यज्ञमय संतत्वाची प्रचिती : श्री सेलूकरजी महाराज

विवेक मराठी    12-Jul-2019
Total Views |


- गंगाधर कुलकर्णी

माउली ज्ञानेश्वर महाराज जिचा माउली असा उल्लेख करतात, ती (नाही श्रुती परौती। माउली जगा) श्रुतीमाउली, तिची निःसीम सेवा करणार्‍या सुपुत्राची कर्मभूमी असणार्‍या श्री क्षेत्र गंगाखेड (जि. परभणी) येथील यज्ञभूमी व दीक्षित सेलूकरजी यांचा संक्षिप्त परिचय आपण या छोट्याशा लेखात पाहणार आहोत.


 

श्रुती अर्थात् वेद हे विश्वकल्याणाचे सर्वश्रेष्ठ संविधान असून भारतीय व महाराष्ट्रीय साधुसंतांनी अत्यंत श्रद्धापूर्वक या श्रुतीमातेचे अनुसरण केले आहे.

वेद आणि वैदिक जीवनपद्धती ही साधुसंतांनी, ऋषिमुनींनी अंगीकारलेली व प्रसारित केलेली जीवनपद्धती असून दीक्षित श्री सेलूकर गेल्या तीन पिढ्यांपासून आपल्या आचरणाद्वारे व उपासनेद्वारे तिचे निष्ठापूर्वक जतन करीत आहेत.

श्रीकृष्ण दीक्षित सेलूकर यांनी अग्निहोत्र दीक्षा घेऊन अनेक दर्शपौर्णमास इष्टियज्ञ करून एक महासोमयाग संपन्न करून आपले ज्येष्ठ पुत्र दीक्षित रंगनाथ कृष्ण सेलूकर यांच्या खांद्यावर या वेदनिष्ठ जीवनप्रणालीची धुरा सोपविली. त्यांनीही आयुष्यभरात संपूर्ण भारतवर्षात अनेकानेक महासोमयाग घडवून शुद्ध वैदिक यज्ञमय जीवनपद्धतीचे दर्शन घडविले.

आपल्या करुणामय वात्सल्ययुक्त साधुहृदयाने त्यांनी अनेक भाविकांच्या जीवनात सन्मती आणि सुनीती प्रवाहित केली. वेद, वेदांनी प्रतिपादिलेली यज्ञसंस्था आणि यज्ञसंस्थेने विकसित केलेली समृद्ध जीवनप्रणाली त्यांनी अत्यंत डोळसपणे समाजासमोर ठेवली.

यज्ञ म्हणजे जोडणे, पशू म्हणजे पाहणारा, बळी म्हणजे ज्याच्यात बळ आहे तो,आहुती म्हणजे आपले बळ डोळसपणे समाजासाठी समर्पित करणे अशा अनेक संकल्पना त्यांनी समाजमनात जाणीवपूर्वक रुजविल्या, वाढविल्या. कर्मकांडातील मर्मकांड समाजासमोर ठेवले.

प्रज्वलित अग्निकुंडात हविर्द्रव्याचा त्याग करून निसर्ग सुरक्षित करता येतो, तर समाजात आपले सद्गुण आहुत करून समाज सुरक्षित करता येतो, हे त्यांनी आपल्या आचरणाद्वारे दाखवून दिले. नियोजन, चिकाटी, सहनशीलता, धैर्य इ.सद्गुणांच्या साहाय्याने अशक्य वाटणारे कामही सहज होऊ शकते, हे त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये भव्यातिभव्य सोमयाग घडवून करून दाखविले.

संपत्ती आणि सत्ता यांना सौजन्याच्या आणि सेवेच्या बळावर सत्कार्यासाठी वळविले जाऊ शकते, हे त्यांनी प्रत्यक्ष दाखविले.

वैदिक महायज्ञांचे सार्वजनिक अनुष्ठान घडविताना सर्वसामान्यांतील दातृत्ववृत्ती कशी विकसित होते, त्याचप्रमाणे सामान्यांकडून असामान्य कार्ये कशी घडू शकतात, याची अनेक प्रात्याक्षिके त्यांनी जीवनभरात समाजासमोर ठेवली.

