व्यंगावर मात करणारी यशस्वी उद्योजिका- माया पारखी

06 Mar 2019 18:19:00

व्यंगावर मात करत आणि अनेक संकटांशी झुंज देत यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला आलेल्या पुण्याच्या 'यशराज टूर्स ऍंड ट्रॅव्हल्स'च्या संस्थापिका आणि प्रगतिशील महिला शेतकरी माया यशराज पारखी यांची कहाणी नुसतीच प्रेरणादायक नाही, तर अनुकरणीयदेखील आहे.

 

आज माणूस छोटया-छोटया गोष्टी-प्रसंगांना समोरे जाताना तणावात आणि निराशेत दिसतो. धडधाकट माणूसदेखील ह्या अशा प्रसंगातून जाताना निराश होतो. काही लोक अत्यंत खडतर प्रवास करत यशाचे शिखर गाठतात. काही दिव्यांग व्यक्तीही मनात आशेचे किरण ठेवून आपले इप्सित साध्य करतात आणि समाजासमोर आदर्श निर्माण करतात. असेच एक उदाहरण म्हणजे माया पारखी होय. आपल्यातील शारीरिक न्यूनतेची निराशा मनात न बाळगता माया यशराज पारखी या जिद्दी महिलेने 'टूर्स ऍंड ट्रॅव्हल्स' आणि 'शेती' या क्षेत्रांत देदीप्यमान यश संपादन केले आहे. डाव्या पायाने अधू असलेल्या माया ह्यांनी सर्वांनाच बोटे तोंडात घालायला लावली आहेत. मेहनत, सातत्य, आत्मविश्वास आणि संयम या चतुःसूत्रीच्या आधारे यशस्वी व्यावसायिक बनलेल्या माया पारखी यांची कहाणी ऐकताना अंगावर काटे उभे राहतात.

माया यांच्या जन्माची कहाणी

श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव ह्या ठिकाणी शेतकरी कुटुंबात माया यांचा जन्म झाला. त्यांची घरची परिस्थिती तशी बेताची होती. मायाला वयाच्या तिसऱ्या वर्षी डाव्या पायाला पोलिओ झाल्यामुळे घरातले सर्व जण चिंतेत होते. वाढत्या वयानुसार माया पायावर झुकत झुकत चालत असत, परंतु प्रत्येक दहा पावले चालताना त्या पडत असत. माया ठीक व्हावी म्हणून सर्व जण पूर्णत: प्रयत्न करत होते.

माया म्हणाल्या, ''काही दिवस मला गाईच्या शेणाच्या उकिरडयात छातीपर्यंत पुरून ठेवले तर मी पूर्णत: ठीक होईन, असा आईचा व आजीचा समज होता. मी सकाळी उठले की, दिवसभर त्या शेणाच्या उकिरडयामध्ये ठेवले जायचे. गाईच्या शेणाच्या उष्णतेमुळे माझी रक्ताभिसरण संस्था योग्य कार्य करेल असे माझ्या आईला कोणीतरी सांगितले होते. हा प्रयोग अनेक दिवस चालला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून मला पुण्याच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे नेण्यात आले. अनेक दिवस श्रीगोंदा-पुणे दौरा चालू होता. अशातच आईवडिलाची चिंता दिवसेंदिवस वाढत होती. काय करावे कोणालाच काही सुचत नव्हते. एकतर शेतकऱ्याचे पोट हे नेहमी हातावर असते. पिकले तर पिकले, नाहीतर उपाशी मरण्याची पाळीसुध्दा येते. एका बाजूला कर्जाचा प्रचंड डोंगर वाढत होता, शिवाय मला उपचारासाठी ठिकठिकाणी घेऊन जायचे असल्याने त्यांना शेतीकडेसुध्दा नीटसे लक्ष देता येत नव्हते. घरामध्ये दिवसेंदिवस चिंता वाढतच होती. मला एक मोठा भाऊ आणि एक बहीण आहे. त्या परिस्थितीमध्ये माझ्या पोलिओमुळे आईवडील इतर मुलांकडेसुध्दा दुर्लक्ष करत. माझे पुढे कसे होणार, ह्या चिंतेमुळे आई वडिलांना सतत काळजी वाटत होती. आईला तर रात्र रात्र झोपसुध्दा लागत नव्हती.''

मायाने शिक्षण घेतले पाहिजे, ती शिकून मोठी झाली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे अशी मायाच्या आई-वडिलांची खूप इच्छा होती. आपल्या आई-वडिलांची इच्छा मायांनी सत्यात उतरून दाखविली. शिक्षण घेत असताना कोणकोणत्या अडचणींना समोरे जावे लागले, याविषयी सांगताना माया म्हणाल्या,''काही झाले तरी चालेल. पण मी शिकले पाहिजे अशी आईची इच्छा होती. आई जरी शिकलेली नसली, तरी ती मला कडेवर शाळेत घेऊन जात होती.

