मनोहर आणि मला एकत्र आणणारा दुवा म्हणजे संघाची शाखा. त्यानंतर मी मनोहरचा मदतनीस म्हणून गोव्यात गेलो. 2000पासून ते 2018पर्यंत मनोहरच्या सहवासातील अनेक आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्या वटवृक्षाच्या छायेत अनेक लोक मोठे झाले. तो असताना त्याची थोरवी जाणवत होती. आता त्या थोर माणसाच्या सहवासाला कायमचे मुकल्याचे दु:ख आहे.
मनोहर आणि मी एकाच वर्षी 1972 साली आय.आय.टी. मुंबईला प्रवेश घेतला. तो बी.टेक.च्या प्रथम वर्षाला होता, तर मी एम.टेक.च्या प्रथम वर्षाला होतो. आम्हाला एकत्र आणणारा दुवा म्हणजे संघाची शाखा. त्या वेळी आयआयटीत साप्ताहिक शाखा भरत असे. आयआयटीतले ते भारलेले दिवस होते. आयआयटी शाखेवर संघातली थोर मंडळी येत असत. प.पू. श्रीगुरुजी, मा. एकनाथजी रानडे अशांच्या प्रत्यक्ष भेटी या दरम्यान होत. तेथेच मनोहर पर्रिकर, चंदन रानडे, विद्यानंद देवधर, दिलीप साठे अशा महाराष्ट्रातील आणि गोव्यावरून आलेल्या स्वयंसेवकांना एकत्र आणण्याचे काम महाडचा प्रचारक गणेश जोशीने केले. आज सुमारे 47 वर्षांनंतर त्या वेळच्या मैत्रीचा ओलावा तसाच आहे. दरम्यानच्या काळात कार्यक्रमांच्या निमित्ताने 1-2 वेळा मुंबईला मनोहरची भेट झाली होती. तेव्हा तो राजकारणात गेला नव्हता. गोव्यातील संघकामाची जबाबदारी त्याच्याकडे होती.
मनोहरने बोलावल
मनोहरशी माझी भेट घडवून देण्यास विवेकचे संपादक दिलीप करंबेळकर कारणीभूत ठरले. मी अनेक वेळा विवेकमधून लेखन करत असे. त्यामुळे दिलीपशी घनिष्ठ परिचय झाला होता. एकदा अचानक दिलीपने मनोहरला भेटायला येण्यासाठी निरोप दिला. त्याप्रमाणे आम्ही तिघे भेटलो. काही क्षणातच आमची जुनी मैत्री पुन्हा ताजी झाली. त्या भेटीतच मनोहरने मला गोव्याला त्याचा मदतनीस म्हणून काम करण्याबाबत विचारले. मी तोवर कार्पोरेट जगतात कामाचा अनुभव घेतला होता. मनोहरचा मदतनीस म्हणून काम करताना माझे श्रम आणि बौध्दिक क्षमता एका राज्याच्या जनतेसाठी कामास येईल, याचा मला मनापासून आनंद झाला. त्याच दरम्यान माझे व्यवस्थापनावरील पुस्तक प्रसिध्द झाले होते. दिलीपने माझ्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अनुभवाची मनोहरला कल्पना दिली होती. मला गोव्याला बोलवावे याबाबत दोघांचेही एकमत होते. मी लगेच होकार दिला आणि 2000 साली मी गोव्याला जाणे सुरू केले. काही काळाने मनोहरने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर प्लॅस्टिकमुक्त मोहिमेचा प्रमुख म्हणून माझी शिक्षण खात्याशी संलग्न नेमणूक केली. त्यानंतर काही काळाने गोव्यात राजकीय अस्थिरता आली. नेमके त्याच वेळेस मला अमेरिकेत काम करण्याची संधी चालून आली. मी मनोहरला जाण्याबाबत विचारले. त्याने ''तू जाऊन परत ये. त्या वेळी तू माझ्या अधिक कामाचा असशील'' अशी जणू भविष्यवाणी वर्तविली.
