महापुरात कोल्हापूरकरांनी दाखवला संयम

16 Aug 2019 18:41:16

महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा येथे निसर्गाच्या रौद्ररुपाचे दर्शन गेल्या काही दिवसात झाले. महापूराच्या विळख्यात अनेक शहरे आणि गावे अडकून पडली होती. कोल्हापूरदेखील महापूराच्या पाण्याने तब्बल सहा दिवस वेढले गेले होते.अशा वेळी कोल्हापूरकरांच्या एकजुटीमुळे, सुनियोजनामुळे अनेक संभावित हानी टाळता आली. 


खरे म्हणजे दर चौदा वर्षांनी प्रलयाची चिन्हे दिसतात, असे म्हटले जाते. कोल्हापूरला यापूर्वी दोन वेळा महाप्रलयाचा तडाखा बसला होता. 2005मध्ये जेव्हा पुराचा तडाखा बसला, तेव्हाच कोल्हापूरकर जागे व्हायला हवे होते. परंतु आपण इतिहासापासून धडा कधी घेत नाही, त्यामुळे निसर्गाने पुन्हा एकदा धडा शिकवला. आपत्ती व्यवस्थापन केवळ कागदावर तयार झाले, परंतु नदीकाठच्या जागांवर बिल्डरांनी केलेले अतिक्रमण, अशा बेकायदा बांधकामांना प्रतिबंध करण्यासाठी रेड झोनही तयार केला, पण लक्षात कोण घेतो?

काही असो, कोल्हापूरकरांची एकी या निमित्ताने पुन्हा दिसली. भयंकर महाप्रलयातही सरकारी यंत्रणा मदतीमध्ये अग्रोसर राहिली. यामध्ये आपत्ती नियंत्रण यंत्रणा असेल, एनडीआरएफ, लष्कर, नौदल, गोवा कोस्टलच्या जवानांबरोबरच कित्येक स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्था, राजकीय, सामाजिक संघटनांबरोबरच सारे कोल्हापूरकर बचाव आणि मदत कार्यात हिरिरीने पुढाकार घेत होते. कितीही संकटे आली तरी ती झेलायची तयारी असणारे रांगडे कोल्हापूर या निमित्ताने दिसले. अतिशय संयमाने आणि धाडसाने कोल्हापूरकर या मदतकार्यात पुढाकार घेत होते. यामुळे कोल्हापूरच्या सामान्य नागरिकांना या पुराची झळ कमी प्रमाणात बसली.

 

महापुराच्या पाण्याने कोल्हापूर जिल्ह्याला तब्बल सहा दिवस वेढलेले होते. प्रशासनाच्या आणि कोल्हापूरकरांच्या नियोजनामुळे प्राणहानी फारशी झाली नाही, आर्थिक नुकसान मात्र मोठया प्रमाणात झाले आहे. शहरातील नागरिकांचे सांसारिक नुकसान तर झालेच, परंतु खरे तर ग्राामीण भागातील नागरिकांचे नुकसान मोठे झाले. अनेकांची घरे पडली आहेत. शहरातील मोठया दुकानदारांबरोबरच टपऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. ग्राामीण भागातील शेतकऱ्यांचे तर मोठेच नुकसान झाले आहे. त्यांच्या उसासह सोयाबीन, भात, जोंधळा यासह अन्य पिकांचे आणि शेतजमिनीचेही नुकसान मोठे आहे. महापुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील 100हून अधिक बंधारे व प्रमुख मार्ग पाण्याखाली गेल्याने गेली आठ-दहा दिवस सारे दळणवळणच ठप्प झाले होते. दूध उत्पादकांना याची मोठी झळ बसली असून, या कालावधीत 60 लाख लीटर दूध घरातच राहिले. यामध्ये एकटया 'गोकुळ'चे 40 लाख लीटर दूध आहे. यामुळे दूध उत्पादकांचे 18 कोटीचे, तर दूध संघांचे तीन कोटीचे नुकसान झाले आहे.


