टाइम आणि टाइम्स

11 May 2019 15:35:00

एक टाइम अभारतीय आहे, त्याचा लेखक हिंदू फोबियाने ग्रस्त आहे. आणि दुसरा टाइम्स भारतातील आहे, तो मोदीभक्त नसला, तरी या टाइम्सला भारत समजतो आणि म्हणून या टाइम्सने अशाली वर्मा यांचा लेख छापण्याचे धाडस केले. टाइम आणि टाइड (काळ आणि लाटा) कुणासाठी थांबत नाहीत, अशी इंग्रजी म्हण आहे. तसेच भारतातील स्त्री-पुरुष कोणत्याही अभारतीयाच्या सल्ल्याने मतदान करीत नाहीत. अशाली वर्मा यांनी केलेली ही भविष्यवाणी मोदीभक्तीतून आलेली नाही. वस्तुस्थितीच्या अभ्यासातून आलेली आहे आणि अमेरिकेच्या टाइमचे म्हणणे मोदीद्वेषातून आलेले आहे. त्याचा विरोधकांना फक्त उपयोग आहे.

ज्याचा जन्म इंग्लडमध्ये झाला, ज्याचा बाप मुसलमान आहे, तो पाकिस्तानी होता, पाकिस्तानच्या सत्ता वर्तुळात होता; हा बाप त्याच्याच अंगरक्षकांतर्फे मारला गेला, ज्याची आई दिल्लीच्या सत्ता वर्तुळात फिरणारी तथाकथित मेनस्ट्रीम पत्रकार आहे, असा मुलगा मोदी समर्थक होऊ शकत नाही, हे न सांगता समजण्यासारखे आहे. या मुलाचे नाव अतीश तशीर. याने 20 'मे'च्या Time साप्ताहिकासाठी लेख लिहिला, लेखाचे शीर्षक आहे - 'इंडियाज डिव्हाइडेड चीफ'. लेखकाने प्रश्न केला आहे की, जगातील सर्वात मोठी लोकशाही आणखी पाच वर्षे मोदींना सहन करू शकेल का?

लोकशाही निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असता, अमेरिकेतून प्रसिध्द होणाऱ्या टाइम साप्ताहिकाने आपल्या अंकाची कव्हर स्टोरी मोदींवर का केली? आणि मुखपृष्ठावर मोदींचे चित्र का टाकले? असे दोन प्रश्न सहज निर्माण होतात. अमेरिकेत बसून टाइम साप्ताहिकाला भारत समजतो का? त्यांच्या कल्पनेतील भारत मोदींनी उभा केलेला नाही. मोदींनी भारतीयांच्या कल्पनेतील भारत उभा करण्याचे काम सुरू केले आहे. टाइम साप्ताहिकाला ते आवडत नसेल, तर हा ज्याच्या त्याच्या आवडी-निवडीचा प्रश्न आहे.

अतीश तशीरने आपल्या लेखात जे तारे तोडले आहेत, ते असे आहेत -

* जगातील सर्वात मोठया लोकशाहीत पूर्वी कधी नव्हते एवढे विभाजन झालेले आहे.

* गोमांसावरून काही जणांना झोडून मारण्यात आले.

* योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री करण्यात आले आणि साध्वी प्रज्ञासिंग यांना भोपाळमधून तिकीट देण्यात आले. हे भगवेकरण सुरू करण्यात आलेले आहे.

* भारत हा मोठया लोकशाहीतून पहिला देश असा ठरेल की, जो लोकप्रियतेवर कोसळला आहे.

* मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राज्याचा चेहरा बदललेला आहे. राज्याला जन्मास घालणारे दुर्लक्षित होत आहेत. अल्पसंख्याकांचे स्थान, त्यांच्या संस्था, त्यांची विद्यापीठे, उद्योग समूह, प्रसारमाध्यमे या सर्वांना हानी पोहोचलेली आहे.

* मोदींच्या राज्यात सर्व प्रकारच्या अल्पसंख्याकांवर, ज्यात उदारमतवादी, निम्न जातीचे, मुसलमान, ख्रिश्चन आहेत, त्यांच्यावर आघात झालेले आहेत.

* मोदींचा आर्थिक चमत्कार अयशस्वी झालेला आहे, उलट त्यांनी विषारी धार्मिक राष्ट्रवाद जन्मास घातलेला आहे.

