प्रचंड आत्मविश्वास, श्रध्दावान आणि सामाजिक जाणीव लाभलेले, मुंबईच्या मालाड उपनगरातील रिखबचंद चौधरी (जैन) हे कणखर अन धडाडीचे नेतृत्व. उत्कृष्ट वक्ता, कुशल संघटक आणि सेवाव्रती ही वैशिष्टये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक आगळी झळाळी प्रदान करतात. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ही एक झलक.
रिखबचंद जैन यांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक छटांचा विलोभनीय मिलाफ आहे. संस्कारक्षम वयात त्यांच्या झालेल्या जडणघडणीत त्याची मुळे आहेत. राजस्थानमधील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या नागौर येथे एका मध्यमवर्गीय जैन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बालपण, कुमारवय आणि तारुण्यातील काही काळ त्यांनी नागौर शहरात व्यतीत केला.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यात शिक्षकांइतकाच संघविचारांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्यासाठी राष्ट्रीय स्वयसंवेक संघ हा दीपस्तंभ आहे. याविषयी सांगताना रिखबचंदजी म्हणतात, ''नागौरमधील संघशाखेत मी नियमित जात असे. त्यामुळे संघजीवनाचा परीसस्पर्श मला लहानपणापासून लाभला. शाखेत मुख्य शिक्षक, प्रचारक आणि कार्यकतर्े यांच्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. प.पू. सरसंघचालक डॉ. हेडगेवार व श्रीगुरुजी यांची चरित्रे वाचून मला सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. सामाजिक कामाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माणात आपले योगदान कसे द्यायचे याचे धडे मी संघशाखेत गिरविले. त्याचबरोबर जैन धर्मातील शिकवणीचाही माझ्यातील सामाजिक कार्यकर्त्यावर खोल संस्कार झाला आहे.''
बजरंग दलाचे व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ता अशीही रिखबचंदजींची एक ओळख आहे. रामजन्मभूमी आंदोलनासारखा ज्वलंत विषय असो की संघाचे वार्षिकोत्सव असोत वा जैन धर्माचाउपक्रम/उत्सव, त्यात ते नित्यनेमाने सहभागी होत आले. यातूनच सामाजिक कार्याचे बीज मनात अंकुरले. समाजासाठी काहीतरी सातत्याने करत राहायचे ही त्यांची कायमसाठीची प्राथमिकता बनली.
सामाजिक बांधिलकीचा यज्ञ
रिखबचंदजी 1992 साली मुंबईत आले. शिक्षण असूनही मुंबईत मनाजोगती नोकरी मिळत नव्हती. मुंबईत येण्याआधी आधी ते कामाच्या शोधात आपल्या भावाकडे चेन्नई येथे गेले होते. मात्र सामाजिक कार्याची ओढ असल्याने त्यांचे मन चेन्नईत रमले नाही आणि त्यांनी मुंबईत यायचे ठरविले.
मुंबईतले सुरुवातीचे दिवस संघर्षाचे होते. काही रात्री त्यांना फूटपाथवर काढाव्या लागल्या. मात्र या दिवसांतही संघसंस्कारांमुळे ते डगमगले नाहीत. मिळतील ती छोटी-मोठी कामे करत राहिले. हळूहळू त्यांनी मालाड भागात कापड व्यवसाय सुरू केला. त्या दिवसातही अतिशय काटकसर करून साठविलेले पैसे समाजकार्यासाठी वापरायला सुरुवात केली.
दिवसाचे 24 तास समाजाच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असणारे नेतृत्व म्हणून आज ते मालाड भागात परिचित आहेत. त्याचे कार्य केवळ जैन समाजापुरते मर्यादित नाही, हे आवर्जून नमूद करण्याजोगे. विविध सेवा संस्थांची धुरा सांभाळताना त्या माध्यमातून जास्तीत जास्त वंचितांपर्यंत पोहोचण्याचा ते विचार करतात. आपण समाजाचे देणे लागतो या उदात्त भावनेतून रिखबचंद जैन यांनी आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे.
चलो, दीप जलाएं वहाँ... जहाँ अभी भी अंधेरा है!
'चलो, दीप जलाएं वहाँ! जहाँ अभी भी अंधेरा है!' या काव्यपंक्तीतील आशयाचे स्मरण ठेवून अंधकारात राहिलेल्या समाजात प्रकाशाची ज्योत पेटविण्याचे कार्य रिखबचंद जैन यांनी केले आहे. 2002 ते 2008पर्यंत ते वेगवेगळया सेवा संस्थांच्या उपक्रमात सहभागी राहिले आहेत. वनवासी कल्याण आश्रम, समतोल आणि सक्षम यासारख्या अनेक संस्थांना समाजातील दानशूरांकडून मदत मिळवून देण्याचा ते प्रयत्न करत असतात.