मी 2002 साली अमेरिकेला गेलो, तो 2008 साली परतलो. 2009 साली माझ्या लहान मुलीच्या, अदितीच्या लग्नाला मनोहर आणि दिलीप दोघेही नाशिकला आले होते. त्यांच्या येण्यामुळे लग्न समारंभाची शोभा वाढते म्हणजे काय, याचा आमच्या कुटुंबाने अनुभव घेतला. खरे तर त्या वेळी मनोहरची बायपास शस्त्रक्रिया नुकतीच झाली होती. मनोहरबरोबर माझ्या कुटुंबीयांनी मनसोक्त छायाचित्रे काढली. मला गोव्याला बोलविण्याबाबत मनोहर आणि दिलीप या दोघांचेही एकमत असावे. निघताना मनोहरने मला गोव्याला ये असेच सांगितले. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. मनोहरने माझ्यावर विश्वास दाखविणे आणि नाशिकला केवळ लग्नासाठी येणे हीच गोष्ट फार प्रेरणादायक होती. त्याने गोव्याला बोलावून सांगितले असते, तरी मी गेलो असतो. डिसेंबर 2009मध्ये मी गोव्याला सहकुटुंब राहायला गेलो. गोव्याच्या नऊ वर्षांच्या वास्तव्यात त्याने दिलेली कामे पार पाडण्यात मोठी आनंदाची गेली. 2000पासून ते 2018पर्यंत मनोहरच्या सहवासातील अनेक आठवणी अजूनही ताज्या आहेत.
मनोहरची तीव्र बुध्दिमत्ता, अचाट स्मरणशक्ती, अत्यंत साधेपणाने राहण्याची जीवनशैली, लोकांविषयीचा कळवळा, निर्मळ चारित्र्य या सर्व गोष्टी विशेषकरून तो जेव्हा देशाचा संरक्षण मंत्री झाला, तेव्हा त्या गोव्यापुरत्या मर्यादित न राहता भारतातील सर्व जनतेपर्यंत पोहोचल्या. त्याविषयी गेले काही दिवस ई-माध्यमांमधून व वर्तमानपत्रांमधून बरीच माहिती लोकांपर्यंत पोहोचली आहे. या ठिकाणी मला भावलेल्या आणि मनोहरबरोबर घडलेल्या प्रसंगांच्या काही व्यक्तिगत आठवणी देण्याचा मानस आहे. इथे एक नमूद करायला पाहिजे. मनोहरच्या साठीच्या निमित्ताने साप्ताहिक विवेकसकट अनेक वृत्तपत्रांनी विशेषांक काढले होते. अश्विनीजी मयेकर यांनी आणि गोव्यातील काही संपादकांनी अत्यंत आग्रह केला, तरी इतका घनिष्ठ संबंध असतानादेखील मी एक शब्दही ठरवून लिहिला नव्हता. मी चांगलेच लिहिणार हे अपेक्षित होते. ते उपकाराच्या ओझ्याखाली लिहिले असे लोकांना वाटल्यास माझ्याबरोबरच मनोहरलाही कमीपणा येईल, असे वाटून मी लिखाणासाठी नकार दिला. आता मात्र अनेक गोष्टी मोकळेपणाने सांगता येतील.
