पेस्ट कंट्रोलची गरज

03 Apr 2019 12:56:00

हल्लीच्या गृहरचनेत कमी जागेत अधिकाधिक सोयी करण्यावर भर देण्यात येतो. कधी कधी अशा रचना साफसफाईच्या दृष्टीने सोयीस्कर नसतात. याची योग्य ती काळजी घ्यायची असेल, तर पेस्ट कंट्रोल हा उत्तम पर्याय आहे.

 

गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा. हा संवत्सराचा पहिला दिवस होय. या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली, असे हिंदू धर्मात मानले जाते. त्यामुळेच हा सण हिंदू धर्मशास्त्रानुसार निर्मितीचा, सर्जनाचा म्हणून ओळखला जातो. या दिवसांत निसर्गात चैतन्य फुललेले असते, प्राणी, सृष्टी यामध्ये एक उत्साह सळसळत असतो. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व आपल्या सणांमध्ये दिसत असते. पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जात असतो. आपल्या सणांमध्ये पत्री, पाने, फुले इत्यादींना महत्त्व आहे. गुढीपाडव्याला आवर्जून वापरली जाणारी एक वनस्पती म्हणजे कडुलिंब. या वनस्पतीचे अनेक आरोग्यदायक फायदे जसे आहेत, तसेच हे झाड नैसर्गिक 'मॉस्किटो रिपेलन्ट'देखील आहे. पूर्वी घरे शेणाने सारवली जायची, त्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होत असे. आपण अशा अनेक नैसर्गिक घटकांच्या मदतीने उपाय करीत होतो.

वर म्हटल्याप्रमाणे 'मॉस्किटो रिपेलन्ट' म्हणून कडुलिंबाच्या पानांचा सररास वापर केला जात असे, तसेच गृहसंरक्षणासाठी निसर्गामध्ये आपल्याला अनेक पर्याय उपलब्ध होते. परंतु आताच्या सुपरफास्ट युगात असे उपाय करणे वेळेच्या दृष्टीने खर्चीक समजले जाते. 

 शहरी भागात बांधण्यात येणारी घरे कमी जागेत उत्कृष्ट सजावटीची असतात. कमी जागेत अधिकाधिक सोयी करण्यावर भर दिलेला असतो. भिंतीतील वॉडरोब, मॉडयुलर किचन, शो-केस, चप्पल स्डँड, छोटया बाथरूम्स, बुक शेल्फ, स्टोअर रूम इत्यादी. कधी कधी साफसफाईच्या दृष्टीने ही रचना सोयीची नसते. याची योग्य ती काळजी घ्यायची असेल, तर पेस्ट कंट्रोल हा उत्तम पर्याय आहे.

आज बऱ्याच जणांचा घरात कमी आणि ऑफिसमध्ये जास्त वेळ जातो. स्वाभाविकच घराच्या स्वच्छतेवर याचा परिणाम जाणवू लागतो. हाताबरोबर केल्या जाणाऱ्या साफसफाईचा नंबर आठवडयावर केव्हा येऊन पडतो, हे आपल्यालाच कळत नाही आणि हेच रूटिन होऊन जाते. कीटकांचे पहिले सैन्य (मुंग्या) येऊन उभे राहते, ते एका रांगेने. झुरळे त्यांची डोकी काढून मधूनच आपल्याला इशारा देत राहतात. पालीचे दर्शन झाल्यानंतर तर आपली घाबरगुंडीच उडते. ही सारी मंडळी घरात वावरू लागली की, आपण त्यांच्या हकालपट्टीसाठी उपाय शोधायला लागतो. घरात एकदा कीटकांचा वावर वाढला की तो त्रासदायक तर होतोच, तसेच अनेक आजारांना निमंत्रण देतो. त्यामुळे या कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी किमान वर्षातून एकदा तरी पेस्ट कंट्रोल करायला हवे. पेस्ट कंट्रोल करायचे ठरविल्यानंतरदेखील विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा. पेस्ट कंट्रोलचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. आपल्या सोयीनुसार आपण उत्तम पर्याय निवडावा.

पेस्ट कंट्रोल करताना कमी पैशात कुणी करून देत आहे हे न पाहता, त्याचा उत्तम दर्जा आणि परिणाम यावर लक्ष द्यायला हवे, नाही तर आपल्या जिवावरदेखील बेतू शकते. याची अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात. ज्या कंपनीकडे आपण पेस्ट कंट्रोलचे काम देणार आहोत, त्यांच्याकडे परवाना आहे की नाही याची खातरजमा करून घ्या. कारण पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय करणाऱ्यांपैकी जवळजवळ 80% व्यावसायिकांकडे याचा परवाना नसतो. आणि अनेकदा असेच व्यावसायिक आपल्याला कमी पैशात पेस्ट कंट्रोल करून देण्याचे कबूल करतात, यापासून आपण सावध राहिले पाहिजे. पेस्ट कंट्रोल व्यावसायिकांना राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून परवाना देण्यात येतो. व्यवसायिकाची शैक्षणिक पात्रता बी.एस्सी. (केमिस्ट्री) पदवीधर असायला हवी. हा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने रीतसर अर्ज भरल्यानंतर आणि निकषांची पूर्तता झाल्यानंतर त्याला परवाना मिळतो.

