बडी सूनी सूनी है

03 Aug 2019 16:28:49

अत्यंत संवेदनशील आणि हळवी माणसे आयुष्याच्या अशा वळणावर आली तर खचतात. सुन्न होतात. योग्य ती मदत, सोबत मिळाली नाही तर जगापासून, स्वतःपासूनही तुटत जातात. भावनांच्या कल्लोळात हरवतात आणि शेवटी दगड बनतात.कितीही विसरायचा प्रयत्न केला तरीही न दिसणारे दुःख मनाच्या तळाशी ठुसठुसत राहते.


 

अगदी जवळच्या मैत्रिणीचा अनुभव आहे. अचानक एका अपघातात नवरा गेला. त्यालाही आता वर्ष झाले आहे. तशी ती सावरली आहे. नोकरी, घर, मुलांचा अभ्यास, परीक्षा, प्रमोशन, त्याचा झालेला आनंद सगळे काही सुरळीत चालू आहे. काळ आणि जीवन कुणासाठीही थांबत नाही. तरीही जाणवणारे रिकामपण, न सांगता येणारी सल, काहीतरी खास हरवल्याची जाणीव मात्र मन पोखरून टाकत आहे.

अनेक वेळा दुःखाचा पहिला ओघ संपला की उरलेले जीवन साद घालते. दैनंदिन आयुष्यातील कामे तर थांबलेली नसतात. माणूस उठतो, कामाला लागतो. दुःख तसेच मनाच्या एका कोपऱ्यात पडून राहते. त्याला वाट मिळत नाही. उभे राहण्यासाठी, नकारार्थी भावनांना माणूस प्रयत्नपूर्वक दाबून टाकतो, पण त्याच वेळी आनंद, उत्साह याही भावना आटतात. मनात उदासी साकळून येते. अर्थ माहीत नाही, कारण कळत नाही, पण डोळे उगाच भरून येतात. एक हताशपणा जाणवत राहतो. काय करावे ते समजत नाही, काही करावेसे वाटतही नाही. मन दगड होते. येणारा दिवस यंत्रवत पुढे ढकलला जातो. नैराश्य दूर करण्यासाठी माणूस कामात गुंतवून घेतो, कधी व्यसनात अडकतो, हल्ली सोशल मीडियाच्या आभासी जगात रमतो. या साऱ्याचा उपयोग नसतोच. कितीही विसरायचा प्रयत्न केला तरीही न दिसणारे दुःख मनाच्या तळाशी ठुसठुसत राहते.

अजब दुख भरी हैं ये, बेबसी बेबसी

बडी सूनी सूनी है, जिंदगी ये जिंदगी

1975मध्ये हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित 'मिली' प्रदर्शित झाला. एका आनंदी, खटयाळ, प्रेमळ मुलीची ही गोष्ट. गोष्ट घडते मुंबईतील एका सोसायटीत. ह्या मुलीचे सर्वांवर प्रेम आहे. सगळयांशी गट्टी आहे. तिच्या मनमोकळया स्वभावामुळे मिली (जया भादुरी) सोसायटीतील सर्वांची लाडकी आहे.

मध्यमवर्गीय लोकांचे आयुष्य तसे संथ आणि सामान्य. त्यामुळे अकस्मात आलेल्या बातमीने बदलून जाते. सोसायटीतील वरच्या मजल्यावरचा फ्लॅट विकला जातो. घेणाऱ्याचे नाव असते. शेखर दयाल (अमिताभ बच्चन). श्रीयुत दयाल यांचा एकुलता एक मुलगा. सोसायटीत कुजबुज सुरू होते. दयाल? ज्यांनी आपल्या पत्नीला आणि सेक्रेटरीला व्यभिचाराच्या संशयावरून ठार मारले, ते दयाल सेठ?

शेखरलाही पिण्याचे व्यसन आहे. शेवटी आपल्या आईवडिलांच्या वळणावरच तर जाणार!

अफवा, कंडया पसरायला वेळ लागत नाही. शेखरला या साऱ्याची सवय असतेच. वडिलांच्या संपत्तीबरोबरच त्यांच्या अपकीर्तीचासुध्दा तो एकुलता एक वारस असतो.

">
 

जेमतेम सहा-सात वर्षाचा असतानाच शेखरच्या आयुष्यात वादळ येते. त्याचे वडील स्वतःच्याच पत्नीचा खून करतात. लहानगा शेखर एके दिवशी शाळेतून घरी येतो, तेव्हा घर पोलिसांनी भरून गेले असते. आई रक्ताच्या थारोळयात मरून पडलेली, वडिलांची मान झुकलेली हे दृश्य त्या लहानग्याच्या मनावर खोल परिणाम करून जाते. वडिलांना फाशी होते आणि हा मुलगा अनाथ होतो. लहान मुलांना जे घडते ते सर्व समजते असे नाही, पण पाहिलेल्या दृश्याचे मनावर ओरखडे मात्र उठतात. जे अघटित घडलेले असते, त्याची तीव्रता जाणवते.

