भगव्या रंगात रंगला संघ

10 Jul 2019 18:28:27

संघाने भगव्या ध्वजाला आपला गुरू मानले आहे. डॉ. हेडगेवारांनी काळाच्या संदर्भात स्वयंप्रकाशित होण्याचा नवीन मार्ग शोधून काढला. कोणत्याही व्यक्तीला, ग्रंथाला वा अन्य कुठल्या मूर्तीला सर्वोच्च स्थान न देता, तत्त्वाचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाला गुरूचे स्थान दिले. स्वयंप्रकाशित होण्याचा मार्ग प्रशस्त केला.

 

संघाची समीक्षा करणारे, संघावर टीका करणारे, संघाच्या बदनामीची मोहीम चालविणारे अफलातून युक्तिवाद आणि पुरावे देत असतात. काही जणांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना संघाचे प्रमुख दर्शनकार ठरवून टाकलेले आहे. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे दर्शन काय होते, यावर यापैकी कोणीही एक वाक्यही लिहीत नाहीत. बीजाशिवाय वृक्ष तयार होत नाही. वृक्षाची गुणवत्ता लक्षात यायची असेल तर त्याचे बीज कोणते, हे समजून घ्यावे लागते.

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

 असा विचार करता आज केवळ एकाच विषयाचा विचार करायचा आहे. संघात गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. आपल्या हिंदू समाजात गुरुपरंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माता-पिता जन्म देतात, पण गुरू हा ज्ञानजन्म देत असतो. म्हणून गोविंद आणि गुरू दोघे एका वेळी समोर आले असता गुरूचे पाय अगोदर धरायचे असतात, कारण गुरूमुळे गोविंदाचे दर्शन होते.

संघाने भगव्या ध्वजाला आपला गुरू मानले आहे. आपल्या परंपरेत गुरू सर्वश्रेष्ठ, म्हणजे त्याहून दुसरा कुणी श्रेष्ठ नाही. भगवा ध्वज हा आपला गुरू, हे डॉ. हेडगेवारांनीच संघात रुजविले. संघाचे सरसंघचालक हे संघाचे सर्वोच्च अधिकारी असतात. पण सर्वश्रेष्ठ गुरू असतो. सरसंघचालकांनादेखील रोज आपल्या गुरूला प्रणाम करावा लागतो.

संघाचा हा भगवा ध्वजरूपी गुरू बोलत नाही, चालत नाही, मार्गदर्शन करीत नाही, म्हटले तर ते भगवे फडके आहे. भगव्या ध्वजाला गुरुस्थानी का ठेवण्यात आले? डॉ. हेडगेवार स्वत: गुरुस्थानी का नाही बसले? बसले असते, तर ते स्वाभाविक झाले असते. कुणी त्याला विरोध केला नसता. असे असतानादेखील ''मी संघाचा गुरू नाही, मी संघाचा स्वयंसेवक आहे, आपला गुरू भगवा ध्वज'' असे डॉ. हेडगेवारांनी सांगितले. तसे मरेपर्यंत आचरण केले.

डॉ. हेडगेवारांसमोर गुरू कुणाला करायचे याचे काही पर्याय होते. पहिला पर्याय हिंदुत्वज्ञानाचा एखादा श्रेष्ठ ग्रंथ हा होता. दुसरा पर्याय हिंदू समाजातील इतिहासकाळातील चंद्रगुप्त, चाणक्य, शिवाजी यांच्यासारखा एखादा श्रेष्ठ पुरुष आणि तिसरा पर्याय स्वतःच गुरुपदी बसण्याचा होता. यापैकी त्यांनी काहीही केले नाही. काय असावे त्यांचे चिंतन?

ग्रंथ गुरू केला, तर शब्दप्रामाण्यवाद निर्माण होतो. कुराणात काही बदल करता येत नाही. कुराणाच्या आज्ञा अंतिम असतात. बायबलात काही बदल करता येत नाही. बायबलाचे कायदे अंतिम समजले जातात. गीतेतही काही बदल करता येत नाही. श्लोकांमध्ये काही परिवर्तन करता येत नाही. याला म्हणतात, पोथीनिष्ठा. पोथीनिष्ठा निर्माण झाली की स्वतंत्र विचार करण्याच्या शक्तीवर मर्यादा पडतात. अडचण आली की ग्रंथाकडे वळावे लागते. ग्रंथात उत्तर शोधावे लागते.

