अमेरिकन समाजात हिंदू धर्म-संस्कृतीबद्दल जाणीव वाढवण्याचे काम करणे महत्त्वाचे होते. या निमित्ताने अमेरिकेमधील हिंदू स्वयंसेवक संघाने (HSSने) सुमारे दहा वर्षांपूर्वी 'गुरुवंदना' हा कार्यक्रम चालू केला. गुरुवंदनेच्या माध्यमातून आज अमेरिकन समाजाला याच सकारात्मक मानसिकतेचे दर्शन होऊ लागले आहे.
दर वर्षी मे महिन्यातील पहिला आठवडा अमेरिकेत Teachers appreciation Week म्हणून आणि त्याच आठवडयातील मंगळवार National Teachers' Day म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने देशभरच्या शाळांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रामुख्याने स्थानिक शाळांमधील पालक-शिक्षक संघटना (Parents Teachers Association - PTA) असे कार्यक्रम आयोजित करतात.
गेल्या काही दशकांत भारतातून, तसेच इतर देशांमधून आलेले आणि अमेरिकेतील दुसऱ्या अथवा आणखी पुढच्या पिढीतील हिंदू यांच्यामुळे शाळांमध्ये हिंदू विद्यार्थी वाढत आहेत. पण प्रत्येक अमेरिकन शिक्षकास अथवा शैक्षणिक अधिकाऱ्यास हिंदू धर्म आणि हिंदू समाज यांच्याबद्दल अजूनही पुरेशी माहिती आहे असे म्हणणे शक्य नाही. बऱ्याचदा त्यांची माहिती पाठयपुस्तकात असलेल्या हिंदू धर्मातील कालबाह्य समजुती-रूढींबद्दल असते, तर कधी इंडियन फूड अथवा कधीतरी पाहिलेले बॉलीवूड नाच यातून तयार झालेल्या चित्रापुरतीच मर्यादित असते. अनेकदा काही पालक सणांनिमित्त अथवा विशेष presentation करून शिक्षकांना माहिती देण्याचा प्रयत्न करतात. अमेरिकन शाळांमध्ये वार्षिक calendars असतात. त्यात विविध धर्मांच्या धार्मिक सुटया (जरी त्यानिमित्त शाळांना सुट्टी नसली, तरी) दाखवलेल्या असतात. आता अनेक ठिकाणच्या शाळा त्यांच्या वार्षिक calendarsमध्ये दिवाळी, होळी तसेच कधीकधी शीख सण दाखवू लागले आहेत. तरीदेखील हे स्वागतार्ह प्रयत्न व्यक्तिगतच असल्याने स्थानिक पातळीपुरतेच राहणे क्रमप्राप्त होते. हे प्रयत्न संरचित करून त्यातून विस्तृत अमेरिकन समाजात हिंदू धर्म-संस्कृतीबद्दल जाणीव वाढवण्याचे काम करणे महत्त्वाचे होते.
अमेरिकेमधील हिंदू स्वयंसेवक संघाने (HSSने) या निमित्ताने सुमारे दहा वर्षांपूर्वी 'गुरुवंदना' हा कार्यक्रम चालू केला. या संदर्भात अधिक लिहिण्याआधी, अमेरिकास्थित हिंदू स्वयंसेवक संघ (HSS) थोडक्यात - HSS ही विना नफा तत्त्वावर चालणारी संघटना (Non-Profit Organization), 1989पासून देशभर 'बालगोकुलम'च्या माध्यमातून हिंदू मुला-मुलींसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी 200हून अधिक ठिकाणी साप्ताहिक शाखा चालवते. या शाखांचे स्वरूप परिवार शाखेचे असते. अर्थात, कुटुंबातील सर्वच - सर्व शालेय आणि महाविद्यालयीन वयोगटातील मुले, आई-वडील ते थेट आजी-आजोबा असे सर्वच यात सहभागी होऊ शकतात आणि होतात. सूर्यनमस्कार, योगासने, खेळ, गटानुसार गोष्टी-चर्चा-बौध्दिके असे सर्व काही दीड तासाच्या साप्ताहिक शाखेत घेतले जाते. अमेरिकेतील दैनंदिन कार्यपध्दतीमुळे, तसेच निवासस्थाने, शाखा/संघस्थान यातील अंतरांच्या मर्यादेमुळे साप्ताहिक शाखा करणे हे व्यावहारिक स्वरूप आहे. मात्र या निमित्ताने एकत्र आलेले HSS स्वयंसेवक-सेविका शाखांच्या व्यतिरिक्त विविध प्रकल्पांतून अमेरिकन समजाला हिंदू संस्कृतीतील, विचारसरणीतील वैश्विक तत्त्वांची ओळख करून देत असतात. वर उल्लेखलेल्या Teachers appreciation Weekच्या आणि National Teachers' Dayच्या निमित्ताने HSSच्या स्वयंसेवक-सेविकांनी हा कार्यक्रम साधारण शनिवारी अथवा रविवारी करणे चालू केले.
गुरुवंदना हा कार्यक्रम साधारण एप्रिलच्या शेवटच्या आठवडयापासून ते जूनच्या पहिल्या आठवडयापर्यंत वेळ आणि सोयीनुसार विविध ठिकाणी केला जातो. काही ठिकाणी हा स्थानिक बाळगोकुलम शाखेच्या कार्यकर्त्यांकडून अगदी स्थानिक पातळीवर केला जातो, तर काही ठिकाणी तो काही शाखा एकत्र येऊन मोठया प्रमाणावर साजरा करतात. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक-शिक्षिका हे प्रामुख्याने आमंत्रित केलेले असतात, त्याव्यतिरिक्त, महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका, मुख्याध्यापक आणि इतर शिक्षण अधिकारी यांनादेखील बोलावले जाते. अमेरिकेत प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून, म्हणजे सरकारी शाळांमधून शालेय शिक्षण होते. येथे स्थानिक स्वराज्य संस्था खऱ्या अर्थाने स्वतंत्र कारभार करत असल्याने, कधीकधी महापौर आणि इतर स्थानिक वरिष्ठ अधिकारीसुध्दा या कार्यक्रमास आवर्जून येतात.
