***डॉ. जयंत कुलकर्णी***
पक्षापुढे उभे ठाकलेले कितीही जटिल प्रश्न असोत वा गुंतागुंतीच्या मुद्दयांवर नेमकी भूमिका घेण्याचा प्रसंग असो, जेटली ज्या मुद्देसूदपणे प्रश्नांची पृष्ठभूमी मांडत आणि तार्किक विवेचनाच्या आधारे पक्षाच्या भूमिकेचे संसदेत वा संसदेबाहेरही समर्थन करीत असत. त्यातून वरिष्ठ नेते आणि सामान्य कार्यकर्ते सर्वांनाच सारखाच आत्मविश्वास मिळत असे.
राज्यसभेत 5 ऑगस्ट रोजी भाजपातर्फे घटनेतील 370वे कलम रद्द करणारा प्रस्ताव मांडण्यात आला आणि बहुमताने तो मंजूरही झाला. काहीतरी अघटित घडत होते. जनसंघाचा 'प्रथम संकल्प' नव्या अवतारातील भाजपा पूर्ण करीत होता. वर्षानुवर्षे दिलेली घोषणा प्रत्यक्षात येत होती. एकीकडे या निर्णयाचा आनंद असताना दुसरीकडे काश्मीर खोऱ्यात याची कशी प्रतिक्रिया उमटेल व या सरकारला ती नियंत्रणात आणता येईल ना, अशी चिंताही या प्रश्नाकडे जवळून पाहणाऱ्या अनेकांच्या मनात होती. अमित शहांनी ज्या आत्मविश्वासाने प्रस्ताव मांडला, त्याला तोड नव्हतीच; तरीही ज्या क्षणी जेटलींचा या मुद्दयाविषयी सर्व शंकांचे निरसन करणारा, भाजपाच्या 370 कलम हटवण्याच्या निर्णयाचे जोरदार सैध्दान्तिक समर्थन करणारा विस्तृत 'ब्लॉग' त्यांच्या वेबसाइटवर दुसऱ्याच दिवशी प्रसिध्द झाला, त्या क्षणी देशभरातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुपटीने वाढला. हा अरुणजींनी लिहिलेला शेवटचा लेख. त्यानंतर दोनच दिवसांनी त्यांना अत्यवस्थ स्थितीत 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आले. सुषमाजींचे शेवटचे ट्वीट काश्मीरच्या कायदेशीर एकीकरणाबद्दल झालेला मनस्वी आनंद व्यक्त करणारे आणि जेटलींचा शेवटचा लेखही याच संकल्पपूर्तीचे समर्थन करणारा आणि कोणत्याही परिस्थितीला हाताळण्यास पक्ष व शासन सिध्द असल्याचा निर्वाळा देणारा!
आयुष्यातील अथक संघर्षाचे, प्रदीर्घ सार्वजनिक प्रवासाचे आणि मनापासून स्वीकारलेल्या वैचारिक निष्ठेचे सार्थक झाले, असे वाटायला लावणारा हा क्षण. कमालीच्या अलिप्ततेने एकाच वेळी सत्तापटापासून अलग झालेले हे दोघेही व्रतस्थ नेते हा क्षण मनापासून जगले आणि एकामागोमाग एक थेट या जगाचाच निरोप घेऊन गेले.
विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्या सामाजिक आयुष्याला प्रारंभ केलेल्या जेटलींनी परिषदेच्या सैध्दान्तिक भूमिकेला छेद न देता 'राजकारण कशासाठी व कोणत्या मर्यादांमध्ये करायचे' याचा वस्तुपाठच आपल्या सहकाऱ्यांना आणि आपल्या मागून येणाऱ्या नेतृत्वाच्या पिढयांनाही घालून दिला. ते ज्या स्थानावर पोहोचले, तेथे जाण्यासाठी बुध्दी आणि प्रतिभेची अलौकिक साधनाच केवळ उपयोगी नसते, तर राष्ट्रकारणाच्या वाटचालीतील 'राजकारण' हा केवळ एक टप्पा आहे याचे भानही आवश्यक असते. देशकारणासाठी विद्यार्थ्यांना व युवकांना प्रेरित करणाऱ्या एका विशाल देशव्यापी संघटनेनेचे आपण एक 'भाग' आहोत आणि त्या संघटनेने सांगितले म्हणूनच आपण एक 'जबाबदारी' म्हणून राजकीय पक्षाचे काम करीत आहोत, याची जाणीव जेटलींच्या संवादात, भाषणात आणि समग्रा देहबोलीत कायमच जिवंत असायची. सगळया चर्चांमध्ये, घटनांमध्ये, निर्णयांमध्ये राहूनही कार्यकर्त्यालाला साजेशी एक 'अलिप्तता' त्यांनी सहजपणे जपली होती. एखाद्या घटनेविषयी, प्रश्नाविषयी राष्ट्रवादी संघटनांची भूमिका ठरवताना त्यांना कधीच फार वेळ लागला नाही वा संदर्भांची मोठी शोधाशोधही करावी लागली नाही. आपण ज्या विचारधारेचा भाग आहोत, ती 'विचारधारा' शब्दशः जगणारे ते सामान्य कार्यकर्तेही होते आणि असाधारण नेतेही होते. वास्तवाचे भान असणारी, कार्यकर्त्यांना दिशा देणारी, सहकाऱ्यांना दिलासा देणारी व पक्षाला कोणत्याही अडचणीतून सहीसलामत बाहेर काढणारी त्यांची 'प्रतिभा' ही त्यांच्या विचारधारेशी तादात्म्य पावल्यानेच हे शक्य झाले.
विचारधारेशी तादात्म्यता ही इतकी सहजसाध्य गोष्ट नाही. विद्यार्थिदशेत जोडल्या गेलेल्या वैचारिक चळवळीशी असलेले नाते त्यांनी कमालीच्या सहजतेने सांभाळले. 1974 सालच्या दिल्ली विद्यापीठ छात्रसंघाच्या निवडणुकीत ते अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून अभाविपतर्फे उभे राहिले आणि स्वाभाविकपणे निवडूनही आले. पाठोपाठ आलेल्या आणीबाणीचा त्यांनी विद्यापीठात मोठा मोर्चा काढून जाहीर निषेध केला आणि परिणाम म्हणून 19 महिन्यांचा तुरुंगवासही भोगला. विद्यार्थी परिषदेचे मार्गदर्शक असणारे अनेक ज्येष्ठ प्राध्यापक आपापल्या प्रांतात अशा तरुण व उगवत्या नेतृत्वाला जाणीवपूर्वक आकार देत होते. सामाजिक चळवळीत सक्रिय राहत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रश्नांविषयीही तितकेच सजग असले पाहिजे, हा आग्राह जोपासला जात होता. 'पक्षीय राजकारणापासून दूर' हा निकष परिषदेत सक्रिय असताना प्रत्येकालाच लागू असतो. पण परिषदेचे काम थांबवल्यावर अशा प्रशिक्षित कार्यकर्त्यांनी सार्वजनिक जीवनातही सक्रिय असावे, त्यांनी राजकीय पक्षांसह विविध क्षेत्रांचे स्वाभाविक नेतृत्व करावे या गोष्टीला प्रोत्साहन दिले जात होते. प्रा. यशवंतराव केळकर, ऍड. बाळासाहेब आपटे, प्रा .राजकुमार भाटिया यांच्या कुशल मार्गदर्शनात देशपातळीवर विद्यार्थी नेतृत्वाची पहिली पिढी याच आग्राहातून आकार घेत होती. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, अरुण जेटली, सुषमा स्वराज हे अकाली अस्त झालेले भाजपाचे कुशल नेते हे याच पहिल्या फळीचे साथीदार होते.
