दुष्काळ पर्यटन की स्थलानुरूप शाश्वत जलसंधारण?

08 May 2019 13:13:00

 कोकणात काम करताना स्थलानुरूप जलसंधारण योजना आखणं, प्रत्यक्ष कामात स्थानिक लोकांचा प्रत्यक्ष सहभाग मिळेल हे पाहणं आणि सांघिक प्रयत्नांमधून दूरगामी यश मिळवणं हा मार्ग स्वीकारला, तर फायदा होतो हे अनुभवातून कळलंय.



 

‘नेमेचि येतो मग पावसाळा’ यात पावसाळ्याच्या ऐवजी उन्हाळा असं म्हणायची वेळ आली आहे, कारण उन्हाळा आला की आम्हाला पाण्याची टंचाई आहे हे जाणवतं. मग आम्ही माकडाच्या घराप्रमाणे काम करायला (?) लागतो. आपले पूर्वज शहाणे होते म्हणून की तेव्हाही आत्तासारखे उत्सवप्रिय लोक जास्त होते म्हणून कोण जाणे, पण आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे - तहान लागली की विहीर खणायची. ही म्हण आपल्यातल्या बहुसंख्य लोकांच्या मानसिकतेचं प्रतीक किंवा खरं तर प्रतिबिंब आहे.

उन्हाळा आणि पाणीटंचाई हातात हात घालून येतात आणि मग सुरू होतो दुष्काळाचा उत्सव! त्यात सगळे उत्साहाने भाग घेतात. शहरांमध्ये जे लोक भरपूर पाणी आणि इतर नैसर्गिक स्रोत वापरतात, त्यांना एक अपराधाची भावना असते. त्यावर त्यांच्या दृष्टीने सोपा उपाय म्हणजे, जेवढं जमेल तेवढं काम करायचं. मग अशी मंडळी चांगल्या हेतूने पण अतिशय मर्यादित काळ आणि जबाबदारी घेऊन एक-दोन दिवस आवडेल तिथे पटेल ते काम करतात, सेल्फी काढून तो सोशल मीडियावर टाकतात, आपापल्या समूहात त्याबद्दल प्रश्न विचारणार्‍या मित्रांशी अपुर्‍या माहितीवर हिरिरीने वाद घालतात, आणि त्या वर्षातील एक कर्तव्य पूर्ण झालं या समाधानात पुढच्या उन्हाळ्यातील एक-दोन दिवसांच्या श्रमदानाच्या सोहळ्याची वाट पाहतात. माझ्या या विधानाचा अनेकांना राग येईल, पण असा राग येणार्‍या प्रत्येकाने स्वत:ला काही प्रश्न विचारायची गरज आहे. माझ्या एक-दोन दिवसांच्या श्रमदानाने नक्की काय फरक पडलाय? मी जिथे आणि जे काम केलंय, त्याचा त्या गावाला नक्की किती आणि काय फायदा झालाय? मी जे काम केलं, ते तांत्रिकदृष्ट्या योग्य होतं याची मी खात्री करून घेतली का? काम करण्यापूर्वी ठरवलेलं ध्येय काम पूर्ण झाल्यावर आपण गाठलं आहे का? मी नक्की काय हेतूने या कामात सहभागी झालो आहे? असे अनेक प्रश्न काम करणार्‍या मंडळींना पडायला हवेत आणि त्यांची प्रामाणिक उत्तरं शोधायची तयारी हवी, तर सकारात्मक फरक पडेल. असं काम करणार्‍या लोकांपैकी किती लोक पुढच्या उन्हाळ्यात आपण पावसापूर्वी  केलेल्या कामाचा उपयोग होतोय किंवा नाही याची खात्री करायला परत त्या गावाला भेट देतात? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला वस्तुस्थितीची जाणीव करून देईल.