गोष्टीवेल्हाळ मनोहर
मनोहरला गप्पा मारण्याचा नाद होता. रंगवून गोष्टी सांगत आपले म्हणणे लोकांपुढे मांडण्याची, मधून मधून खास म्हणी पेरण्याची विलक्षण हातोटी त्याला होती. तो मुख्यमंत्री झाल्यावर त्याला पहिले काही महिने एका वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागत असे, ''तुम्ही तंत्रशाखेचे पदवीधर असून राजकारणात कसे पडलात?'' याचे उत्तर तो गोष्ट सांगून देत असे. एकदा पाण्यात बुडणाऱ्या माणसाला ज्या माणसाने वाचविले, त्याचा सत्कार लोक नदीकिनाऱ्यावर करत होते. त्या सत्कारादरम्यान, वाचविणाऱ्या माणसाची नजर कोणाला तरी शोधत होती. ते लक्षात येऊन कोणीतरी त्याला विचारले की ''तुम्ही काय शोधता आहात?'' त्यावर त्याने उत्तर दिले की ''मला पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला मी शोधतो आहे.'' एका दृष्टीने ते खरेच होते. ज्या कोणी त्या वाचविणाऱ्या माणसाला पाण्यात ढकललेले असेल, त्याला ढकललेल्या व्यक्तीच्या पोहण्याच्या क्षमतेवर नक्कीच विश्वास असावा. मनोहरच्या बाबतीत तसेच खरे होते. ज्या तऱ्हेने मनोहर संघाचे काम करत होता, ते जवळून पाहणाऱ्या दुर्गानंद नाडकर्णी, सुभाष वेलिंगकर, रत्नाकर लेले यांच्यासारख्या ज्येष्ठ संघकार्यकर्त्यांना किंवा दिलीप करंबेळकरसारख्या समवयस्क पूर्व-प्रचारकाला मनोहर राजकीय क्षेत्रातही उत्तम काम करेल याचा विश्वास होता. संघाच्या योजनेतून मनोहरला राजकारणात ढकलण्यात आले असेच म्हणता येईल. तो विश्वास अनाठायी नव्हता, हे तर मनोहरने सिध्द केलेच, त्याचबरोबर अनेक क्षेत्रांत गोव्याचे तारू काठाला लावले. अटल सेतूचे उद्धाटन हा कळसाध्याय ठरला. अगदी अलीकडचा महत्त्वाचा प्रकल्प ज्यात मी सहभागी होतो, तो सालीगावचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मनोहरच्या निर्णयामुळेच मार्गी लागला. प्रकल्प सुरू झाल्यावर तेथे दिवसाला सुमारे 8000 घ.मी. बायोगॅस जाळण्यात येत असे. त्यासाठी मी आधीच्या प्रशासनाकडे पाठपुरावा करत होतो. त्या वाया जाणाऱ्या गॅसपासून वीज निर्माण करण्याचा प्रकल्पसुध्दा मनोहरमुळेच मार्गी लागला.
गोव्यात चित्रपट महोत्सव, ईफ्फी आणि अनेक प्रकल्प मनोहरने कसे आणले, यासाठी तो कसा अणि किती झटला यावर पूर्वी अनेकांनी लिहिले आहे. काम करण्याची अचाट क्षमता, भ्रष्टाचारविरहित आणि निर्मळ चारित्र्य यामुळे मनोहर गोवेकरांच्या गळयातील ताईत बनला नसता, तरच नवल ठरले असते.
योग्यता पाहून काम
मनोहर मुख्यमंत्री होण्यापूर्वी काही काळ गोव्यात जणू अराजक होते. थेट मुख्यमंत्र्यापासून खालपर्यंत टक्केवारीने कामे चालत. मुख्यमंत्री झाल्यानंतर एका प्रकल्पासंदर्भात एका आयएएस अधिकाऱ्याने मनोहरला त्याच्या कमिशनबाबत बेधडक विचारण्याचे साहस केले. मनोहर ही काय चीज आहे, याची त्या बिचाऱ्याला कल्पना नसावी. मनोहरने त्या अधिकाऱ्याला ताबडतोब सस्पेंड केले. कमिशनची रक्कम वजा करून प्रकल्पाची किंमत कमी करवून घेतली. त्यात गोवा राज्याचा कोटयवधीचा फायदा झाला. हा अधिकारी धडाडीचा होता. त्या वेळेस पणजीतील मार्केट अतिशय गलिच्छ स्थितीत होते. अनेकांचे हितसंबंध गुंतले असल्याने त्याला हात लावायला कोणी धजावत नव्हते. मनोहरने त्या अधिकाऱ्याला परत कामावर घेताना मार्केटचे काम मार्गी लावण्याचे आव्हान दिले. त्यानेही बेधडकपणे काम करून पणजी मार्केटची प्रशस्त अशी इमारत उभी केली. कोणाकडून कोणते काम करून घ्यायचे याची मनोहरला पुरेपूर जाण होती.
