रे झुंजत रहाणे रीतच झुंजाराची!

23 Mar 2019 17:13:00

 कृ.ब. निकुंब यांचा 1954 साली प्रकाशित झालेला 'उर्मिला' हा दुसरा काव्यसंग्रह. झुंजारपणा या वृत्तीवर या एका संग्रहातच तीन-चार कविता वाचायला मिळतात. कुठे झुंजारवृत्तीचं कौतुक आहे, तर कुठे ती लढाऊ  वृत्ती आहे की अगतिकता असा संभ्रम, तर कुठे आपण असे झुंजार का नाही, अशी प्रामाणिक खंत!

एखाद्या कवीच्या मनात एखादी खंत सलत असली, तर ती वारंवार कवितेत येत असेल का? जशी एखादी आठवण, एखादी लाडकी उपमा, आवडतं वृत्त - वारंवार वापरलं जातं, किंबहुना ते मनात इतकं रुजलेलं असतं, की ते सहजभावाने आपसूक डोकावतंच. तसा एखादा छळणारा प्रश्नही कवीच्या रचनांमध्ये परत परत येत असावा.

'घाल घाल पिंगा वाऱ्या'सारखी गोड गाणी व 'माझ्या चंदनी खोडाचा मंत्र : झिजणे झिजणे!' अशा कविता देणारे कृ.ब. निकुंब यांचा 1954 साली प्रकाशित झालेला 'उर्मिला' हा दुसरा काव्यसंग्रह. झुंजारपणा या वृत्तीवर या एका संग्रहातच तीन-चार कविता वाचायला मिळतात. कुठे झुंजारवृत्तीचं कौतुक आहे, तर कुठे ती लढाऊ  वृत्ती आहे की अगतिकता असा संभ्रम, तर कुठे आपण असे झुंजार का नाही, अशी प्रामाणिक खंत! या चारही कविता एकाच संग्रहात आहेत व वर्षभराच्या कालावधीत लिहिलेल्या आहेत.

एकाच वृत्तीबाबतचे निरनिराळया कवितांमधले हे निराळे विभ्रम पाहताना एकच वस्तू अनेक कोनातून निरखत असल्यासारखं वाटतं.

'ही सौंदर्ये' कवितेत निकुंब आपल्या निवांत रसपूर्ण जीवनाचं वर्णन करतात आणि शेवटी म्हणतात,

ही सौंदर्ये, हे काव्य मधुर यांतील

प्रिय मजला होतें, आहे,  प्रिय राहील!

परि आज 'सख्या, हें जीवन अधुरें, अपुरें'

जाणीव जाळते जिवा अशी आंतील!

 

वाटतें अतां कधि : दुपार जळत असावी

उरिं संघर्षाची आतुर हांक घुमावी

क्षणिं अपुलीं अवघीं सामर्थ्यें जुळवून

झुंजारपणांतिल रुद्र चारुता प्यावी!

हे सुखासीन आयुष्य प्रिय आहेच, पण आत कुठेतरी पौरुष सळसळतं आहे, झुंजण्यातलं रांगडं सौंदर्य चाखावंसं वाटतं आहे! 

तर ही एक जोडकविता - ज्यात पहिल्या चार ओळी समान आहेत व पुढील चार ओळी मात्र बरोबर विरुध्द आशयाच्या आहेत.

1 ः प्रक्षुब्ध गर्जतो विराट सागर पुढती

बेफाम जाहला हा तर वादळवारा

करितील वाटते क्षणीं जगसंहार!

माहीत मला हें पूर्णतया असुनीही

दर्यावर देतों सोडुनि माझी नौका! 

 

दे आंतुनि कुणि मज संजीवक संदेश

निज बाहुबलावर काय न तव विश्वास

-- होऊन व्हायचें काय भयंकर अंती ?

या सागरतळिंचा होशिल सुंदर मोतीं

रे, झुंजत मरणें - रीतच झुंजारांची! 