गेल्या आठ दिवसांपासून थैमान घातलेल्या महापुरामुळे कोल्हापूर विभागात येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतील दोन लाख हेक्टरवरील पिके कुजली आहेत. साडेपाच लाखांवर शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. यात जिरायती, बागायती क्षेत्रांतील पिकांसह फळबागांचा समावेश आहे. अजून पंचनामे झाले नसले, तरी तलाठी व सर्कलकडून घेतलेल्या नजरअंदाज पाहणीनुसार कृषी विभागाने हा अहवाल तयार केला आहे. यात कोल्हापूर विभागात मोडणाऱ्या तीन जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे दिसत आहे, त्याखालोखाल साताऱ्याचा आणि त्यानंतर सांगलीचा क्रमांक लागतो.

कोल्हापूर जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1738.39 मिलिमीटर आहे. ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांत त्याच्या तीनपट पाऊस झाला आहे. 2005च्या महापुरात 129 गावे पाण्यात गेली होती, या वेळी 249 गावे पाण्यात होती. कोल्हापूर जिल्ह्यातील 2,37,330 इतकी लोकसंख्या पूरग्रास्त असल्याचा शासकीय आकडा आहे. संपूर्णपणे संपर्क तुटलेल्या गावांची संख्या 18 आहे.

पूरग्रास्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी एनडीआरएफ, लष्कर, नौदल, गोवा कोस्टलच्या सुमारे 501 जवानांनी जवळपास 87 अद्ययावत बोटींच्या साहाय्याने मोठया साहसाने आणि माणुसकीच्या भावना जोपासत अनेकांना मृत्यूच्या छायेतून दूर नेले. त्यामुळेच या जवानांना कधी देव तर कधी पाठीराखा भाऊ मानला.

शिरोळ तालुक्यात 47 बोटी ठेवण्यात आल्यामुळे अनेक पूरग्रास्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. पूरग्रास्तांसाठी जिल्ह्यात 208 संक्रमण शिबिरांमध्ये 78,621 पूरग्रास्तांची सोय करण्यात आली. शिरोळ तालुक्यातील 93 संक्रमण शिबिरांमध्ये 36,957 लोकांची सोय केली आहे. या शिबिरात त्यांना जीवनावश्यक वस्तू तसेच पाणी, आरोग्य अशा सोयीही देण्यात आल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष लक्ष केंद्रित करून त्यांना काही कमी पडणार नाही याकडे लक्ष दिले. पूरग्रास्तांच्या चार हजाराहून अधिक जनावरांची व्यवस्था छावण्यांच्या माध्यमातून करण्यात आली. सर्वच जनावरांच्या लसीकरणाकडे आणि आवश्यक औषधोपचाराकडेही लक्ष देण्यात आले आहे.

प्रशासनाने आतापर्यंत एनडीआरएफ, लष्कर, नौदल, गोवा कोस्टलच्या जवानाबरोबरच स्वयंसेवी, सेवाभावी संस्थांच्या आणि व्यक्तींच्या मदतीने 249 गावांमधून 50,594 कुटुंबांतील 2,47,678 लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले. शिरोळ तालुक्यातील 43 गावांमधून 31,038 कुटुंबांतील 1,56,755 लोकांचा समावेश आहे. महापालिकेच्या माध्यमातून अडीच हजारांहून अधिक कुटुंबांतील दहा हजारांहून अधिक जणांचे स्थलांतर करण्यात आले. पुराने वेढा दिलेल्या आंबेवाडी, चिखलीसह शिरोळ तालुक्यातील अनेक गावांतील पूरग्रास्तांना सर्वप्रथम बाहेर काढण्यास प्राधान्य दिले. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील पुराचे पाणी ओसरू लागले आहे. आता पडलेल्या घरांचे, जनावरांचे तसेच शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी गावनिहाय पथके तयार होत आहेत. पूरग्रास्त भागातील वीजपुरवठा पूर्ववत होत आहे. आतापर्यंत सुमारे 1,32,444 घरांमध्ये विजेचा पुरवठा तत्काळ सुरू करण्यास प्राधान्य दिले जात आहे. अंदाजे 429 पाणीपुरवठा योजना बंद आहेत. त्या तत्काळ सुरू करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मुख्य म्हणजे आरोग्य विभागातर्फे स्वच्छतेसाठी मोठी यंत्रणा उभारण्यात येत आहे. यासाठी कोल्हापूरबाहेरील पूर नियंत्रणाचा अनुभव असणाऱ्या महानगरपालिकेतील मनुष्यबळाला आमंत्रित करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयामार्फत औषध फवारणी, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता यावर मोठा भर देण्यात येत आहे.