माझ्या स्वत:च्या बाबतीत मनोहर विविध प्रकारच्या कामांची जबाबदारी माझ्यावर टाकत गेला. 2000 साली मला प्लॅस्टिकमुक्त गोवा अभियानाचे काम दिले. 2009मध्ये पुन्हा गोव्याला बोलावून, प्रथम माझ्यावर गोव्यातील महिलांसाठी चालू केलेल्या महालक्ष्मी ट्रस्टची जबाबदारी टाकली. दै. गोवादूतच्या व्यवस्थापनात लक्ष घालण्याचे काम दिले. त्या वेळी तो विरोधी पक्षनेता होता. मुख्यमंत्रिपदावर आल्यानंतर त्याने माझ्यावर पर्यायी ऊर्जा क्षेत्राशी संबंधित गोवा ऊर्जा विकास यंत्रणा या विभागाची जबाबदारी टाकली. त्याच दरम्यान पर्यावरणाशी संबंधित समितीचे अध्यक्षपदही दिले. या सर्व जबाबदाऱ्या निभावताना माझे तांत्रिक ज्ञान तसेच तंत्रज्ञाचे सामान्यज्ञान (Common sense of a technocrat) हे दोन्ही कसाला लागले.
असेच एक काम येता येता राहून गेले. संरक्षण मंत्री असताना एका गोव्याच्या भेटीत त्याने मला मॅरियॉट हॉटेलमध्ये बोलावून घेतले. त्या वेळी त्याने सांगितले की संरक्षणविषयक संशोधन करणाऱ्या संस्थांमधील तरुण संशोधकांशी सुसंवाद साधण्याचे (Interacting with young scientists in defence laboratories) आणि वैचारिक आदानप्रदान करण्याचे काम मला देण्याचा त्याचा विचार आहे. फक्त मला फिरतीवर राहावे लागेल. देशाच्या संरक्षणाच्या कामात खारीचा वाटा उचलण्याचे महद्भाग्य मिळण्याची ती संधी होती. त्यातच मनोहरने काम दिल्यावर नाही म्हणण्याचा प्रश्न होताच कुठे! मनोहरने माझ्या गणिती, वैज्ञानिक संशोधन क्षमतेबरोबरच तरुण संशोधकांशी सुसंवाद साधण्याच्या हातोटीवरही विश्वास दाखविल्याचा मला अत्यंत आनंद झाला. त्याक्षणी माझे हृदय भरून आले होते. मी तिथल्या तिथे मनोहरला होकार दिला आणि सांगितले, ''मनोहर, तू सांगशील तिकडे मी जाईन.'' घरी आल्यानंतर पत्नी उषाला मी ती बातमी सांगितली, तेव्हा ती म्हणाली की, ''तुमच्या मित्राकडून कधीमधी बायकोलाही बरोबर नेण्याची परवानगी मागून घ्या.'' पण ते व्हायचे नव्हते. तो दिल्लीला गेला आणि काही दिवसांत पुलगावच्या लष्करी उत्पादन कारखान्यात जबरदस्त मोठा अपघात झाला. त्यानंतर उरी आणि पठाणकोट येथील अतिरेकी हल्ले हे सर्व देशाला हादरवून गेले. पाठोपाठ सीमेपलीकडे घुसून लष्कराने पाकिस्तानातील अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले. या सर्व धामधुमीच्या काळात मला संरक्षण खात्यातर्फे संशोधन सल्लागार पदावर घेण्याची योजना कदाचित दिल्लीच्या नोकरशाहीच्या लालफितीत रुतून पडली असावी. इकडे गोव्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. अनपेक्षितपणे मनोहरला मुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले. माझ्यावर येऊ शकणारी जबाबदारी दृष्टिआड झाली.
