सुवर्ण महोत्सव - विश्वासाच्या अधिष्ठानाचा

30 Aug 2019 14:44:44

डोंबिवली हे जिल्ह्याचे नव्हे, तर तालुक्याचेही ठिकाण नाही. अशा गावात 1970 साली संघमंडळींनी सुरू केलेली ही बँक. ती ही, लगतच्या कल्याण शहरात नुकतीच एक सहकारी बँक बुडाल्याच्या पार्श्वभूमीवर. त्यामुळे समाजात ओळख निर्माण करणं, विश्वास निर्माण करणं आणि स्थिरस्थावर होणं हे आव्हान होतं. सहकाराच्या मंत्राने भारलेल्या सर्वांनी हे आव्हान नुसतं पेललंच नाही तर यशस्वीपणे पेललं. 

स्थापनेपासून सातत्याने ''वर्गात येणारी, दर वर्षी मागील वर्षाहून जास्त नफा प्राप्त करणारी, त्या नफ्यातून नियमांप्रमाणे देता येईल ती कमाल रक्कम दर वर्षी समाजोपयोगी कामांसाठी देणारी, प्रतिवर्षी चांगल्या दराने लाभांश देणारी अशी ही बँक. अखिल भारतीय पातळीवर पहिल्या 15 सहकारी बँकांमध्ये आज या बँकेचा समावेश होतो. आज ही बँक सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त या बँकेची संक्षिप्त माहिती देणारा हा लेख.

1969च्या सुमारास नुकतेच बँकांचे राष्ट्रीयीकरण जाहीर केले गेले होते. अनेक बँका समाजाभिमुख होण्याचा प्रयत्न करीत होत्या. त्या काळात नवीन खाजगी बँकांचे पेव फुटलेले नव्हते. सहकारी बँकांचाही म्हणावा तसा जम बसला नव्हता. अशा वातावरणात एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेल्या डोंबिवलीतील संघविचारांच्या काही तरुणांनी एकत्र येऊन डोंबिवली नागरी सहकारी बँकेची स्थापना केली. दि. 6 सप्टेंबर 1970 रोजी ही बँक सुरू झाली. स्थापनेच्या वेळीच संस्थापक संचालकांनी द्रष्टेपणाने अनेक चांगल्या गोष्टींचा भक्कम पाया घातला, ज्यामुळे आज डोंबिवली नागरी सहकारी बँक देशातील अग्रगण्य सहकारी बँकांपैकी एक म्हणून ओळखली जात आहे.

बँकेला पहिल्या आर्थिक वर्षातही झालेल्या निव्वळ नफ्यातून, तत्कालीन तरतुदींप्रमाणे नफ्याच्या 10 टक्के रक्कम म्हणजेच रू. 38.41 धर्मादाय निधीसाठी राखून ठेवण्याचा पायंडा हा त्यापैकीच एक. त्याचप्रमाणे संचालकांनी बँकेचे विश्वस्त म्हणून काम करायचे, कोणताही भत्ता घ्यायचा नाही हा दंडक संचालकांनी स्वतःच घालून घेतला. संचालक निधी या स्वरूपात हा भत्ता असून त्यातून आपत्तिग्रास्तांना सहाय्य केले जाते. तसेच बँकेतून कोणत्याही प्रकारचे कर्ज स्वतःसाठी घ्यायचे नाही, हा स्वयंशिस्तीचा आणखी एक धडा संस्थापक संचालकांनी घातला. यातून डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे वेगळेपण उठून दिसते.

1996मध्ये बँकेला शेडयूल्ड दर्जा प्राप्त झाल्यानंतर बँकेची घोडदौड अधिक वेगाने चालू राहिली. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग चोखाळत बँकेचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले, जेणेकरून बँकेला उत्तुंग भरारी घेण्याची क्षमता बाळगता येईल. या सर्वांचा आज निश्चितच फायदा होताना दिसतो आहे.