 

पंचगंगेने दाखवला हिसका

पंचगंगा नदीचे पाणी इशारा पातळीपर्यंत गेले, तरी कोल्हापुरातील अनेक लोकांनी स्वत:हून स्थलांतर केले नव्हते. यामध्ये सरकारी नोकरी करणारेही होते. स्थलांतराच्या छावणीत जाऊन राहण्यापेक्षा घरातच राहणे त्यांनी पसंत केले. मात्र, पुराचे पाणी जेव्हा फ्लॅटमध्ये शिरले, तेव्हा मात्र त्यांनी वाचवण्यासाठी आटापिटा सुरू केला. यामुळे बचावपथकांवर मोठा ताण आला. खरे तर जून महिन्यातच पूर जेथे येतो, तेथील रहिवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात करता आली असती. पंचगंगा नदीने त्यांना इशारा दिला होता, पण न ऐकल्यामुळे कोणतीही दयामाया न दाखवता नदीने आपला हिसका दाखवलाच.


 

कोल्हापुरात 2005मध्ये जेव्हा महापूर आला होता, त्यानंतर 14 वर्षांत रेड झोनमध्येच इतकी बांधकामे झाली की मोजता येणार नाहीत. पूरपातळी विचारात न घेता पाणी येणार असे खोटेनाटे सांगून बांधकामे केली व लोकांच्या गळयात मारली. बिल्डरने पाण्याची पातळी सर्टिफाइड करण्याने धोका वाढला. या रेड झोनमध्ये खरे तर अनेक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्ससह 44हून अधिक छोटी-मोठी एकूण रुग्णालये आहेत. त्यामध्ये 250हून अधिक रुग्ण उपचार घेत होते. महापुराच्या पाण्यातून त्यांची सुटका करणे हे आव्हान ठरले. अतिदक्षता विभागामधील (आयसीयूमधील) रुग्ण तराफ्यावरून बाहेर काढावे लागले. 

राजकारण बाजूला ठेवून काम

महापुराची वाढत चाललेली तीव्रता विचारात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्याचा निर्णय घेऊन कोल्हापुरातील आणि सांगलीतील पूरपरिस्थितीची पाहणी केली. सांगलीतील आणि कोल्हापुरातील पूरपरिस्थितीत पूरग्रास्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याबरोबरच देशाच्या विविध राज्यांतूनही बोटी मागवून पूरपरिस्थिती हाताळण्यास त्यांनी प्राधान्य दिले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून अलमट्टीचा विसर्ग 5 लाख 30 हजारावर नेला. पूरग्रास्तांना मदतीसाठीचे निर्णय जाग्यावरच दिले. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री खुद्द चंद्रकांत पाटील हे तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात तळ ठोकून पूरग्रास्तांच्या बचाव व मदत कार्यात अग्राभागी राहिले आहेत. सदाभाऊ खोत असोत अथवा गिरिश महाजन किंवा अन्य मंत्रीही या भागात येऊन गेले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना कोल्हापूर, सांगलीत राहण्यास सांगितले. त्यांचे सर्व आमदार, खासदार, मंत्री पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. विरोधी पक्षातील शरद पवार, अजितदादा पवार, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांनीही भेटी देऊन दिलासा दिला. विशेष म्हणजे या नेत्यांनी कोणतेही राजकारण न करता लोकांच्या मदतीला प्राधान्य दिले आहे.