जलसंधारणात आणि व्यवस्थापनात अभ्यासाची गरज

सध्या पाण्याचं संधारण आणि व्यवस्थापन हे काम म्हणजे हे तांत्रिक तज्ज्ञाला विचारून, अभ्यास करून त्या त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीचा अभ्यास करून योग्य उपाय योजणं असं नसून, पुढाकार घेणार्‍याला काय वाटतंय, त्याला काय पटतंय, त्या कामासाठी पैसे देणार्‍याला काय वाटतंय, गावातल्या लोकांना काय चांगलं वाटतंय, इत्यादी गोष्टींवर अवलंबून आहे असं चित्र आहे.

जलसंधारण आणि व्यवस्थापन यात योग्य अभ्यासाची गरज आहे, तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याची, मार्गदर्शनाची गरज आहे याचीच खूप लोकांना जाणीव नाहीये. त्यामुळे, कोणीतरी राज्यात किंवा देशात कुठेतरी काहीतरी उपाय केलाय आणि त्याला यश मिळालंय, एवढ्या ऐकीव माहितीवर आणि इंटरनेटवर असलेल्या (पण कसलीही खात्रीपूर्वक माहिती नसलेल्या) वेगवेगळ्या माहितीच्या आधारे लोक स्वयंप्रेरणेने काम चालू करतात. काही ठिकाणी ते यशस्वी होतं आणि त्याची बातमी होते. पण बहुसंख्य ठिकाणी मिळालेलं अपयश लपवलं जातं आणि अधिकाधिक लोक योग्य तांत्रिक सल्ल्याशिवाय काम करायला उद्युक्त होतात.


गेली काही वर्षं या प्रकारे काम चाललं आहे. पण एवढी वर्षं काम चालू असूनसुद्धा जिथे कामं झाली आहेत, त्या भागात पाणीटंचाई वाढतच चालली आहे असं दिसतं. त्या भागात होणार्‍या सरकारी आणि खाजगी टँकरच्या पाणीपुरवठ्याचं प्रमाण आणि मागणी वाढतच चालली आहे. म्हणजेच, झालेलं काम पुरेसं पाणी उपलब्ध करू शकलं नाहीये.

जर ही चालू असलेली बरीचशी कामं पाणीटंचाई दूर करू शकत नसतील, किंवा पाण्याची टंचाई एवढ्या कामांनंतर वाढत असेल, तर आपण सध्या करत असलेल्या उपाययोजना अपुर्‍या किंवा चुकीच्या आहेत हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. आत्ता काय चालू आहे? तर सगळीकडे काही ठरावीक प्रकारचे उपाय योजून पाणीटंचाई कमी करायचा प्रयत्न केला जातोय. पाणीटंचाई कुठेही असली - म्हणजे कोकणात असो वा पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात असो वा विदर्भात वा खान्देशात, डोंगरावर असो, उतारावर असो वा सपाटीवर किंवा पठारावर, उपाय साधारणपणे सारखेच केले जात आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सध्या जास्त काम म्हणजे चांगलं काम हा गैरसमज मोठ्या प्रमाणावर पसरला असल्याने गोंधळात भर पडली आहे. त्यातच, सर्वसामान्य माणसाला केवळ पाणी वाढलंय हे तज्ज्ञाने सांगून किंवा अनुभवाने कळून पुरत नाही, तर ते पाणी वाढलंय हे दिसावं लागतं. त्यामुळे, लोकांच्या इच्छेप्रमाणे काम केलं जातं आणि अशा कामांमधून पाणी अडवण्याच्या फायद्यापेक्षा पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढून होणारा तोटा जास्त त्रासदायक ठरतोय. आणि हे लक्षात न घेता अनेक ठिकाणी कामं होत असल्याने, भरपूर काम करूनही पाणीटंचाई दूर होत नाहीये हे लक्षात आल्याने सर्वसामान्य माणूस निराश व्हायला लागलाय.

