‘स्नेहवन’ला मिळाला दातृत्वाचा हात

20 May 2019 16:55:00

समाजात गरजवंत जसे आहेत तसे दानशूरही आहेत. प्रस्तुत घटनादेखील याच गोष्टीस पुष्टी देते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी भोसरी येथे कार्यरत असलेल्या 'स्नेहवन' संस्थेला डॉ. रवींद्र आणि स्मिता कुलकर्णी दांपत्याने दोन एकर जमीन दान देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कुलकर्णी यांच्या दातृत्वामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना हक्काची जागा मिळाली आहे.

 

  जगण्याच्या संघर्षात हरलेल्या, संकटाने ग्रासलेल्या, हतबल झालेल्या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांच्या पाठीमागे ‘स्नेहवन’ ही संस्था उभी राहिली आहे. अशोक देशमाने या तरुण सामाजिक कार्यकर्त्याने आयटी क्षेत्रातील नोकरीचा राजीनामा देऊन डिसेंबर 2015मध्ये भोसरी येथे स्नेहवन संस्थेचे रोपटे लावले. गेल्या 4 वर्षांत संस्थेने या मुलांचा केवळ सांभाळ केला नाही, तर या मुलांचे शैक्षणिक पुनर्वसन करून समाजामध्ये ताठ मानेने जगण्यासाठी आत्मविश्वास दिला आहे. सध्या या संस्थेमध्ये 52 मुलांना सांभाळले जाते. यासाठी कोणतेही शासकीय अनुदान मिळत नाही. लोकांच्या मदतीवर संस्थेचे काम उभे आहे. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे पालकत्व संस्थेने स्वीकारले आहे. अपुर्‍या जागेमुळे मुलांना सांभाळणे कठीण जात होते.

अवघ्या चार खोल्यांत 52 मुले एकत्र राहत, त्यामुळे मुलांची गैरसोय व्हायची. अशोक देशमाने यांच्या ध्येयासमोरचा हाच मोठा अडथळा होता. संस्थेच्या मालकीची जागा असावी यासाठी ते प्रयत्नात होते. पण पैशाअभावी ते जमीन घेऊ शकत नव्हते. सगळे काही आव्हानात्मक होते, पण त्यांनी आशेचा अंकुर जिवंत ठेवला.


“मुलांना शेतीचे धडे देणार”

 डॉ. रवींद्र कुलकर्णी

अशोक देशमाने हे एक क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते आहेत. स्नेहवन संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील मुलांसाठी सुरू असलेले कार्य गतिशील स्वरूपाचे आहे. देशमाने यांच्या कामांविषयी विविध माध्यमांतून माहिती मिळाली, तेव्हा त्यांच्यांशी परिचय वाढत गेला. गेल्या चार वर्षांपासून हा स्नेह जपला आहे. स्नेहवनसाठी भोसरी येथील जागा काही काळापुरती मिळालेली होती. ही जागा लहान आहे. देशमाने यांचे पुढचे नियोजन या जागेत पूर्ण होणार नाही, हे माझ्या लक्षात आले.

भोसरीपासून 16 आणि आळंदीपासून 8 किलोमीटर अंतरावर माझी शेतजमीन आहे.त्यातील काही जमीन वापरात नाही. ही जमीन स्नेहवन संस्थेला वापरण्यासाठी दिली आहे. ही जागा दान करत असताना माझ्या डोळ्यांसमोर उद्देश होता की, ही सर्व मुले आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील आहेत, त्यामुळे ते जन्माने शेतकरी आहेत. ग्रामीण मुलांचे प्रश्न, मुलांची होणारी शैक्षणिक परवड, गरिबी हे प्रश्न सतत डोळ्यांसमोर होते. हे लक्षात घेऊन या जागेत मुलांना शेतीचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून करणार आहे. मुलांना शालेय जीवनापासून शेती कशी करावी, याची माहिती मिळाल्यास त्यांच्यामध्ये शेतीविषयी आवड निर्माण होईल. ही सर्व मुले गावाकडे परत गेल्यानंतर आपल्या शेतीमध्ये इथे मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करतील असे मला वाटते.

- भोसरी, पुणे


हेचि दान देगा देवा

 समाजाच्या भल्यासाठी काम करणार्‍या सेवा-संस्थांना  दानशूर व्यक्तीचा मदतीचा हात नेहमी आधार देणारा असतो. त्यामुळे सेवा-संस्थांच्या कामांना, दुर्दम्य आशांना आणखी बळ मिळते. गोरगरीब, शेतकर्‍यांच्या मुलांविषयी कणव असणार्‍या भोसरी येथील डॉ. रवींद्र आणि स्मिता कुलकर्णी या दांपत्याने कर्णाप्रमाणे मुक्तहस्ताने दातृत्व करणे म्हणजे काय असते हे दाखवून दिले आहे. या दांपत्याने आळंदी-चाकण रोडवरील कोयाळी गावातील 4 कोटी रुपये किमतीची आपल्या स्वतःच्या मालकीची 2 एकर जमीन स्नेहवन संस्थेला दान करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे.