शाखाविस्तार

1978मध्ये बँकेने डोंबिवली शहराबाहेरची पहिली शाखा कुळगाव (बदलापूर) येथे सुरू केली. तर 2002-2003मध्ये प्रथमच ठाणे जिल्ह्याबाहेर शाखाविस्तार केला. त्याच आर्थिक वर्षामध्ये फोर्ट (मुंबई) आणि पुणे या ठिकाणी शाखा सुरू करून जिल्ह्याबाहेर सीमोल्लंघन केले. 2005-2006च्या सुमारास भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तत्कालीन धोरणाप्रमाणे सहकारी बँकांना शाखाविस्ताराची अनुमती मिळत नव्हती. परिणामी सहकारी बँकांच्या व्यवसायवृध्दीवर, विस्तारावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे अन्य सहकारी बँकांना आपल्या बँकेत विलीन करून घेणे असा पर्याय काही सहकारी बँकांनी निवडला. विस्ताराचा हा पर्याय अवलंबत 2007 साली इचलकरंजी येथील श्री शिवनेरी सहकारी बँक व 2010 साली डोंबिवली येथील सुवर्ण मंगल महिला सहकारी बँक या दोन बँकांचे आपल्या बँकेत विलीनीकरण झाले. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वदूर भागांमध्ये डोंबिवली बँकेचा विस्तार झाला.

2008 साली बँकेने महत्त्वपूर्ण असा 1,000 कोटी रुपये ठेवींचा टप्पा पार केला. 2017 साली बँकेला बहुराज्यीय सहकारी बँक (Multi State Co-op. Bank) असा दर्जा मिळाला. त्यामुळे महाराष्ट्र राज्याबाहेरही डोंबिवली बँकेचा शाखाविस्ताराचा मार्ग मोकळा झाला. आज रोजी बँकेच्या मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद व नागपूर अशा 15 जिल्ह्यांमध्ये 69 शाखा कार्यरत आहेत. बँकेचा एकूण व्यवसाय7,700 कोटी रुपयांहून अधिक आहे. वार्षिक निव्वळ नफा सुमारे 38 कोटीच्या आसपास आहे. सातत्याने '' ऑडिट वर्ग मिळविणारी, सभासदांना प्रतिवर्षी चांगला लाभांश वितरित करणारी, तसेच प्रतिवर्षी वर्धिष्णू नफा कमविणारी बँक म्हणून डोंबिवली बँक ओळखली जाते.



भारतीय रिझर्व्ह बँकेने, तसेच केंद्रीय सहकार खात्याने आपल्या बँकेस 49 कोटीचे Perpetual Non-Cumulative Preference Shares (PNCPS) भांडवल उभारण्यास नुकतीच अनुमती दिली आहे. अशा प्रकारच्या भांडवल उभारणीस देशात फारच थोडया सहकारी बँकांना अनुमती मिळाली आहे. अनिवासी भारतीयांच्या ठेवी (NRE Deposits) स्वीकारण्यासाठीही बँकेच्या सर्व शाखांसाठी रिझर्व्ह बँकेकडून परवानगी मिळाली आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार

बँकेने 2007 या वर्षीपासूनच महत्त्वपूर्ण अशा कोअर बँकिंग प्रणालीचा अवलंब सुरू केला. या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत असताना सर्व शाखा आज एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. खातेदारांना आपल्या खात्याचे व्यवहार कोणत्याही शाखेतून करणे शक्य झाले आहे. देशभरातील राष्ट्रीयीकृत तसेच खाजगी बँकांच्या विविध शाखांमध्ये आर.टी.जी.एस.द्वारे, तसेच एन.ई.एफ.टी.द्वारे तत्काळ पैसै पाठविण्याची सोय उपलब्ध आहे.

शहरांबरोबरच ग्राामीण भागातील जनतेलाही बँकिंग सेवेचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा या हेतूने तलासरी, अनगाव, विक्रमगड सारख्या ठाणे/पालघर जिल्ह्यातील वनवासी/ग्राामीण भागांतील ठिकाणी शाखा सुरू केल्या. कुळगाव, शहापूर यासारख्या ठिकाणी पहिले ए.टी.एम. डोंबिवली बँकेने सुरू केले, हे अभिमानाने नमूद करावेसे वाटते. टिटवाळयासारखे उपनगरीय ठिकाणे बाँबे क्लिअरिंगच्या व्यवस्थेत आणण्यासाठी डोंबिवली बँकेने विशेष प्रयत्न केले, त्यात योग्य ते यश आले. आज बँकेच्या 69 शाखांपैकी 65 ठिकाणी ए.टी.एम. आहेत, तर 41 ठिकाणी ई-लॉबी कार्यरत आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीबाबत एन.पी.सी.आय.सारख्या संस्थांनीही आपल्या बँकेवर विश्वास दर्शविला आणि पथदर्शक प्रकल्प (Pilot Project) म्हणून आपल्या बँकेची निवड केली. त्यामुळेच मोबाइल बँकिंग (I.M.P.S.) तसेच रुपे डेबिट कार्ड ग्राहकांना उपलब्ध करून देणारी आपली पहिली सहकारी बँक ठरली. मा. राष्ट्रपतींच्या हस्ते रुपे डेबिट कार्डाचे वितरण झाले. त्या ऐतिहासिक सोहळयास अनेक मोठया सरकारी व खाजगी बँकांबरोबर डोंबिवली बँकेलाही राजधानी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले होते. याच अनुषंगाने आज भारत सरकारचे BHIM तसेच UPI या ऍपशी आपली बँक संलग्न असून भारत बिल पेच्या (B.B.P.S.च्या) माध्यमातून व्यापारी देणी देणे व स्वीकारणे सहज शक्य झाले आहे. आपल्या बँकेने व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक यांना पॉइंट ऑफ सेल (POS) मशीन्स उपलब्ध करून दिली आहेत. विविध पेमेंट ऍप्समुळे क्यू.आर. कोडद्वारा पैसे स्वीकारण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्या सर्व ऍप्सशी - उदा. भीम, गूगल पे, फोन पे, पेटीएम इत्यादींशी आपल्या बँकेचे खाते संलग्न करता येते. त्यामुळे आपल्या खातेदारांना त्यांची येणी क्यू.आर. कोडद्वारे सहज, अल्पवेळात स्वीकारता येतात. अनेक दुकानदार, हाउसिंग सोसायटया, हॉटेल व्यावसायिक, केमिस्ट इत्यादी या सुविधेचा लाभ घेत आहेत.

