राखणदार

02 Apr 2019 18:35:00

कुत्रा या पाळीव प्राण्याने फार पूर्वीच माणसाच्या आयुष्यात राखणदार आणि त्याचा कुटुंब सदस्य म्हणून जागा पटकावली आहे. घरादाराचं, शेतीवाडीचं रक्षण करण्यासाठी घराबाहेर बांधला जाणारा हा सुरक्षा रक्षक आता घराच्या आत आला आहे. मात्र घराची काळजी घेणाऱ्या या लाडक्या प्राण्याची त्याच्या मालकालाही काळजी घ्यावी लागते.   

कुठल्याही गृहसंकुलाची जाहिरात पहिली, तर त्या जाहिरातीमध्ये स्विमिंग पूल, खेळाची लॉन्स, तिथे बागडणारी मुलं आणि पहिल्या फेजमध्ये राहत असलेल्या आनंदी कुटुंबाच्या ऍक्चुअल फोटोत एखादं झुपकेदार शेपटीचं भूभू हमखास दिसतंच. रो हाउसेस असो की बंगले, आलिशान फ्लॅट्स असो की कॉम्पॅक्ट घरं, या सगळयांच्या जाहिरातींमध्ये उडया मारणारा आनंदी खेळकर कुत्रा नसेल तर जणू त्या जाहिराती फाउल समजल्या जात असाव्या. आधुनिक जीवनमानाच्या सर्व सुखसोयींबरोबरच प्राणिप्रेमाचा हा पारंपरिक बंध दर्शवणाऱ्या जाहिरातींचं मला कायम कौतुकच वाटत आलंय. सोफ्यावर उताणं पडलेल्या कुत्र्याच्या फोटोखाली 'तुमचा वैयक्तिक सुरक्षा रक्षकही इथे गाढ झोपू शकतो अशी सुरक्षा आम्ही देतो' असं वाक्य मिरवणारी एक जाहिरात माझ्या मनात घर करून बसली आहे. त्या कुत्र्याला वैयक्तिक सुरक्षा रक्षकाची उपमा देणारं ते वाक्यं किती योग्य आहे नं? पूर्वापार मानवी वस्त्यांमध्ये, उपयोगी प्राण्यांचं वास्तव्य आपल्या गरजेनुसार गृहीत धरलं गेलंय. प्रत्येक प्राण्याची समाजातली जागा मानवाच्या गरजेनुसार ठरवली गेली आणि आजही त्यात विशेष बदल केले गेले नाहीयेत. शेतीच्या, दूधदुभत्याच्या कामासाठी गाय, बैल, म्हैस यांच्याच जोडीला डुकरं, गाढवं, शेळया-मेंढया, कोंबडया, बदकं, ससे, कबुतरं असे प्राणी पाळायला सुरुवात झाली. रानकुत्र्यांचे दूरचे भाऊबंद, अर्थात पाळीव कुत्रे आणि रानमांजरांच्या नातलग मांजरीही या पाळीव प्राण्यांच्या यादीत समाविष्ट झाल्यावर त्यांना काही भूमिकाही देण्यात आल्या, उदा., घराची, शेताची, शेळया-मेंढयांची राखण करण्याची जबाबदारी कुत्र्याकडे सोपवण्यात आली. उंदीर-घुशी मारण्याचं घाऊक कंत्राट मांजरींना देण्यात आलं. उंदीर-घुशी मारणाऱ्या या मांजरी घराच्या आत मुक्कामाला आल्या, पण राखणदार कुत्रे मात्र दाराबाहेरच ठेवले गेले.

राखण करणारा राखणदार घराबाहेरच राहात असल्याने, पूर्वीपासूनच पाळीव कुत्रे शेताच्या, शेतघराच्या, वाडयांच्या बाहेर बांधले जाऊ लागले. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे, होणाऱ्या हालचालींकडे या राखणदारांचं बारीक लक्ष असायचं. नवीन व्यक्ती आल्यास, एखादी अनियमित घटना घडल्यास भुंकून भुंकून गदारोळ उडवणं आणि मालकाला सावध करणं हे यांचं काम. रात्रीच्या वेळी या रखवालदारांचा जागता पहारा असण्याचं कारण म्हणजे, कुत्रे निशाचर प्राणी असल्याने दिवसा झोपून रात्री स्वत:ची हद्द प्राणपणाने जपतात. कळपात राहणं हे दुसरं वैशिष्टय असणारे कुत्रे आपल्या मालकाला किंवा त्याच्या कुटुंबाला स्वत:च्या कळपाचा किंवा स्वत:ला त्याच्या कळपाचा हिस्सा समजत असल्याने ते आपल्या कळप सदस्यांच्या सुरक्षेसाठी प्राणपणाने झगडतात. हा कळप जिथे वावरतो, वास्तव्य करतो, त्या हद्दीची राखण करण्यासाठी सजग राहण्याच्या गुणधर्माचा उपयोग करून घेण्याकडे मानवी कल असतो. याचमुळे कुत्र्याला पाळीव प्राण्यांच्या यादीत सर्वोच्च स्थान मिळालं आहे. बदलत्या काळानुसार, पूर्वीच्या प्रशस्त घरांची, निवासस्थानांची जागा टोलेजंग इमारतींनी आणि आटोपशीर घरांनी घेतलीय. घराबाहेर राहणारा कुत्रा नामक सुरक्षा रक्षक आता घराच्या आत आला आहे. आज जगभर पाळीव प्राण्यांमध्ये सर्वोच्च प्राधान्य दिला गेलेला प्राणी म्हणून कुत्र्याकडे सहज बोट दाखवता येतंय.