जिल्ह्याच्या अन्य भागांतील पूरग्रास्तांनाही सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम येथे गतिमान आहे. बचावकार्यावर आणि मदतकार्यावर स्वत: जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिकेचे आयुक्त कलशेट्टी व्यक्तिश: लक्ष ठेवून पूरग्रास्तांचे बचावकार्य आणि मदतकार्य सुकर होण्यासाठी योग्य नियोजन करत आहेत.

जिल्ह्यातील अनेक धाडसी आणि मदतकार्यात स्वत:ला बेधडक झोकून देणाऱ्या तरुणांचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौऱ्यात कौतुक केले. जिल्हा प्रशासनासह दहा प्रमुख स्वयंसेवी संस्था व त्यांचे सातशेहून अधिक स्वयंसेवक बचावकार्यात पुढे होते. स्थलांतर शिबिरातील पूरग्रास्तांना अन्नपाणी, कपडे, वैद्यकीय मदतीपासून ते पांघरूण देण्यापर्यंतची उत्तम व्यवस्था समाजातून माणुसकीच्या भावनेतून उभी राहिली. आपत्ती व्यवस्थापनात मदत व्हावी, म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात आपदा मित्र म्हणून दोनशे स्वयंसेवक प्रशिक्षित करण्यात आले आहेत. त्यात 93 तरुणी आहेत. गेले दहा दिवस महापुरात लोकांचे प्राण वाचवण्यात हे सर्व जण पुढे आले. 

हे व्हायला हवे...

महापुरासारखी अशी आपत्ती पुन्हा आली, तर बोटी, जेसीबी, पोकलॅनसारखी यंत्रे, त्याचे चालक याची यादी हवी, त्याशिवाय पूरग्रास्त व बचाव मोहिमेतील लोकांसाठी भोजन उपलब्ध करून देतील असे आचारी, भांडी याची माहिती हवी. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जो पाऊस पडतो, त्याची नोंद होते. कोल्हापुरातील कुंभी-कासारी, धामणी, तुळशी आणि भोगावती या पश्चिम घाटातील प्रमुख नद्या 50 ते 60 किलोमीटर वाहत येऊन पंचगंगेला मिळतात, परंतु पर्जन्यमापक यंत्रणा नसल्यामुळे त्या नद्यांमध्ये किती पाऊस पडतो याची नोंद होत नाही. या पाच नद्यांतून येणारे पाणी कोल्हापुरातील शिवाजी पूल, शिरोली पूल, रुई आणि इचलकरंजी पुलाखालून वाहत मग कृष्णेला मिळते. त्यामुळेही पाण्याला पुलाच्या मागील बाजूस मोठा फुगवटा येतो. पूल बांधताना या महापुराच्या पाण्याचा निचरा लवकर कसा होईल याचा विचार करायला हवा.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुढाकार

पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या या संकटात सापडलेल्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यातर्फे प्रायव्हेट हायस्कूल, खासबाग, कोल्हापूर येथे मदत व निवारण केंद्र सुरू करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी या मुख्य केंद्रातून मदत व निवारण करण्यात येत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दैवज्ञ बोर्डिंग येथे 50हून अधिक कार्यकर्ते पूरग्रास्तांना रोज लागणाऱ्या साहित्याचे 1000 किट्स तयार करून वितरित करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीने जिल्ह्यात 110 केंद्रांवर तत्काळ मदतकार्य सुरू केले. धान्य, वैद्यकीय सेवा, पाण्याचे व्यवस्थापन आणि कपडयांची व्यवस्था करण्यात आली आहे. 26 केंद्रांवर मेडिक्लॉरचा वापर करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 26 पूरग्रास्त निवारा केंद्रांवर, म्हणजेच कोल्हापूर शहर तसेच करवीर, शिरोळ, चंदगड या ठिकाणी वैद्यकीय केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये 32 डॉक्टरांचा आणि 25 मेडिकल प्रतिनिधींचा समूह सेवा देत आहे. सद्यःस्थितीत 5 लाख रुपयांहून अधिक वैद्यकीय साहित्य व औषधे दान स्वरूपात जमा झाली आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये नऊ हजाराहून अधिक लोकांची तपासणी करून गरजेनुसार औषधोपचार करण्यात येत आहेत. या कामात भगतराम छाबडा, डॉ. सूर्यकिरण वाघ, डॉ. राजेश पवार, केदार प्र. जोशी, राहुल भोसले, अनिरुध्द कोल्हापुरे, डॉ. मिलिंद सामानगडकर, केशव गोवेकर, मिलिंद कुलकर्णी यांच्यासह 1150 स्वयंसेवक सहभागी आहेत.