खरे तर पावसाळयात गावामध्ये प्रचंड चिखल होतो, शिवाय शाळेमध्ये जाण्यासाठी नदी ओलांडून जावे लागत असे. त्यामुळे आई मला कडेवर घेऊन नदी ओलांडून पलीकडे फार अवघड होते. कधीकधी आई शेतात काम करत असल्यास माझा मोठा भाऊ राजू मला पाठीवर घेऊन पोहत नदीपलीकडे घेऊन जात असे. एकदा तर मला नदी ओलांडून घेऊन जात असताना मी पाठीवरून खाली पडले. माझ्या नाकातोंडात पाणी गेले. माझा भाऊ पोहण्यामध्ये पटाईत होता. त्याने मला मरणाच्या दारातून बाहेर आणले. माझे पहिली ते तिसरीपर्यंतचे शिक्षण गावातल्या ग्रामीण शाळेमध्ये झाले. कालांतराने माझे शिक्षण नीट व्हावे म्हणून मला आत्याकडे (मलठण गावातल्या) जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीत घालण्यात आले.''

अपंग कल्याणकारी संस्थेत मिळाले बाळकडू >

ग्रामीण भागात दिव्यांग मुला-मुलींना शिकत असताना अनेक  प्रश्न उभे राहतात. शारीरिक आणि मानसिक क्षमतेनुसार शिक्षणाचेच वळण बदलावे लागते. काही वेळा अपंगत्वाची तीव्रता लक्षात घेऊन त्यांना घरीच शिकवावे लागते. काही दिव्यांग सामान्य शाळेच्या चौकटीत बसत नाहीत, म्हणून त्यांना विशेष शाळेत घालावे लागते. अशातच ग्रामीण भागात अशी विशेष शाळा नसल्यामुळे मायाची शैक्षणिक परवड होईल की काय, असा प्रश्न मायाच्या आई-वडिलांसमोर उभा राहिला.

या संदर्भात माया म्हणाल्या, ''मलठण गावामध्ये दुसरी एक मुलगीसुध्दा अपंग होती. ती पुण्यामध्ये अपंग कल्याणकारी संस्थेत राहत होती. मलासुध्दा त्या अपंग कल्याणकारी संस्थेत ठेवा असे तिच्या आईवडिलांनी सुचविले. लागलीच आईवडील मला वानवडी-पुणे येथे असलेल्या अपंग कल्याणकारी संस्थेत घेऊन गेले. ती संस्था अत्यंत उत्तम कार्य करते. माझे अपंगत्व किती आहे, हे संस्थेत तपासण्यात आले. माझे व्यंग 50 टक्के होते. त्यामुळे मला संस्थेत सामील करून घेण्यात आले. मी सुरुवातीला जेव्हा या संस्थेत आले, तेव्हा मला नीटसे चालतासुध्दा येत नव्हते. मी काही पावले चालल्यावर पडत असे. संस्थेत आल्यावर माझे जीवन पूर्णपणे बदलले. इथे शिस्त होती, वेळच्या वेळेवर जेवण दिले जात होते. मुलांना साडेपाच वाजता उठून व्यायाम व प्रार्थना शिकविली जात असे. तसेच सर्व दिव्यांग मुलामुलींना जिल्हा परिषदेच्या शाळेत इतर मुलामुलींबरोबर पाठविले जायचे. ऍड. मुरलीधर कचरे व इतर सर्व पदाधिकारी उत्तम कार्य करीत आहे. विशेषत: डॉ. विलास जोग हे गेल्या 24 वर्षांपासून संस्थेच्या मुलामुलींचे मोफत ऑॅपरेशन करीत आहेत. त्यामुळे दिव्यांग मुलामुलींना एक नवीन जीवन प्राप्त होते. संस्थेत जी मुले सरपटत येतात, ती संस्थेतून बाहेर पडताना ताठ मानेने स्वत:च्या पायावर बाहेर पडतात. सुरुवातीला संस्थेत असताना दहावीपर्यंत मला खूप काही शिकायला मिळाले.''

दहावीनंतर माया संस्थेच्या बाहेर पडल्या. संस्थेच्या शिक्षणातून जे बाळकडू मिळाले, त्यामुळेच माया यांना स्वावलंबी बनण्याची प्रेरणा मिळाली. पुण्यातल्या मॉडर्न महाविद्यालयात माया ह्यांनी बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण घेतले. शिक्षण घेत असताना त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहायचे ठरविले. दोन पैसे कमवून घराला हातभार लावण्याचा निश्चय केला. पुरुषोत्तम जाधव ह्यांच्या दूध डेअरीत काही दिवस हिशेब ठेवण्याचे काम करत. हे काम सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत करत करत त्यांनी बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. इथूनच त्यांच्या जिद्दी उद्योजकतेच्या प्रवासाला सुरुवात झाली.