आपल्या बँकेच्या ग्राहकांना रुपे व प्लॅटिनम डेबिट कार्डमुळे ऑनलाइन शॉपिंगची सुविधाही मिळते आहे.

अन्य सुविधा

सर्वांसाठी एकाच छत्राखाली सर्व सेवा देता याव्यात, या हेतूने सर्वसाधारण विम्यासाठी बजाज अलायन्स, आयसीआयसीआय लोम्बार्ड व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्यासमवेत, जीवन विम्यासाठी एचडीएफसी लाइफ, कोटक लाइफ याच्यासमवेत व आरोग्य विम्यासाठी रेलिगेअर हेल्थ इन्शुरन्स यांच्यासमवेत सामंजस्य करार झाला आहे. या अनुषंगाने वय वर्षे 61हून अधिक असलेल्या बँकेच्या खातेदारांना 'सिनियर केअर' आरोग्य विमा या नावाने विशेष सुविधा उपलब्ध केली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक याचा लाभ घेत आहेत. रेलिगेअर कंपनीने डोंबिवली बँकेच्या अन्य ग्राहकांसाठी तुलनेने खूपच कमी अशा प्रिमियम रकमेची 'DNS संजीवनी' ही आरोग्य विमा योजना उपलब्ध करून दिली आहे, ज्याचा हजारो खातेदार लाभ घेत आहेत.

म्युच्युअल फंड व्यवसायासाठी रिलायन्स कॅपिटल, तसेच कोटक म्युच्युअल फंड यांच्यासमवेत सामंजस्य करार झाला आहे.

पुरस्कार

सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेऊनच सर्व संचालकांनी, अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी प्रारंभापासूनच काम केले, म्हणूनच महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स असोसिएशन / महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनचा 1990-91, 2011-12, 2012-13, 2013-14या वर्षांचा उत्कृष्ट बँकेचा मानाचा पुरस्कार आपल्या बँकेला मिळाला. त्याचप्रमाणे, सहकार भारती या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने योजलेल्या उत्कृष्ट अहवाल स्पर्धेतही बँकेला 2011-12, 2016-17या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अहवालाचे पारितोषिक प्राप्त झाले. बँको या मासिकाच्या वतीनेही 2017-18 या आर्थिक वर्षातील कामगिरीसाठी बँकेला गौरविण्यात आले.

सामाजिक जाणीव

बँकेने आतापर्यंत सहकार, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, वनवासी अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुमारे 200 निरनिराळया संस्थांना धर्मादाय निधीतून आजपर्यंत साडेतीन कोटी रुपयांहून अधिक रकमेचे अर्थसाहाय्य केले आहे. सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या कार्यकर्त्यांस किंवा संस्थेस एक लाख रुपये रोख व मानपत्र याचा समावेश असलेला समाजमित्र पुरस्कार देण्यात येतो.

तसेच, सहकार क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तीस अथवा संस्थेस सहकार मित्र पुरस्कार देण्यात येतो. 51,000 रुपये रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पर्यावरण दक्षता मंडळ, ठाणे तसेच अनुलोम या संस्थेच्या वतीने अनुक्रमे रुंदे (टिटवाळा) व नांदिवली (श्रीमलंग रोड) येथील आर.टी.ओ.च्या जागेत योजलेल्या वृक्षारोपण उपक्रमात बँकेचे संचालक, अधिकारी-कर्मचारी तसेच ग्राहकही सहभागी झाले होते.