संघप्रेरणेतून रिखबचंद यांनी 2008 साली 'हेतू चॅरिटेबल ट्रस्ट' या सामाजिक संस्थेची स्थापना केली. राष्ट्रहित व समाजहित जोपासणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. HETU - H = Health, E = Education, T = Trust, U = Utility या 4 मुख्य बिंदूंवर संस्थेचे काम चालते. गोरगरीब, दिव्यांग, पीडित, उपेक्षित, वंचित अशा सर्व घटकांसाठी ही संस्था काम करते.
मालाडसारख्या संपन्न भागातही उपेक्षित, वंचित समाज मोठा आहे. या समाजाची स्थिती फार बदलेली नाही. दिवाळी हा सण अनेकांच्या जीवनात आनंदाची पहाट घेऊन येत असला, तरी हलाखीचे जीवन जगणाऱ्यांसाठी वर्षाचे सगळे दिवस सारखेच असतात. अशा उपेक्षित घटकांतील मुलांच्या/दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी रिखबचंद 2009पासून सक्षम संस्थेच्या मदतीने 'दिवाळी मिलन' या कार्यक्रमाचे आयोजन करतात.
''संपन्न कुटुंबांत ज्याप्रमाणे दिवाळी साजरी केले जाते, त्याप्रमाणे ही मुले दिवाळी साजरी करतात. या मुलांच्या आयुष्याला नव्या आनंदाचा स्पर्श होतो. या निमित्ताने सुमारे दीड हजार दिव्यांग मुलांना नवीन कपडे, फराळ, शालेय साहित्य आदी वस्तू भेट दिल्या जातात. या निमित्ताने अनेक निरागस मुलांच्या आयुष्यात आनंदाचा आणि आशेचा दीप उजळता येतो, याचे मला समाधान वाटते'' असे रिखबचंदजी म्हणाले.
दिव्यांग मुलांना मिळाला आधार
दिव्यांग मुला-मुलींचे आयुष्य म्हणजे केवळ संघर्ष आहे. यातही जर अशी मुले गरीब कुटुंबांमध्ये जन्मली, तर त्यांचे पुनर्वसन किंवा संाभाळ हाही एक मोठा सामाजिक प्रश्न आहे. अशा दीनदुबळयांची सेवा करण्यात रिखबचंदजी यांना खरे सुख वाटते.
''दिव्यांगांबाबत समाजाने सहानुभूतीने/सकारात्मक विचार करावा, त्यांचे मनोबल वाढवावे, यासाठी मी आणि आमची संस्था सतत कार्यरत असते. जैन समाजाच्या माध्यमातून 35 दिव्यांग मुलांचे पालकत्व स्वीकारण्यात आले आहे. पाच वर्षांपूर्वी ज्या मुलांचे पालकत्व घेण्यात आले, ती आज मोठी झाली आहेत. ही सर्व मुले पालकत्व स्वीकारलेल्या कुटुंबाचे एक सदस्य बनले आहेत. समाजाकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन आम्ही आणखी 15 दिव्यांग मुलांना दत्तक घेणार आहोत'' अशी माहिती रिखबचंदजी यांनी दिली.
दिव्यांग मुलांना शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा गरजवंताला 'हेतू'च्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीमुळे शिक्षणाची संधी मिळालेल्या मुलांमध्ये आत्मविश्वासाची वाढ झाली आहे. या मुलांच्या बरोबरीने समाजातील उपेक्षित/वंचित घटकातील मुलांची शैक्षणिक परवड होऊ नये, यासाठी शालेय साहित्याचे वाटप करण्यात येत असते. दर वर्षी जवळपास 25 हजाराहून जास्त वह्यांचे वाटप केले जाते.
