हिंदू दहशतवाद' हा शब्दप्रयोग दिला. कथित हिंदू दहशतवादी पकडले. एका संन्यासीवर घोर अत्याचार केले. त्याच पक्षाची मंडळी आता हिंदुहिताची चिंता करणाऱ्या भाजपात जात आहेत. त्यांच्याही मनात फडणवीस यांच्याप्रमाणेच हिंदुहिताचा विचार सदैव राहावा, अशी आपण अपेक्षा करू या. त्यांच्या चांगलेपणावर विश्वास ठेवू या.
भाजपात होत असलेली ही भरती अनेकांना मनापासून आवडत नाही. कालपर्यंत ज्यांनी आपल्याशी टोकाचे शत्रुत्व केले, त्यांना जवळ कशासाठी करायचे? त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न का करायचे? वर्षानुवर्षे जे पक्षात राहिले, त्यांना का डावलायचे? असे सर्व प्रश्न उभे राहतात.
देशाचा विचार करता 2014मध्ये देशामध्ये क्रांतिकारक परविर्तन झाले. राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि मी सगळयात शेवटी, हा विचार जगणारे सत्तेवर आले. जनतेला त्यांचा राज्यकारभार आवडला, म्हणून जनतेने 2019 साली पुन्हा त्यांना सत्तेवर बसविले. आज देशात समाजवाद, सेक्युलॅरिझम याची कुणी चर्चा करीत नाही. आज सर्व देश, 'देशाची' चर्चा करतो. विक्रम लँडर हे नाव आता घरोघर झालेले आहे. म्हटले तर ते यंत्र आहे, पण ते सजीव होऊन आपल्या प्रत्येकाच्या घरात आलेले आहे. देशभक्तीचा विषय इतका व्यापक झालेला आहे.
हा विषय व्यापक करणाऱ्या भाजपाला व्यापक होण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. आपल्या घरचे दरवाजे बंद करता येणार नाहीत. जे लायक आहेत, त्यांना जवळ करावेच लागेल. सर्व सज्जनांना बरोबर घेऊन वाटचाल करावी लागेल. सगळेच आपले आहेत. काही आमच्या अगदी जवळ आहेत, काही घरात आहेत, काही दूर आहेत, ही वृत्ती ठेवावी लागेल.
आपल्या देशात दोन प्रकारच्या मनोवृत्ती एकाच वेळी काम करत असतात. एक मनोवृत्ती आपल्या प्राचीन वारशाच्या केंद्राकडे जाणारी असते आणि दुसरी मनोवृत्ती या वारशापासून दूर खेचणारी असते. या दुसऱ्या मनोवृत्तीचे प्रतिनिधित्व काँग्रेस नावाच्या विचारधारेने केलेले आहे. ती आपल्या हिताची नाही. आपल्या देशाचे कल्याण तिच्यात नाही. यासाठी पहिली मनोवृत्ती बळकट करण्याचे काम, हेच महत्त्वाचे काम आहे. राजकीय क्षेत्रात जेवढे लोक आपल्याबरोबर येतील त्यांना घेऊन हे काम करावे लागेल.
देवेंद्र फडणवीस यांनी हे काम अत्यंत प्रामाणिकपणे सुरू केलेले आहे. ते म्हणतात की, ''माझ्याकडे गमाविण्यासारखे काही नाही. ज्याच्याकडे गमाविण्यासारखे काही नसते, तोच कमावू शकतो. म्हणून व्यापक अर्थाने आज जे आपल्या जवळ येतात, त्यांचे स्वागत केले पाहिजे आणि त्यांना पचवून टाकले पाहिजे.''