श्रीलंका

04 Mar 2019 17:07:00

 'ताम्रपर्णी, चोल, पांडय, केरळ व यवनदेश आदी शेजारच्या राज्यांमध्ये मी मनुष्यांसाठी आणि पशूंसाठी दवाखाने उपलब्ध करून दिले आहेत. तिथे औषधी झाडांची लागवड केली आहे.' 'ताम्रपर्णी राज्य' म्हणजे लंका. बौध्द साहित्यात लंकेचे नाव तंबपंणी असे येते, तर प्राचीन ग्रीक उल्लेख Taprobana असा येतो. ब्रिटिश राजवटीत या पाचूच्या बेटाला सिलोन (Cylone) हे नाव मिळाले. 1948मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षांनी, म्हणजे 1972मध्ये या द्वीपाने श्रीलंका हे आपले प्राचीन नाव पुनश्च धारण केले.

 

प्राचीन साहित्यात श्रीलंकेचा उल्लेख प्रथम रामायणात व नंतर महाभारतात येतो. त्यामधून लंकेची कथा कळते ती अशी - पुलस्त्य ऋषींचा मुलगा विश्रवा. त्याची मुले - कुबेर, रावण, विभीषण, कुंभकर्ण आदी. विश्वकर्म्याने कुबेरासाठी लंका नगरी बांधवली. रावणाने कुबेराला हरवून लंकेचा ताबा घेतला. उत्कृष्ट तटबंदी असलेली, अनेक मजले असलेल्या प्रासादांनी व उपवनांनी सजलेली रम्य नगरी, लंका! स्वत: राम लंकेबद्दल म्हणतो -

अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते।

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥

लंका सोन्याची असली, तरी मला काही ती रुचत नाही रे लक्ष्मणा! मला माझी जन्मभूमी स्वर्गापेक्षाही प्रिय आहे. 

यानंतर श्रीलंकेचा उल्लेख मिळतो तो सम्राट अशोकाच्या शिलालेखात. इ.स.पू. तिसऱ्या शतकात (3rd century BCE) अशोक लिहितो - 'ताम्रपर्णी, चोल, पांडय, केरळ व यवनदेश आदी शेजारच्या राज्यांमध्ये मी मनुष्यांसाठी आणि पशूंसाठी दवाखाने उपलब्ध करून दिले आहेत. तिथे औषधी झाडांची लागवड केली आहे.' 'ताम्रपर्णी राज्य' म्हणजे लंका. बौध्द साहित्यात लंकेचे नाव तंबपंणी असे येते, तर प्राचीन ग्रीक उल्लेख Taprobana असा येतो. ब्रिटिश राजवटीत या पाचूच्या बेटाला सिलोन (Cylone) हे नाव मिळाले. 1948मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षांनी, म्हणजे 1972मध्ये या द्वीपाने श्रीलंका हे आपले प्राचीन नाव पुनश्च धारण केले.

श्रीलंकेवर भारतीय संस्कृतीचा किती प्रभाव आहे, हे पाहायचे असेल तर त्यांचे सिंहली भाषेतील राष्ट्रगीत ऐकावे -

श्रीलंका माता, अप श्रीलंका। नमो नमो, नमो नमो माता।

सुंदर सिरी बरिनी। सुरेंदी अति शोभमान लंका।

धन्य धन्य नेका। माल पल थुरू पिरी, जय भूमी रम्या।

अप हत सप सिरी सथ सदना। जीवनये माता।  

पिलीगनु मेना अपं भक्ती पूजा। नमो नमो माता।

श्रीलंका माता, अप श्रीलंका। नमो नमो, नमो नमो माता।

श्रीलंकेतील सर्व जातींचे, धर्मांचे, वंशांचे, वयांचे नागरिक आणि राजकीय पक्षांचे नेतेसुध्दा 'वंदे मातरम्'च्या धर्तीचे हे राष्ट्रगीत एक सुरात व एक मनाने गातात! (याच आशयाचे राष्ट्रगीत तामिळ या श्रीलंकेच्या दुसऱ्या भाषेतदेखील आहे.)

श्रीलंकेची सिंहली भाषा ही द्रविड भाषांपेक्षा उत्तर भारतीय भाषांच्या (Indo-Aryan Languagesच्या) अधिक  जवळची आहे. तसेच लिहिण्यासाठी वापरली जाणारी सिंहली लिपी ब्राह्मी लिपीची कन्या आहे आणि ध्वजावरील सिंहसुध्दा भारतीय आहे.

