लाइफलाइनवरची लाइफसेव्हर- वन रुपी क्लिनिक

विवेक मराठी    14-May-2019
Total Views |

  रेल्वे अपघातात तत्काळ उपचार मिळण्याच्या उद्देशाने मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकात सुरू करण्यात आलेलं ‘वन रुपी क्लिनिक’ या लाइफलाइनवरचं ‘लाइफसेव्हर’ ठरत आहे. त्याचबरोबर स्वस्त दरात आरोग्य सेवा देणारी ही केंद्रं अन्य नागरिकांसाठीही दिलासादायक ठरत आहेत.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातील एक घटना. सकाळची पावणेसहाची वेळ. कोकणकन्या एक्स्प्रेसने प्रवास करणार्‍या एका वीस वर्षीय गरोदर तरुणीला गाडीतच प्रसूतिकळा सुरू झाल्या. अंगावरून पाणी जाऊ लागलं. गाडी ठाणे स्थानकात आली आणि स्टेशनमास्तरांनी सेफ्टी अलार्म वाजवला आणि स्थानकातल्या ‘वन रुपी क्लिनिक’मध्ये संपर्क साधला. त्या क्लिनिकचा स्टाफही तितक्याच तत्परतेने गाडीच्या दिशेने धावला. त्या तरुणीला तपासताना लक्षात आलं की बाळाचं डोकं जवळजवळ बाहेर आलेलं आहे. त्यांनी त्या तरुणीला स्ट्रेचरवरून क्लिनिकमध्ये आणलं. क्लिनिकमधील डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिची सुखरूप आणि नैसर्गिक प्रसूती झाली. त्या तरुणीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर आई आणि बाळ दोघींना पुढील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलं. रेल्वे स्थानक परिसरातील ‘वन रुपी’ क्लिनिकमधली ही आतापर्यंतची सातवी प्रसूती आणि ठाणे स्थानकातील क्लिनिकमधली चौथी. 7 एप्रिल रोजीही ठाणे स्थानकातच ‘वन रुपी क्लिनिक’द्वारे अन्य एका महिलेची प्रसूती करण्यात आली.

हे वाचल्यावर हे ‘वन रुपी क्लिनिक’ आहे तरी काय अशी उत्सुकता अनेकांच्या मनात निर्माण झाली असेल. तर मुंबईतील मध्य उपनगरी रेल्वेमार्गावर नियमित प्रवास करणार्‍या अनेकांनी काही स्थानकांवर हे ‘वन रुपी क्लिनिक’ पाहिलंही असेल.

रेल्वे अपघातात गोल्डन अवरमधील उपचार

मुंबईतल्या उपनगरी रेल्वेचा प्रवास दगदगीचा असतो. गर्दीच्या वेळेची स्थिती तर भयानक असते. या प्रवासात अपघात, चेंगराचेंगरी यांसारखे दुर्दैवी प्रसंग वारंवार घडत असतात. अशा घटनांमुळे आणि वाढत्या रेल्वे अपघातांमुळे रेल्वे स्थानक परिसरात अशा प्रकारच्या वैद्यकीय केंद्रांची गरज कायमच जाणवत होती. मुंबईत रेल्वे अपघातात वर्षाला सरासरी तीन ते साडेतीन हजार लोक मृत्युमुखी पडतात. त्यामुळे उच्च न्यायालयाने आदेश दिला होता की प्रत्येक स्थानकावर इमर्जन्सी वैद्यकीय उपचार केंद्र असले पाहिजे. रेल्वेने त्यासाठी या क्षेत्रातील खासगी संस्थांकडून निविदा मागवल्या. त्याच दरम्यान ‘मॅजिक दिल’ ही संस्था अ‍ॅफोर्डेबल हेल्थ केअर क्षेत्रात येण्याच्या तयारीत होती. रेल्वे प्रशासनाने त्यांच्याशी करार केल्यानंतर 2017पासून ‘मॅजिक दिल’ची ‘वन रुपी’ उपचार केंद्रं मध्य रेल्वेच्या काही स्थानकांवर सुरू झाली. या संस्थेचे सीईओ डॉ. राहुल घुले सांगतात, “अपघात झाल्यानंतर जो गोल्डन अवर (महत्त्वाचा काळ) असतो, त्या वेळी योग्य उपचार मिळणं आवश्यक असतं. यापूर्वी अपघात झाल्यावर प्राथमिक वैद्यकीय उपचार त्वरित उपलब्ध न झाल्याने गोल्डन अवर निघून जायचा आणि त्यात रुग्णाची परिस्थिती अधिक बिघडायची. आता मात्र रेल्वे स्थानकातच 1 रु. क्लिनिक असल्यामुळे या गोल्डन अवरमध्ये तत्काळ आणि मोफत उपचार देणं शक्य झालं आहे.”