अतीश तशीर यांची ही शब्दांची आतशबाजी आहे. तसे पाहू जाता, या लेखाचे मूल्य कचऱ्याच्या टोपलीत फेकून देण्याच्या लायकीचे आहे. पण टाइम मासिकाची प्रतिष्ठा खूप मोठी आणि त्यात भारताविषयी काय आले, तर आपल्याकडील वृत्तपत्रे ती उष्टावळ वेचायला धावतात. इंडिया टुडे, आउटलुक, इंडियन एक्स्प्रेस यांनी लगेचच टाइमने काय म्हटले, हे छापायला सुरुवात केली.

टाइमचे म्हणणे काँग्रेसला आणि मोदींचा विरोध करणाऱ्यांना सोयीचे असल्यामुळे जर त्यांनी त्याचा उपयोग केला नाही, तर त्यांना बावळट समजले पाहिजे. त्यांनी म्हणायला सुरुवात केली, ''बघा, आम्ही जे सांगितले तेच टाइमने सांगितले. ते आता आंतरराष्ट्रीय झालेले आहे.''

अतीश तशीर स्वतःला पत्रकार समजतो. पत्रकाराचे पहिले कर्तव्य हे आहे की, काहीही लिहिण्यापूर्वी त्याने सत्य काय आहे, हे सर्व बाजूंनी जाणून घ्यायला पाहिजे. मी मुंबईत राहतो आणि वेगवेगळया कारणासाठी भारतात प्रवास करावा लागतो. सर्व ठिकाणी मुस्लीम महिला बुरख्यात असतात. त्या बिनधास्तपणे कॉलेजला जातात, मार्केटला जातात, शॉपिंगला जातात, त्यांच्या सुरक्षेवर शून्य प्रश्न असतो. प्रत्येक ठिकाणी लहान-मोठया मशिदी आहेत. शुक्रवारचा नमाज अदा करायला मोठया संख्येने मुस्लीम बांधव जमा होतात. त्यांना सुरक्षेचे अजिबात भय वाटत नाही. हिंदू-मुस्लीम संमिश्र वस्तीत मुले एकत्र खेळतात, भांडतात आणि पुन्हा एक होतात. अनेक ठिकाणी फळे, भाजी विकणारे मुस्लीम विक्रेते असतात, खरेदी करणारे सर्व हिंदू असतात. त्यांच्यात धर्मावरून कधीही भांडणे होत नाहीत. मुंबईत उबेरचे आणि ओलाचे असंख्य ड्रायव्हर मुसलमान आहेत, ते कधी प्रवाशाला चुकीच्या स्थानी घेऊन जात नाहीत आणि प्रवासीदेखील कधी त्यांच्याशी भांडण करीत नाही. गेली पाच वर्षे भारत सांप्रदायिक दंगलमुक्त भारत झालेला आहे. मुस्लीम बापाच्या घरी जन्मलेला  आणि धर्मांध देशात वाढलेला  अतीश तशीरला भारतातील धार्मिक सौहार्द कसे समजणार?

सगळे ख्रिश्चन सुखात आहेत. देशात दर महिन्याला कोठे ना कोठे नवीन चर्च बांधले जाते. झोपडपट्टयांतून त्यांच्या धर्मप्रचाराचे कार्य न थकता चाललेले असते. त्यांच्या शैक्षणिक संस्था स्वायत्त आहेत. तेथे आरक्षण लागू होत नाही. अल्पसंख्याकांच्या ताशीरच्या बापाच्या देशातही एवढे धार्मिक स्वातंत्र्य नाही. ताशीरच्या बापाची हत्या एका अल्पसंख्याकाला वाचविण्यात झाली, हे ताशीरने विसरता कामा नये. बापाच्या देशात अन्य धर्मीयांची गोष्ट सोडा, अहमदिया मुसलमानांनाही जगू दिले जात नाही. आणि सुफी पंथीयांच्या दर्ग्यांवर, मजारीवर बाँबस्फोट केले जातात - ते मुसलमान असूनदेखील. आपल्या बुडाखाली काय जळते, याची चिंता अतीशने केली पाहिजे.  '