यज्ञाची वैश्विक उपयुक्तता आणि आवश्यकता स्पष्टपणे दिसत असताना देहमर्यादा व आयुष्यमर्यादा यांच्या बंधनामुळे आपली इहलोकीची यज्ञमय जीवनयात्रा संपविण्यापूर्वी त्यांनी आपले सुपुत्र दीक्षित यज्ञेश्वरजी सेलूकर यांना या विश्वउपकारक कार्याचा वसा देऊन जणू आपल्या देहाचे जीर्ण वस्त्र त्यागून यज्ञेश्वरजींच्या शरीरात प्रवेश केला.

त्यानंतर दीक्षित यज्ञेश्वरजींनी अत्यंत वेगाने, निष्ठेने आणि आपल्या पिताश्रींच्या पदचिन्हांना प्रमाण मानून अग्निहोत्र व्रत कार्य प्रारंभ केले.

पूज्य पिताश्रींनी संस्थापित केलेल्या वेद पाठशाळेचा गुणवत्तापूर्ण विस्तार करून त्याला प्रगतिपथावर नेत असतानाच त्या अनुषंगाने यज्ञभूमी गंगाखेड येथे विस्तीर्ण आणि भव्य असे वास्तुनिर्माण त्यांच्या विद्यमान कार्यकालात होत आहे. निराधारांना आधार देत त्यांचा प्रतिपाळ करून ते समाजासमोर एक आदर्श प्रस्थापित करीत आहेत. वेद विद्यालयातील विद्यार्थ्यांप्रती पुत्रवत प्रेमाने ओथंबलेली त्यांची कार्यपद्धती वेद विद्यालयाला वैभव प्राप्त करून देत आहे.देशातील श्रेष्ठातिश्रेष्ठ वैदिक चिंतकांच्या, संशोधकांच्या अभ्यासपूर्ण आणि आनंददायक ‘श्रौत संगोष्ठी’च्या अयोजनाची मालिका तर संपूर्ण देशात कौतुकाचा आणि आदराचा विषय होत आहे.

श्रीक्षेत्र गंगोत्री, श्रीक्षेत्र बद्रीनाथ धाम, श्रीक्षेत्र पुष्कर, श्रीक्षेत्र गाणगापूर आदी देशातील विविध पवित्र स्थानी संपन्न झालेले, तसेच मराठवाड्यामध्ये व महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये संपन्न झालेले भव्यातिभव्य महासोमयाग हे दीक्षित यज्ञेश्वरजींच्या कार्यशैलीचा अद्भुत आणि आश्चर्यकारक पैलू आहे.

काही लाख रुपयांपासून सुरू झालेला महासोमयाग मालिकांचा प्रवास कोटीच्या घरात येऊन पोहोचलेला असूनसुद्धा यज्ञेश्वरजींची आर्थिक अलिप्तता पाहिली,म्हणजे ‘कमलदल पत्र समान’ म्हणजे काय, याचे प्रत्यक्ष दर्शन घडते.

नियोजनाची सूक्ष्मता, परिणामाची अचूकता, कार्यकर्त्याची कार्यनिष्ठा, परिश्रमाची परिपूर्णता या सर्व पातळ्यांवर एवढा सुंदर मेळ साधला जातो की, त्यांचा महासोमयाग म्हणजे दिग्गज वादकांच्या विविध वाद्यांच्या एकाच वेळी सादर होणार्‍या आनंददायक मैफलीची आठवण यावी.

महासोमयागातील सवन याग, अन्नदान, भागवतादी कथांचे अयोजन, प्रचंड संख्येने उपस्थित भाविकांसोबत सामूहिक श्रीसूक्त हवन, काळजाचा ठोका चुकविणारा महाआहुतीचा प्रसंग!.... सारेच अद्भुत, अनाकलनीय, तरीही अतिआनंददायक!!!

