नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने जवळजवळ सर्व मतदारसंघांत आपले उमेदवार उभे केले आणि सर्व उमेदवारांना हार पत्करावी लागली. स्वतः प्रकाश आंबेडकर दोन मतदारसंघांतून पराभूत झाले. भविष्यात प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी यांचे भवितव्य कसे असेल, याचे अनेकांना कुतूहल असणार आहे.
22 मे रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात सर्व म्हणजे 48 जागा जिंकेल असा दावा केला होता. त्याच दिवशी सोशल मीडियावर प्रकाश आंबेडकर निवडून आले नाही तर भाजपाचे कार्यालय जाळू अशी धमकीही प्रकाश आंबेडकरांच्या समर्थकांनी दिली होती. प्रत्यक्षात वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या मताची बेरीज 34 लाखाच्या आसपास गेली आहे. स्वतः प्रकाश आंबेडकरांना दोन ठिकाणांहून हार पत्करावी लागली. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी झळकू लागली. आधी काँग्रेसबरोबर युती करण्याचा प्रयत्न करणारे प्रकाश आंबेडकर एमआयएमच्या ओवेसीला सोबत घेऊन लढले. निवडणुकीपूर्वी त्यांनी जे वातावरण तयार केले, ते मतदानात परावर्तित झाले नाही. प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोलापुरात जेवढी गर्दी जमा केली होती, तेवढीही मते त्यांना मिळाली नाहीत. सोलापुरात ते तिसर्या स्थानावर फेकले गेले. नांदेड, सांगली, हातकणंगले परभणी येथील त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांनी दोन लाखाच्या आसपास मजल मारली असली, तरी तो त्यांचा वैयक्तिक करिश्मा आहे. त्यात प्रकाश आंबेडकराच्या नेतृत्वाचे योगदान शून्यवत आहे. अन्य उमेदवारांनी 20 हजार ते 70 हजारच्या आसपास मते मिळवली आहेत. या सार्या गोष्टींचा विचार करता वंचित बहुजन आघाडीची पुढची वाटचाल आणि प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व कसे विकसित होणार, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ही आघाडी कशा प्रकारची लढत देणार यांची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ही गाजराची पुंगी आहे की प्रस्थापितांना समर्थ पर्याय आहे, हे त्यांच्या आगामी कृती कार्यक्रमावरून लक्षात येणार आहे.
कारण प्रकाश आंबेडकरांचा आजवरचा राजकीय व सामाजिक प्रवास पाहता कोणताही विषय सातत्याने करण्याचा त्याचा स्वभाव नाही. एकच विषयपत्रिका घेऊन त्यावर निष्ठापूर्वक काम करण्यासाठी जे सातत्य लागते, वैचारिक अधिष्ठान लागते ते प्रकाश आंबेडकरांपाशी आहे का? केवळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू या एकमेव भांडवलाच्या आधाराने राजकारण, समाजकारण करणे आजच्या काळात शक्य नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा प्रकाश आंबेडकर खर्या अर्थाने पुढे नेत आहेत का? असा प्रश्न आज अनेकांच्या मनात उभा आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे जातमुक्त समाजाचे स्वप्न प्रत्यक्षात आणू पाहणारे, जन्मदाखल्यावरून जातीचा रकाना रद्द करा म्हणणारे प्रकाश आंबेडकर आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या जन्मजातीचे प्रदर्शन मांडतात. जातकेंद्री समाजाला घातलेले हे खतपाणी नसते का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माओवाद साम्यवाद यांना विरोध केला होता, तर प्रकाश आंबेडकरांनी नक्षली संबंधासाठी तुरुंगवास भोगलेल्या सचिन माळीला आपल्या पक्षाचा प्रवक्ता केले आहे. या सार्या गोष्टी पाहिल्या की प्रकाश आंबेडकर यांची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे, हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक राजकीय शक्ती उभी करण्याचा प्रयत्न केला असला, तरी तो सर्वकाळ यशदायक आणि शाश्वत स्वरूपाचा असणार नाही. कारण ते ज्या समूहाची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत, तो समूह आधीच विविध राजकीय पक्षांत विभागलेला आहे. त्याचबरोबर परस्परांविषयीची निश्चित मते असणारा असा हा समूह आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या विविध समूहांना एकत्र आणण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकरांनी करत मी केवळ दलितांचा नेता नाही, तर सर्व वंचित, बहुजन आणि भटके विमुक्तांचा नेता आहे अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला किती यश आले हे काळच ठरवेल.