सध्या भायखळा, गोवंडी, चेंबूर, मानखुर्द, शीव, कुर्ला, भांडुप, ठाणे, कळवा, डोंबिवली, टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ या रेल्वे स्थानकांत वन रुपी क्लिनिकची सेवा उपलब्ध आहे. लवकरच पश्चिम मार्गावर ग्रँट रोड स्थानकातही ही सेवा सुरू होणार आहे.

रेल्वे अपघातातील रुग्णांवर किंवा रेल्वेतील किंवा रेल्वे स्थानकातील प्रसूतीसारख्या घटनांमध्ये या उपचार केंद्रात मोफत उपचार होतात. मात्र अन्य प्रवाशांसाठी आणि नागरिकांसाठीही ही केंद्रं वैद्यकीय खर्चाच्या दृष्टीने दिलासादायक ठरत आहेत. ‘वन रुपी’ नावातच त्याचा प्रत्यय येतो.


परवडणार्‍या दरातील वैद्यकीय सेवा

खरं तर आजच्या काळात आरोग्य सेवा ही नुसतीच जीवनावश्यक सेवा राहिली नसून लक्झरी झाली आहे. सरकारी रुग्णालयात होणारी दिरंगाई आणि खासगी रुग्णालयातील महागडी आरोग्य सेवा यांच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांचे मात्र तीन तेरा वाजतात. ‘वन रुपी क्लिनिक’ मात्र या प्रश्नांवर उत्तर ठरत आहेत. या क्लिनिकमध्ये 1 रुपयात वैद्यकीय सल्ला दिला जातो. सुरुवातीला 100 रु. कन्सल्टेशन फी भरली की त्यानंतर वर्षभर त्या व्यक्तीला आणि तिच्या कुटुंब सदस्यांना वर्षभर 1 रुपया दरात वैद्यकीय सल्ला मिळतो.

दुसरं विशेष म्हणजे सध्या उपचारांइतकंच प्रिव्हेंटिव्ह चेकअपलाही महत्त्व आले आहे. कोणत्याही आजाराच्या निदानासाठी लोक वैद्यकीय तपासण्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहू लागले आहेत. तपासण्यांमुळे त्यांच्या शंका दूर होतात, तसंच डॉक्टरही थेट वैद्यकीय निदान करण्याचा धोका न पत्करता तपासण्या करण्यास सांगतात. रक्तदाब, मधुमेह, थायरॉइड यांसारख्या विकारात तर नियमित तपासण्या कराव्या लागतात. तपासण्यांचा हा खर्च 1 रु. क्लिनिकमुळे सुसह्य झाला आहे. ठाणे स्थानकात त्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज मध्यवर्ती पॅथॉलॉजी लॅब असून बाकीच्या केंद्रांवर कलेक्शन्स केली जातात. वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून जवळजवळ 50 ते 70 टक्के सवलतीच्या दरात रक्त तपासण्या करून मिळतात. तसंच बीपी 5 रुपयात, इसीजी 50 रुपयात, तर एमआरआय, सीटीस्कॅन, सोनोग्राफी यांसारख्या तपासण्याही कमी दरात केल्या जातात. या केंद्रांना लागूनच त्यांची औषधांची दुकानंही आहेत. तेथे 20 टक्के इतक्या सवलतीत औषधं मिळतात. थोडक्यात ‘वन रुपी क्लिनिक’च्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा त्याच्या आरोग्यावरचा खर्च अगदीच कमी होऊन जातो.