समांतर मदतयंत्रणा

रांगडया कोल्हापूरकरांनी एकमेकांना धीर आणि आधार देत महापुराच्या संकटाचा सामना केला. आपुलकी आणि स्नेह यांची वेगळी ओळख कोल्हापूरकरांनी दाखवून दिली. महापुराच्या संकटातील पूरग्रास्तांना बाहेर काढणे, त्यांचे सुरक्षित स्थलांतर करणे, विविध छावण्यांमधील पूरग्रास्तांची आरोग्यतपासणी करणे, जेवण, कपडे, आवश्यक साहित्याचा पुरवठा करणे, ज्यांना पुरातून बाहेर काढणे शक्य नाही, अशा लोकांपर्यंत खाद्यपदार्थ, पाणी पोहोचवणे यासाठी तरुणाई सक्रियपणे कार्यरत राहिली. विविध सेवाभावी, सामाजिक संस्था, ग्राूपच्या माध्यमातून तरुणाईने आपली कामगिरी बजावली. चित्रदुर्गमठ, मुस्लीम बोर्डिंग आदी ठिकाणी स्थलांतरित पूरग्रास्तांच्या कॅम्पमध्ये जबाबदारी सांभाळली. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली आणि आंबेवाडी, तर शिरोळ तालुक्यातील गावागावांमधील तरुणाईने उपलब्ध साधनांद्वारे मदत, बचावकार्य सुरू केले. जनावरांना सुरक्षितस्थळी हलविले.

'एनडीआरएफ', आपत्ती व्यवस्थापन, व्हाईट आर्मीच्या जवानांच्या खांद्याला खांदा लावून युवक-युवतींनी काम केले. मदतीसाठी रात्रंदिवस त्यांचे हात राबत आहेत. कोल्हापूर वुई केअर, 'एनजीओ कम्पशियन 24', शिवाजी विद्यापीठाचे एन.एस.एस.चे स्वयंसेवक, विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समिती, न्यू कॉलेजमधील विवेक वाहिनी, रॉबिनहूड आर्मी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रोस, एन.एस.यू.आय., मनविसे, युवा सेना, मेडिकल, इंजीनिअरिंग, फार्मसीसह कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील आजी-माजी विद्यार्थी, विविध लहान-मोठया कंपनीमधील नोकरदार युवक-युवतींच्या ग्राूपने आपापल्या परीने कोल्हापूरवरील महापुराच्या संकटाचा सामना केला.

ग्राामीण भागात गट-तट आणि तरुण मंडळांमध्ये मोठीर् ईष्या असते. मात्र महापुराच्या काळात हे गट-तट,र् ईष्या विसरून, जाती-पातींच्या भिंती मोडून तरुणाईने एकजुटीने मदतकार्य राबवले. छोटया गावातील युवकांनीही महापुराच्या काळात गावातील निम्म्याहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले, जनावरांना हलविले. दिंडनेर्ली, हणबरवाडी, नंदगाव आदी गावांतील तरुणांनी पूरग्रास्त भागातील जनावरांसाठी ओला चारा पुरवण्याचे काम केले. पूरग्रास्तांना दूधवाटप केले. गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, उचगाव, सरनोबतवाडी, शिरोली आदी गावांमधील युवकांनी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय मार्गावर शिरोली ते उजळाईवाडीदरम्यान थांबून राहिलेल्या वाहनचालकांना चहा, न्याहरी आणि जेवण उपलब्ध करून दिले.