एकत्र काम करण्यातून, वैचारिक विरोधांना तोंड देत विद्यापीठात निर्धाराने उभे राहण्यातून, प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता आनंदाने तिच्यावर मात करण्यातून कार्यकर्ते प्रथम एकमेकांशी नंतर संघटनेशी व अंतिमतः विचारांशी जोडले जातात. संघपरिवारातील सर्वच संघटनांनी आपापल्या कार्यपध्दतीत मुरवलेला साधेपणा आणि सच्चेपणा हा त्या त्या कार्यकर्त्यांचा सहजतेने स्वभावविशेष बनतो. भाजपाकडे असलेले विविध प्रांतातले, विविध सामाजिक पार्श्वभूमीवरून आलेले प्रतिभावान व कार्यक्षम नेतृत्व हे याच एका सहज प्रक्रियेचा परिणामआहे. अरुण जेटली हेही याला अपवाद नव्हतेच. आणीबाणीविरोधी लढयातील हा भारावलेला काळ एका अर्थाने त्यांच्या संपूर्ण सामाजिक व राजकीय वाटचालीचा दिशादर्शक ठरला.
जनता पक्षाच्या कारकिर्दीत जेटली हेतुतः पक्षीय राजकारणाच्या परीघाबाहेर राहून व्यवसायात स्थिरस्थावर होत होते. देशातील अग्रागण्य तरुण कायदेतज्ज्ञांपैकी एक असा त्यांचा नावलौकिक याच काळात तयार होत होता. वैचारिकतेचा एक धागा जनता पक्षातून बाहेर पडलेल्या भाजपशी जोडलेला होताच. 1988-89दरम्यान देशभर भ्रष्टाचाराविरोधात मोठे जनमत तयार होत होते. 'बोफोर्स'ने एक मोठे निमित्त पुरवले होते. याच काळात अभाविपने पुढाकार घेऊन देशपातळीवर 'राष्ट्रीय संघर्ष मोर्चा'ची स्थापना केली. मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान सभागृहात भरलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी नेत्यांच्या भरगच्च सभेचे उदघाटन करताना अरुण जेटलींनी आपल्या स्पष्ट विचारांनी, तार्किक भूमिकांनी आणि संयत मांडणीने राज्यभरातून जमलेल्या आम्हा शेकडो प्रतिनिधींच्या मनाचा ताबा घेतला. विद्यार्थी चळवळीला नवी दिशा देणारे बाळासाहेब आपटेंचे प्रास्तविक, या दिशेने जाताना, येणाऱ्या आव्हानांची व त्या आव्हानांशी मुकाबला कसा करायचा याची नेमकी मांडणी करणारे अरुण जेटलींचे ओघवते भाषण या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील विद्यार्थी चळवळीने तेथून पुढील काळात घेतलेले जन-आंदोलनाचे मोठे रूप व आज सक्षमतेने सामाजिक व राजकीय क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या पिढीला मिळालेला आत्मविश्वास! जेटली हे अशा अर्थाने विद्यार्थी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांचे प्रत्यक्ष ऊर्जास्थान होते.