आतापर्यंत 50 हजारांहून अधिक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. रेल्वे अपघातग्रस्त रुग्णांना तर या उपचार केंद्रांचा लाभ झालाच, शिवाय रेल्वे प्रवासादरम्यान गर्दीमुळे हृदयविकाराचा त्रास होणार्‍या अनेक प्रवाशांना स्थानकावरच त्वरित उपचार मिळून त्यांचे प्राण वाचले. याबाबतचा एक प्रसंग डॉ. घुले सांगतात, “जळगावची एक व्यक्ती आपली पत्नी आणि गतिमंद मुलगी यांच्यासह मुंबईहून जळगावला चालली होती. त्यांना रेल्वे स्थानकातच हार्ट अ‍ॅटॅक आला. मी त्या वेळी क्लिनिकमध्येच होतो. त्या व्यक्तीला क्लिनिकमध्ये आणण्यात आलं. मी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्वरित त्यास रुग्णवाहिकेने सायन रुग्णालयात पाठवलं. तिथे त्याच्यावर तत्परतेने अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. आठ दिवसांनी ती व्यक्ती माझ्या क्लिनिकमध्ये आली. तुम्ही होता म्हणून माझा जीव वाचला, असं म्हणून ते रडायला लागले.”

रेल्वे स्थानकातील रेल्वेच्या आरोग्य सेवेपेक्षा ‘वन रुपी क्लिनिक’ वेगळं आहे. रेल्वेच्या आरोग्य केंद्रात केवळ प्रथमोपचार दिले जातात. वन रुपी क्लिनिक हे परिपूर्ण इमर्जन्सी क्लिनिक आहे. ऑक्सिजन सिलिंडर, डिफिब्रिलेटर मशीन, नेब्युलायझर, इमर्जन्सी औषधं आदींनी ते सुसज्ज असतं. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या रुग्णांवर तेथे उपचार करता येतात. नेत्रोपचार, त्वचाविकारांवरील उपचारही येथे वाजवी दरात केले जातात. क्लिनिकमध्ये कायम डॉक्टर्स आणि प्रशिक्षित कर्मचारिवृंद उपलब्ध असतात.


संकल्पाचं मूर्त रूप

2015 साली रस्ते अपघातात डॉ. राहुल यांच्या वडिलांच्या डोक्याला जबर मार बसला. त्यांना वर्षभर आयसीयूमध्ये ठेवावं लागलं. त्यानंतरही कायमचं अपंगत्व आलं. मात्र त्यामुळे डॉ. राहुल घुले आणि त्यांचे बंधू डॉ. अमोल घुले यांनी तत्काळ उपचारांचं महत्त्व जाणून सामाजिक भावनेतून कमीत कमी दरात अशा प्रकारची वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प केला. ‘मॅजिक दिल’ ही त्यांची संस्था आणि त्या माध्यमातून चालवली जाणारी ‘वन रुपी क्लिनिक’ ही या संकल्पाचंच मूर्त रूप आहे. डॉ. अमोल घुले हे या संस्थेचे संचालक म्हणून जबाबदारी पाहतात. हे दोन्ही बंधू एमबीबीएस आहेत, तर डॉ. पूजा बांगर या आणखी संचालक आहेत.

अडचणींवर मात

कमीत कमी दरात वैद्यकीय सेवा देणं ही गोष्ट तांत्रिकदृष्ट्या नक्कीच सोपी नाही. रेल्वे स्थानकांवर ही सेवा देण्यासाठी ‘मॅजिक दिल’ला रेल्वेकडून केवळ जागा, पाणी आणि वीज मिळते. त्यासाठीचं भाडंही द्यावं लागतं. मात्र त्याव्यतिरिक्त डॉक्टर्स आणि अन्य कर्मचारी यांच्या वेतनासाठीच दोन ते अडीच लाख प्रतिमहा इतका खर्च येतो. तसंच वैद्यकीय उपकरणांचा, औषधांचा आणि अन्य गोष्टींचा विचार केल्यास खर्चाचं हे गणित वाढत जातं. असं असताना कमी दरात उपचार आणि अन्य वैद्यकीय सेवा देण्याचा हा उपक्रम नक्कीच फायदेशीर नाही.