प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांच्या समोर पर्याय उभा करण्याचा, राजकीय परीघाच्या बाहेर फेकलेल्या समाजगटांची मोट बांधत वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला असला, तरी केवळ जातीच्या आधाराने पक्ष कशा प्रकारे विस्तारणार हा प्रश्न आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत खरोखरच जर प्रकाश आंबेडकरांनी आपल्या वंचित बहुजन आघाडीला उतरवले, तर मात्र त्याचा परिणाम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारंपरिक मतपेढीवर होणार आहे. प्रकाश आंबेडकरांबरोबर असणारे काही घटक या ना त्या कारणाने दोन्ही काँग्रेसशी जोडलेले होते, तर धनगर, माळी हे समाज हे आरक्षणाच्या कारणाने वंचित बहुजन आघाडीकडे गेले आहेत. पुढील काळात प्रकाश आंबेडकर या मंडळींना अपेक्षित असणार्या आरक्षणाबाबत काय भूमिका घेतात, यावर बर्याच गोष्टी अवलंबून राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत विविध समाजगटांची मोट बांधत प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी उभी केली असली, आणि या समाजगटातून त्यांना निवडणुकीसाठी देणगीरूपाने निधी मिळाला असला, तरी केवळ तेवढ्या भरवशावर प्रकाश आंबेडकर पक्षाची वाटचाल कशी करणार आहेत? कारण निवडणुकीच्या मैदानात विशिष्ट समाजगटाच्या बळावर यश संपादन करणे अशक्य आहे. काहींना वगळून आणि काहींना सोबत घेऊन मतांची लढाई जिंकता येत नाही, हे प्रकाश आंबेडकरांना माहीत नाही असे कसे म्हणता येईल? लोकसभा निवडणुकांमध्ये उभे केलेल्या उमेदवारांच्या जाती जाहीर करून, आपण सिलेक्टिव्ह समाजासाठी राजकारण करणार आहोत असे प्रकाश आंबेडकरांनी सूचित केले आहे का? आणि असे असेल तर उठता-बसता संविधानाबद्दल आणि लोकशाहीबाबत त्यांना बोलण्याचा अधिकार आहे काय? प्रकाश आंबेडकरांनी उभ्या केलेल्या सर्व मतांची बेरीज ही त्यांना प्रादेशिक पक्षांची मान्यता मिळवून देणारी असली, तरी पक्ष केवळ अस्मिता आणि जातभावना यांच्या आधाराने उभा राहू शकणार नाही.
प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केल्यानंतर काँग्रेसशी युती करण्यासाठी अट घातली होती की ‘संघाला संविधानाच्या कक्षेत आणण्याचा आराखडा द्या, मग युती करतो.’ आता काँगे्रसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी प्रकाश आंबेडकरांना सुचवले आहे की, ‘तुम्ही कायदेतज्ज्ञ आहात, तुम्ही संघाला संविधानाच्या कक्षेत आणण्याचा आराखडा तयार करा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ.’ आता प्रकाश आंबेडकर तो आराखडा कसा तयार करतात यापेक्षा विधानसभा निवडणुकांपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा विचार कसा करतात, या गोष्टीला खूप महत्त्व असणार आहे. ते प्रकाश आंबेडकारच्या कृतीतून, विचारातून दिसून आले नाही, तर वंचित बहुजन आघाडी ही गाजराची पुंगी ठरायला वेळ लागणार नाही.