समन्वयाचे अलगूज

01 Aug 2019 13:09:53

गावगाडा आणि गावगाड्याच्या आधाराने जगणारा समाज हा अण्णाभाऊंच्या लेखनाचा मुख्य घटक आहे. समाजातील कुरिती, आपआपसातील वैर संपून, समाज सुखी, संपन्न व्हावा आणि समाजात मैत्रभावाने सलोखा निर्माण व्हावा, हा समन्वयाचा सूर अण्णाभाऊंच्या साहित्यात दिसून येतो.

 

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे. दि. 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगावच्या मांगवाड्यात अण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला. आई वालूबाई आणि वडील भाऊराव. केवळ दीड दिवसाची शाळा शिकलेल्या या महापुरुषाला अनेक संकटांशी, समस्यांशी झगडावे लागले. परिस्थितीशी झगडत असताना त्यांनी विपुल साहित्यलेखन केले. त्यांनी कथा-कादंबर्यांमधून जे चित्रण केले आहे, त्याचा विचार करताना असे लक्षात येते की अण्णाभाऊंनी साहित्यातून समाजदर्शन घडवले, पण वैयक्तिक जीवनाची पडछाया त्याच्यावर पडू दिली नाही. स्वतःला अलिप्त ठेवत त्यांनी आत्मीय भावनेने लिखाण केले आहे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातून जिवंत माणसे साकार झालेली आहेत. अण्णाभाऊंच्या कथा-कादंबर्यांमधील व्यक्तिरेखा या वास्तवातील व्यक्ती आहेत. अण्णाभाऊ म्हणतात त्याप्रमाणे त्यांना कल्पनेचे जग निर्माण करता येत नाही. अण्णाभाऊंनी जे पाहिले-अनुभवले, तेच आपल्या साहित्यातून साकार केले आहे.

विद्रोह नाही समन्वय

अण्णाभाऊंच्या साहित्याबद्दल विचार करताना मला नेहमी दोन प्रश्न पडतात - 1) अण्णाभाऊंनी जे लिहिले, ते का? कुणासाठी लिहिले? 2) अण्णाभाऊंच्या साहित्याचा सूर कोणता आहे? आज अण्णाभाऊंचे निधन होऊन पन्नास वर्षे होऊन गेली आहेत. या पन्नास वर्षांत अण्णाभाऊंच्या साहित्याचे खर्या अर्थाने मूल्यमापन झाले नसले, तरी त्यांच्या साहित्याला वेगवेगळ्या परिभाषा-संकल्पनांच्या चश्म्यातून पाहण्याचा प्रयत्न झाला आहे आणि तो परिपूर्ण नाही, उलट अण्णाभाऊंवर अन्याय करणारा आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याची ओळख एका शब्दात सांगायची, तरसमन्वयवादी साहित्यअशीच करून दिली पाहिजे, मात्र त्या अंगाने अण्णाभाऊंच्या साहित्याचा अभ्यास अपवादानेच झाला आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यात संघर्ष आहे, बंड करून उठणार्या व्यक्तिरेखा आहेत, तरीही नकार, विद्रोह हे त्यांच्या साहित्याचे अंतिम गंतव्यस्थान नाही. संघर्ष, बंड, उठाव या तात्कालिक बाबी असून समाजजीवनात, गावगाड्यात परस्परपूरकता जपली पाहिजे, परस्परपूरकतेतून एकमेकांच्या उन्नतीचा मार्ग चालताना निर्माण होणार्या अडचणी, संकटे यांना माणूस म्हणून तोंड देत संघर्ष केला पाहिजे आणि माणूसपणाची वाट निर्मळ केली पाहिजे, असा संदेश अण्णाभाऊंच्या साहित्यातून मिळतो. अण्णाभाऊ संघर्षाला घाबरत नाहीत किंवा त्यांना संघर्ष वर्ज्य नाही. मात्र संघर्ष कशासाठी करायचा हे त्यांना नक्की माहीत आहे.