व्ही.पी. सिंग सरकारच्या काळात भारत सरकारचे अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून झालेली नियुक्ती हे त्यांनी राजकीय जीवनात स्वीकारलेले पहिले पद. त्यानंतरचा काळ हा एका अथक आणि यशस्वी प्रवासाचा होता. अर्थात प्रवास यशस्वी होईलच याची कणभरही शाश्वती नसताना जाणीवपूर्वक स्वीकारलेला तो मार्ग होता. जेटली या मार्गावर चालणाऱ्या त्यांच्यासारख्या अनेकांचे दीपस्तंभ बनले. 2014मध्ये नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून देशातील वातावरण प्रथमच राष्ट्रवादी विचारांना अनुकूल व सकारात्मक बनले आहे. त्यापूर्वीची स्थिती म्हणजे निव्वळ अडचणींचा आणि संघर्षाचाच काळ होता. सर्वोच्च न्यायालयापासून ते विद्यापीठांपर्यंत आपली घट्ट पकड ठेवून असणारी डाव्या मंडळींची 'लॉबी', सर्वच प्रकारातील माध्यमांवर असलेला याच 'लॉबी'चा वरचश्मा, आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्यांचा प्रभाव आणि प्रत्यक्ष सत्तेच्या राजकारणात काँग्रोसच्या आवतीभोवती जमलेले संकुचित जातीय पक्ष या पार्श्वभूमीवर संघाचे वा भाजपाचे काम करणे म्हणजे प्रवाहाविरोधात पोहण्यासारखेच होते. अरुण जेटलींनी आपली उच्च दर्जाची प्रतिभा, बुध्दिमत्ता आणि नेतृत्वक्षमता यांच्या आधारे हे सारे अडथळे तर पार केलेच, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष नरेंद्र मोदी व अमित शहांच्या मागे एखाद्या भक्कम पहाडासारखे ते उभे राहिले. या दोघांना राजकीय व सामाजिक जीवनातून हद्दपार करण्याचे जे जे प्रयत्न तेव्हाच्या सरकारने व या डाव्या 'लॉबी'ने केले, ते सर्व उधळून देत राष्ट्रीय राजकारणाची समग्रा दिशाच बदलण्याचे श्रेय जेटलींना दिलेच पाहिजे. कायदेशीर प्रक्रियेतील गुंतागुंत, आरोप करणाऱ्यांचे अंतःस्थ हेतू व त्याला त्याच भाषेत उत्तर देण्याची धमक या तिन्ही गोष्टी समजून घेत जेटलींनी या काळात दिल्लीतील किल्ला जवळपास एकहाती लढवला व मोदींच्या सत्तारोहणाचा मार्गही प्रशस्त केला.
जेटलींच्या कर्तृत्वाला साधेपणाची एक असाधारण किनार होती. जेटली गेल्यावर त्यांचे निकटचे मित्र व इंडिया टीव्हीचे मालक रजत शर्मा सायंकाळी स्वतःच छोटया पडद्यावर आले आणि आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेल्या जेटलींच्या सहृदयतेच्या अनेक आठवणी त्यांनी जागवल्या. आपल्या घरी वा कार्यालयात अहोरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची त्यांनी घेतलेली काळजी, सहकारी कायदेतज्ज्ञांशी असलेले जिव्हाळयाचे संबंध, विरोधकांशी जपलेला स्नेहभाव, पत्रकारांच्या अडचणी जाणून घेत त्यांना वेळोवेळी केलेली मदत आणि मुख्य म्हणजे पक्षातील तरुण खासदारांच्या नेतृत्वविकासाला त्यांनी मनापासून केलेली मदत... अरुण जेटली हे असे बहुआयामी व्यक्तित्व होते. एकाच वेळी उत्तुंग नेतृत्वक्षमता असलेले आणि तरीही संघटनाशरण स्वभावामुळे जमिनीचेही भान असलेले.
महाराष्ट्रातील गोपीनाथ मुंडे, मध्य प्रदेशातील अनिलजी दवे, कर्नाटकचे अनंत कुमार, गोव्याचे मनोहर पर्रिकर, हरियाणाच्या सुषमा स्वराज.. संघविचारांच्या मुशीत तयार झालेली ही अलौकिक नेतृत्वाची पिढी. आपापल्या प्रांतात चळवळीत आली आणि राष्ट्रीय जनजीवनाशी एकरूप होत राजकीय पक्षात सक्रिय झाली. या सर्वांनीच अंगभूत नेतृत्व गुणांचा आविष्कार घडवताना वैयक्तिक महत्त्वाकांक्षांना सहजतेने बाजूला सारले. देशाच्या भिन्न भागात, भिन्न वातावरणात, भिन्न सामाजिक पार्श्वभूमीवर कार्याला प्रारंभ करूनही एकाच विचारधारेच्या संस्कारामुळे ही भाजपाची बिनीच्या शिलेदारांची पिढी भारताच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर आपला 'अमीट' असा ठसा उमटवू शकली.
एकापाठोपाठ एक हे सगळे अस्तंगत होतांना आपण पाहतोय.