कुत्रा पाळताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. निव्वळ हौस म्हणून घरात कुत्रा आणताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टींची यादी करणं गरजेचं असतं. आपल्या घराचा आकार आणि त्यात राहणाऱ्या माणसांची संख्या यांचा विचार सर्वप्रथम करावा. कॉम्पॅक्ट घरांमध्ये उपलब्ध होणारी जागा, तिचा वापर आणि आपल्या कुत्र्याला लागणारी जागा यांचं गणित अनेकदा कठीण होतं. जिथे दरडोई वापराला जागेची कमतरता जाणवते, अशा ठिकाणी मोठया आकाराचे कुत्रे पाळणं मोठी चूक ठरू शकते. मध्यम अथवा लहान आकाराचे कुत्रे अशा ठिकाणी उत्तम ठरू शकतात. घरातल्या इतर सदस्यांना या विशेष सदस्याबरोबर अनेक बाबतीत ऍडजस्टमेंट स्वीकारावी लागते. कुत्र्याचे गळणारे केस, त्यांच्या वावरण्याने, खेळण्याने खराब होणारं फर्निचर, त्यांच्या खाण्यापिण्याच्या, फिरण्याच्या सांभाळाव्या लागणाऱ्या वेळा, वार्षिक लसीकरण या सर्वाचा प्राधान्याने विचार करावा लागतो. कुत्र्याचं पिल्लू विकत घेताना आपली आर्थिक ऐपत, जागेची उपलब्धता यांचबरोबर कुटुंबाची एकूण मनोवृत्ती कशी आहे हे लक्षात घेऊनच कुत्र्याचं पिल्लू घ्यावं. मुळातच गंभीर प्रवृत्ती असलेल्या कुटुंबात खेळकर, मस्तीखोर कुत्रे डोकेदुखी बनतात. त्याच वेळेस, आनंदी आणि उत्साही मनोवृत्ती असलेल्या कुटुंबाला गंभीर स्वरूपाचा कुत्रा नको वाटतो. याचसाठी, हल्ली सरकारमान्य डॉग केनेल्समध्ये पेट काउन्सिलर्स असतात, जे कुत्रा निवडीच्या वेळी ह्या सर्व गोष्टींचा अंदाज घेतात आणि कुठलं पिल्लू घ्यावं हे सुचवतात. अर्थात, आजही अनेक मध्यमवर्गीय घरांमध्ये, भारतीय कुत्र्यांना - अर्थात रस्त्यावरून आणलेल्या पिल्लांना पाळलं जात. माझ्या मते महागडे, परदेशी जातीचे कुत्रे विकत घेऊन पाळण्यापेक्षा रस्त्यावरची लहान पिल्लं पाळल्यास ते उत्तम ठरतं. आपल्या स्थानिक हवामानाची सवय असलेले हे कुत्रे आपलं राहणीमान, खानपान पध्दत लगेच स्वीकारतात आणि उत्तम साथीदार बनतात.