 

2 ः प्रक्षुब्ध गर्जतो विराट सागर पुढती

बेफाम जाहला हा तर वादळवारा

करितील वाटते क्षणीं जगसंहार!

माहीत मला हें पूर्णतया असुनीही

दर्यावर देतों सोडुनि माझी नौका! 

 

छे! उगीच माझा नका करूं सन्मान

गौरवू नका मम वृथा आत्मविश्वास

झुंजार न मी! -- मी नच मृत्युंजय कोणी!

मरणास न समजा माझें हें आव्हान

असहाय मनाचें अगतिक हें बलिदान! 

 

आपल्या उपजीविकेसाठी उधाणलेल्या दर्यात जिवावर उदार होऊन नाव लोटणारा नाविक किंवा पावलोपावली संघर्ष, धोके असणाऱ्या क्षेत्रात काम करणारा कुणीही सामान्य माणूस, सगळे धोके पत्करूनही जीवनसंग्रामाला भिडतच असतो. अशा वेळी शरीरबल, आत्मबल यावर विसंबूनच माणूस डाव खेळतो. 'होऊन होऊन काय होईल? मरण येईल, इतकंच ना? निदान संकटाशी झुंजलो एवढीतरी नोंद होईल!' असा निकराचा विचार करून लढणाऱ्याविषयी खरंच इतरांना आदर वाटतो. त्यांच्या लढयाची आठवण सुंदर मोत्यासारखी झळकत रहाते.

पण हे दुरून पाहणाऱ्यांचं मत!  खरंच जो लढत असतो, त्याच्या मनात काय भाव असेल? तो लढा दर वेळी काही कोणत्या विशेष गौरवास्पद कामाकरिता, देशाकरिता, समाजाकरिता असेलच असं नाही. किंवा त्याच्या मनात तो तसा लढावा असं असेलच, असंही नाही! कित्येकदा माणूस चिडीला येऊन काहीतरी करून जातो नि त्यात यश आलं की लोक त्याला लढा वगैरे म्हणतात! कधी त्याची इतकी कोंडी झालेली असते की त्याला मागे फिरणंही अशक्य असतं. लढत पुढे सरकत राहणं, जगत राहणं एवढंच त्याच्या हाती असतं. 'या असल्या यातना सोसत झुंजत राहण्यापेक्षा मरण बरं' असंही मनात येत असेल, पण तो बांधलेला असतो कर्तव्यांनी, नात्यांनी, अपेक्षांनी... अन मग तो एकटा लढत राहतो.

त्यामुळे 'माझ्या या झुंजण्याला बलिदान वगैरे म्हणून वृथा गौरवू नका हो,  खरं तर माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता' असं म्हणून प्रामाणिकपणे कवी त्या वादळात सापडलेल्या सामान्य माणसाची बाजू सांगतो.

मानवतेकरिता जे झुंजले, त्यांच्या जीवनगाथांपुढे नतमस्तक होताना कवीला वाटतं की मी का नाही बरं असा होऊ शकत? मीही काही सुखासीन आयुष्य जगत नाहीये, मलाही व्याधींशी, संकटांशी, झुंजावं लागतंय, मी दररोज हजार चिंतांच्या शरशय्येवरच निजलेला असतो! मग मला जग त्याच्यासारखं मृत्युंजय म्हणून का गौरवीत नाही बरं? कवीला त्याचं मनच याचं उत्तर देतं -

'दुसऱ्यास्तव लढले ते

झुंजत मी मजसाठी!'