महापुरुषाचे मार्गदर्शन नेहमीच कालसापेक्ष असते. कोणताही महापुरुष कालातीत मार्गदर्शन करू शकत नाही. काळ सतत बदलत राहतो. राजकीय-सामाजिक-आर्थिक रचना, समाजाचे रितीरिवाज, कायदे, परंपरा यामध्येच निरंतर बदल होत राहतात. बदलेल्या परिस्थितीचे प्रश्न नवीन असतात. ते प्रश्न समजून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न त्या पिढीने करायचा असतो. असा प्रयत्न करत असताना समाजजीवनातील शाश्वत तत्त्वे कोणती आणि कालसापेक्ष भाग कोणता, याचा विवेक करून बदल करावे लागतात. भूतकाळाशी पूर्णपणे फारकत न घेता वर्तमानकाळातले प्रश्न सोडवायचे असतात, ज्यामुळे भविष्याकडे जाण्याचा मार्ग सुकर होतो.

डॉक्टरांनी स्वतःला किंवा इतर कुणाला गुरू केले नाही. व्यक्ती कितीही महान असली तरी, कितीही बुध्दिमान असली तरी ती चिरंजीव नसते, तिच्या आयुष्याला मर्यादा असतात. अशी एक व्यक्ती गुरू झाली की सगळे संघटन त्या व्यक्तीभोवती केंद्रित होते. याला व्यक्तिसापेक्ष संघटन म्हणतात. सगळे प्रश्न त्या व्यक्तीकडे येतात. ती व्यक्ती ते प्रश्न सोडवीत राहते. गांधीजी हयात होते तोपर्यंत सगळे प्रश्न गांधीजींकडे येत. सरकार स्थापन झाल्यानंतरही पं. नेहरू, सरदार वल्लभभाई गांधीजींना भेटायला येत, प्रश्नांची चर्चा करीत. 48 साली गांधीजी गेले, मार्गदर्शक गेला. नेहरूंनी गांधीमार्ग सोडला. सरदार पटेलांना फार आयुष्य लाभले नाही. ज्यांना नेहरूमार्ग पसंत नव्हता, त्यांनी प्रजासमाजवादी पक्ष काढला. ज्यांना राजकारण नको होते, ते सर्वोदयी झाले. प्रत्येक जण सांगू लागला की, त्याचाच गांधीवाद खरा. व्यक्ती सर्वोच्च स्थानी असली की असे होते.

डॉ. हेडगेवार 1940 साली गेले. त्यांच्या विचारांचा 'इझम' झाला नाही. संघात हेडगेवारवाद नाही. त्यानंतर गुरुजी आले. त्यांनी प्रचंड विचारधन दिले. त्यांच्या नावाने गोळवलकरवाद तयार झाला नाही. व्यक्ती संघाची गुरू नाही, भगवा ध्वज गुरू. यामुळे हे शक्य झाले. भगवा ध्वज हे प्रतीक आहे. ते तत्त्वांचे प्रतीक आहे. तत्त्वे शाश्वत आणि चिरंजीव असतात. मुख्य तत्त्व आहे, हे हिंदुराष्ट्र आहे. हिंदू समाज या राष्ट्राचा पुत्ररूप समाज आहे. हिंदू समाजाच्या पतनात राष्ट्राचे पतन आहे. त्याच्या उत्थानात राष्ट्राचे उत्थान आहे. हे राष्ट्र जीवनमूल्यांच्या आधारे जीवित राष्ट्र झालेले आहे. या राष्ट्राची जीवन जगण्याची एक पध्दती आहे. ती सर्वसमावेशक आहे, सर्वग्राह्य आहे. या संस्कृतीचा रंग भगवा आहे. भगवा रंग त्यागाचे प्रतीक आहे. त्यागाचे अनंत प्रकार आहेत. स्वतःच्या अहंकाराचा त्याग करून समष्टीत विलीन होणे हा त्यागाचा सर्वात श्रेष्ठ प्रकार आहे. भगवा ध्वज त्याची शिकवण देतो.

जो समष्टीमय झाला, त्याला अन्य कुठून ज्ञान घेण्याची आवश्यकता नसते. समष्टीतून त्याला ज्ञान मिळते. समष्टीची सुख-दुःखे त्याच्या अनुभूतीचे विषय होतात. समाजाचे सुख कशात आहे आणि समाजाचे दुःख कशात आहे, हे त्याला उत्तम प्रकारे समजते. त्यासाठी ग्रंथाची पोपटपंची करण्याची गरज नसते. भगव्या ध्वजाचा हा मार्ग आहे. समाजाशी एकरूप व्हा, समाजाच्या सुख-दुःखाशी तादाम्य पावा, त्याची अनुभूती घ्या, मग समाजासाठी काय करायला पाहिजे हे आपोआप समजेल.