नेमकेपणाचा आग्रही
मनोहरने 2013 साली मला गोवा ऊर्जा विकास यंत्रणेचे काम दिले. त्या वेळी ते खाते मनोहरकडे होते. माझ्या खात्याच्या फायली निर्णयासाठी मनोहरकडे जात असत. त्याला दोन पानात सामावतील इतक्याच विस्ताराची 'नोटिंग' आणि तीही मोठया फाँटमध्ये अपेक्षित असे. परिपूर्ण माहिती देणाऱ्या तशा नोटिंग तयार करून पाठविणे ही बौध्दिक कसरत असे. त्यावरील त्याचे अभिप्राय वाचण्यासारखे असत. पर्यायी ऊर्जा क्षेत्राशी निगडित अद्ययावत माहिती त्याला असे.
कौतुकाची थाप
चांगल्या कल्पनांना, कामाला मनोहर दाद, प्रतिसाद देत असे. प्लॅस्टिकमुक्त गोवा अभियानाच्या दरम्यान गोव्यात फिरत असताना भव्य आणि सुबक तुळशी वृंदावने माझ्या डोळयात भरली. गोव्याचा सांस्कृतिक वारसा म्हणून त्यांचे छायाचित्रण व्हावे, अशी इच्छा मी मनोहरकडे व्यक्त केली. ती त्याने लगेच उचलून धरली. त्याचबरोबर होली क़्रॉसांचीही छायाचित्रे त्यात समाविष्ट करावी अशी सूचना केली. त्याला धरून प्रकल्प प्रारूप द्यायला सांगितले. मला त्या प्रकल्पासाठी गाडी आणि छायाचित्रकार सोबत दिल्याने वर्षभरात तो प्रकल्प पूर्ण झाला. त्या संदर्भात मला फोंडयाचे वास्तुतज्ज्ञ कमलाकर साधले यांना भेटण्यास सांगितले. साधले यांनी दिलेली महत्त्वाची माहिती मी समाविष्ट करून पुस्तकाचा मजकूर आणि छायाचित्रे कला आणि संस्कृती खात्याला सादर केली. कॉफीटेबल स्वरूपात यथावकाश Living Traditions of Emerald Land : TulasiVrindavans and the Holy Crosses of Goa हे पुस्तक मी आणि उषा असे दोन लेखकांच्या नावे प्रकाशित झाले. त्याचे सर्व श्रेय मनोहरला आहे. त्या पुस्तकाला मनोहरने प्रस्तावना लिहिली आहे.
गोव्यातील प्रसिध्द लकाकी लाँड्रीचे मालक दलालांनी एका भेटीत सौर ऊर्जा वापरून वाफ तयार करण्याचे संयंत्र लावण्यासाठी तयारी दाखविली. मी त्यांच्या मागेच लागलो. त्यांनी तो प्रकल्प उभारला. त्याचे उद्धाटन करण्यासाठी मनोहर आला. श्वेता दलाल यांनी आठवण सांगितल्याप्रमाणे, मनोहरने गाडीतून उतरताना पहिला प्रश्न केला की ''उघडया मैदानात असलेल्या संयंत्राची काय काळजी घेणार आहात?'' अनेक गोष्टींकडे त्याचे बारीक लक्ष असे. उद्धाटनाच्या वेळी त्याने मला अगदी शेजारी बसवून घेतले. ती कौतुकाची थाप अजूनही मिटलेली नाही.
त्या वटवृक्षाच्या छायेत अनेक लोक मोठे झाले. तो असताना त्याची थोरवी जाणवत होती. आता त्या थोर माणसाच्या सहवासाला कायमचे मुकल्याचे दु:ख आहे.
drpvpathak@yahoo.co.in