ही परिस्थिती आपण ओढवून घेतली आहे. त्यामुळे, या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला आपण करत असलेल्या चुका, त्रुटी शोधून, दुरुस्त करून, योग्य पद्धतीने काम करायला लागेल. आणि अशा प्रकारे योग्य अभ्यास करून, स्थलानुरूप उपाययोजना आखून त्या योग्य तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या, तर त्याचा निश्चित फायदा होतो, हा आमचा गेल्या 15 वर्षांमधला अनुभव आहे.

कोकणात काम करताना आलेला अनुभव

गेली काही वर्षं आम्ही वेगवेगळ्या संस्थांसाठी पालघर आणि रायगड जिल्ह्यांत काही गावांमध्ये जलसंधारणाची कामं करत आहोत. वर उल्लेख केलेल्या मानसिकतेपासून लांब राहून, प्रत्येक ठिकाणी योग्य आणि पुरेसा अभ्यास करून, स्थलानुरूप जलसंधारण उपाययोजना करणं ही साधी, सोपी वाटणारी पण अत्यंत कार्यक्षम पद्धत अवलंबून आम्ही जलसंधारण योजना यशस्वीपणे राबवत आहोत.

आम्ही काम करत असलेला भाग कोकणात येतो. पाऊस भरपूर आणि चढ-उतार असलेल्या जमिनीमुळे प्रवाहाचा वेग प्रचंड, मातीची खोली कमी आणि लगेच लागणारा कातळ, या गोष्टींमुळे इथे राबवल्या जाणार्‍या सरकारी योजना बरेचदा अयशस्वी होतात किंवा अपेक्षित परिणाम साधत नाहीत. गाळाने भरलेले किंवा प्लेट्स हरवलेले आणि गळणारे बंधारे, पाणी मुरेल इतका वेळ द्यायला असमर्थ पाझर तलाव इत्यादी गोष्टी आपल्याला या ठिकाणी आंधळेपणाने केलेले उपचार चालणार नाहीत, हे स्पष्टपणे सांगत असतात. आपल्यापैकी बरेच ते नीट बघू आणि समजू शकत नाही, ही अडचण आहे.

कोकणात काम करताना स्थलानुरूप जलसंधारण योजना आखणं, प्रत्यक्ष कामात स्थानिक लोकांचा प्रत्यक्ष सहभाग मिळेल हे पाहणं आणि सांघिक प्रयत्नांमधून दूरगामी यश मिळवणं हा मार्ग स्वीकारला, तर फायदा होतो हे अनुभवातून कळलंय.

सकारात्मक उदाहरणं

एक उदाहरणं देऊन हे समजावून सांगता येईल. हे उदाहरणं आहे एका गावाचं, ज्याचं नाव आहे म्हाडाचा पाडा. जव्हार तालुक्यातील या गावात भीषण पाणीटंचाई होती. गावाची लोकसंख्या 400 आणि गावात असलेल्या आश्रमशाळेत असलेली मुलं 400 अशी एकूण 800-900 लोकसंख्या एका विहिरीवर अवलंबून होती. जलस्वराज्य योजनेत नवीन विहीर झाल्यावर गावकर्‍यांनी जुनी विहीर आश्रमशाळेला देऊन टाकली. दुर्दैवाने, नवीन विहीर 3-4 वर्षांत कोसळली आणि गावकर्‍यांना त्यामुळे भयंकर त्रास व्हायला लागला. जुनी विहीर शाळेला दिली आणि नवीन कोसळली. गावातल्या लोकांना हंडाभर पाण्यासाठी दोन दोन कि.मी. चालायची वेळ आली. उन्हाळ्यात खड्डे करून मिळेल ते पाणी प्यायची वेळ आली. अतिशय बिकट परिस्थिती, प्यायला आणि शेतीला पाणी नाही अशा निराश करणार्‍या वातावरणात गावकरी असताना आम्ही त्या गावात केशवसृष्टी ग्रमविकास योजना या संस्थेसाठी गेलो. सर्वेक्षण केल्यावर लक्षात आलं की गावात पाणी आहे, पण ते कुठे आहे हे न कळल्याने आणि रूढ उपचार करून पाणी अडवायचा प्रयत्न केल्याने, डिसेंबरपर्यंत किरकोळ पाणी असतं, पण ऐन उन्हाळ्यात काहीच स्रोत उपलब्ध नाही अशी परिस्थिती होती.

