पालकत्वाच्या प्रवासातला वाटाडया

05 Mar 2019 16:51:00

 मुलांना घडवणं म्हणजे एक प्रकारे जन्मदात्यांचंही घडणं असतं. दोघेही घडत असतात, एकमेकांना घडवतही असतात. पालकत्वाच्या वाटेवर चालताना हा दृष्टीकोन ठेवला, तर समाजघडणीवरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. उत्तम माणूस आणि या देशाचे उद्याचे नागरिक तयार करण्याची जबाबदारी जितकी शाळेची, तितकीच - किंबहुना त्याहूनही अधिक घरांची आहे, याची जाणीव या पुस्तकातून होते. 'घार हिंडते आकाशी' हे पुस्तक आपल्यातल्या पालकाला नवी दृष्टी, नवा विचार, नवी प्रेरणा देतं.

 सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

नव्या युगाची नवी आव्हानं सर्व क्षेत्रांत आहेत. घराघरातून होणारं मुलांचं संगोपनही त्याला अपवाद नाही. जैविकदृष्टया जन्मदाते होणं हे एकवेळ सोपं वाटावं, इतकं सुजाण पालक होणं हे आजच्या युगातलं अवघड आणि आव्हानात्मक काम आहे. विज्ञानयुगातल्या यंत्रांशी विशेष मैत्री असलेल्या मुलांना वाढवणं, त्यांना एक संवेदनशील माणूस बनवणं ही पालकांची खरोखर कसोटी आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत पालक म्हणजे फक्त जन्मदाते अशी स्थिती नव्हती. कारण त्या वेळी एकत्र कुटुंबातली अन्य ज्येष्ठ मंडळीही मुलांवर संस्कार करण्यात, त्यांना घडवण्यात सहभागी असत. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. घरं छोटी झाली आहेत. त्यामागची कारणं काहीही असतील, ती त्या त्या ठिकाणी योग्यही असतील कदाचित, पण कुटुंबं आक्रसून गेली आहेत. या आक्रसण्याचा घरातल्या मुलांच्या घडणीवर परिणाम होतो आहे. तो होऊ नये यासाठी जन्मदात्यांनी स्वत:ला तयार करणं, पालक म्हणून 'अपग्रेड' करणं ही काळाची गरज आहे. जन्मदाते ते पालक हा प्रवास केवळ आपल्या अनुभवांवर आधारित करण्यापेक्षा त्याला काही सुजाण पालकांच्या शब्दबध्द अनुभवांची, त्यांच्या समंजस दृष्टीची जोड मिळाली तर हा प्रवास आनंददायक तर होतोच, तसाच आपल्या मुलांसाठी लाभदायकही होतो. अशी पुस्तकं वाटाडयासारखी सोबत करतात आणि त्यामुळे आपल्यातला पालक भरकटण्याची, गोंधळण्याची शक्यता संपते.

घार हिंडते आकाशी

लेखिका - शेफाली वैद्य

प्रकाशक - इंद्रायणी साहित्य, पुणे

पृष्ठे - 148

मूल्य - 170/- रु.

आपल्यातल्या पालकाला अधिक समंजस बनवणारं, विचारांच्या वेगवेगळया दिशांशी परिचय करून देणारं एक पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालं आहे, ते म्हणजे शेफाली वैद्य यांचं 'घार हिंडते आकाशी' हे इंद्रायणी साहित्य या पुणेस्थित प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेलं पुस्तक. शेफाली वैद्य या विवेक परिवारातील वाचकप्रिय लेखिका आहेत. तशा त्या अनेक नियतकालिकांमधून सातत्याने लेखन करत असतात. अनेक विषयांवर व्याख्यानं देण्यासाठी भारतभर प्रवास करत असतात. फेसबुक, टि्वटर यासारख्या आजच्या लोकप्रिय समाजमाध्यमांमध्ये थेट, सडेतोड लेखनातून त्यांनी स्वत:ची मोहोर उमटवली आहे. त्याचबरोबर त्या एक सुजाण, संवेदनशील आणि कलासक्त पालक आहेत.... किंबहुना हे सर्व करत असतानाही त्या आधी पालक आहेत अशी त्यांची भावना आहे. 'बाकीच्या भूमिका या दिवसातल्या काही ठरावीक काळापुरत्या निभावायच्या असतात, मात्र आई ही भूमिका अखंड निभावण्याची असते' असं त्यांचं मत आहे आणि या विचाराचं प्रतिबिंब त्यांच्या या पुस्तकात जागोजागी पडलेलं दिसतं.

पालक म्हणून आणखी एक वेगळेपण म्हणजे हे आईपण तिळया मुलांचं आहे. एकच मूल असण्याच्या आजच्या काळात एका वेळी एका वयाची तीन मुलं एकसाथ वाढवणं, त्यांच्यातली वैशिष्टयं जपत ती फुलवणं हे अधिक आव्हानात्मक आहे. मात्र आई-वडील दोघांचाही पालकत्व या विषयात एकमेकांशी मोकळा संवाद असेल, आपापले दृष्टीकोन ठाऊक असतील, त्यातलं मुलांसाठी काय योग्य ठरेल याचा सारासार विवेक दोघांमध्येही असेल, तर पालकत्वाचा हा प्रवास किती आनंददायक होऊ शकतो, हे अनुभवण्यासाठी एकदा या पुस्तकाचं वाचन करायला हवं.