सभासदांसाठी व ग्राहकांसाठीचे उपक्रम

आज एक लाखाच्या आसपास सभासद व सुमारे साडेसहा लाख इतकी ग्राहकसंख्या आहे. बँकेने सभासद कल्याण निधी निर्माण केला आहे. त्याद्वारे बँक सभासदांसाठी विविध लाभार्थी योजना राबवीत असून सभासदांच्या आरोग्यविषयक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी केली जाते. दर दोन-तीन वर्षांतून प्रत्येक शाखेत सभासद ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले जाते.




नियमित बँकिंगबरोबरच बँक सभासदांकरिता, तसेच ग्राहकांकरिता विविध उपक्रम राबवीत असते. त्यापैकी एक म्हणजे बँक प्रतिवर्षी प्रकाशित करीत असलेली दिनदर्शिका (कॅलेंडर). बँकेच्या ग्राहकांकडून विविध प्रकारचे लेख, कविता, फोटो, पेंटिंग्ज मागवून दिनदर्शिकेमध्ये त्यांचा समावेश केला जातो. गेली काही वर्षे हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे. त्यास ग्राहकांचा, सभासदांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. डोंबिवली बँक ही हा उपक्रम राबविणारी एकमेव बँक असेल.

प्रतिवर्षी घरगुती गणपती आरास स्पर्धेचेही आयोजन बँक करते. अनेक ग्रााहक यात भाग घेतात. उत्कृष्ट सजावट करणाऱ्या दहा ग्राहकांस रोख बक्षिसे व प्रमाणपत्राने गौरविले जाते. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सवांकरिता आरास स्पर्धेचे व विसर्जन मिरवणुकीसाठीही स्पर्धेचे आयोजन केले जाते. यामध्ये पर्यावरणपूरक सजावटीस व पारंपरिक प्रकारच्या शिस्तबध्द मिरवणुकांना प्राधान्य दिले जाते. सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास रोख बक्षीस व प्रमाणपत्र दिले जाते.

प्रतिवर्षी बँक स्वातंत्र्यदिनी तसेच प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करते. यास विविध मान्यवरांना आमंत्रित केले जाते. या वेळी बँकेतील कर्मचारी, अधिकारी तसेच ग्राहकही उपस्थित असतात.

मान्यवरांच्या भेटी

विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सामाजिक/राजकीय क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तींनी बँकेस भेट दिली आहे. कुळगाव शाखेचे उद्घाटन व स्व-वास्तूत स्थलांतर झाले त्या वेळी तत्कालीन मा. सरसंघचालक बाळासाहेब देवरस, तर शहापूर शाखेच्या उद्धाटनसमयी मा. मोरोपंत पिंगळे, अनुदान वितरण समारंभास माजी पंतप्रधान मा. अटलबिहारी वाजपेयी, ठाकुर्ली शाखेच्या उद्धाटन समारंभास नानाजी देशमुख, नाशिक शाखेच्या उद्धाटन प्रसंगी मा. भैयाजी जोशी यांनी भेटी दिल्या आहेत.

कर्मचारी संबंध

बँकेचे व्यवस्थापन व कर्मचारी/अधिकारी यांच्या संघटना यांचे संबंध खरोखरच सलोख्याचे असून बँकेने नुकतीच 5.70 कोटी रुपयांची पगारवाढ केवळ Unionized Staffसाठी देऊ केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी या वेळच्या पगारवाढीतील काही रक्कम Linked to Individual Performance अशी असणार आहे. अशा प्रकारचे Performance Linked Pay Structure सर्व कर्मचाऱ्यांसाठी आणणारी ही पहिलीच सहकारी बँक आहे. यामधे कर्मचारी संघटनेनेही अत्यंत कौतुकास्पद भूमिका बजावली आहे.

आर्थिकदृष्टया, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने समृध्द अशी सक्षम बँक बनवत असताना, संवेदना न गमवता, सामान्य माणसाच्या हितासाठी काम करण्याचा, तसेच ग्रामीण भागात आपला पाया विस्तारण्याची, भक्कम बनविण्याची योजना अंमलात आणण्याचा निर्धार संचालक मंडळाने सुवर्णमहोत्सवाच्या निमित्त व्यक्त केला आहे.

- सपना कदम आचरेकर

Powered By Sangraha 9.0