आनंद संप्रदायाची ही आनंदयात्रा अविरतपणे ‘सर्वभूतहितार्थाय’ या वृत्तीने चालत आहे. श्री दीक्षित यज्ञेश्वरजींची वेद, यज्ञ, सोमयाग या सर्वांकडे पाहायची दृष्टी केवळ धार्मिक उपक्रम एवढीच मर्यादित नसून सांप्रत संपूर्ण वसुंधरा पर्यावरण असंतुलनाच्या श्रीषण संकटात सापडली असून प्रदूषणाने सैरभैर झाली आहे.पृथ्वीसाठी असलेले हे महाभयंकर संकट पृथ्वीला नष्ट करील की काय, अशी साधार भीती जगातील शास्त्रज्ञ, संशोधक, राज्यकर्ते व्यक्त करीत आहेत. अशा दुर्धर प्रसंगातून वसुंधरेला वाचविण्यासाठीचा एकमेव सर्वश्रेष्ठ उपाय म्हणून दीक्षित यज्ञेश्वरजी यज्ञसंस्थेकडे पाहत आहेत. केवळ पाहत नसून आपल्या संपूर्ण शक्तीनिशी विविध सोमयाग प्रयोगांतून ते पृथ्वीला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

लाखो-करोडो कारखान्यांतून अंतरिक्षात प्रवाहित होऊन पृथ्वीला सर्वनाशाकडे नेणारा विषारी धूर शेवटी थोपवायचा कसा, याचे उत्तर, जर कारखान्यात अग्निसंपर्क येऊन विविध घटक आपले नकोसे द्रव्य आकाशात सोडत असतील,तर यज्ञमंडपातून अग्नीद्वारा वसुंधरेला बलवान करणारे घटक अवकाशात प्रवाहित केले पाहिजेत. लाखो-करोडो घराघरांतून, संपूर्ण जगभरातून अग्नीत हविर्द्रव्ये आहुत करून वातावरण सुंगंधी आणि विधायक घटकांनी पुष्ट केले पाहिजे, ज्यामुळे माणूसही आरोग्यवान, बलवान होऊन श्रेष्ठ कर्माला प्रवृत्त होईल. ज्याप्रमाणे हा मानवी देह - ‘पिंड’ - निरोगी, बलवान होण्यासाठी भारतीय संस्कृतीने विश्वाला ‘योग’ प्रदान केला आहे, त्याचप्रमाणे ‘ब्रह्मांड’ निरोगी व बलवान होण्यासाठी ‘याग’ ही भारतीय संस्कृतीने विश्वाला दिलेली सर्वश्रेष्ठ अनमोल अशी देणगी आहे.

या तत्त्वसिद्धान्तावर दृढ विश्वास ठेवून श्री यज्ञेश्वरजी सेलूकर यज्ञीय कार्य करतात. त्यासाठीच गेल्या 25 वर्षांपासून गंगाखेड येथे वेद विद्यालयाचे कार्य अविरतपणे चालू आहे. या विद्यालयातून शेकडो विद्यार्थी अध्ययन करून देशाच्या मोठमोठ्या शहरांत अत्यंत आदरणीय जीवन जगत आहेत. यज्ञीय जीवनमूल्ये समाजात रुजवीत आहेत. राष्ट्राचे एक जबाबदार आणि कार्यकुशल नागरिक म्हणून राष्ट्रगौरव वाढवीत आहेत.

पांडुरंगाच्या चरणी लीन आणि तल्लीन करणारा आषाढीचा हा अनुपम सोहळा ज्या संतविचाराने अवघा महाराष्ट्र अनुभवतो, त्या संत ज्ञानेश्वर, संत तुकोबाराय आदी सर्व संतांनी वेदाचा महिमा अधोरेखित केला आहे. ‘वाचे बोलू वेद नीती’अशी संत तुकाराम महाराजांची भूमिका आहे. ‘आम्ही वैकुंठवासी। आलो याचि कारणासी। बोलिले जे म्हणी। साचभावे वर्ताया॥’ असे त्यांनी आपल्या जीवनकार्याचे प्रयोजन सांगितले आहे. यज्ञ, दान, तप, कर्म हे अवश्यमेव आहे असा गीता मातेचाही उपदेश आहे. साधुसंतांनी गौरविलेल्या शुद्ध वैदिक यज्ञसंस्थेची अशी निःस्वार्थीपणे, निःस्पृहपणे सेवा करणार्‍या श्री दीक्षित यज्ञेश्वरजी सेलूकर यांच्या कार्याच्या सहवासात आपण अवश्य यावे, असे अवाहन करून मी या परिचय चिंतनाला विराम देतो.