सम्राट अशोकाने आपली मुले महेंद्र व संघमित्रा यांना बौध्द धर्माचा प्रचार करण्यासाठी श्रीलंकेला पाठवले. बुध्दाला ज्या वृक्षाखाली बोधी प्राप्त झाली, त्या वृक्षाची एक फांदी, बुध्दाच्या काही अस्थी व बौध्द धर्माची शिकवण घेऊन हे समुद्रमार्गाने लंकेत पोहोचले. 'देवांनांपीय तिस्स' या राजाने अनुराधापूर या राजधानीमध्ये त्यांचे स्वागत केले. महामेघवन हे उपवन विहारासाठी दिले. बोधिवृक्ष आणि बौध्द धर्म रुजायला सुरुवात झाली. अनुराधापूर येथे हा वृक्ष पाहायला आजही गर्दी होते.

इ.स.पू. पहिल्या शतकात (1st century BCE) अभय वट्टगामनी राज्य करीत असताना दक्षिण भारतातील काही राजांनी हल्ला केला, तेव्हा हा राजा 14 वर्षे बौध्द भिक्षूंच्या आसऱ्याने वनात राहिला. पुन्हा सैन्य जमवले आणि आपले राज्य परत मिळवले. राज्यावर आल्यावर त्याने एक मोठा स्तूप बांधला. तसेच त्याने चौथी बौध्द धर्म परिषद आयोजित केली. (या आधीची परिषद सम्राट अशोकाने पाटलीपुत्रमध्ये आयोजित केली होती.) या परिषदेनंतर 400हून अधिक वर्षे मौखिक परंपरेने तिपिटकांमध्ये जपलेली बुध्दाची वचने पहिल्यांदा लिहिली गेली.

साधारण चौथ्या शतकात कलिंग येथे बुध्दाच्या दातासाठी लढाई झाली. त्या वेळी कलिंगच्या राजाने बुध्दाचा दात श्रीलंकेला पाठवण्याची व्यवस्था केली. या दाताची ख्याती अशी होती की ज्याच्याकडे तो दात असेल तो राजा राज्य करेल. बुध्दाच्या दातावर बांधलेलं मंदिर श्रीलंकेत कँडी शहरात आहे.

दहाव्या शतकाच्या दरम्यान दक्षिण भारतात छोल राजे त्यांच्या पराक्रमाने प्रसिध्दीस आले. अतिशय भव्य व शक्तिशाली नौसेना असलेल्या या राजांनी दक्षिणेच्या व पूर्वेच्या समुद्रावर राज्य केले. त्यांचे राज्य केरळपासून इंडोनेशियापर्यंत पसरले होते. या राजांनी काही काळ श्रीलंकेवरसुध्दा राज्य केले. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी, नंतर डचांनी व अठराव्या शतकात इंग्रजांनी श्रीलंकेचा ताबा घेतला. पुढे 1948मध्ये श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाले व तो स्वतंत्र देश झाला.

बौध्द धर्माला काही काळ ओहोटी लागली होती. तसेच पोर्तुगीज राजवटीत ख्रिश्चन धर्म फोफावला होता. श्रीलंकेने म्यानमार येथून बौध्द भिक्षूंना आमंत्रित करून बौध्द भिक्षू संप्रदाय परत स्थापन केला. एकोणिसाव्या शतकात बौध्द व ख्रिश्चन धर्मातील धर्मगुरूंनी एकेमेकांशी वाद केला. या वादात बौध्दांचा विजय झाला आणि तेव्हापासून श्रीलंकेत बौध्द धर्म पुन्हा स्थिरावला. येथून पुढील काळातसुध्दा बौध्द धर्माचा व ग्रंथांचा प्रचार होत राहिला. 1893मध्ये शिकागो येथे झालेल्या धर्म परिषदेत श्रीलंकेतून अंगारिक धर्मपाल या बौध्द भिक्षूने बौध्द धर्माचे प्रतिनिधित्व केले होते. धर्मपालांनी भारतातील काही बौध्द स्थळांचासुध्दा जीर्णोध्दार केला. 

श्रीलंकेचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे, येथे सामान्य लोकांत व राजकीय लोकांत बौध्द भिक्षूंना, धर्मगुरूंना असलेली मानाची वागणूक. विमानात सर्वात आधी भिक्षूंना बोर्डिंग करू दिले जाते. कोणत्या सभेसाठी त्यांना आमंत्रण असेल तर पंतप्रधान व राष्ट्रपतीसुध्दा धर्मगुरू आल्याशिवाय सभा सुरू करत नाहीत असे दिसते. पूर्वेच्या इतर काही देशांत असेच चित्र पाहायला मिळते. ते पुढील काही लेखांत पाहू.

श्रीलंकेतील बौध्द धर्माच्या पूर्वीपासून इथे असलेला हिंदू धर्म व त्या संदर्भातील इतिहास पुढील लेखात.

दीपाली पाटवदकर

9822455650

Powered By Sangraha 9.0