साधी, सरळ ओघवती शैली, नेमकी शब्दयोजना, कमालीची सकारात्मक दृष्टी आणि मुलांविषयी मनात भरून राहिलेली ओतप्रोत माया याच्या खुणा पुस्तकात जागोजागी आढळतात. त्याचबरोबर, मुलांच्या जोपासनेत जन्मदात्यांइतकंच अन्य नातेवाइकांचं, शेजाऱ्यापाजाऱ्यांचं, सुहृदांचं आणि मदतनीसांचंही महत्त्वाचं योगदान असतं, याचाही कृतज्ञ उल्लेख पुस्तकात अनेकदा आला आहे, हे या पुस्तकाचं वैशिष्टय आहे.

दिवसाचे 24 तास आईबाबांनी आपल्यासोबत असावं अशी मुलांची अपेक्षा नसते. अतिसहवासाचा काचही होऊ शकतो. मात्र ते जितका वेळ त्यांच्यासोबत असतात, त्या वेळेवर मुलांचा पूर्ण अधिकार असावा अशी मुलांची प्रांजळ अपेक्षा असते. मुलं जे बोलत असतील त्यात त्यांनी रस घ्यावा, त्यांचं पूर्ण लक्ष त्यावर केंद्रित असावं असं मुलांना वाटतं. या लेखनामधून मुलांना दिलेला 'क्वालिटी टाइम' म्हणजे काय याची नेमकी कल्पना येते. चौकशी/उपदेश यापेक्षा अकृत्रिम संवादातून मुलं आईवडिलांच्या अधिक जवळ जातात, हा अनुभव अनेक लेखांमधून शेफाली यांनी मांडला आहे.

एक माणूस म्हणून मुलाला घडवताना अनेक संस्कारांची शिदोरी मुलाला बरोबर द्यावी लागते. हे पाथेय त्याला आयुष्यभर पुरणारं असतं. ते संस्कार शाब्दिक असून चालत नाहीत. वेगवेगळया प्रसंगांतून, अनुभवातून आणि आईवडिलांच्या प्रत्यक्ष वागणुकीतून त्यांना जोखत, निरखत मुलं घडत असतात. त्याच वेळी आईवडिलांनाही घडवत असतात. त्यासाठी आईवडिलांचं मन मोकळं असावं लागतं. तरच मुलांकडून काही शिकता येतं. आई म्हणून शेफाली यांनी असा मनाचा मोकळेपणा दाखवला, त्यातून त्यांच्यातली आई अधिकाधिक शहाणी होत गेली, समृध्द होत गेली, याची कृतज्ञ नोंद त्यांनी वेगवेगळया लेखांमधून केली आहे.

छोटया कुटुंबातून आणि बहुतेक ठिकाणी एकुलती एक म्हणून वाढताना मुलं स्वयंकेंद्री होत चालली आहेत. 'मी, माझं, मला' या त्रिसूत्रीभोवती बहुतेकांचं जग गुंफलेलं आहे. मुलांना समाजाशी जोडण्याची, या समाजाचा आपण एक भाग आहोत, हा समाज ज्या देशाचा घटक आहे त्या देशाप्रती आपली काही कर्तव्यं आहेत याची नुसती पोपटपंची केली, तर त्याकडे मुलांचं दुर्लक्ष होण्याचीच शक्यता असते. त्याऐवजी आईवडिलांच्या कृतीतून समाजाप्रती, देशाप्रती असलेली आस्था त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वात खोलवर झिरपतेही, या विचाराने शेफाली यांनी मुलांची घडण केली. त्यातून मुलांच्या मनात जागृत झालेल्या संवेदनशीलतेचं दर्शन वाचकाला थक्क करतं.

हे पुस्तक म्हणजे गोव्यातील एका नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या त्यांच्या सदराचं संकलन आहे. त्यातून लेखनाला आलेल्या शब्दमर्यादेच्या बंधनामुळे हे लेखन अधिक नेमकं आणि कसदार झालं आहे. सुजाण पालकत्वाच्या वाटेवर युक्तीच्या चार गोष्टी सांगताना त्यांनी कुठेही प्रौढी मिरवलेली नाही वा तात्त्वि उपदेश केलेला नाही. वेगवेगळया प्रसंगांमधून एकेक मुद्दा अगदी अलगद समोर ठेवला आहे. त्यातून ज्याने-त्याने आपल्या झोळीच्या क्षमतेनुसार भरून घ्यावं आणि त्याचा योग्य उपयोग करावा.

बालभवनच्या संचालिका, लेखिका शोभा भागवत यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे आणि कविता महाजन यांची संपादकीय दृष्टी या लेखनावरून फिरली आहे. या दोन्हीमुळे या पुस्तकाच्या गुणवत्तेत भरच पडली आहे.

समाजाची गरज असलेल्या एका महत्त्वाच्या विषयावरचं पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल लेखिकेइतकंच प्रकाशकांचंही अभिनंदन करायला हवं.

- अश्विनी मयेकर

Powered By Sangraha 9.0