वाट चुकलेली मुले स्वगृही
आजही, दर दिवशी शेकडो मुले घरातून पळून मुंबईत येतात. घरातले कलुषित वातावरण, पालक व मुले यांच्यामधील संवादाचा अभाव, मुंबईचे आकर्षण ही यामागची मुख्य कारणे असतात. तर काही जण या मायानगरीच्या मोहाने मोठया आमिषांना फसून आलेली असतात. घर सोडून पळालेली अशी मुले मुंबई उपनगरांच्या अनेक रेल्वे स्थानकांवर नजरेस पडत असतात. मिळेल ते काम करून रात्री फूटपाथवर झोपतात. अशा वाट चुकलेल्या मुलांना योग्य मार्ग दाखवून त्यांची पुन्हा त्यांच्या पालकांशी गाठ घालून देण्याचे कार्य रिखबचंदजी कित्येक वर्षांपासून करत आहेत. या कामात त्यांना विजय जाधव यांच्या 'समतोल' या संस्थेची मोठी मदत मिळाली. आतापर्यंत 1 हजार मुलांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या पालकांकडे सुपुर्द करण्यात आले आहे.
''आज ह्या मुलांना त्यांच्या पालकांकडे परत पाठवले नसते, तर ही मुले भरकटली असती, त्यातली काही वाममार्गालाही लागली असती. त्यामुळे या कामातून मिळणारे समाधान शब्दांत सांगता येण्याजोगे नाही'' असे रिखबचंदजी सांगतात.
महिला बनल्या स्वावलंबी..
मालाडमधील अनेक झोपडपट्टयांमध्ये राहणाऱ्या महिलांची मोलमजुरी करण्याची तयारी असूनही त्यांना स्वाभिमानने जगता येत नाही. त्यांच्यापैकी अनेकींना कायमस्वरूपी काम मिळत नाही. त्यामुळे घरात नेहमीच पैशाची चणचण भासते. अशा महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी आतापर्यंत 100 शिलाई मशीन देण्यात आल्या आहेत. शिवाय अनेक दानशूर व्यक्तींच्या मदतीतून 150हून अधिक घरघंटी देण्यात आल्या आहेत. या दोन्हींच्या माध्यमातून 650हून अधिक महिलांना रोजगार मिळाला आहे. शिलाईच्या व्यवसायातून महिलांना नियमित कमाई व्हायला लागल्याने त्या स्वावलंबी तर बनल्या आहेतच, शिवाय या स्वावलंबनातून आत्मविश्वासातही वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या या महिला आता त्यांच्या कामातही निपुण झाल्या आहेत. व्यवसायामुळे गाठीशी जमलेल्या पैशांचा उपयोग त्या मुलांच्या शिक्षणासाठी करीत आहेत. 'आता पैशासाठी कोणाच्याही समोर हात पसरवा लागत नसल्याचे समाधान त्या महिलांना आहे' असे रिखबचंदजी यांनी सांगितले.
युवकांमध्ये चेतना जागविण्याचे कार्य
राष्ट्रीय एकात्मता म्हणजे राष्ट्रातील भिन्न भिन्न व्यक्तींची मने जोडण्याची प्रक्रिया होय. राष्ट्राविषयी नागरिकांच्या मनात समान भावना असायला पाहिजेत. आजच्या युवकांमध्ये देशप्रेमाची भावना रुजावी, स्वातंत्र्यचळवळीतील सैनिकांच्या अमूल्य योगदानाचे त्यांना स्मरण असावे, यासाठी रिखबचंदजी विविध उपक्रम राबवत असतात. विविध धर्मांतील पंडितांना, साधु-संत-मुनींना आमंत्रित करून त्यांच्या प्रेरक व्याख्यानांमधून युवकांमध्ये राष्ट्रचेतना जागविण्याचे काम ते करत असतात. स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नामधील राष्ट्र घडावे, असा यामागचा हेतू आहे.
रिखबचंदजी प्रत्येक सामाजिक-धार्मिक काम तळमळीने करतात. त्यांच्या प्रयत्नाने मालाडमध्ये गेल्या दोन वर्षांपासून कावड यात्रा मोठया भक्तिभावाने निघत असते. त्याचबरोबर हिंदू नववर्षानिमित्त स्वागत यात्रा काढण्यात येते. गोपाळकाला कार्यक्रमात मालाडकर मोठया संख्येने सहभागी होतात.
या भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जाणीवजागृती व्हावी, यासाठी ते आरोग्य शिबिरांचे सातत्याने आयोजन करत असतात. ते स्वतः भाजपा वैद्यकीय प्रकोष्ठचे सहसंयोजक राहिल्याने त्यांनी वनवासी भागातील बांधवांना वैद्यकीय मदत करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. जेव्हा मालाड परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या होत्या, तेव्हा रिखबचंद यांनी 'चोरांपासून सावधान राहावे' अशी सावधगिरीच्या सूचना देणारी पोस्टर्स शहरात जागोजागी लावली होती. झोपडपट्टी भागातील अस्वच्छतेचा प्रश्न सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पावसामुळे जेव्हा शहरातील नाले तुंबतात, तेव्हा महानगरपालिकेला याविषयी वेळावेळी सूचना देत, 'स्वच्छ पाणी, स्वच्छ परिसर' यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. एवढेच नाही, तर शहरातील प्रत्येक सोसायटीत जाऊन स्वच्छतेसंदर्भात ते प्रबोधन करतात. शहरात जेव्हा डेंग्यूचा फैलाव झाला होता, तेव्हाही त्यांनी जागृती मोहीम राबविली होती.
समाजकारण व राजकारण यांचा मेळ
रिखबचंदजी यांनी आपले काम विविध सेवा संस्थांच्या माध्यमातून चालू ठेवले आहे. समाजातील सामान्य घटकाच्या पाठीशी प्रसंगी सर्वशक्तीनिशी उभे राहणे अन् हाती घेतलेले काम कोणत्याही परिस्थितीन तडीला नेणे ह्या गुणवैशिष्टयांमुळे ते जनसामान्यांचे नेते बनले आहेत.
राजकारणात येण्याआधी जर एखादी व्यक्ती बरीच वर्षे समाजोपयोगी कामात असेल, तर लोकांच्या मनात तिची एक प्रतिमा तयार होते. पुढील वाटचालीसाठी त्या प्रतिमेचा नक्कीच उपयोग होतो. रिखबचंदजी यांचा प्रवासही त्या दिशेने चालू झाला आहे असे म्हणता येईल. सामाजिक कामासाठी एक मोठा पट मिळावा हा त्यामागचा हेतू आहे, असे सांगताना रिखबचंद म्हणाले, ''आज मी 20हून अधिक सामाजिक संस्थांशी आणि त्या माध्यमातून विविध प्रकारच्या कामांशी, माणसांशी जोडला गेलो आहे. हेतू चॅरिटेबल ट्रस्ट (संस्थापक आणि सचिव) मी मालाडकर (अध्यक्ष), जिओ (Jain International Organisation) (Executive President Mumbai Zone), मेहता इंडस्टि्रयल इस्टेट (अध्यक्ष), सकल मालाड जैन संघ (संस्थापक), राजस्थान जैन संघ मालाड (विश्वस्त), सक्षम कोकण विभाग (उपाध्यक्ष), समतोल फाउंडेशन (समन्वयक), मालाड नववर्ष स्वागत समिती (उपाध्यक्ष) अशा विविध सेवा संस्थांबरोबर मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, विश्व हिंदू परिषदेचा, वनवासी कल्याण आश्रमाचाही सक्रिय सदस्य आहे. भाजपा वैद्यकीय प्रकोष्ठचे सहसंजयोक म्हणून मी जबाबदारी सांभाळली आहे. या वैविध्यपूर्ण जबाबदाऱ्यांमुळे मी आज मालाडकरांच्या परिचयाचा झालो आहे याचा आनंद आहे.
कामामुळे माझा सतत सामान्य माणसांशी संवाद होत असतो. त्यातून आमच्यात अकृत्रिम स्नेहाचे एक नाते निर्माण झाले आहे. या कामामुळे असंख्य नागरिक माझे बोलणे ऐकतात, कारण त्यांच्या मदतीसाठी मी सदैव उपलब्ध असतो.
विविध संस्था-संघटनांच्या कामांमधून मला सामाजिक विषयांवर काम करायची आतापर्यंत संधी मिळाली असली, तरी नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी सक्रिय राजकारणात जाण्याला पर्याय नाही, असे माझे मत आहे.
गेली 20 वर्षे मालाड भागात काँग्रेसचे राज्य आहे. पश्चिम उपनगरातील महत्त्वाचे शहर असूनही अद्याप त्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही, ही खंत आहे. लोकलच्या अपुऱ्या सुविधा, वाहतूक कोंडीचा प्रश्न, शैक्षणिक असुविधा, फेरीवाल्यांची वाढती संख्या, रस्त्यांची झालेली दुरवस्था हे प्रश्न इथे आ वासून उभे आहेत. त्यावर उत्तर शोधण्यासाठी इथे आपले राजकीय प्रतिनिधित्व हवे. मालवणीसारख्या भागात अस्वच्छतेचे असलेले साम्राज्य ही काही फक्त त्या भागाची समस्या नाही, ती शहराची समस्या आहे. अशा प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सक्रिय राजकारणात सहभाग असायला हवा.