अगदी घरासारखी काळजी

ही मदतकार्यातील तरुणाई पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आलेल्या पूरग्रास्तांची अगदी घरातील व्यक्तीसारखी काळजी घेत होती. त्यांना टूथपेस्ट-ब्रशपासून ते रात्री झोपण्यासाठी उबदार ब्लँकेट, डासांपासून सुरक्षिततेची कॉइलपर्यंत सर्व काही उपलब्ध करून देण्यात तरुणाई झटत होती. कधी 'गणपती बाप्पा मोरया'चा, तर कधी 'जय भवानी जय शिवाजी'चा, 'हर हर महादेव'चा गजर करीत मदतकार्यात तरुणाईने आपले योगदान दिले.

हॅम रेडिओच्या माध्यमातून पूरग्रास्तांना मदत

 

कोल्हापूरच्या महापुरात फारशी जीवितहानी झाली नाही, याचे कारण नितीन ऐनापुरे आणि त्यांच्या चमूने हॅम रेडिओच्या माध्यमातून सुसूत्र आणि नियोजन पध्दतीने केलेली मदत. 35 वर्षांचा अनुभव असलेल्या ऐनापुरे यांनी हॅम रेडिओच्या माध्यमातून या महापूरात 10 वॉकीटॉकींच्या आणि ऑपरेटर्सच्या साहाय्याने अचूक मार्गदर्शन करत कोणतीही जीवितहानी होऊ दिली नाही. महामार्गावरील बेस कॅम्प आणि जोतिबावरून रिपिटर यंत्रणेद्वारे संदेशवहन यंत्रणेद्वारे शिंगणापूर, आंबेवाडी, चिखली येथील 3000 लोकांना पाच रबर बोटींतून बाहेर काढण्यास मदत झाली. शिरोली नाका ते तावडे हॉटेल मार्गावरील रोजच्या 35 ते 40 फेऱ्यांद्वारे अत्यवस्थ रुग्ण, रुग्णालय आणि अन्नछत्रासाठी लागणारे गॅस सिलिंडरची वाहतूक, नैसर्गिक मृत्यू झालेले मृतदेह, विद्यार्थी यांना मदत झाली.

'सोशल मीडिया'द्वारे मदतीचे काम

सोशल मीडिया म्हणजे बागुलबुवा अशी ओरडा करणाऱ्यांना कोल्हापूरकरांनी सणसणीत उत्तर दिले. त्यांनी या माध्यमांचा जेवढा चांगला आणि सशक्त उपयोग केला, तेवढा आजपर्यंत कोणीही केला नाही. विविध कारणांमुळे ज्यांना प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी होणे शक्य नव्हते, अशा 'नेट'करी तरुणाईने सोशल मीडियाद्वारे मदतीचे काम केले. पुरामध्ये अडकलेल्या लोकांच्या ठिकाणाची माहिती देणे. विविध ग्राूपद्वारे मदतीचे आवाहन करणे, कोणत्या ठिकाणी, कोणत्या स्वरूपातील मदतीची गरज आहे, ते अनेकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. महापुराची स्थिती, पाणी पातळी कमी-अधिक होणे, आदी विविध स्वरूपांतील माहिती क्षणाक्षणाला तरुणाईकडून सोशल मीडियावर दिली जात होती. महापुराच्या काळात आपल्याला मदत करता येत नसल्याने, नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई-पुण्यासह राज्यभर आणि देशभर असलेल्या कोल्हापूरच्या तरुणांची घालमेल सुरू होती. अनेकांनी ती सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली. आता याच सोशल मीडियावरून त्यांची मदत मिळू लागली आहे.

मधुबाला आडनाईक

9011030047

कोल्हापूर

Powered By Sangraha 9.0