ज्योति कलश छलके

03 Jun 2019 16:44:00

***प्रिया प्रभुदेसाई***

ज्योति कलश छलके या गीताचे वैशिष्टय म्हणजे संस्कृतप्रचुर हिंदी. तसेच शब्द, सूर, अभिनय आणि चित्रीकरण असा दुर्मीळ संयोग या गीतात दिसून येतो. मनाला प्रसन्न करणारी आणि आत्म्याला स्पर्श करणारी ही रचना चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर आहे.

लहानपणी, आठवडयाचा शनिवार आणि रविवार आजीच्या घरी जायचा. गिरगावच्या शांताराम चाळीत सर्वात वरच्या मजल्यावर आजीची खोली होती. त्यावर होते कौलारू छप्पर. ऊन येण्यासाठी दोन-तीन कौले काढून काच लावली होती. रविवारच्या पहाटेचा पहिला किरण त्या काचेतून चेहऱ्यावर पडायचा. जेमतेम दहा बाय आठची खोली त्या प्रकाशात उजळून निघायची. त्याबरोबर आईचा सुरेल आवाज गाढ साखरझोपेतून जाग आणायचा.

या मजल्यावर सात-आठ खोल्या असतील आणि त्या सर्वांना मिळून एक सामायिक बाल्कनी होती. सकाळच्या प्रहरी बायकांची लगबग सुरू व्हायची. पहाटे उठून पहिल्या सूर्यकिरणासमोर नतमस्तक होणे, आपल्या खोलीसमोरची जागा झाडून घेणे, दारासमोर पिटुकली का होईना, तांदळाच्या पिठाने रांगोळी काढणे, डालडयाच्या डब्यात हौसेने लावलेल्या रोपांना पाणी देणे आणि मग चुलीवर चहाचे आधण ठेवणे, ही दृश्ये सर्वच खोलीत याच क्रमाने दिसायची.

चहाचा तो दर्प नाकात जायचा. दर्पच, कारण मला चहा आवडायचा नाही तेव्हा. चाकरमान्यांच्या घरात, ऑफिसला, शाळेला घेऊन जायच्या डब्याच्या तयारीला सुरुवात व्हायची आणि तो पूर्ण मजला वेगवेगळया गंधांनी दरवळून जायचा.

आमचे मूळ घर तळमजल्याला होते. ही खोली फक्त झोपायला. रविवारी शाळा नसल्याने, उठायची घाई नसायची. पांघरुणात स्वतःला गुरफटून घेतले तरी आई न ओरडता, तिचे आवडीचे गीत गुणगुणायची. तिच्या आवाजाने मग आणखीनच गुंगी यायची. डोळे चोळत, तिचा हात धरून अर्धवट मिटलेल्या पापण्यांनी मी चाळीचा लाकडी जिना उतरायचे. एवढी वर्षं लोटली, पण रात्री झोप येण्यासाठी म्हटलेली 'नीज माझ्या नंदलाला' आणि उठवण्यासाठी म्हटलेली 'ज्योती कलश छलके' ही भूपाळी ह्यांचे सूर आजही आईच्या आठवणीला हाताशी धरून येतात.

संगीतकार सुधीर फडके यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीला परिचित आहेच, तसेच हिंदी चित्रपटांतसुध्दा त्यांचे मोजके पण मोलाचे योगदान आहे.

1961मध्ये प्रदर्शित झालेल्या 'भाभी की चूडियाँ' ह्या चित्रपटातले त्यांचे संगीत अतिशय गाजले. उर्दूचा वापर सररास असताना, शुध्द हिंदीत लिहिलेली गीते आणि शास्त्रोक्त संगीतावर आधारित रचना यामुळे ह्या सिनेमातली गीते त्यांच्या वेगळेपणामुळे लोकप्रिय झाली.

'भाभी की चूडियाँ' हा अस्सल भारतीय चित्रपट. एकत्र कुटुंबव्यवस्था हे भारतीय परंपरेचे वैशिष्टय आहे. या चित्रपटातसुध्दा एका मध्यमवर्गीय कुटुंबाचे चित्रण आहे.

शाम आणि मोहन हे दोघे भाऊ. त्यांच्या वयात बरेच अंतर आहे. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मोठया भावाने लहान भावाला प्रेमाने वाढवले आहे. कितीही प्रेम असेल तरीही घराला स्त्रीचा स्पर्श लागतोच. शामचे लग्नाचे वयही झाले आहे. सर्वच जण लग्नाचा आग्राह करत असतानाही त्याला मात्र आपल्या भावाची काळजी आहे. नवीन येणारी मुलगी आपल्या भावाला स्वीकारेल का? ही काळजीसुध्दा स्वाभाविक आहे.