जगाच्या टाकेरी नजरा झेलतच शेखर मोठा होतो. न केलेल्या अपराधाचे ओझे स्वतःच्या पाठीवर घेऊन जगतो. लोकांशी तुटक वागतो. एकटेपणाच्या अंधाराआड स्वतःला लपवतो. त्याला आवाज सहन होत नाही. कुणी जवळ आलेले खपत नाही. प्रेम, जिव्हाळा, माया या शब्दांशी त्याने फारकत घेतली आहे. स्वतःचे अस्तित्वसुध्दा जेव्हा परके होते, तेव्हा कुणाचीही साथ नकोशी वाटते.

बड़ी सूनी सूनी है, जिंदगी ये जिंदगी

मै खुद से हू यहाँ अजनबी अजनबी

या प्रकारच्या उदाहरणात अनेक वेळा पाहिले आहे की, अत्यंत संवेदनशील आणि हळवी माणसे आयुष्याच्या अशा वळणावर आली तर खचतात. सुन्न होतात. योग्य ती मदत, सोबत मिळाली नाही तर जगापासून, स्वतःपासूनही तुटत जातात. भावनांच्या कल्लोळात हरवतात आणि शेवटी दगड बनतात.

क्लेशकारक प्रसंगाला तोंड देण्याचे वेगवेगळे मार्ग असतात. कधी माणूस हिंसक, आक्रमक होतो, कधी तोंड लपवतो, तर कधी गोठतो, थिजतो. प्रतिकार करायचा विसरून जातो.

सोसायटीत राहायला आल्यावर, शेखर मुलांना गच्चीचे दार बंद करतो. आता मुलांना फक्त मिलीचा आधार आहे. मिली त्याला समजवायचा खूप प्रयत्नही करते, पण व्यर्थ.

जगाचा वाईट अनुभव असल्याने शेखर त्याला दाद देत नाही. नैराश्य, विध्वंस आणि एकाकीपणाच्या या वाटेवर त्याला साथ हवी आहे ती दूरवर लुकलुकणाऱ्या ताऱ्यांची आणि याच एकांताला गडद करणाऱ्या सुरांची.

कभी एक पल भी कही ये उदासी

दिल मेरा भूले

कभी मुस्कुराकर दबे पाँव आ कर दुख मुझे छू ले

न कर मुझसे गम मेरे दिल्लगी ये दिल्लगी

माणूस जेव्हा एकटा पडतो, तेव्हा एकच प्याला हे धोक्याचे वळण असते. मनात दाटून आलेली उदासी, साठून राहिलेले नैराश्य दुसऱ्या पेल्याला निमंत्रण देते, मग तिसरा, चौथा.. सारासार विचार करायची क्षमता संपते. शेखरच्या बाबतीत हेच होते. एक क्षण का होईना, त्याला या दुःखापासून जायचे आहे, पण ते काही त्याची पाठ सोडायला तयार नाही.

कभी मैं ना सोया, कही मुझसे खोया

सुख मेरा ऐसे

पता नाम लिखकर कही यूँही रखकर भूले कोई जैसे

अजब दुख भरी हैं ये, बेबसी बेबसी

बड़ी सूनी सूनी है

बंद खिडकीतून दिसणारी त्याची सावली, हातात ग्लास आणि पार्श्वभूमीवर गुंजणाऱ्या किशोरच्या स्वरातली वेदना. कवी योगेशने त्या वेदनेला शब्दात पकडले आहे.

आपल्या खिडकीतून पाहणाऱ्या मिलीलाही ती जाणवते.

सतत संगतीला असणारा काळाकुट्ट भूतकाळ शेखरला नकोसा झाला आहे. त्याला हवी आहे त्याच्या आठवणीपासून मुक्तता, एक नवीन ओळख. मिलीचे प्रेम, तिचा विश्वास त्याला ती मिळवून देणार आहे.

मिली या चित्रपटात तीन गाणी आहेत. बडी सूनी सूनी है ह्या गीताचे रेकॉर्डिंग चालू असतानाच, सचिन देव बर्मन आजारी पडले. किशोर कुमारसाठी हा मोठा आघात होता. हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी दादांना हे रेकॉर्डिंग पूर्ण करण्याचे वचन दिले. त्यानंतर दादांचे निधन झाले. त्यांची पत्नी, मीरा बर्मन आणि मुलगा आर.डी. बर्मन यांनी ह्या गीताचा साउंड ट्रॅक रेकॉर्ड केला. बडी सुनी सुनी है हे गीत किशोर कुमार यांनी दादांना वाहिलेली श्रध्दांजली म्हणून अमर झाले.

 - प्रिया प्रभुदेसाई

 

Powered By Sangraha 9.0