आजारपणाशी लढा देणारा दुसऱ्या रुग्णाला प्रेरणा नक्की देतो. प्रतिकूल हवेत ट्रेक करणारे वा साहसी सहलीला जाणारे त्या प्रकारच्या सहली आवडणाऱ्यांना स्फूर्ती देतात. पण आजारपण अंगावर दागिन्यासारखं मिरवत लोकांसाठी काम करत राहणारा एखादा झुंजार कार्यकर्ता किंवा प्रतिकूल हवामानात, बर्फात, थंडीत शत्रूशी झुंजणारे, सीमांचं रक्षण करणारे सैनिक हे खरंच लोकांच्या काळजात कायम राहतात! कारण ते झुंजलेले असतात इतरांसाठी!  त्यांनी ही झुंज स्वत: होऊन स्वीकारलेली असते. सारं समजत असतानाही ते या झुंजीत जिवावर उदार होऊन शिरलेले असतात. मग ते या झुंजीत पडले, तरीही त्यांची स्मृती समाजमनाच्या तळाशी अनमोल मोत्यासारखी झळकत राहते!

आणि ही चौथी कविता. एका संपलेल्या झुंजीची....

वादळ म्हणजे संघर्ष. वादळ म्हणजे परीक्षा. वादळ खडबडून जागं करतं. वादळ सगळं साचलेपण ढवळून टाकतं. वादळ होत असताना त्रास असतो, पण ते निघून गेल्यावर आपण जे उरतो, ते संपूर्ण नवे असतो!  खूप सोसून, झगडून हातात उरलेलं ते ताजेपण, तो गारवा अपूर्व असतो.  ती संघर्षानंतरची आत्मविश्वासपूर्ण शांतता असते. तो संघर्ष जाता जाता निराशा नव्हे, नवी उमेदच पेरून जातो. ती जीवनाने वादळावर केलेली मात असते.

अशा वादळानंतरच्या शांततेचं हे वर्णन! 

एक वादळ शांत झालंय. झुंज अखेर संपलीय.

साऱ्या भावना एकवटून मनात इवलीही जागा उरू नये, तसं पाणी स्तब्ध झालंय. त्या वादळाचे साक्षीदार असलेले मेघही छिन्न झालेत. इकडेतिकडे भिरभिरताहेत. सैरभैर झालेत. त्याच्या रणक्षेत्रावर, त्या किनाऱ्यावर, त्या ठिकाणी झालेल्या संघर्षाचे वळ अजूनही ओले आहेत, ताजे आहेत. वादळामुळे उधाणलेल्या लाटांनी सोडलेले आठवणींचे अवशेषही किनाऱ्यावर अस्ताव्यस्त विखुरलेत. सगळीकडे मूक शांतता आहे. पाखरंही गप्प झालीत. त्या हबक्याने गाणी विसरून गेलीत. या सोसाटयात विदीर्ण झालेली काही होडकी किनाऱ्याला कशीबशी रेलून बसलीत. सारं संपल्यावरचं हे रिकामं आकाश आणखीनच मोठ्ठं शून्य होऊन समोर उभंय. सारं पाणी आटून गेलेल्या नदीप्रमाणे फुटून फुटून वाहलेला ऊर झालाय रिकामा, कोरडा! सगळं गोळा केलेलं अवसान संपलंय. झुंजच संपली तर आता हे बळ तरी कशासाठी एकवटायचं? एक असाहाय्य शिथिलता आलीय तनामनाला. या दु:खाचा भार जेवढा प्रचंड, तेवढा जडशीळ झालाय श्वास. आणि ते वादळाचं चैतन्य, तो झुंजीचा आवेश सरल्यावर उरलीय सुन्न उदास शांतता...

ही शांतता दु:सह आहे. नकोशी आहे. ही संपायला हवी.

जीवन असंच का विरून जाणार? शरण जाणार?

या पृथ्वीवरचं या किनाऱ्यावरचं हे जीवन पुन्हा जागतं व्हायला हवंय. एक वादळ शांत झालं म्हणून काय? विजिगीषा कायम राहायलाच हवी. जीवन सुरू राहायला हवं. ही शांतता, स्तब्धता, ही जीवनाला एका जागी गाडून टाकेल. ही झुंजारपणाला संपवेल. ही स्तब्धता विरायला हवी. जीवनाने पुन्हा उसळी घ्यायला हवी.

पुन्हा वादळ व्हायला हवं!

झुंजारासारखं झुंजत राहायला हवं!

 

Powered By Sangraha 9.0