कार्यक्रमाच्या सुरवातीस निमंत्रितांना कुंकू लावून त्यांचे स्वागत केले जाते. नंतर उपस्थित पालक आणि इतर उपस्थित यांच्यासमोर बालगोकुलम सदस्य मुले-मुली शिक्षक-शिक्षिकांची पूजा करतात, त्यांना फूल तसेच भेटवस्तू देतात. कार्यक्रमाच्या स्थानिक स्वरूपानुसार नंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. स्थानिक प्रतिष्ठित व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित असते. प्रमुख पाहुण्यांचे, तसेच HSSच्या प्रमुख वक्त्याचे प्रसंगानुरूप ठरलेल्या विषयावर भाषण होते. कुठलाही भारतीय कार्यक्रम भारतीय अल्पोपाहराशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. भारतीय तसेच अभारतीय उपस्थित, विविध प्रकारच्या भारतीय खाद्यपदार्थांचा मनापासून स्वाद घेतल्याशिवाय जात नाहीत! त्याव्यतिरिक्त स्थानिक शाखांनी ठरवल्याप्रमाणे खेळाची प्रात्यक्षिके, भारतीय इतिहास, धर्म, तत्त्वज्ञान, गुरुशिष्य परंपरेतील गोष्टी आदींवरील स्टॉल्स असतात, ज्यातून केवळ निमंत्रित शिक्षकांनाच नाही, तर उपस्थितांनादेखील माहिती मिळते. अनेक शिक्षकांनी आणि शाळांनी फेसबुक आणि टि्वटर यासारख्या समाजमाध्यमांतून या कार्यक्रमाचे फोटो प्रकाशित करून, कार्यक्रम खूप आवडल्याचे खऱ्या अर्थाने जगजाहीर केले.
दहा वर्षांपूर्वी केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच ठिकाणी हा प्रयत्न केला गेला होता. पण दर वर्षी ह्या प्रकल्पास वृध्दिंगत होणारा प्रतिसाद मिळत गेला आहे. या वर्षी बोस्टन, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, शिकागो, ह्युस्टन, लॉस एंजल्स, बे एरिया या मोठया शहरी भागांव्यतिरिक्त अनेक राज्यांत मिळून जवळपास 70 ठिकाणी कार्यक्रम झाले. त्यात एकूण 7800 जणांच्या उपस्थितीमध्ये 1700हून अधिक शिक्षक, शैक्षणिक अधिकारी, तसेच स्थानिक अथवा राज्यस्तरावरील लोकप्रतिनिधी सहभागी झाले. ह्या प्रकल्पामुळे हिंदू संस्कृती आणि तत्त्वज्ञान याची किमान तोंड-ओळख करून देणे शक्य झाले आहे. त्यातून होणारे सक्रिय परिणाम केवळ शालेय शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यापुरतेच मर्यादित नसून त्यातून भिन्न संस्कृतींच्या समाजांना सकारात्मकतेने जवळ आणणे शक्य झाले आहे.
बऱ्याचदा अमेरिकन संस्कृतीस 'मेल्टिंग पॉट' असे संबोधले जाते. थोडक्यात, जो कोणी येथे येतो, तो इथला भाग होऊन जातो, त्याला अमेरिकन संस्कृती आपलेसे करते. बऱ्याचदा अमेरिका आणि वंशवाद, हिंसा आदीसंदर्भात उलटसुलट वाचनात येते. कधी कोणाचे दुर्दैवी - वाईट अनुभव ऐकायला मिळतात. तरीदेखील अमेरिकन संस्कृती बहुतांशी वेळेस समोरच्याला सहज आपलेसे करते हा अनुभव आणि निरीक्षण आहे.
अमेरिका हा प्रयोग 243 वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. त्या अर्थाने हा तरुण देश आणि नागरी संस्कृती आहे. त्यामुळेच विविध प्रयोग आणि त्याला अनुसरून विविध वाक्प्रयोग, येथे अपरिहार्यपणे, विशेषतः विचारवंत करत असतात. म्हणूनच समोरच्या सांस्कृतिकदृष्टया वेगळया व्यक्तीस आपलेसे करणे याचा अर्थ त्या व्यक्तीचे वेगळे वाटणारे अस्तित्वच नष्ट करणे असा तर होत नाही ना, हा विचार वाढू लागला आहे. त्यातूनच आता मेल्टिंग पॉट या संकल्पनेस पर्यायी असा 'सॅलड बाउल' हा नवीन वाक्प्रयोग आता वापरात येत आहे. सॅलडमध्ये जसे वेगवेगळे घटक पदार्थ स्वतःचे वेगळे अस्तित्व टिकवत एकत्र होतात, तसेच विविध समाजांनी एकत्र आलेल्या देशाचे असते. 'एकम सत विप्रा बहुधा वदन्ति' तसेच 'अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्' असे कायम म्हणत समोरच्याला आपलेसे करणाऱ्या हिंदू - भारतीय मानसिकतेस हे नवीन नाही. गुरुवंदनेच्या माध्यमातून आज अमेरिकन समाजाला याच सकारात्मक मानसिकतेचे दर्शन होऊ लागले आहे.