कुलकर्णी दांपत्य गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून भोसरीत वैद्यकीय सेवा देत आहे. रुग्णसेवेबरोबर त्यांनी सामाजिक भान जपले आहे. मनात कोणतीही आडकाठी न ठेवता त्यांनी स्नेहवन संस्थेला मुक्तहस्ते आपली जमीन दान दिली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मुलांसाठी ते देवदूत ठरले आहेत.

अशोक देशमाने सांगतात, “माझी पत्नी अर्चना हिच्या बाळंतणामुळे कुलकर्णी दांपत्याला स्नेहवनच्या कामाची माहिती मिळाली. शेतकर्‍यांच्या मुलांसाठी करत असलेले काम पाहून तेही आमच्याशी जोडले गेले. त्यांनी स्नेहवनला भेट दिली. संस्थेला जागेची अडचण आहे हे त्यांच्या लक्षात आले. संस्थेतल्या मुलांमध्ये आशा आणि विश्वास निर्माण करण्यात आम्हाला यश आले आहे. त्यामुळेच कुलकर्णी दांपत्याने आपली स्वमालकीची दोन एकर जागा आम्हाला देऊ केली. त्यासाठी महिना एक रुपया भाड्याने 99 वर्षांच्या कराराने ही जमीन दिली आहे. यामुळे जागेचा प्रश्न सुटला आहे. कुलकर्णी दांपत्यांच्या दातृत्वामुळे आशेचा अंकुर आणखी फुलू लागला आहे.” 

नवी आशा, नवी दिशा

मुलांच्या विकासासाठी आवश्यक असणारे भौतिक घटक म्हणजे निवास घर आणि स्वच्छतागृह बांधण्याचे काम वेगात सुरू आहे. हे सर्व बांधकाम दान मिळालेल्या जागेत करण्यात येत आहे. मे 2019 अखेरपर्यंत मुलांचे नव्या जागेत स्थलांतर होणार आहे. येथूनच संस्थेचे संपूर्ण कामकाज चालणार आहे. स्नेहवनच्या या नवीन प्रकल्पाला डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या मातोश्री ‘श्रीमती नलिनी कुलकर्णी ज्ञानग्राम’ हे नाव कृतज्ञतापूर्वक देण्यात येणार आहे. तसेच डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना स्नेहवन संस्थेच्या विश्वस्त मंडळावर घेण्यात येणार आहे.

अशोक देशमाने सांगतात, “नवीन जागेत जातोय याचा आनंद वाटतो आहे. गेली चार वर्षे आम्ही ज्या संघर्षात दिवस काढले, त्या संघर्षाला यश मिळाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनात असलेल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यसाठी आम्ही उत्सुक असून सध्या त्यावरच काम सुरू आहे. मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी संगणकासह प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संस्थेतील मुलांबरोबर आजूबाजूच्या गावातील मुलांनाही या प्रशिक्षण केंद्राचा फायदा मिळवून देण्यात येणार आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी यासाठी 5 हजार पुस्तकांचे ग्रंथालय उभारणार आहोत. नव्याने बांधण्यात आलेल्या जागेत या सर्व संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.”

 कोणत्याही सामाजिक संस्थेच्या कार्यविस्तारात जागा ही महत्त्वाचा घटक असते. अशोकने आणि त्याच्या परिवाराने या मुलांना कुटुंबसदस्य मानून सांभाळले. त्यामुळे जागेची अडचण असूनही त्यांच्या कामात कधी अडथळा आला नाही. मात्र आता अशोक यांच्या या सेवा कार्याला अधिक गती मिळेल, नवीन जागेत हे स्नेहवन अधिक बहरेल, त्याचा सुगंध अधिक पसरेल, हे निश्चित.

 

“आणखी 80 मुलांची जबाबदारी घेणार”

- अशोक देशमाने

सध्या समाजातील चांगुलपणा हरवत चालला आहे, अशी ओरड होत असते. पण स्नेहवन संस्थेसाठी डॉ. रवींद्र आणि स्मिता कुलकर्णी यांनी दोन एकरांची जमीन दान करून आपला चांगुलपणा जपला आहे. शेतकर्‍यांच्या मुलांविषयी असणारा त्यांचा कळवळा खूप काही सांगून जातो. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने विदर्भातील व मराठवाड्यातील नागरिक उपजीविकेसाठी शहरांकडे स्थलांतर करत आहेत. त्यामुळे संस्था आणखी 80 मुलांची जबाबदारी घेणार आहे. मुलांचा जेवणाचा खर्च, आरोग्याचा, शैक्षणिक आणि इतर खर्च लक्षात घेता मोठी आर्थिक कसरत करावी लागणार आहे. त्यासाठी दानशूरांकडून मदतीची अपेक्षा आहे.

- संस्थापक, स्नेहवन संस्था, भोसरी

 

संस्थेचा नवीन पत्ता

स्नेहवन संस्था, वडगाव रोपवाटिकेजवळ,

आळंदी वडगाव घेनंद रोड, कोयाळी तर्फे, चाकण

ता. खेड, जि. पुणे - 410501.

संपर्क - 8796400484

www.snehwan.in

  

Account Name - Snehwan

Account Type - Current

Bank Name - SBI

Account Number - 35517151681

IFSC Code – SBIN0005923 (5th character is zero)

 

 

 

 

 

Powered By Sangraha 9.0