गावकर्‍यांशी बोलून योग्य ठिकाणी एक विहीर करायचं ठरवलं. आधीच्या अनुभवावरून लोक आधी उदासीन होते. सगळ्यांना मोठा बंधारा किंवा तलाव असं काहीतरी, ज्यात पाणीसाठा दिसेल असं, हवं होतं. पण त्याचे दुष्परिणाम सांगितल्यावर लोक तयार झाले आणि जी उपाययोजना सांगितली होती, त्याप्रमाणे काम सुरू झालं. काम करताना मागणी आणि पुरवठ्याचा विचार करून, गणित करून, भौगोलिक आणि भूगर्भाची परिस्थिती अभ्यासून मग उपाययोजना ठरवली होती.

मे महिन्यात काम पूर्ण झालं, तेव्हा गावामध्ये आम्ही केलेल्या कामातून पाण्याचा कायमस्वरूपी किमान दोन लाख लीटर्सचा साठा शिल्लक होता. आणि तोही पाऊस पडायच्या आधीच!

आम्ही केलेल्या त्या कामातून 400 गावकर्‍यांना दारात नळाने पाणी तर मिळालंच, तसंच लागवडीसाठी पाणी उपलब्ध झालं. गावामध्ये सुमारे 100 एकरपेक्षा जास्त जमिनीवर नवीन मोगरा लागवड झाली. मोगरा लागवडीत एका एकरमधून अंदाजे 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळू शकतं, असं गणित आहे.

आम्ही राबवलेल्या योजनेचा खर्च होता अंदाजे साडेसहा लाख रुपये, जे एीीशश्र झीेरिलज्ञ या कंपनीने सामाजिक बांधिलकी म्हणून केशवसृष्टी संस्थेला दिले. या साडेसहा लाखांमध्ये त्या गावात वर्षभर पिण्यासाठी आणि वापरासाठी पुरेसं पाणी उपलब्ध झालंच, त्याचबरोबर एकरी दहा लाख देऊ शकणार्‍या मोगर्‍याची 100 एकरपेक्षा जास्त लागवड झाल्याने गावाची उत्पादन क्षमता 10 कोटी रुपयांपर्यंत वाढली.

आणि हे केवळ एका गावाचं उदाहरण झालं. गेल्या दोन वर्षांमध्ये या भागात आम्ही पन्नासपेक्षा जास्त गावांमध्ये विविध संस्थांकरता अशा प्रकारची कामं यशस्वीपणे पूर्ण केली. हे शक्य झालं एका कारणामुळे - आम्ही प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र अभ्यास करून, सर्वेक्षण करून, स्थलानुरूप उपाय योजले. ते योजताना गावकर्‍यांना काय हवंय हे विचारलं, पण काम काय करायचं याचा निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतला.

जलसंधारण करताना आपण हाच मार्ग स्वीकारला, तर त्यात शाश्वत यश मिळू शकतं. प्रत्येक गावाचा प्रश्न वेगळा आहे, त्यावर उपाय वेगळा असू शकतो आणि तो अभ्यास करून आपण काम केलं तर अपयश येत नाही आणि गावकर्‍यांना जेव्हा सर्वाधिक गरज आहे, त्या वेळी - म्हणजे उन्हाळ्यात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध राहू शकतो, असं आम्ही आमच्या अनुभवावरून नक्की म्हणू शकतो.

जलसंधारण हे स्पर्धा किंवा उत्सवाचं काम नाही, तर योग्य अभ्यास करून, स्थलानुरूप उपाय करण्याचं काम आहे हे लक्षात ठेवलं आणि योग्य आणि अनुभवी तज्ज्ञांची मदत घेतली आणि त्याचं ऐकलं, तर यश आणि पाणी मिळणं आणि टिकणं शक्य आहे.

Powered By Sangraha 9.0