घरात पेस्ट कंट्रोल करण्यापूर्वी व्यावसायिकाने घराची पाहणी करणे गरजेचे आहे. घरात नेमक्या कोणत्या कीटकांचा त्रास आहे, त्यासाठी लागणारी औषधे, त्याचे प्रमाण किती असायला हवे; तसेच घरातील एकूण सभासद किती आहेत आणि त्यापैकी कुणाला दमा, ऍलर्जी, हृदयविकार असे आजार आहेत का, शिवाय लहान मुले आहेत का, याचा प्रामुख्याने विचार होणे गरजेचे आहे. पेस्ट कंट्रोल व्यावसायिकांकडे वेगवेगळया प्रकारच्या ट्रीटमेंट्स उपलब्ध असतात. प्रत्येक कीटकासाठी वेगळी किंवा सर्वांसाठी एक असेही पर्याय उपलब्ध असतात.

पेस्ट कंट्रोलचे अनेक प्रकार असतात. आपल्या घरात कुठल्या प्रकाचे कीटक आहेत आणि कशा प्रकारे पेस्ट कंट्रोल केले तर आपल्याला सोयीचे आहे, याचा विचार करून त्यानुसार पेस्ट कंट्रोल करावे.

तसेच कीटकांनुसारदेखील पेस्ट कंट्रोल केले जाते. केमिकल आणि हर्बल दोन्ही प्रकारेही पेस्ट कंट्रोल केले जाते. पेस्ट कंट्रोल हे कराराच्या पध्दतीने किंवा स्वतंत्रदेखील करता येते. तीन ते चाळीस हजारापर्यंत पेस्ट कंट्रोल बाजारात उपलब्ध आहेत, असे सद्गुरू पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेसचे धीरज शिंदे सांगतात.

काळजी

l         आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा.

l         झाडांच्या कुंडयांमध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्या.

  कचरा कचराकुंडीतच टाका.

l         गृहसजावटीसाठी घेतल्या जाणाऱ्या गोष्टी या साफसफाईच्या दृष्टीने सुटसुटीत असाव्यात.

l         झुरळे मुख्यतः वॉश बेसिनच्या किंवा अन्य पाईपमध्ये लपून राहतात. त्यामुळे त्यांची वेळोवेळी स्वच्छता ठेवा.

l         बाथरूमच्या पाईपमधून झुरळ आणि उंदीर घरात प्रवेश करीत असतात. म्हणून रोज बाथरूम स्वच्छ करावे आणि बाथरूमला अटॅच टॉयलेट असेल तर अधिकच काळजी घ्या. शिवाय ठरावीक दिवसानंतर बाजारात मिळणाऱ्या कीटकनाशक स्प्रेचा किंवा गोळयांचा वापर करा.

l बाजारात मिळणाऱ्या कृत्रिम एअर फ्रेशनरपेक्षा नैसर्गिक कापूर, धूप यासारख्या पर्यायांचा वापर करा, जेणेकरून वातावरण प्रसन्न आणि कीटकमुक्त राहण्यास मदत होईल.

l पावसाळयानंतर बरेचदा भिंती ओलसर होतात आणि बुरशीजन्य थर भिंतीवर दिसू लागतात. तेव्हा बाजारात वॉटरफ्रूफिंग बेस रंग मिळतात त्याचा वापर करा. अन्यथा वॉलपेपर हासुध्दा एक उत्तम पर्याय आहे. तो दीर्घकाळ टिकतो.

l पेस्ट कंट्रोल करण्यापूर्वी व्यवसायिकाकडे असलेल्या परवान्याची खातरजमा करा.

l पेस्ट कंट्रोल करताना घरात कुणीही थांबू नका. विशेषतः श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींनी तर त्या बाजूस फिरकूही नये.

l घरात असणारे कोरडे खाद्यपदार्थ पॅकबंद करून ठेवा.

l पेस्ट कंट्रोल झाल्यावर किमान एक ते दोन तास घर बंद ठेवा.

l त्यानंतर खिडक्या, दारे, उघडे करून पंखे चालू करून किमान वीस मिनिटे हवा बाहेर जाऊ द्या आणि नंतरच घरात प्रवेश करा.

l ताबडतोब फरशी धुऊ नका, जेणेकरून औषधांचा चांगला परिणाम दिसून येईल.

वरील सूचनांचा अवलंब करून पेस्ट कंट्रोल करून घेतलेले केव्हाही श्रेयस्कर.

पेस्ट कंट्रोलचे प्रकार

बायोलॉजिकल/ हर्बल - नैसर्गिक पध्दतीने डास, झुरळे, ढेकूण, पाल, इत्यादी कीटक यांची पैदास थांबविणे आणि ती आटोक्यात आणणे. तसेच उपद्रवी कीटकांची तुमच्या घराजवळील वाढ रोखणे.

पॉयझन स्पे्र - उंदीर, झुरळे, इतर कीटक मारण्याचा पर्याय

फ्युमिगेशन - कीटकनाशक धूर सोडून किडयांचा, जंतूंचा, कीटकांचा समूळ नाश करणे.

 

Powered By Sangraha 9.0