देशी अथवा परदेशी, कुठल्याही कुत्र्याला पाळायचं नक्की केल्यावर त्याला घरात आणल्यावर आपल्या लहान मुलांप्रमाणेच त्याची काळजी घ्यावी लागते. निसर्गनियमानुसार, आपल्या मुलांची वाढ होते त्याच्या सात पट वाढ कुत्र्याची होते. नवीन जागेत आलेल्या पिल्लाची अवस्था केजीत जाणाऱ्या आपल्या लहान मुलांसारखीच असते. नवख्या ठिकाणी रुळताना त्यांना होणारा त्रास, नवीन जेवण, नवीन जागा, आई-भावंडांपासून झालेला दुरावा, नवीन माणसं ह्याची सवय झाली की ते पिल्लू स्थिरावतं. मग त्याला खाण्यापिण्याच्या सवयी, शी-शू करायच्या सवयी लावणं सुरू होतं. अनेक घरांमध्ये लाडाकोडाने बिघडलेली लहान मुलं दिसून येतात. त्या लहान पिल्लाचंही हेच होऊ शकतं. योग्य वेळी, योग्य ठिकाणी शी-शू करणं, ठरावीक वेळी ठरावीक ठिकाणी खाणं ह्या सवयी कुत्र्याला ह्याच काळात शिकवल्या जातात. घर राखणीसाठी कुत्रा पाळताना, त्याला शिस्तीच्या, संरक्षणाच्या अनेक गोष्टी शिकवण्याचा हा महत्त्वाचा काळ असतो. यात उठणं, बसणं, धावणं, पाठलाग करणं, वस्तू हुडकून काढणं, योग्य वेळी भुंकणं, घरातल्या गोष्टींमध्ये मदत करणं यांचा समावेश होतो. ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या समजल्या जातात, कारण यातल्या अनेक गोष्टींमुळे बहुतांश गृहसंकुलांमध्ये पाळीव प्राणी मालक विरुध्द कमिटी अशी भांडणं होत असतात. ऍनिमल वेल्फेअर बोर्ड ऑॅफ इंडियाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कुठलीही गृहनिर्माण संस्था/ सोसायटी फ्लॅटमध्ये पाळीव प्राणी पाळण्यापासून मज्जाव करू शकत नाही. सोसायटीच्या लिफ्ट्समध्ये, पार्कमध्ये, मैदानावर ह्या पाळीव प्राण्यांना आणायला बंदी करता येऊ शकत नाही. कुत्रा भुंकतो म्हणून त्याला तोंडाला मझल बांधून ठेवायची जबरदस्ती मालकावर करता येत नाही. कुत्र्यांना दूर सोडून येण्यासाठी,  अथवा अशा सदस्यांविरुध्द मतदान करून त्यांना सोसायटीबाहेर घालवायचे प्रयत्न केल्यास, प्राणी असलेल्या व्यक्तीला भाडेकरू म्हणून घर नाकारल्यास अशा कमिटीवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. गेल्या काही वर्षांमध्ये प्राणी मालकांचे वारंवार उडणारे खटके लक्षात घेऊनच AWBoIने उपाययोजना केल्या आहेत. मात्र याच जोडीला पाळीव प्राण्याच्या मालकांनी आपल्या कुत्र्यांना फिरायला नेताना शक्यतो मोकळं नेऊ नये, त्यांनी केलेली घाण काढून टाकणं, इतरांना कुत्र्याचा त्रास होणार नाहीय याची काळजी घेणं अपेक्षित आहे. आपण ज्याप्रमाणे घराच्या सेफ्टी डोअर्सची, बेल्सची, ग्रिल्सची काळजी घेतो, त्याचप्रमाणे या जिवंत सुरक्षा रक्षकाची काळजी घेणं गरजेचं असतं. बोलू शकत नसूनही आपल्या डोळयांतून, भुंकण्यातून, चाटण्यातून, शेपूट हलवण्यातून व्यक्त होणाऱ्या कुत्र्याला वार्षिक लसीकरण करून त्यांची नोंदणी करणं, नखं कापणं, कान साफ ठेवणं, नियमित आंघोळ घालणं, योग्य आहार देणं, फिरायला नेणं आणि त्यांच्याशी खेळून गप्पा मारणं गरजेचं असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुत्र्याला प्रेमाची, मायेची गरज असते, जी सर्वात अमूल्य असते. मनात आलं म्हणून कुत्रा पाळणं व कंटाळा आला म्हणून सोडून देणं असं करणं कायद्याने गुन्हा आहे. 

अनेकांना कुत्रे आवडत नाहीत. पण एखादी घटना त्यांच्याकडे पाहायचा दृष्टीकोन बदलते. मध्यंतरी व्हिएतनामच्या युध्दात जगलेल्या अमेरिकन सैनिकांची फिल्म पाहण्यात आली. त्या युध्दातून परत आलेला एक अपंग सैनिक व्याकूळ स्वरात सांगत होता की तिकडे असताना प्रत्येक सैनिकाचा स्वत:चा एक स्थानिक कुत्रा असायचा. हा कुत्रा बेडच्या पायाला बांधलेला असायचा. रात्री कुणी आल्यास शेकडो कुत्रे भुंकून सावध करायचे. जमिनीत पेरलेले हजारो सुरुंग ह्या कुत्र्यांमुळेच कळायचे. अनेक सुरुंग या कुत्र्यांवर फुटायचे नि सैनिक वाचायचे. त्या सैनिकाने त्याचा जखमी झालेला कुत्रा पुढे अमेरिकेत नेला आणि मरेपर्यंत जवळ बाळगला होता. आपल्याकडे शिवाजी महाराजांच्या वाघ्या कुत्र्याने महाराजांच्या चितेवर उडी मारून आत्मसमर्पण केल्याची कथा सांगितली जाते. अशा अनेक कथांमधून भेटणारा, जीव लावल्यास जीव जाईपर्यंत इमानी राहणारा हा जीव खरंच आपली दक्ष सुरक्षा आहे, हेच खरं.

roopaliparkhe@gmail.com

 

Powered By Sangraha 9.0