उद्योजकतेचा यशस्वी प्रवास

स्वतःचा व्यवसाय असावा या विचाराने माया यांनी दहा वर्षांपूर्वी 'टूर्स आणि टॅ्रव्हल्स'चा व्यवसाय सुरू केला. हा प्रवास कसा सुरू झाला? याविषयी सांगताना त्या म्हणाल्या, ''बी.कॉम. पूर्ण झाल्यानंतर पुढे काय करायचे ते कळत नव्हते. नोकरीचे अनेक पर्याय होते. पण मला स्वत:चा उद्योग उभारायचा होता. त्यासाठी मी हितचिंतकांचे मार्गदर्शन घेत होते. माझे एक मित्र, जे नंतर माझे पती झाले, त्या यशराज पारखी ह्यांनी मला छान मार्गदर्शन केले. मी एका कंपनीतील मोठया पगाराची नोकरी सोडून टूर्स ऍंड ट्रॅव्हलच्या कार्यालयात फक्त दोन हजार पगाराची नोकरी धरली. सकाळी साडेपाच ते रात्री दहा अशी माझ्या कामाची वेळ होती. सकाळी साडेपाच वाजता मुंबईला पहिली गाडी निघत असे आणि शेवटची गाडी रात्री दहा वाजता जेएम रोडवरून निघत असे. या नोकरीत मुंबईबरोबरच महाराष्ट्रभर जाणाऱ्या गाडयांची तिकिटे बुक करणे व छोटया गाडया भाडयाने देणे हे काम करीत असे. नोकरीत पगार कमी मिळत होता, पण खूप काही शिकायला मिळाले. पैशांची बचत केल्यावर काही वर्षांनी नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करावा असे मला वाटत होते. मी त्याविषयी शालन ट्रॅव्हल्सचे मालक दत्तात्रय कदम ह्यांच्याशी बोलले. त्यावर कदम ह्यांनी मला त्याच ट्रॅव्हल्स व्यवसायात भागीदार होण्याबाबत विचारले. पण मला स्वत:चा व्यवसाय सुरू करायची इच्छा होती. 'कोणावर ओझे व्हायचे नाही आणि कशाची हाव बाळगायची नाही', असा मी संकल्प केला. त्यातूनच स्वतःची 'टूर्स आणि ट्रॅव्हल्स' कंपनी सुरू करण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली. माझे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे पती यशराज यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. व्यावसायिक प्रवासाला सुरुवात केल्यानंतर काही समस्यांना सामोरे जावे लागले, पण पुढे बघता बघता ग्राहकांचा विश्वास संपादन करीत स्वतःचा व्यवसाय यशस्वी केला.''

सध्या माया पारखी यांनी टूर्स आणि ट्रॅव्हल्स या व्यवसायात उत्तुंग भरारी घेतली आहे. शून्यातून सुरू झालेला हा व्यवसाय प्रवास जिद्दीच्या, चिकाटीच्या आणि परिश्रमाच्या जोरावर आज कोटयवधी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भारतभर आणि भारताबाहेर त्यांच्या सहली जात असतात. त्याच्या यशाबद्दल समाजात मोठया प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.

  स्वकमाईतून फुलविला मळा

केवळ टूर्स आणि ट्रॅव्हल्स व्यवसायावर अवलंबून न राहता काळया आईची सेवा करता यावी, यासाठी त्यांनी स्वकमाईतून चार एकर शेतजमीन घेऊन भावाला भागीदार करून त्या शेती व्यवसाय करत आहेत. या विषयात त्यांनी झिरो बजेट शेतीचे प्रणेते पद्मश्री सुभाष पाळेकर यांना गुरू मानले आहे. दोन एकर जागेतील उसामुळे वर्षात दोन लाख रुपये, तर कांदा उत्पादनातून सहा महिन्यांत दोन लाख रुपयांची कमाई केली आहे. तर सध्या पपईबरोबर काकडी, वांगी, कलिंगड व मिरच्या, दोडके ह्यांची लागवड करून आपला मळा फुलविला आहे. शेती व्यवसायाबरोबरच शेळया व गाई पाळून दुग्धव्यवसाय करीत आहेत. शेतीला पुरेसे पाणी मिळावे, यासाठी त्यांनी अर्ध्या एकर जागेत शेततळे घेतले आहे. शेततळयात एक लाख मासे सोडून मत्स्यपालन करण्याची योजना आहे. शारीरिक मर्यादेवर मात करत शेतीत नवीन क्रांती करण्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे.

अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये माया यांच्या जीवनाची सुरुवात झाली. टूर्स-ट्रॅव्हल्स आणि शेती व्यवसायामध्ये आज त्या पूर्णपणे मग्न आहेत. नशिबाने आलेल्या व्यंगाचा हसतमुखाने स्वीकार करत सतत काम करत राहणे, हा त्यांचा मूलमंत्र आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना पुरस्कारदेखील मिळालेला आहे. माया पारखी यांची उद्यमशीलता नव्याने व्यवसायात उतरू पाहणाऱ्या महिलांना प्रेरणा देणार आहे.

 

Powered By Sangraha 9.0