याला उत्तर दुसऱ्या टाइम्सने पूर्वीच दिलेले आहे. हा दुसरा टाइम्स आहे 'टाइम्स ऑफ इंडिया' - भारतातील एक प्रतिष्ठित वर्तमानपत्र. रंग, रूप आणि स्वभावाने हिंदूविरोधी. त्यांचे संपादकीय लेख आणि संपादकीयदेखील हिंदूंची बाजू घेणारे अपवादाने असतात. अशा टाइम्स ऑफ इंडियामध्ये अशाली वर्मा यांचा लेख प्रकाशित झाला आहे. शीर्षक आहे - 'पंतप्रधान मोदी आणि भाजपा - 23 मे 2019ला का जिंकतील?' लेखिका म्हणते - (सारांश) 'मी मुख्यधारेतील पत्रकार नाही. परंतु दिवसातील अनेक तास टीव्हीवरील बातम्या, सोशल मीडिया आणि मुख्य धारेतील वर्तमानपत्रे यांच्या अभ्यासात घालविते. ट्रम्प निवडून येतील याची भविष्यवाणी मी या आधारावर केली होती. ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदेशीर घुसणाऱ्या लोकांचा प्रश्न पुढे आणला. उद्योग क्षेत्रात अधिक रोजगार करण्याचा विषय आणला आणि विदेश व्यापार अमेरिकेच्या फायदाचा कसा होईल, हे विषय आणले.

अमेरिकेतील माध्यमांनी क्लिंटन विजयी होणार, असे चित्र उभे केले होते. मतदानोत्तर चाचणी अहवालदेखील हिलरी क्लिंटनच्या बाजूचे होते. या लोकांना जनतेची नाडी समजली नाही. सामान्य मतदार कसा विचार करतो - मग हा सामान्य मतदार समाजाच्या उच्च स्तरातील असो की निम्न स्तरातील असो, हे या लोकांना समजले नाही. भारतात जवळजवळ प्रत्येकाच्या हातात आता मोबाइल आलेला आहे. अमेरिकन माणसाला याची कल्पनादेखील नाही. मोबाइलमुळे माणसे परस्परांशी जोडली गेलेली आहेत. एकमेकांशी त्यांचे आदान-प्रदान सतत चालू असते.

सामान्य माणसांच्या मनात काय चालू आहे, हे भारतातील घराणेशाहीवर चालणाऱ्या पक्षांना समजत नाही. अगदी खालच्या स्तरावर असणारे लक्षावधी काय विचार करतात आणि ते कसे मतदान करणार आहेत, हे घराणे चालविणाऱ्या लोकांना समजत नाही.

कोण जिंकण्याच्या शर्यतीत आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर समाजातील तरुण वर्ग काय विचार करतो आणि तो कोणाला मत देणार आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. त्याच्याशी संवाद साधल्यानंतर वारे कोणत्या दिशेने वाहतात, हे लक्षात येईल. भारत हा दहा वर्षांपूर्वीचा भारत राहिलेला नाही. लोकांच्या हे लक्षात आलेले आहे की, जर राजकीय इच्छाशक्ती प्रकट केली तर काहीही मिळविता येईल. भारतातील तरुणांत देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी आहे. भारताच्या उत्थानात त्यांना रस आहे. ते पाहतात की, दिल्ली रेल्वे स्टेशन विमानतळासारखे झालेले आहे आणि वाराणसीतील घाट अतिशय स्वच्छ झालेले आहेत. हे सर्व ठिकाणी व्हावे अशी त्यांची इच्छा आहे.

विकास कोण चांगला करील, कोण भारताला सुरक्षित आणि सन्मानित करील, आणि कोण विकासाचा दर दोन आकडयाचा करील, हे या निवडणुकीतील प्रश्न आहेत. लोकांना फुकटची आश्वासने नको आहेत. ते आता नव्या युगात जाण्यास उत्सुक आहेत. यासाठी ते मतदान करतील, याची मला खात्री आहे.'

एक टाइम अभारतीय आहे, त्याचा लेखक हिंदू फोबियाने ग्रस्त आहे. आणि दुसरा टाइम्स भारतातील आहे, तो मोदीभक्त नसला, तरी या टाइम्सला भारत समजतो आणि म्हणून या टाइम्सने अशाली वर्मा यांचा लेख छापण्याचे धाडस केले. टाइम आणि टाइड (काळ आणि लाटा) कुणासाठी थांबत नाहीत, अशी इंग्रजी म्हण आहे. तसेच भारतातील स्त्री-पुरुष कोणत्याही अभारतीयाच्या सल्ल्याने मतदान करीत नाहीत. अशाली वर्मा यांनी केलेली ही भविष्यवाणी मोदीभक्तीतून आलेली नाही. वस्तुस्थितीच्या अभ्यासातून आलेली आहे आणि अमेरिकेच्या टाइमचे म्हणणे मोदीद्वेषातून आलेले आहे. त्याचा विरोधकांना फक्त उपयोग आहे. विरोधकांमध्ये जान फुंकण्यासाठी टाइमने हे बेटाइम लेखन छापले, असे जर कुणी म्हटले तर ते चूक नसेल.

vivekedit@gmail.com

 

Powered By Sangraha 9.0