अण्णाभाऊंचे स्वप्न

अण्णाभाऊंनी का लिहिले? कुणासाठी लिहिले? या प्रश्नांची आपण उत्तर शोधतो, तेव्हा असे लक्षात येते की अण्णाभाऊ हे माणसावर अतोनात प्रेम करणारे होते, माणसाच्या सुखदुःखाशी समरस होणारे होते आणि माणसाचे सारे दुःख-दैन्य लयाला जाऊन त्याला स्वाभिमानाने जगता आले पाहिजे, अशी थोर श्रद्धा उराशी बाळगून लेखन करणारे होते. आपली ही श्रद्धा प्रत्यक्ष अनुभवास यावी अशी त्यांना आस होती. आपल्यावैरकादंबरीच्या मनोगतात ते लिहितात, ‘मला वाटतं आपण सतत लिहीत राहावं, जुन्या चालीरिती दूर कराव्यात आणि जुन्या पण लोप पावलेल्या प्रगत प्रथांना पुन्हा पुढे आणावं. हेवेदावे, दुष्टावे, वैर यांचा घोर परिणाम दाखवावा आणि या नवमहाराष्ट्रात प्रेम, सलोखा यांची वाढ व्हावी, जनता सुखी, संपन्न व्हावी आणि महाराष्ट्र राज्यात विषमता नष्ट झालेली नि समाजसत्तावादाचा अरुणोदय झालेला आपण पाहावा अशी दृढ श्रद्धा हृदयात घेऊन मी लिहितो.’ अण्णाभाऊंचे हे मनोगत वाचले की त्यांच्या लेखनाच्या प्रेरणा आपल्या लक्षात येतात. पण केवळ श्रद्धा असून चालत नाही, तर त्या श्रद्धेवर अटल राहून तसा अनुभव यावा यासाठी प्रयत्न करावा लागतो. या प्रयत्नांचे शब्दचित्र अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून साकार केले. अण्णाभाऊंच्या साहित्यात मारामार्या, खून, अत्याचार, पळवापळवी यांचे चित्रण येते ते समाजवास्तव दाखवण्यासाठी, पण त्याचबरोबर समाजात असणारी सज्जन शक्तीही अण्णाभाऊंच्या साहित्यातून उठावदारपणे दिसून येते. एका बाजूला अहंकार, वैर, झगडा, एकमेकांवर केलेल्या कुरघोडी यांचे प्रत्ययकारी चित्रण अण्णाभाऊ करतात आणि दुसर्या बाजूला प्रेम, त्याग, करुणा, आपुलकी अशा चिरंतन मूल्यांची पाठराखणही तितक्याच ताकदीने करतात. वरवर संघर्षाचे चित्रण वाटणार्या अण्णाभाऊंच्या साहित्याच्या अंतरंगातून समन्वयाचा सूर घुमताना दिसतो.