या भगव्या ध्वजाच्या छायेखाली ज्यांचा विकास झाला, त्यांना समाजात काम करीत असताना काय केले पाहिजे हे ज्ञान समाजातूनच होत गेले आहे. संघविचारातून चालणाऱ्या शेकडो संस्था आहेत, वृत्तपत्रे आहेत, साप्ताहिके, मासिके आहेत. राजकीय, धार्मिक, मजूर क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आहेत. या संस्था ज्या ज्या स्वयंसेवकांनी उभ्या केल्या, त्यांनी त्या संस्था उभारण्याचे ज्ञान कोणत्या पुस्तकातून, कोणत्या ग्रंथातून घेतलेले नाही, त्या कामातूनच ज्ञान त्यांना मिळत गेले. ज्ञान समाजातून मिळत गेले. कोणाची उधार-उसनवारी नाही. माक्र्स काय म्हणतो, केन्सने काय सांगितले, लेनिनने कोणता मार्ग स्वीकारला, जॉन, लॉक, मिल, स्पेन्सर, कान्ट यांचे काय म्हणणे आहे, उदारमतवाद काय आहे, या सगळया उधार-उसनवार कल्पना संघाचा गुरू स्वीकारायला लावीत नाही. तो म्हणतो, ''तुमच्यासमोर समाज आहे, समाजाचे प्रश्न आहेत, आपला इतिहास आहे. तुला बुध्दी आहे, तू विचार कर, चालायला लाग, मग आपोआप मार्ग तयार होईल.''

संघाच्या गुरूने स्वयंप्रेरित, स्वयंशासित, स्वबुध्दीने काम करणारे लाखो स्वयंसेवक निर्माण केले. तसा आपल्या गीतेचाही आदेश आहे की, आपला उध्दार आपणच करायचा असतो. उध्दारात उधारी करता येत नाही आणि कुणाची मदतही घेता येत नाही. भगवान बुध्दांनीही सांगितले की, 'आत्मदिपो भव्' - तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा. त्यांनी स्वयंप्रकाशित होण्याचा मार्ग आखून दिला, काळाच्या ओघात तो नष्ट झाला. डॉ. हेडगेवारांनी काळाच्या संदर्भात स्वयंप्रकाशित होण्याचा नवीन मार्ग शोधून काढला. कोणत्याही व्यक्तीला, ग्रंथाला वा अन्य कुठल्या मूर्तीला सर्वोच्च स्थान न देता, तत्त्वाचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाला गुरूचे स्थान दिले. स्वयंप्रकाशित होण्याचा मार्ग प्रशस्त केला.

भारताच्या पुनरुत्थानाचा हाच मार्ग आहे. भारताला भारताच्या मार्गाने जायचे आहे. इंग्लड, अमेरिका, फ्रान्स किंवा रशिया यांची नक्कल आपण नाही करू शकत. आज अमेरिकेच्या नकलीच्या मागे आपण लागलेलो आहोत, हे नाकारता येणार नाही. पण तीच अवस्था कायमची अवस्था राहणार नाही. खा, प्या, मजा करा, यामध्ये मुलांचा अडथळा होतो म्हणून मुलांना जन्म देण्याचेच बंद करा, या अमेरिकन प्रभावाखाली जगणारी असंख्य तरुण मंडळी आपण सभोवताली पाहतो. पण ही तरुण मंडळी म्हणजे समाज नव्हे. आपला समाज हा आपल्या मूल्यांवर जगणारा आहे आणि नवलाईचे नऊ दिवस ही त्याची म्हण आहे. नवीन आहे म्हणून त्याचा तो नऊ दिवस अंगीकार करील, मग त्याच्या लक्षात येईल की हे आपल्या कामाचे नाही. यातून जीवनात शांती मिळत नाही. तो स्वयंप्रकाशाच्याच मार्गाने जाईल.

दुसऱ्या भाषेत यालाच भगव्या ध्वजाचा मार्ग म्हणावे लागेल. आपले अर्धवट विद्वान आणि संघद्वेषाच्या भुताने झपाटलेले विचारवंत 'भगवेकरणाची' भाषा करतात. देशाचे भगवेकरण करणारे आम्ही कोण? ज्याचा रंगच भगवा आहे, त्या देशाला भगवा रंग कोण देणार? ज्या देशाचा मार्गच भगवा आहे, त्या देशाला भगव्या मार्गावर आणणारे आम्ही कोण? आमचे म्हणजे संघाचे वैशिष्टय एवढेच की, या देशाचा रंग ओळखून त्या रंगात संघाने स्वतःला रंगवून घेतलेले आहे. भगव्या ध्वजाला उद्देशून एक गीत संघात म्हटले जाते -

गुरू वंद्य महान, भगवा एकचि जीवनप्राण

अर्पित कोटी कोटी प्रणाम।

धैर्य, साहस, तेज, त्याग, तपस्या, समर्पण, यांची निरंतर प्रेरणा देणाऱ्या भगव्या ध्वजाला अर्पित कोटी कोटी प्रणाम!ु

vivekedit@gmail.com

Powered By Sangraha 9.0