त्याचे वरिष्ठ स्वतःच्याच एका निवृत्त सहकाऱ्याच्या मुलीचे, गीताचे स्थळ सुचवतात. मोहनला पहिल्या नजरेतच गीता आवडून जाते. शाम (बलराज सहानी) आणि गीता (मीना कुमारी) यांचे लग्न होते. आईविना वाढलेला मोहन, तिच्यातच आपल्या आईला पाहतो. स्त्रीच्या स्पर्शाला आसुसलेले त्याचे घर गीताला प्रेमाने सामावून घेते आणि गीताही त्याला प्रेमाने, मायेने आपलेसे करून घेते.

या चित्रपटात येणारी गीतेही सिनेमाच्या प्रवृत्तीला साजेशी. कथेत सहज सामावून गेली आहेत. हे कुटुंब गावातले. गावातली पहाट मोहक, अलवार आणि चैतन्यदायक. या पहाटेचे वर्णन 'ज्योती कलश छलके' या अतिशय गाजलेल्या गीतात आलेले आहे.

लता मंगेशकर यांनी गायलेले हे गीत भूप रागात बांधलेले आहे. भूप रंगाची जी शांत, स्थिर प्रकृती आहे ती यात दिसते. एक सहज स्वीकार. मग ते दुःख असो किंवा सुख. ते न बोलता स्वीकारणे याला मनाची ताकद लागते. ती या रागात आहे.

 ज्योती कलश छलके

हुये गुलाबी, लाल सुनहरे, रंगदल बादल के

 ढगांच्या आवरणातून बाहेर डोकावणारा सूर्य कवीला प्रकाशाने तुडुंब भरलेल्या कलशासारखा भासतो. ही पहाट आहे उगवतीचे तेज ल्यालेली. आकाश लाल, पिवळया, गुलाबी रंगात न्हाऊन निघाले आहे. उगवणारी प्रत्येक पहाट ही दिवसाचीच नाही, तर जीवनाचीही नवीन सुरुवात असते. पहाटेचा पवित्र सूर्यप्रकाश हा सुंदरता, शांतता, आशा आणि स्वप्ने यांना जन्म देतो. त्याचे प्रतिबिंब सृष्टीतही दिसते.

 घर आंगन वन उपवन उपवन

करती ज्योति अमृत से सींचन

मंगल घट ढल के

ज्योति कलश छलके

 हे गीत चित्रगीत आहे. गावातील पहाट म्हणजे नवीन दिवसाची सुरुवात. लवकर उठणे, सूर्याला नमस्कार करणे, अंगण झाडणे, सडा-संमार्जन करणे, तुळशीला पाणी घालणे, रांगोळी काढणे हा  येथील दिनक्रम आहे. घर, अंगण, घरासमोरची चिमुकली बाग सूर्यप्रकाशात उजळून आली आहे. सारी धरित्री हिरव्या रंगात साजिरी दिसत आहे. फुलांच्या कडांवर दवबिंदू विसावले आहेत. जशी माता यशोदा बाळकृष्णाची काळजी घेते, तशीच सूर्यनारायण चराचराची जपणूक करत आहेत.

 पात पात बिरवा हरियाला

धरती का मुख हुआ उजाला

सच सपने कल के

ज्योति कलश छलके

 हे गीत केवळ सूर्याची प्रार्थना नाही, तर यात आईचाही गौरव आहे. वहिनी आणि दीर यांचे सुंदर नाते इथे चित्रित केले आहे. ती नात्याने वहिनी आहे, पण प्रेमाने आईची जागा तिला मिळाली आहे. ज्या प्रेमाने यशोदा कन्हैयाचे पालनपोषण करते, त्याचेच  प्रतिबिंब या सिनेमातील दीर आणि वहिनी यांच्या नात्यात दिसते.

 ज्योति यशोदा धरती मैय्या

नील गगन गोपाल कन्हैय्या

श्यामल छवि झलके

 भाभी की चूडियाँ हा चित्रपट 'वहिनीच्या बांगडया' या मराठी चित्रपटाचा रीमेक होता. मूळ भूमिका सुलोचना या अभिनेत्रीने साकारली होती. हिंदी सिनेमात ही भूमिका निभावताना मीना कुमारी यांनी ह्या भूमिकेच्या गाभ्याला स्पर्श केला आहे. आपल्या अभिनयातून, भावमुद्रांमधून एका आदर्श भारतीय स्त्रीला जिवंत केले आहे.

चित्रीकरणालासुध्दा दाद द्यावी लागेल. सुरुवातीचा आलाप, धुक्याला छेदून येणारा मंद प्रकाश, चराचरावर पसरत जाणारी सूर्यकिरणे आणि त्यात उजळून निघालेली सृष्टी हे सर्वच अत्यंत देखणे.

गाण्याचे शब्द आहेत नरेंद्र शर्मा यांचे. संस्कृतप्रचुर हिंदी हे या गीताचे वैशिष्टय. शब्द, सूर, अभिनय आणि चित्रीकरण असा दुर्मीळ संयोग या गीतात दिसून येतो. मनाला प्रसन्न करणारी आणि आत्म्याला स्पर्श करणारी ही रचना चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर आहे.

9820067857

 

 

Powered By Sangraha 9.0