समाजवास्तव

अण्णाभाऊंच्या साहित्यात दोन परिसरातील समाजाचे चित्रण झाले आहे. एक परिसर आहे महामाया मुंबापुरीचा. या महाकाय शहरातील गरीब माणसे, कामगार, भिकारी, भटके विमुक्त, झोपडपट्टीचे दादा, विपरीत स्थितीतही तग धरून राहणारी परिस्थितीशी दोन हात करत जगणारी माणसे अण्णाभाऊंच्या साहित्यातून भेटतात, दुसरा परिसर आहे सातारा-सांगली-कोल्हापूर या जिल्ह्यांचा. हा परिसर कधीकाळी पुंडाव्यासाठी, खुनाखुनीसाठी प्रसिद्ध होता. या भागातील वैराच्या, संघर्षाच्या अनेक कथा-कादंबर्या अण्णाभाऊंनी लिहिल्या आहेत. वैर आणि पुंडाव्याशिवायही या मातीची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत आणि तीच अधोरेखित करून समाजापुढे मांडली पाहिजेत. अण्णाभाऊ लिहितात, ‘तिथे कष्टाची कृष्णाबाई अखंडपणे वाहते, तिथे देशभक्तीची कोयना नवजीवन निर्माण करते नि तिथे त्यागाचे महान कुंड सदैव धगधगत असते. ती माती शिवरायांच्या घोड्याच्या टापांनी पुनित झालेली आहे. तिथे मराठा सैनिकाची तलवार तळपली आहे आणि मराठी साहित्यिकांच्या प्रतिभेने इंद्रधनुष्य निर्माण केले आहे. अशा त्या भूमीला नंदनवन हे सार्थ नाव प्राप्त झाले आहे. तेव्हा मी वरील सद्भावना हृदयात घेऊन माणसे घडवण्याची धडपड करतो.’ अण्णाभाऊ माणसे घडवण्यासाठी धडपड करतात म्हणजे नक्की काय करतात? तर ते आपल्या लेखनातून गावगाड्यातील कुरिती, अज्ञान, अंधश्रद्धा यावर नेमकेपणाने बोट ठेवतात आणि या सार्याचे परिणाम अधोरेखित करतात. एका बाजूला समाजातील विकृतीवर ते भाष्य करतात, तर दुसर्या बाजूला सद्गुण आणि आधुनिकता यांची पाठराखण करतात. अण्णांच्या कथा-कादंबर्यांतील संघर्ष हा तात्कालिक स्वरूपाचा असून त्यांना समाजजीवनात कायम संघर्ष राहावा, माणसे एकमेकाविरुद्ध कटकारस्थाने करत, दुष्टाव्याने जगू नयेत असे वाटते. त्यामुळे सामाजिक संघर्ष चितारताना ते त्यांच्या स्वप्नातील समाजजीवन, ज्याचा त्यांना ध्यास आहे, ते प्रत्यक्षात यावे म्हणून दिशादर्शन करतात. जे समाजवास्तव आहे, ते कुशलपणे मांडताना जे सकारात्मक आहे, समाजाच्या भल्याचे आहे, भेदविरहित आहे त्यांची पाठराखण करण्याचे काम अण्णाभाऊ करतात. गावगाडा आणि गावगाड्याच्या आधाराने जगणारा समाज हा अण्णाभाऊंच्या लेखनाचा परीघ असल्यामुळे त्या परिघातील सर्व घटकांना आपल्या साहित्यात स्थान देण्याचे काम अण्णाभाऊंनी केले आहे.


अण्णाभाऊंच्या
साहित्यात जसा देशमुख-देशपांडेचा भला मोठा वाडा दिसतो, तसाच गावाबाहेरच्या माळावर पाले ठोकून राहणारा व्यंकू दरवेशीही दिसतो. समाजजीवनाचा उभा-आडवा पट अण्णाभाऊंच्या साहित्यात दिसतो, कारण सर्व प्रकारच्या माणसांवर अण्णाभाऊंचे प्रेम आहे. माणसाचे माणूसपण जागावे आणि त्यांनी परस्परपूरक जीवन जगावे, ही अण्णाभाऊंची इच्छा आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारी सामाजिक मनोभूमिका निर्माण करण्याचे काम अण्णाभाऊंचे साहित्य करत असते. वैर, दुष्टावा संपावा, भेदभाव लयास जावा असे म्हणताना माणूस जगला पाहिजे अशी अण्णाभाऊंची भूमिका आहे आणि ती थेट संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पसायदानाशी नाते सांगणारी आहे. ‘खळांची व्यंकटी सांडोअसे मागणे मागणारी ज्ञानेश्वर माउली आणि वैर, दुष्टावा संपून प्रेम-सलोखा वाढावा असे म्हणणारे अण्णाभाऊ हे एकाच चिरंतन तत्त्वाचे वाहक आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्याचा सूर कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहेसमन्वय.’ अण्णाभाऊंनी आपल्या विपुल लेखनातून समन्वयाच्या अलगुजाचे मंजूळ स्वर छेडले आहेत आणि ते नकार-विद्रोहासारखे तात्कालिक स्वरूपाचे नाहीत, चिरंतन आहेत.

Powered By Sangraha 9.0