या खर्चाबरोबरच रेल्वे प्रशासनाच्या नियमांमुळेही या संस्थेला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला. पूर्ण वेळ चालणार्‍या या उपचार केंद्रांमध्ये दिवसभर एमबीबीएस डॉक्टर्स उपलब्ध असतात. मात्र एमबीबीएस डॉक्टरांची उपलब्धता कमी असल्याने सुरुवातील काही ठिकाणी रात्रपाळीसाठी बीएएमएस डॉक्टर सेवा देत असत. त्याबद्दल रेल्वे प्रशासनाने आक्षेप घेऊन हे नियमात बसत नसल्याचं सांगितलं. त्यात काही रेल्वे स्थानकांवरची वन रुपी क्लिनिकची सेवा बंद करावी लागली होती. मात्र आता त्यामागची अडचण समजून घेऊन रेल्वे प्रशासनाने बीएएमएस डॉक्टर ठेवण्यास परवानगी दिली आहे.

अधिकाधिक लोकांना परवडणार्‍या दरात आरोग्य सेवा देणं हाच डॉ. घुले आणि त्याच्या संस्थेचा उद्देश आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील जास्तीत जास्त रेल्वे स्थानकांवर आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न मॅजिक दिलच्या माध्यमातून सुरू आहे.

अपघात टाळण्यासाठी जनजागृती

केवळ आरोग्य सेवा देऊन आपलं काम संपलं असं डॉ. घुले यांना वाटत नाही. ते आरोग्यविषयक वेगवेगळ्या विषयांवर जनजागृती मोहीम राबवतात. रेल्वे अपघातांचं वाढतं प्रमाण बघितल्यावर अपघात टाळण्यासाठी प्रवाशांमध्येच जनजागृती करायला पाहिजे, असं त्यांना वाटतं. ते सांगतात, “एखाद्या बाँबस्फोटात जितके लोक दगावतात, तितकेच लोक रेल्वे अपघातात आपला जीव गमावतात. अनेकांना कायमचं अपंगत्व येतं. मोनिका मोरे अपघात प्रकरण आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तिला आपले दोन्ही हात या अपघातात गमवावे लागले. त्यामुळे प्रवाशांनीच रेल्वेप्रवासात शिस्तीने वागून अपघात टाळले पाहिजेत. त्यासाठी आम्ही एक मोहीम हाती घेणार आहोत. आमच्या प्रत्येक क्लिनिकमध्ये दररोज 70-80 लोक येतात. आम्ही या लोकांकडून प्रतिज्ञापत्रच लिहून घेणार आहोत की, ‘मी चालत्या ट्रेनमध्ये/ट्रेनमधून चढणार/उतरणार नाही. रेल्वे रूळ ओलांडणार नाही, टपावर बसून प्रवास करणार नाही इ.’ खरं तर याबाबत रेल्वेत आणि फलाटावर उद्घोषणा होत असतेच. पण लोक जोपर्यंत प्रतिज्ञा म्हणून या गोष्टी स्वीकारणार नाहीत, तोपर्यंत जबाबदारीने त्या करणार नाही. रेल्वे प्रवासातील स्वयंशिस्त हा आमच्या या चळवळीचा केंद्रबिंदू असणार आहे.”

पुढच्या काळात मुंबईसारख्या महानगरीप्रमाणेच ग्रामीण भागातही परवडणार्‍या दरातील आरोग्य सेवा देण्याचा डॉ. घुले यांचा उद्देश आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात बस स्थानकांच्या परिसरात अशा प्रकारची सेवा सुरू करण्याचा मानस डॉ. घुले यांनी व्यक्त केला.

आज ‘वन रुपी क्लिनिक’ हे मुंबई लोकलसारख्या लाइफलाइनवरचं ‘लाइफसेव्हर’ ठरत आहे. अशा प्रकारच्या कमी दरातील आरोग्य सेवा जितक्या मोठ्या प्रमाणात सुरू होतील, तितक्या मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांचं आरोग्यमान उंचावेल. शासन, प्रशासन यांनीही आपली जबाबदारी ओळखून अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे.

डॉ. राहुल घुले

9819931418